[ओवी, छन्द देवद्वार]
तेहतीस कोटी, देव या देशांत
भक्त का अनाथ, दीनवाणी ? १
स्थळोस्थळीं येथे, असूनी देऊळें
मानवांचीं कुळें, निराश्रित ? २
देवांचे शृङगार, होती अन्नकोट;
कष्टाळूंचें पोट, न भरावें ? ३
रत्नसोनियांचे, देवारी भार,
नागवावे पार, कष्टकरी ? ४
देवच न राहे, पतितपावन,
शुद्धार कवण, करणार ? ५
देवांना भडिगती होती ते समर्थ,
दीनतेची शर्थ, भगतांच्या, ६
देवांवरी भार, कासया टाकावा ?
स्वत:च आखावा मार्ग आता. ७
नको देव ! व्हा हो, नर नारायण
राष्ट्रपरायण, करणीने. ८
२४ एप्रिल १९३५