मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
अतर्क्य प्रेम

प्रकाशित कविता - अतर्क्य प्रेम

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[वृत्त मन्दाकिनी]

माझ्याकडे हे पाहती की हा कसा आला ऊथे,
आनन्दही चर्या कशी याची खुलूनी दाविते,

बोलावणें गेलें तरी नि:सत्त्व शिष्टाचार हा -
भोळाच किंवा धूर्त ये घेऊनि तो आधार हा,

अन सारिलें प्रेमासवें याला अधिक्षेपें दुरी,
का स्वाभिमानाची छटा नाहीच ती याचे ऊरीं,

का ये करुनी घ्यावया वाया स्वत:ची वञ्चना -
स्वानन्दमग्ना मङगला याच्याकडे पाहीच ना,

माला तिच्या कण्ठीं पडे बोचे कसा काटा न या,
आशीर्वचांच्या वादळीं का ग्रासिती लाटा न या,

सामान्य लोकद्दष्टिचे हे प्रश्न सारे पाहतो
अन गुङगुनी या मङगलीं कौतूहलें मी राहतों

अन्याय तू केलास तो होता किती मोठा तरी
त्याहून मोठें प्रेम हें आहे भरूनी अन्तरीं.

तूतें करावें अडिकता प्रेमीं न माझ्या हेतु हा -
सेवा तुझी माझ्या करें होवो अशी होती स्पृहा.

तूतें नको सेवा, बरें ! मी ठेवितों ती दक्षता -
ऊत्कर्षकालींही तुझ्या टाकूं नको का अक्षता !

२३ एप्रिल १९३५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP