प्रकाशित कविता - जबला रमणी
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[जाति प्रणयप्रभा]
भयचकित नभी जो तुज रमणी
तुडवीहि तोच का तुज चरणीं ? ध्रु०
विपुल काजळी हे कच मादक,
मृगद्दष्टि ही यांना साधक,
स्त्रीत्व अभारे अरिं हृदबाधक.
लीन करी युवकास झणी. १
ध्येयसृष्टी दिव्य अगोचर
मूर्त जणू तुजमधे मनोहर,
तरुण हुरळुनी जाय खरोखर,
जीवनदेवी तूज गणी. २
यांत अनिर्वचनीय जरी सुख,
क्षणिकच तरि हें मनसिज कौतुक
सृष्टीची बघ गोड फसवणुक -
मृगजलदर्शन रूक्ष रणीं. ३
नर नारीला म्हणुनी देवी
पिञ्जर्यांत मैनेपरि ठेवी -
परवशास पण आदर केवी
जरी किति करी लाड धणी - ४
धुन्दी डोळ्यावरिल निवळतां
घ्याताचें त्या स्वरूप कळतां
प्रेमाची न दिसेच अमरता,
नित्यता न चेतोहरणीं. ५
रमणीस्तव होवोत झुञ्जते
धुन्दफुन्द सुन्दोपसुन्द ते,
त्यास्तव लढती श्वान म्हणुन तें
हाडुक होय न वज्रमणी. ६
दावुनि सुन्दरता दुबळी ती
माया अपजविणेंनरचित्तीं
अर्भकास ती शोभे रीती -
हो सहकारी तू रमणी. ७
सौन्दर्ये नर होय मूढवश.
परिचर्येने कृतज्ञ बहुवस.
होऊ कधि तो निष्ठुर नीरस
बघुनि तुझी अश्रुस्मरणी. ८
असलीस जरी त्रिकालजननी
कधीमधी जन लागे भजनीं,
हिरकणीस परि जो मान जनीं
मिळवुं शके न तयास खणी ९
हो व्याघ्रापरि सतेज मादक.
दुबळयांचा बघ देवहि घाटक,
दुबळेपण तर केवळ पातक
असुं दे सर्वंसह धरणी ! १०
तुझें लतापण, तुझें चन्द्रपण
अवनतीस तव झालें कारण,
स्वावलम्बनाविण शुब्दार न !
तळपव तू अपुला तरणी. ११
३ जानेवारी १९३६.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP