पौष वद्य १३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
शहाजहान बादशहाचें निधन !
शके १५८७ च्या पौष व. १३ रोजीं मोंगलांचा पांचवा बादशहा शहाजहान याचें निधन झालें. शहाबुद्दीन मुहमद किरान उर्फ शहाजहान हा जहांगीर ऊर्फ सेलीमचा जोधपूरच्या राजकन्येपासून झालेला पुत्र होय. सन १६२८ मध्यें हा गादीवर आला. सर्व आप्तांचा नायनाट करुन यानें सन १६३७ मध्यें शहाजीचा पराभव केला व अहमदनगरचा सर्व मुलूख आपल्या ताब्यांत आणला. युरोपियन लोकांच्या बाबतींत हा मोठा धूर्त होता. त्यांनीं धर्माच्या बाबतींत हात न घालावा म्हणून हा अत्यंत दक्ष असे. पोर्तुगीझ धार्मिक जुलूम करतात म्हणून यानें हुबळी नदीच्या कांठीं असलेली त्यांची वखार लुटली. असफखानाची मुलगी मुमताज ही शहाजहानची बायको होती. या मुमताजवर त्याचें फारच प्रेम होतें. तिच्याच स्मरणार्थ यानें जगप्रसिद्ध अशी ताजमहाची इमारत बांधली. असें सांगतात कीं, या इमारतीच्या बांधकामावर वीस हजार मनुष्यें बारा-तेरा वर्षे खपत होतीं. एकूण खर्च नऊ कोटी, सतरा लाख रुपये झाला. याची कारकीर्द म्हणजे मोंगल अमदानीचें सुवर्णयुग होय. हल्लीचें दिल्ली शहर यमुनेच्या काठांवर यानेंच वसविलें. हा मोठा विलासी व रंगेल असे. जुम्मा मशीद, मोती मशीद, दिवाणी आम, दिवाणी खास, वगैरे प्रेक्षणीय इमारती यानेंच बांधिल्या. हा बादशहा वृद्ध झाला तेव्हां वडील मुलगा दारा राज्यकारभार पाहूं लागला. पुढें औरंगजेबानें सर्व बंधूंचा नायनाट करुन शहाजहानास कैदेंत टाकलें व राज्य बळकावलें. आठ वर्षांची कैद शहाजहानास भोगावी लागली, आणि त्यांतच त्याचा अंत झाला. शहाजहान इतरांविषयीं बेपर्वा, वर्तनांत गर्विष्ठ, स्थिर वृत्तीचा व शांत स्वभावाचा होता. युद्धकलेंत त्यांचे प्रावीण्य विशेष होतें. राज्यकारभारांत तो बराच कुशल होता. त्याच्या दरबाराचा डौल विशेष थाटाचा असे. कविताश्रवण, संगीत, नृत्य, नाटक इत्यादींची त्याला विशेष आवड होती. सुप्रसिद्ध मयूरसिंहासनाची निर्मिति यानेंच केली.
- २२ जानेवारी १६६६
N/A
References : N/A
Last Updated : October 04, 2018
TOP