मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
ध्रुवचरित्र

ध्रुवचरित्र

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


भागवत चतुर्थस्कंध अध्याय ८ यांत उत्तानपादपुत्र ध्रुव, हा पित्याच्या अंकावर बसण्यास जातो तेव्हां सुरुचि (ध्रुवाची सापत्न माता) ध्रुवास अपमानोक्तीनें बोलली, ते कवि वर्णितात.

पद १ लें - घ्या हरिच्या नामा या चालीवर.

पोरा ये माझे उदरीं ॥ मग या बैसे मांडीवरी ॥
चल उठ येथुनि जा स्वघरीं ॥ कैचें हें सुख तव पदरीं ॥धृ०॥
केलिस पूर्वीं क्रिया खोटी ॥ म्हणुनिया जन्म तिच्या पोटीं ॥
आतां तुज राज्य सुखासाठीं ॥ लागली आशा बहु मोठी ॥
कैशा घडतील या गोष्टी ॥ पाहिजे पदरिं पुण्य कोटी ॥
दुराशा व्यर्थ मनीं न धरीं ॥ कैचे हें सुख तव पदरीं ॥१॥
जरि तुज अवश्य हें करण ॥ करि मद्वचना अनुसरण ॥
स्वामी त्रैलोक्याऽभरण ॥ नतजनविपदब्ध्युद्धरण ॥
त्या श्रीहरिला जा शरण ॥ तयाचे घट्ट धरी चरण ॥
त्याचा प्रसाद होय जरी ॥ मग या बैसे मांडिवरी ॥२॥
असे हे शब्द तिचे कांटे ॥ लागतां हृदय जणू फाटे ॥
चित्तीं फार खेद वाटे ॥ तेणें कंठनाळ दाटे ॥
निघाला रडत रडत वाटे ॥ ये निज माउलिला भेटे ॥
ती त्या कबळुनि त्द्ददयिं धरी ॥३॥
तयातें जें जें कां छळलें ॥ सर्वहि जनवदनें कळलें ॥
तत्क्षणिं अंतर कळवळलें ॥ अश्रुजळ नयनांतुन गळले ॥
पळ मन मोहभरें मळलें ॥ विवेकें परि न तिळहि चळलें ॥
विठ्ठल तत्पदिं नमन करी ॥४॥

सुनीति ध्रुवास नीति सांगून सांत्वन करिते :---

पद २ रें - राग कालंगडा.

वत्सा बारे उगा कां रडसी ॥ चिंतुनि आपुला हेवारे ॥धृ०॥
आपुलें आपणा कर्म फलप्रद, दोष कुणावर द्यावा ॥ धडली नाहीं आम्हा जन्मांतरीं, श्रीहरिची पदसेवा ॥
सांप्रत केवि मिळेल तुला हा, राज्यसुखाचा मेवा ॥ काय वदूं मज भाज म्हणाया, लाज गमे नरदेवा ॥
हा आज तुजला गुज परि कथिला, निज अंतरिंचा ठेवा ॥ काय मृषाही वद्ली ती कीं, श्रीहरि आधिं पुजावा ॥
तदनुग्रह होतांचि यथेष्ट, स्वेष्ट सुधारस प्यावा ॥ विठ्ठलविभु जरि श्रीहरि तुजवरि, करिल कृपेचा रेवा ॥
सुरवरही कर जोडुनि येइल, तेथ तिचा किति केवा ॥ वत्सा बारे० ॥१॥

ध्रुव सुनीतीची आज्ञा घेऊन ईश्वर प्राप्तीकरितां अरण्यांत जातो. तेथें नारदाचें दर्शन होतें. नारद त्यास ईश्वरप्राप्तीचें साधन व उपदेश करून मधुवनीं तपश्चर्येस पाठवितो. नंतर नारद, राजास दर्शन देण्यास नगरांत येतो. राजा पुत्रवियोगदु:खी होऊन ध्रुवाचें क्षेमवृत्त विचारतो आणि नारद राजाचें सांत्वन करितो.

पद ३ रें. राग जोगी - (माझा कृष्ण या चालीवर)

माझें मूल अढळलें काय ? स्वामी सांगाहो ॥धृ०॥
चित्तीं वाटतसे हळहळ ॥ अंकीं बैसाया हे बाळ ॥
त्याची केलि असे हे बाळ ॥ मी चांडाळ काय किती ॥ मा० ॥१॥
अंगीं लहानसें अंगडें ॥ माथां शोभतसें टोपडें ॥
गेलें रडत रडत बापडें ॥ बाळ मजकडे पहात कीं ॥ मा० ॥२॥
कैसा काय निघोनि जाय ॥ नीलोत्पलदल - कोमल - पाय ॥
सर्व जन करिती हाय हाय ॥ न सुचे उपाय काय करूं ॥ मा० ॥३॥
नारद म्हणे नृपा धरि धीर ॥ पुशि बा निज नयनाचें नीर ॥
विठ्ठलपंत - प्रभु - रघुवीर ॥ कृपा करील त्यावरती ॥ मा० ॥४॥

ध्रुवानें, ६ महिने तपश्चर्या करून देवास प्रसन्न केलें. देव प्रकट होऊन आपलें चतुर्भुज रूप दाखवितात. तें ध्यान मस्तकापासून चरणापर्यंत कवि वर्णितात.

पद ४ थें. भगवद्धयान.

(प्रथम २ चरण आरती भुवनसुंद्राची ही चाल आणि पुढें कटावाची.)

हरि हा आनंदाचा कंद ॥ आनंदाचा कंद उभा पुढें भक्त - सखा - गोविंद भगवानानंदाचा कंद ॥धृ०॥
सजलनीरदश्यामतनू नवरत्नखचित - सौवर्णमुगुट शिरपेंच तुरा वरि कल्गी विराजित कुटिलालक निटिलासि कस्तुरीतिलक केशरीगंध ॥ हरि हा आनंदाचा कंद ॥१॥
श्रवणिं मनोहर मकरकुंडलें फुल्लगल्ल कर्णांत - दीर्घ - सुप्रसन्न - लोचन इंदुवदन तिलपुष्पनासिका कुंदरदन हनु अधरबिंबगत हास्य मंद मंद ॥ हास्य मंद मंद ॥ हरि० ॥२॥
कंबुकंठ कौस्तुभाभरणशुभपटीरपंक नवद्रवरूषित पीवरांसकेयूरविभूषित कनककटकसहरत्नतोडरप्रभानुभाषित शंखसुदर्शनगदासरोरुहलसच्चतुर्भुज ललितांगुलिधृतरत्नमुद्रिकावृंद ॥ हरि० ॥३॥
विशाल वक्षस्थळीं रमाकुचकुंभकुंकुमालेपलिप्त श्रीवत्सलांछित सुवर्णयज्ञोपवीत मध्यवलित्रयबंधुर निम्रनाभि तनु रोमराजि लुठदुत्तरीयपट पारिजात नवकुसुम तुलसिकामिश्रहार पादाग्रचुंबि नभ भरुनि जयाचा मधुर सूटला गंध ॥ हरि० ॥४॥
कटीतटी जरिकांठि पीत कौशेयवास पट वास सुवासित विचित्र शृंखल अगणितमणिझणिझणित मंजुलक्वणित किंकिणी विपुलतरोरुद्वंद्वविराजितजानुजंघ सुकुमार सरलतर कनकवलययुत रत्नतोडरें मंजुमंजुसिंजानहरिमंजीर परिष्कृत सहजरक्तमृदुवज्रअंकुशध्वजांबुजांकित वृत्तवृत्तउत्तुंगरक्तनखचक्रवालसत्पुण्यचंद्रिकाध्वस्त महद्भृदयांधतमस मंदाकिनीमाहेरचरणयुगधृत रणरणिक जयाच्या क्षणिक ध्यानें तुटती झटिति सर्व भवबंध ॥ हरि० ॥५॥
कोटिकोटिकंदर्परूपलावण्यदर्पहर ध्यानमनोहर अनंतजन्ममनोमलपटलीनिर्मूलनकर भक्तिगम्यतापत्रयभंजन आसेचनक ध्यानि पहातां वाटें जणु नयनांत भरावें हुंगावें द्दढ आलिंगावें की चुंबावें विसरतसे संसार सर्वही संतत याचा पंतविठ्ठला सहज लागला छंदा ॥ हरि हा आनंदाचा कंद ॥६॥
भागवत - दशमस्कंध, उत्तरार्धांत सूर्यग्रहणपर्वकालनिमित्त कौरवपांडवपांचालादि अनेक देशचे राजे स्नानदानादि पुण्यकर्में करण्यास कुरुक्षेत्रांत आले. एकमेकांत कुशलप्रश्न झाल्यावर द्रौपदी, सर्व कृष्णस्त्रियांस (अष्टनायिकांस) आपापलें विवाहवृत्त कथन करण्याविषयीं आग्रहकरिते. सर्वांत मुख्य स्त्री रुक्मिणी आपलें विवाहवृत्त द्रौपदीस सांगते.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP