पौष शुद्ध ३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
"मोंगलांस कृपावंत झाले !"
शके १६८२ च्या पौष शु. ३ रोजीं राघोबादादा यांनीं निजामशीं उरळी येथें अप्रयोजक असा तह केला. पानपतच्या युद्धात मराठ्यांचा प्रचंड संहार झाला आणि कलिपुरुष राघोबादादा कचखाऊ निघाले. ही संधि निजामानें चांगलीच साधली. त्यानें कारवाया सुरु करुन मराठ्यांचे मुलूख घेण्यास आरंभ केला. ‘अविंधानें लबाडी केली. त्याचें पारिपत्य शीघ्रच घडेल’ या विश्वासावर निजामास तोंड देण्याची तयारी मराठ्यांनीं जोराची केली. उद्गीरच्या लढाईंत गेलेला प्रांत परत मिळविण्यासाठीं निजामाची धडपड होती. पानपतावर मुख्य फौजा बुडाल्या, व नानासाहेब दिवंगत झाले यामुळें निजामास पुरतेंच फावलें. माधवराव पेशवे व रघुनाथराव दादा दसर्याच्या मुहूर्तावर बाहेर पडले. गोपाळराव पटवर्धन, बाबूजी नाईक, विसाजी कृष्ण, शहाजी भोसले, विठ्ठल शिवदेव, नारो शंकर, दमाजी गायकवाड, शिंदे, प्रतिनिधि, इत्यादि सर्व सरदार जमा होऊन सत्तर हजार फौज एकत्र झाली. नागपूरकर जानोजी भोसलेहि सामील झाले. युद्धाची झोंबी सुरु झाली. "मोंगल अगदीं हैराण व गार झाला. त्यास असा मार कधीं झाला नाहीं. त्याचें घोडें, माणूस आठशेंपर्यंत ठार, खेरीज जखमी हजार दोन हजार, आमच्या फौजा भारी झाल्या आहेत. श्रीमंतांचें प्रारब्ध उत्तम आहे." अशी स्थिती असली तरी सुद्धां मोंगलांच्या प्रलयामुळें जनता त्रस्त झाली. मराठ्यांना अंतिम यशाची खात्री नव्हती. कारण "दादासाहेबांचें अवशीस बोलणें एक, आणि पहांटेस एक असें आहे. कोणाचे मनांत युद्ध करावेंसें नाहीं. सर्वांचें एकचित्त असल्यास पारिपत्य करणें अगाध नाहीं. परंतु बहुनायकी ...... उभयतां श्रीमंतांचे चित्त शुद्ध नाहीं. दरबार नासलें आहे. मोंगलानें मातब्बर झुंजे केलीं. दौलताबाद, नगर, हिवरे, श्रीगोंदे व भुलेश्वर या ठिकाणीं चांगलीं युद्धें झालीं. ..." अशा प्रकारें विजयाची खात्री असतांहि विचित्र योगेंकरुन दादासाहेबांनीं निजामशीं तह करुन हातचें यश दवडलें. "दादासाहेब भोळा सदाशिव, मोंगलांस कृपावंत झाले-"
- २९ डिसेंबर १७६१
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
TOP