[वृत्त भ्रान्त]
पश्चिमेच्या मारुताचे हे उसासे अन का ?
अन हे सेवूं नका.
का असासे टाकितों मी - सत्य घ्या हें अकुनी -
येऊ मी जें देखुनी.
तो पहा दूर प्रतीची, डोम्ब आगीचा पहा,
होय त्याचा ताप हा.
आर्द्र अङगीं सागराच्या लोळुनी आलों तरी
आग होऊ अन्तरीं.
पावलों अत्तुङग सहयाद्रिच्या शृङगावरी
दाह जीवाचा परी.
धूर जो तेथील माझ्या काळजाला झोम्बला
घेरि आणी तो मला.
जाऊना, डोळ्यांपुढूनी द्दश्य जें मी पाहिलें
जाऊना तें साहिलें !
ने कसे कासार - काठीं शान्तिपाठी पण्डिती
मञ्जुनादें मण्डिती.
आणि त्यांची गोड पुङगी दुर्बलांना गुङगवी,
स्वत्व त्यांचें लुङगवी.
जाणती नेणीव साधूंची न साधे ती मला,
जीव हा वैतागला,
कृष्ण राष्ट्राच्या अतिश्रीची घडी ही पातली,
दिग्बुभुक्षा मातली.
धाड घाली लाण्डगी साम्राज्यलोभें झिङगली
श्यामलांच्या जङगलीं
स्वीय अच्छवासासवे दे सोडुनी नाना विषें
मुक्तिदानाच्या मिषें.
अन्तराळातून झेपा घालुनी घारीपरी
वृष्टि अग्नीची करी.
चाङगलें भाजून खावें मांस साङगे संस्कृती
गौरवर्णें चारु ती.
संस्कृतीची याच शिक्षा श्यामलांना द्यावया
पातळी देखा वया.
हीं द्विपाद प्राणधारी जङगली का माणसें ?
मेन्दु हा त्यांना नसे.
बाहुचें सामर्थ्य आहे, कोट छातीचा खडा,
होय जीवाचा धडा.
फोल हें यन्त्रापुढे; बुद्धिप्रतापाच्या पुढे
क्षात्र आता बापुडें.
हें हटे, झुञ्जे हटाने, घाव घे छातीवरी,
साहय कोठे आश्वरीं ?
फोल आता न्यायनीतीच्या जुन्या त्या कल्पना,
धर्मभोळ्या जल्पना,
धर्मबन्धुत्वाचिया डोक्यावरी ही पाय दे
माजली सत्तामदें.
युद्ध धर्माशीच चाले, धर्मयुद्धीं या नव
दीन तो जो मानव
हिंस्र शस्त्रास्त्रें नवीं जो निर्मुनी नानापरी
दुर्बलांना संहरी,
आपुल्या देवापरी जो दुर्बलांचा घातकी
तो कशाचा पातकी ?
हा निमित्ताचा धनी योगेश्वराचा हा सखा
दोष या पार्थास का ?
दुर्बलत्वाला मानी पाप तो जिडकी जगा
सत्य सैतानी बघा.
दोष आता आपुल्या द्या रानटी नीतीप्रती
जीर्ण होऊ क्षिप्र ती.
बायका पोरें रडूं द्या, त्यास रक्षा जोहरीं,
अन रणींचीं मोहरीं
घेऊनी गाडूनि खेतीं, झुञ्जुं द्या हारींत ही
राजपूती रीत ही !
सर्वनाच्या प्रसङ्गीं स्वत्व अर्धें सोडिना
शत्रूमैत्री जोडिना,
त्या नृसिंहाला शहाणे निन्दिती, निन्दोत ते
भानु तो, खद्योत ते !
टेकला अस्ताचलीं तो तापल्या सोन्यापरी
स्वप्रभा दावी खरी.
वानुं द्या चङगीझतैमूरादि जेत्यांना कुणी
दास अर्थाचे गुणी;
या पराभूतापुढे झुञ्जार माझी मान मी
वाकवूनी त्या नमीं.
श्यामलाच्या हे नरेन्द्रा, तूजसाठी आसवें
कृष्ण अच्छवासांसवें.
मीहि जातों संस्कृतीच्या पार कैवल्याश्रमीं -
का भ्रमूं येथे श्रमी ?
खङक त्या दुर्धर्ष गौरीशङकराच्या सङगती -
वीण कोठे सदगती ?
४ मे १९३६