पौष शुद्ध ८

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) पानपतचा अखेरचा संग्राम !

शके १६८३ च्या पौष शु. ८ या दिवशीं पानिपतचा शेवटचा घनघोर संग्राम होऊन सदाशिवरावभाऊ पेशवे यांचा अंत झाला व लढाई थांबली. या दिवशीं सूर्योदयापूर्वी मरुं वा मारूं या भावनेनें मराठ्यांची सेना वीरश्रीनें मैदानावर आली. श्रीमंत भाऊसाहेब व विश्वासराव घोड्यावर बसून निशाणाकडे निघाले. सर्वांच्या अंगांत त्वेष संचारत होता. लढाईचें तोंड भारी लागून मारामारी, खणाखणी, एक प्रहरपर्यंत चालू होती. भाऊसाहेब व विश्वासराव बारा वाजण्याच्या सुमारास घोड्यावर स्वार होऊन स्वत: हल्ल्यांत पुढें झाले. मराठ्यांकडे जयश्री चालून येत होती तों अहमदशहाच्या नशिबानें विश्वासरावास गोळी लागून ते ठार झाले. नानासाहेबांचें निधान हरपलें. भाऊसाहेबांनीं बहुत विलाप केला आणि ‘गिलच्यास खाशानिशीं मारीन’ म्हणून भाऊसाहेब पुढें झाले. जरिपटक्याजवळ भाऊसाहेबांच्यावर गिलच्यांचा भारा पडला होता तिकडे जनकोजी धांवला. भाऊसाहेबांचा चेहरा लाल झाला असून धुळीणें भरला होता, तरवार रक्तानें न्हाली असल्यानें चमकत नव्हती, त्यांनी जनकोजीला शाबासकी दिली. आतां चार घटका दिवस राहिला होता. दहा हजार ताजा दमाचे गिलचे व रोहिले आणि पांच हजार थकलेले पण निर्वाणीच्या शूरत्वानें लढणारे मराठे यांचेमधील हा अखेरचा सामना फारच भयंकर झाला. चारी बाजूंनीं तरवार उसळत होती. भाऊसाहेब दिसतां दिसतां दिसेनासे झाले. तेव्हां जरिपटक्याच्या निशाणाचें घोडें इकडे तिकडे भटकूं लागले. शेवटीं घोड्यावरील निशाण धरणारा मनुष्य ठार झाला. तेव्हां निशाण जमिनीवर पडलें. लढाई बंद झाली. पानिपतचा संग्राम समाप्त झाला. या युद्धांत मराठ्यांची एक सबंध पिढीच्या पिढी कापली गेली. मराठ्यांचा पराजय झाला तरी त्यांतहि शत्रूला जबरदस्त धक्का बसल्यामुळें तो एक प्रकारचा विजयच होता. "Even the battle of panipat was a triumph and glory for Marathas" असा निर्वाळा इंग्रज लेखकहि देतात.

- १४ जानेवारी १७६१
-------------------------

(२) श्रीविष्णुदास माहूरकरांची समाधि !

शके १८३९ च्या पौष शु. ८ रोजीं माहूर येथील प्रसिद्ध सत्पुरुष श्री. विष्णुदास कवि यांनीं समाधि घेतली. यांचा जन्म सातारा येथील धांदरफळे याच्या घराण्यांत झाला. यांना लहानपणापासूनच भगवद्‍भक्तीची आवड होती. लग्न झाल्यानंतर एका वर्षानें हे दत्तदर्शनासाठीं घर सोडून निघाले. तीर्थयात्रा करीत करीत हे दक्षिणेंतील विरुपाक्ष येथील मठांत येऊन श्रीमच्छंकराचार्य यांच्या चरणीं लीन झाले. यांचा सद्‍भाव पाहून स्वामींनीं यांना जिष्णुदास हें नांव दिलें. शेवटीं तीर्थक्षेत्रे करीत करीत हे श्रीक्षेत्र मातापूर येथें आले. पुढें गोदावरी तीरावर बासर येथें यांना सरस्वतीची कृपा प्राप्त झाली; त्यानंतर काव्यरचना करीत यांनी माहूर येथें आपले वास्तव्य कायम केलें. नंतर परमेश्वराची कृपा झाल्यावर यांचे चित्त शांत झालें. कवित्वाला रसालपणा प्राप्त झाला. त्यांत अनुभवाचे अमृतमय बोल प्रकट होऊं लागले. विष्णुकवींच्या या भ्रमणामुळें घरी पत्नी राधादेवी हिची फारच कठीण अवस्था झाली होती. तिचें उत्कृष्ट चित्रण विष्णुकवींनीं आपल्या आत्मचरित्रपर पोवाड्यांत रेखाटलें आहे. घरच्या मंडळींना विष्णुकवींचा शोध लागला. पुन्हा त्यांनीं प्रपंचास सुरुवात केली. परंतु त्याचें वैभव थोडा वेळच टिकलें. पत्नीनिधनानंतर विष्णुदास विरक्त बनले आणि आदि जननी  श्रीरेणुकादेवी हिची उपासना त्यांनीं मोठ्या कळकळीनें सुरु केली. परमेश्वरास आई संबोधून केलेली वात्सल्यभक्ति हा यांच्या कवितेचा विशेष आहे. त्यांची काव्यपद्धति त्यांच्याच शब्दांत अशी सांगतां येईल -
"आरस नाहीं, सरस आहे खिरस गाईचा ।
मिळेना बहु महागाईचा ॥
घ्यावा भासला मधूर केवळ साखरबाईचा ।
आहे बहु तुमच्या सोईचा ॥"
यांचे विस्तृत चरित्र व कवितेचे दोन खंड यांचे भाचे व सच्छिष्य श्री. नरहरशास्त्री खरशीकर यांनीं प्रसिद्ध केले आहेत.

- २० जानेवारी १९१८

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP