पौष वद्य ३०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


दोन जन्मठेपींची शिक्षा !

शके १८३२ च्या पौष व. ३० रोजीं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दुसर्‍या खटल्याचा निकाल लागून त्यांना दुसरी जन्मठेप-काळ्या पाण्याची शिक्षा झाली. मायदेशीं सावरकर आले ते नाशिकच्या तुरुंगांतच अटकेंत राहिले. जॅक्सनच्या खुनामुळें सरकार बिथरुन गेलें होतें. स्पेशल ट्रिब्यूनलपुढें खटल्याचें काम सुरु झालें. एकूण सत्तर दिवस खटल्याचें काम चाललें. शेवटीं मार्गशीर्ष व. ८ (२४-१२-१९१०) या दिवशीं निकाल सांगण्यांत आला. त्यांत पहिली शिक्षा सावरकरांना जन्मठेप-काळ्यापाण्याची झाली. सावरकरांना याची जाणीव होतीच. आदल्याच दिवशीं त्यांनीं एक सुंदर काव्य लिहिलें होतें. त्यांत ते मातृभूमीस म्हणतात, "ऋण तें फेडाया । हप्ता पहिला तप्त स्थंडिली देह अर्पितों हा । जननी देह अर्प्रितों हा " यानंतर जॅक्सनच्या खुनास मदत केल्याच्या दुसर्‍या खटल्यास सुरुवात झाली. "कटाच्या खटल्यांत सावरकर यांना जी शिक्षा झाली तिनें सरकारचें समाधान झालें नाहीं. सरकारनें हट्टानें हा दुसरा खटला उभा केला. त्या अर्थी सावरकरांना शक्य तर फांसावर लटकावण्याचा सरकारचा उद्देश आहे असें लोकांना वाटूं लागलें." या खटल्यांत सावरकरांनीं आपली बाजू मांडली, "जॅक्सनच्या खुनाला मदत करण्याच्या बाबतींत माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीनें कांहींहि संबंध नाहीं. " न्यायमूर्तीनीं अर्थातच त्याला मान्यता दिली नाहीं. विलायतेस जाण्यापूर्वी आरोपीचें चरित्र, इंग्लंडमधील त्याचीं कृत्यें, इत्यादीवरुन त्यांनी असा निष्कर्ष काढला कीं, आरोपीने दोन पिस्तुलें सरकारी अधिकार्‍यांचा खून करण्यासाठींच धाडली होतीं, आणि यासाठीं सावरकरांना दुसर्‍यांदा जन्मठेप-काळ्यापाण्याची शिक्षा झाली. यावर या क्रांतिसिंहानें उद्‍गार काढले, "तुम्ही जी परमावधीची शिक्षा सांगितली ती निमूटपणें सोसण्याला मी सिद्ध आहें. आमची प्रिय मायभूमि शाश्वतीच्या विजयाप्रत पोंचावयाची ती हालअपेष्टा व स्वार्थत्याग या मार्गांनींच पोंचेल अशी माझी श्रद्धा आहे." सावरकरांचें सर्वच जीवित याप्रमाणें अद्‍भुत घटनांनीं भरलेलें आहे.

- ३० जानेवारी १९११

N/A

References : N/A
Last Updated : October 04, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP