पौष शुद्ध ४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


रामचंद्र-बिभीषण-भेट !

पौष शु. ४ या दिवशीं लंकेचा राजा रावण याचा धाकटा भाऊ बिभीषण आणि रामचंद्र यांची भेट झाली. लंकेला आग लावून मारुति गेल्यानंतर रावण पुढें काय करावें या विचारांस असतां बिभेषणानें सुचविलें. - "राम धर्मानें लढत आहे. तेव्हां युद्धाग्नि पेटण्यापूर्वीच त्याची धर्मपत्नी परत करावी. " पण मदोन्मत्त झालेला रावण, कुंभकर्ण, इंद्रजित्‍ यांना हा सल्ला काय म्हणून पसंत पडावा ? शेवटीं "बंधो, धर्माचा मार्ग सोडून आपण वागत आहांत, नीतीचें आणि हिताचें बोलणें तुम्हांला रुचत नाहीं" असें म्हणून बिभीषण तडक रामाकडे येण्यास निघाला. उत्तम अलंकार घातलेला, गदा, खड्ग, आदि आयुधें घेतलेला राक्षस पाहतांच वानरसैन्यांत गडबड उडाली, परंतु, बिभीषणानें समजाविलें, - ‘वानरांनो, मरणार्‍याला जसें औषध रुचत नाहीं, तसेंच माझा उपदेश रावणास पचला नाहीं, आज मी रामचंद्रास शरण आलों आहें. -" ही वार्ता ऐकून सुग्रीवादि वानरांचा बिभीषणावर विश्वास बसला नाहीं; पण रामचंद्रांनी म्ह्टलें, "सुग्रीवा, शरणागताला अभय द्यावें. त्याचा त्याग करुं नकोस, मग तो बिभीषण असो वा रावण असो." त्यानंतर बिभीषण पुढें झाला आणि त्यानें रामाच्या पायांवर डोकें ठेवून ‘आत्मनिवेदन’ केलें. रावणाच्या सामर्थ्याचेंहि खरें वर्णन त्यानें केलें. आणि म्हटलें, - "लंकेवर हल्ला करुन राक्षसांचा नाश करण्यास मी तुम्हांस जिवापाड साह्य करीन." आणि यानंतर राम-बिभीषण यांनीं एकमेकांना आलिंगन दिलें. रामाज्ञेवरुन लक्ष्मणानें समुद्राचें पाणी आणलें. तें घेऊन राम बोलले - "रावणाला प्रहस्त इंद्रजितासह ठार करुन तुला लंकेच्या राज्यावर बसवीन. हें पहा आतांच राज्याभिषेक करतों. -" तेव्हां सर्व वानरांनीं ‘धन्य राजा रामचंद्र’ म्हणून रामचंद्राच्या औदार्याचा जयघोष केला. या राज्याभिषेकानंतर राम, लक्ष्मण, सुग्रीव, बिभीषण, अंगद, हनुमान, इत्यादि लोक समुद्र कसा ओलांडावा याचा विचार करण्यास बसले. आणि त्या दृष्टीनें तयारीस प्रारंभ झाला.

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP