पौष शुद्ध १४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
"श्रीमंतांच्या राज्याचा आळा गेला !"
शके १७१९ च्या पौष शु. १४ रोजीं मराठेशाहीच्या अखेरच्या काळांतील थोर मुत्सद्दी नाना फडणीस यांना बाजीरावाच्या मदतीनें दौलतराव शिंदे यांनीं कैद केलें व त्यांची सर्व मालमत्ता जप्त केली. या वेळीं मराठी राज्याचे सर्वच ग्रह फिरले होते. महादजी शिंदे व हरिपंत फडके हे नानांचे डावे-उजवे हात कालाच्या ओघाबरोबर निघून गेले होते. सवाई माधवरावाच्या आत्महत्येमुळें मराठेशाहीवर मृत्युयोगच ओढवला होता. पेशवाईचे धनी रावबाजी अगदींच कमकुवत होते. शिंदे यांच्या मदतीनें त्यांनीं नानाविरुद्ध कारस्थानें करण्यास सुरुवात केली. बाळोबा पागनीस, परशुरामभाऊ पटवर्धन हेहि नानांच्या विरुद्ध झाले. तेव्हां नाना महाडास गेले आणि पैसा व बुद्धि या जोरावर त्यांनीं तेथें मोठें कारस्थान उभें केलें. शिंदे यांनाहि आपल्याकडे फितवून घेतलें. आणि बाजीरावास पेशवा नेमून नानांनीं राज्यकारभार पुन्हा हातीं घेतला. शिंद्यांनीं कपट-राजस्थान केलें. भोजनासाठीं म्हणून नाना कांही साथीदार बरोबर घेऊन शिंदे यांच्या सांगण्यावरुन नानांस कैद केलें. "नानांच्या लोकांनीं बराच दंगा केला. पण त्यांस शिंद्यांच्या फौजेनें उधळून लाविलें. या बनावानें पुण्यांत मोठा हाहा:कार उडाला. लोकांची तोंडें काळीं ठिक्कर पडलीं. पेशवाईचा लय होऊन आजपासून बेबंदशाहीसच सुरुवात झाली असें सर्वांना वाटलें." दुसर्या दिवशीं म्हणजे पौष शु. १४ रोजीं नाना व त्यांचे साथीदार यांच्या घराची जप्ती झाली ! ही सर्व चिन्हें पेशवाई समाप्त होण्याचीं होतीं. "नानांस कैदेत घालण्याचा विधि समाप्तीस गेला. याउपरीं श्रीमंतांच्या राज्याचा आळा गेला. आतां जो जबरदस्त त्याचें पागोटें वांचेल. " अशी स्थिति निर्माण झाली. नानांना अहमदनगरच्या किल्ल्यांत कैदेंत राहावें लागलें. पुढें बाजीरावानें आपण निरपराध असल्याचें नानांस सांगितलें. "शिंद्यानें तुम्हांस कैदेंत टाकलें. मी नव्हे. मी तुम्हांस बापाप्रमाणें मानतों. " इत्यादि मिठ्ठास भाषण बाजीरावानें केलें. पुढें नानांची सुटका झाली.
- १ जानेवारी १७९८
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
TOP