पौष शुद्ध १०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


चिमाजीअप्पांचें निधन !

शके १६६२ च्या पौष शु. १० रोजीं बाळाजी विश्वनाथांचे दुसरे पराक्रमी चिरंजीव चिमाजीअप्पा यांचें निधन झालें. वडिलांच्याबरोबर हे दिल्लीला गेले होते. थोरल्या बाजीरावांनीं मोंगलांविरुद्ध चढाईचें धोरण स्वीकारलें, तेव्हां हे माळवा प्रांतांत मुलुखगिरीवर होते. चिमाजीअप्पांचें नाव वसईच्या युद्धामुळें अमर झालें आहे. सन १७३१ पासूनच पोर्तुगीझ व मराठे यांचा बेबनाव वाढीस लागला. शेवटीं सन १७३८-३९ सालीं मराठ्यांनीं वसईचा संग्राम चांगलाच गाजविला. वसईवर विजय मिळत नाहींसे पाहून मोठ्या वीरश्रीनें चिमाजी बोलले, "वसई ताब्यांत येत नाहीं. माझा हेतु तर ती घ्यावी असा आहे. तरी तोफ डागून माझें मेलेलें शरीर तरी वसईच्या किल्ल्यांत पडेल असें करा." तेव्हां सर्वांना वीरश्री चढली आणि निकराचा लढा झाल्यावर वसईवर मराठ्यांचे निशाण लागलें. "या लढाईमुळें यांचे नांव अजरामर झालें आहे. मराठ्यांच्या इतिहासांत महत्त्वाच्या व अत्यंत जुटीनें केलेल्या लढायांपैकी ही एक आहे. यांत मराठ्यांना फिरंग्याचा तीनशें चाळीस गांवे असलेला पाऊणशें मैल लांबीचा पट्टा, वीस किल्ले व पंचवीस लाखांचा दारुगोळा वगैरे साहित्य मिळालें." त्यानंतर पुढल्या वर्षी यांनीं दीव, दमण यांमधील रेवदंडा नांवाचें ठिकाण काबीज केलें. या वेळीं त्यांची प्रकृति फारच ढासळली होती. स्वारींतून परत आल्यावर पौष शु. १० रोजीं यांचा अंत झाला. यांची पत्नी अन्नपूर्णाबाई यांच्याबरोबर सती गेली. तिचें वृंदावन पुणें येथें ओंकारेश्वराच्या दारासमोर आहे. चिमाजीअप्पा हे शूर, धोरणी, मनमिळाऊ व नीतिमान असे होते. चिमाजीअप्पांची इतरहि पराक्रमी कृत्यें प्रसिद्ध आहेत. शाहूच्या आज्ञेवरुन सिद्दीसातास यांनींच ठार मारिलें. वसईच्या किल्ल्यांत सापडलेल्या फिरंग्यांच्या मुलीस यांनीं सन्मानानें परत पाठविलें ही आख्यायिका यांच्या नीतिमत्तेची साक्ष देते. बाजीरावानें उत्पन्न केलेल्या अनेक प्रकरणांचा निकाल हेच लावीत.

- १७ डिसेंबर १७४०

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP