पौष वद्य १२
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
वडगांव येथें इंग्रजांचा पराभव !
शके १७०० च्या पौष व. १२ रोजीं वडगांव येथें इंग्रज व मराठे यांचें युद्ध होऊन इंग्रजांचा पराभव झाला; आणि त्यांना मराठ्यांशीं तह करावा लागला. मुंबई प्रातात फ्रेंचांचें वर्चस्व वाढून ते पुण्याच्या दरबारांत सलोखा करीत आहेत असें दिसतांच इंग्रजांना वैषम्य वाटलें. मराठ्यांच्या दरबारीं फ्रेंचांचें वर्चस्व वाढलें तर कंपनीच्या हितास मोठाच धक्का बसणार होता. तेव्हां त्यांच्या प्रतिकारासाठीं कलकत्त्याहून इंग्रजी फौजा खुष्कीच्या मार्गानें मुंबईकडे येऊं लागल्या. मुंबईकरांच्या हातीं असलेल्या राघोबास मराठ्यांच्या स्वाधीन त्यांनी केले नव्हतेंच. या सर्व गोष्टी पुरंदरच्या तहाविरुद्ध होत आहेत असें पाहून मराठ्यांनीहि सामना देण्याचें ठरविलें. नाना फडणीस आणि महादजी शिंदे या जोडीनें जोरांत तयारी सुरु केली. इंग्रजांच्या फौजेंत कर्नल इगर्टन, कार्नक व मॉस्टिन हे तीन अधिकारी होते. त्यांनीं दादा व अमृतराव यांना घेऊन पनवेलखालीं आपलें सैन्य उतरवलें. मराठ्यांचें सैन्य सावध होतेंच. त्यांनीं इंग्रजांना सतावून सोडण्यास सुरुवात केली. वडगांव येथें दोन्ही सैन्यांची गांठ पडली. त्या ठिकाणीं निकराचा सामना होऊन इंग्रजांचा मोड झाला. तहनाम्याचीं बोलणीं सुरु झालीं. त्या वेळीं महादजीनें स्पष्ट बजाविलें, - ‘पुरंदरचा तह तुम्हीं मोडला आहे. प्रथम रघुनाथरावांस स्वाधीन करा आणि मग बोला. आम्हांस लढाईचा बाऊ दाखवूं नका. त्याची आम्हांला मुळींच परवा नाहीं. या ठिकाणी नवीन तह केल्याखेरीज आम्ही तुम्हांस परत जाऊं देणार नाहीं !" तेव्हां तहाच्या वाटाघाटी झाल्या. ‘दादास स्वाधीन करावें, साष्टी, ठाणें, उरण, गुजराथचे महाल इंग्रजांनीं मराठ्यांना परत करावेत, दादापासून दस्ताऐवज परत द्यावेत ....’ याप्रमाणें पौष व. १२ ला वडगांव येथें तह ठरला. आणि नंतर इंग्रज फौजेस परत जाण्यास परवानगी मिळाली. यासंबंधीं इंग्रज रिपोर्टर लिहितो. - " करार पुरा होऊन मराठ्यांच्या अंगचे औदार्य व नेमस्तपणा यांचा लगोलग अनुभव इंग्रजांना आला. जिंकलेल्या शत्रूंना इतक्या सवलतीनें वागविल्याचीं उदाहरणें क्वचितच सांपडतात."
- १३ जानेवारी १७७९
N/A
References : N/A
Last Updated : October 04, 2018
TOP