द्रौपदीस्वयंवराचें पद
अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.
याचा इतिहास रुक्मिणीस्वयंवरासारिखाच. सूर्यग्रहणकालीं सर्व स्त्रिया एकत्र मिळाल्या असतां प्रत्येकजण आपापलें विवाहवृत्त सांगत असतां त्यांत दौपदी आपलें विवाहवृत्त रुक्मिणीस सांगते.
पद - (बायांनो द्या सोडोनी) या चालीबर.
आयके भीष्मकतनये ॥ मद्विवाह कथितें विनयें ॥धृ०॥
मज्जनकें लघु - काम - द्रोण निंदीला ॥ तद्विरोध द्रोणें धरिला ॥
मत्तात गर्वही हरिला ॥ पांचालहि जंव मनिं खचला ॥
तव उपाय द्रुपदा सुचला ॥ चाल ॥
द्रोणघ्न पुत्र निर्माया॥ कौंतेय स्नेह साधाया ॥
श्रीकृष्ण प्रसादहि व्हाया ॥ उपयाज दर्शना वनिं ये ॥ आय० ॥
याजोपयाज संमतिनें ॥ सव मांडिलाचि नरपतिनें ॥ हवनांतीं राज्ञिस मुनिनें ॥
घे भाग म्हणें परि सतिनें ॥ नेघे तिस रोधिलि पतिनें ॥
दे अग्निमुखीं मुनि विधिनें ॥ चाल ॥
होमितांचि कुंडीं पाहे ॥ शरधनुधृत बालक राहे ॥
मजलाही पाहुनि देहें ॥ कवटाळुनि धरिलें रायें ॥ आय० ॥२॥
द्रुपदीं फलभारचि पिकला ॥ आनंद जाहला सकलां ॥
जाणुनि मत्परिणय काला ॥ नृपमनीं हेतु उदेला ॥
जतुसदनदाह जंव कळला ॥ दु:खाग्निमाजिं तळमळला ॥ चाल ॥
ही कन्या कोणा द्यावी ॥ सुविचार सुचेमा भावी ॥
मत्कीर्ति जगीं कसि व्हावी ॥ चिंतार्त जाहला सखये ॥ आय० ॥३॥
सैंवरासि आरंभीलें ॥ नृपवरां लिखित प्रेषीलें ॥
संपत्तिसहित नृप सजले ॥ घंटापथ दानें भिजले ॥
पांचालनगर यजबजलें ॥ परि भामिनि मन्मन थिजलें ॥ चाल ॥
पांडवा पथिक मुखिं कळलें ॥ स्वाचरणीं परि नच मळले ॥
चातकीस घनसे वळले ॥ पांचाळ पुराप्रति मदये ॥ आय० ॥४॥
सये रंगमंटपीं राजे ॥ पातले भयद वीरा जे ॥
संपुजूनि ते युवराजें ॥ अधिवासनिं द्रुपदहि बाजे ॥
वृकधूपें भावित सदजे ॥ मलयानिल पाहुनि लाजे ॥ चाल ॥
ऋषिसंघहि पूजित शोभे ॥ जे महार्थ आले लोभें ॥
मग न्हाणुनि मज वैदर्भें ॥ मज्जननी सुख नच माये ॥ आय० ॥५॥
सखिजनें धातली वेणी ॥ धम्मिल्लग्रथित नग श्रेणी ॥
तानवडें वाळ्या कर्णीं ॥ नग त्यागिलेचि सौवर्णी ॥
मुक्तावलिकंठाभरणी ॥ मृदुसिंजितमंजिर चरणी ॥ चाल ॥
पुढें काय सांगु सखे तुजला ॥ नेसवितां शालू मजला ॥
तो वेष असा कीं सजला ॥ मोहिनीरूप जनमनिं ये ॥ आय० ॥६॥ चाला ॥
निजपण तो सकळा सांगे ॥ यंत्रभेद करि जो अंगें ॥
त्या शूरवरा अनुरागें ॥ आलिंगिल कन्या कायें ॥७॥
मग सखे कर्ण तो उठला ॥ निजबाहू गर्वें पिटिला ॥
स्फुरदोष्ठ करुनि भ्रुकुटीला ॥ कुरुपातें देउनि मिटिला ॥
दाउनी वदे तो निटिला ॥ कुरुपतिनें पार्षद लुटिला ॥ चाला ॥
मदभरें यंत्र भेदाया ॥ धनु चढउनि बोले राया ॥
द्रौपदी आणि मम जाया ॥ निंदितांचि उलथुनि जाये ॥ आय० ॥८॥
निर्वाण वचन परिसोनी ॥ उठे पार्थसिंह तेथूनी ॥
द्विज म्हणति जाय निरखोनी ॥ मनिं विजयवीर हांसोनी ॥
अग्रजा द्विजां वंदोनी ॥ चापोपकंठिं येऊनी ॥ चा० ॥
मन लाउनि हरिगुणचरणीं ॥ चापींही सायक सगुणीं ॥
करि लक्ष - पंच - शर- सरणी ॥ भेदितां लक्ष अवनीये ॥
आयके भीष्मकतनये ॥ मद्विवाह कथितें विनयें ॥९॥
Last Updated : January 11, 2015
TOP