ग्रहणंचजन्मराश्यादौनिषिद्धम् तदुक्तंज्योतिषे त्रिषट् दशायोपगतंनराणांशुभप्रदंस्याद्ग्रहणंरवींद्वोः द्विसप्तनंदेषुषुमध्यमंस्याच्छेषेष्वनिष्टंकथितंमुनींद्रैरिति आयएकादश नंदानव इषुःपंच मदनरत्नेगर्गः जन्मसप्ताष्टरिः फांकदशमस्थेनिशाकरे दृष्टोरिष्टप्रदोराहुर्जन्मर्क्षेनिधनेपिच रिःफंद्वादशम् अंकानव निधनंसप्तमतारा पृथ्वीचंद्रोदयेविष्णुधर्मे यन्नक्षत्रगतोराहुर्ग्रसतेशशिभास्करौ तज्जातानांभवेत्पीडायेनराः शांतिवर्जिताः ।
जन्मराशीस वगैरे ग्रहण निषिद्ध ( अशुभ ) आहे, तें सांगतो - ज्योतिषांत - “ जन्मराशीपासून ३।६।१०।११ या स्थानीं सूर्यचंद्रग्रहण शुभ; २।७।९।५ या स्थानीं मध्यम; १।४।८।१२ या स्थानीं अशुभ; असें ऋषिवर्यांनीं सांगितलें आहे. ” मदनरत्नांत गर्ग - “ जन्मराशि, व जन्मराशीपासून सात, आठ, बारा, नऊ, दहा, या राशीस; तसेंच जन्मनक्षत्र व जन्मनक्षत्रापासून सातवें नक्षत्र या ठिकाणीं ग्रहण असतां तें ग्रहण जर पाहिलें तर अरिष्टकारक होतें. ” पृथ्वीचंद्रोदयांत - विष्णुधर्मांत - ‘‘ ज्या नक्षत्रीं ग्रहण असतें त्या नक्षत्रावर जे झालेले असतात त्यांनीं शांति केली नाहीं तर त्यांस पीडा होते. ”
तत्रैवपुराणांतरे सूर्यस्यसंक्रमोवापिग्रहणंचंद्रसूर्ययोः यस्यत्रिजन्मनक्षत्रेतस्यरोगोथवामृतिः तस्यदानं चहोमंचदेवार्चनजपौतथा उपरागाभिषेकंचकुर्याच्छांतिर्भविष्यति स्वर्णेनवाथपिष्टेनकृत्वासर्पस्यचाकृतिम् ब्राह्मणायददेत्तस्यनरोगादिश्चतत्कृतः जन्मनक्षत्रंतत्पूर्वोत्तरेचत्रिजन्मनक्षत्रमित्युच्यते जन्मदशमैकोनविंशतिताराइतिकेचित् सर्पस्यतदाकारस्यराहोरित्यर्थः अद्भुतसागरेभार्गवः यस्यराज्यस्यनक्षत्रेस्वर्भानुरुपरज्यते राज्यभंगंसुह्रन्नाशंमरणंचात्रनिर्दिशेत् राज्यस्यनक्षत्रंअभिषेकनक्षत्रमितितत्रैवव्याख्यातम् ।
पृथ्वीचंद्रोदयांत - पुराणांतरांत - “ ज्याचे त्रिजन्मनक्षत्रावर, ( जन्मनक्षत्र, त्याच्या पूर्वींचे व पुढचे नक्षत्रावर ) सूर्याची संक्रांति अथवा चंद्रसूर्यग्रहण होईल त्यास रोग किंवा मरण प्राप्त होईल; त्याच्या परिहाराकरितां दान, होम, देवपूजा, जप, बिंबावर अभिषेक हीं करावीं म्हणजे शांति होतें. सुवर्णाचा किंवा पिष्टाचा सर्पाकृति राहु करुन तो ब्राह्मणास द्यावा, म्हणजे रोगादिक होत नाहींत. ” अद्भुतसागरांत - भार्गव - “ ज्या नक्षत्रीं राज्याभिषेक झाला त्या नक्षत्रीं राहु असून ग्रहण होईल तर राज्यभंग, सुह्रन्नाश, मरण हीं प्राप्त होतात. ” ‘ राज्यस्य नक्षत्रं ’ याची राज्याभिषेकनक्षत्र अशी तेथेंच व्याख्या केली आहे.
भार्गवार्चनदीपिकायांज्योतिःसागरे सौवर्णंकारयेन्नागंपलेनाथपलार्धतः तदर्धेनतदर्धेनफणायांमौक्तिकंन्यसेत् ताम्रपात्रेनिधायाथघृतपूर्णेविशेषतः कांस्येवाकांतलोहेवान्यस्यदद्यात्सदक्षिणं चंद्रग्रहेतुरुप्यस्यबिंबंदद्यात्सदक्षिणम् नागंरुक्ममयंसूर्यग्रहेबिंबंचहेमजम् तुरंगरथगोभूमितिलसर्पिश्चकांचनम् कालविवेकेपि सुवर्णनिर्मितंनागंसतिलंकांस्यभाजनम् सदक्षिणंसवस्त्रंचब्राह्मणायनिवेदयेत् सौवर्णंराजतंवापिबिंबंकृत्वास्वशक्तितः उपरागभवक्लेशच्छिदेविप्रायकल्पयेत् मंत्रस्तु तमोमयमहाभीमसोमसूर्यविमर्दन हेमताराप्रदानेनममशांतिप्रदोभव विधुंतुदनमस्तुभ्यंसिंहिकानंदनाच्युत दानेनानेननागस्यरक्षमांवेधजाद्भयादिति ।
भार्गवार्चनदीपिकेंत - ज्योतिःसागरांत - पल किंवा अर्धपल, अथवा पावपल, किंवा अष्टमांशपल परिमित सुवर्णाचा नाग करावा, व त्याचे फणेवर मौक्तिक लावून तो घृतपूर्ण ताम्रपात्रांत किंवा कांस्यपात्रांत अथवा कांतलोहपात्रांत ठेवून त्याचें दक्षिणासहित दान करावें. चंद्रग्रहणीं रुप्याचें चंद्रबिंब, आणि सुवर्णाचा नाग करुन दक्षिणासहित दान करावें. सूर्यग्रहणीं सुवर्णाचें सूर्यबिंब व सुवर्णाचा नाग करुन दान करावें. अश्व, रथ, गाई, भूमि, तिल, घृत, सुवर्ण यांचींही दानें, करावीं. ” कालविवेकांतही “ सुवर्णाचा नाग करुन तो कांस्यपात्रांत ठेवून तिल, वस्त्र, दक्षिणा यांहीं युक्त ब्राह्मणांस द्यावा. आपल्या शक्तीप्रमाणें सुवर्णाचें किंवा रुप्याचें बिंब करुन ग्रहणजन्य क्लेश दूर करण्याविषयीं समर्थ अशा ब्राह्मणास द्यावें. ” दानाचा मंत्र - “ तमोमयमहाभीमसोमसूर्यविमर्दन ॥ हेमताराप्रदानेनममशांतिप्रदो भव ॥ विधुंतुद नमस्तुभ्यं सिंहिकानंदनाच्युत ॥ दानेनानेन नागस्य रक्ष मां वेधजाद्भयात् ” ॥
अत्रशांतिरप्युक्तामात्स्ये यस्यराशिंसमासाद्यभवेद्ग्रहणसंभवः स्नानंतस्यप्रवक्ष्यामिमंत्रौषधिसमन्वितम् चंद्रोपरागंसंप्राप्यकृत्वाब्राह्मणवाचनम् संपूज्यचतुरोविप्रान् छुक्लमाल्यानुलेपनैः पूर्वमेवोपरागस्यसमानीयौषधादिकम् स्थापयेच्चतुरः कुंभानव्रणान् सलिलान्वितान् गजाश्वरथ्यावल्मीकसंगमाद्ध्रदगोकुलात् राजद्वारप्रदेशाच्चमृदमानीयनिक्षिपेत् पंचगव्यंपंचरत्नंपंचत्वक् पंचपल्लवम् रोचनंपद्मकंशंखंकुंकुमंरक्तचंदनम् शुक्तिस्फटिकतीर्थांबुसितसर्षपगुग्गुलून् मधुकंदेवदारुंचविष्णुक्रांतांशतावरीं बलांचसहदेवींचनिशाद्वितयमेवच गजदंतंकुंकुमंचतथैवोशीरचंदनं एतत्सर्वंविनिक्षिप्यकुंभेष्वावाहयेत्सुरान् सर्वेसमुद्राः सरितस्तीर्थानिजलदानदाः आयांतुयजमानस्यदुरितक्षयकारकाः योसौवज्रधरोदेव आदित्यानांप्रभुर्मतः सहस्रनयनः शक्रोग्रहपीडांव्यपोहतु मुखंयः सर्वदेवानांसप्तार्चिरमितद्युतिः चंद्रोपरागसंभूतामग्निः पीडांव्यपोहतु यःकर्मसाक्षीलोकानांधर्मोमहिषवाहनः यमश्चंद्रोपरागोत्थांग्रहपीडांव्यपोहतु रक्षोगणाधिपः साक्षान्नीलांजनसमप्रभ खड्गहस्तोतिभीमश्चग्रहपीडांव्यपोहतु नागपाशधरोदेवः सदामकरवाहनः सजलाधिपतिर्देवोग्रहपीडांव्यपोहतु प्राणरुपोहिलोकानांसदाकृष्णमृगप्रियः वायुश्चंद्रोपरागोत्थांग्रहपीडांव्यपोहतु योसौनिधिपतिर्देवः खड्गशूलगदाधरः चंद्रोपरागकलुषंधनदोत्रव्यपोहतु योसाविंदुधरोदेवः पिनाकीवृषवाहनः चंद्रोपरागपापानिसनाशयतुशंकरः त्रैलोक्येयानिभूतानिस्थावराणिचराणिच ब्रह्मविष्ण्वर्करुद्राश्चदहंतुममपातकम् एवमावाहयेद्देवान्मंत्रैरेभिश्चवारुणैः एतानेवतथामंत्रान्स्वर्णपट्टेविलेखयेत् ताम्रपट्टेथवालिख्यनववस्त्रेतथैवच मस्तकेयजमानस्यनिदध्युस्तेद्विजोत्तमाः कलशान् द्रव्यसंयुक्तान्नानारुपसमन्वितान् गृहीत्वास्नापयेद्गूढंभद्रपीठोपरिस्थितम् पूर्वैरेवतुमंत्रैश्चयजमानंद्विजोत्तमः अभिषेकंततः कुर्यान्मंत्रैर्वारुणसूक्तकैः आचार्यंवरयेत्पश्चात्स्वर्णपट्टंनिवेदयेत् आचार्यदक्षिणांदद्याद्गोदानंचस्वशक्तितः होमंवापिप्रकुर्वीततिलैर्व्याह्रतिभिस्तथा दानंचशक्तितोदद्याद्यदीच्छेदात्मनोहितं सूर्यग्रहेसूर्यनामयुक्तान्मंत्रांश्चकीर्तयेत् अनेनविधिनायस्तुग्रहणेस्नानमाचरेत् नतस्यग्रहणेदोषः कदाचिदपिजायते इतिग्रहणशांतिः ।
याविषयीं शांतिही सांगितली आहे मत्स्यपुराणांत - “ ज्याचे जन्मराशीस ग्रहण होतें त्यास मंत्रौषधियुक्त स्नान सांगतो. चंद्रग्रहण आलें असतां तें ब्राह्मणाच्या मुखापासून श्रवण करुन ग्रहणाच्या पूर्वींच श्वेतपुष्प, श्वेतगंध यांहींकरुन चार ब्राह्मणांचे पूजन करुन त्यांसह हें पुढचें कर्म करावें. तें असें - ओषध्यादिक आणून उदकपूर्ण असे नूतन चार कलश घेऊन ते स्थापित करावे, नंतर त्या कलशांत हत्ती बांधण्याची जागा, अश्वशाला, राजमार्ग, वारुळ, दोन नद्यांचा संगम, डोह, गोठा, राजद्वार, या ठिकाणांहून मृत्तिका आणून ( कलशांत ) टाकावी. नंतर कलशांत पंचगव्य, पंचरत्न, पंचत्वचा, पंचपल्लव, गोरोचन, पद्मकाष्ठ, शंख, कुंकुम, ( केशर ), रक्तचंदन, शुक्ति, स्फटिक, तीर्थोदक, श्वेतसर्षप, गुग्गुल, ज्येष्ठमध, देवदारु, विष्णुक्रांता, शतावरी, चिकणा, सहदेवी, हळद, दारुहळद, गजदंत, कुंकूं, वाळा, चंदन, हे सर्व पदार्थ कुंभांत टाकून पुढें सांगितलेल्या मंत्रांनीं देवतांचें कुंभांवर आवाहन करावें. ते मंत्र असे - “ सर्वे समुद्राः सरितस्तीर्थानि जलदा नदाः ॥ आयांतु यजमानस्य दुरितक्षयकारकाः ॥ योसौ वज्रधरो देव आदित्यानां प्रभुर्मतः ॥ सहस्त्रनयनः शक्रो ग्रहपीडां व्यपोहतु ॥ मुखं यः सर्वदेवानां सप्तार्चिरमितद्युतिः ॥ चंद्रोपरागसंभूतामग्निः पीडां व्यपोहतु ॥ यः कर्मसाक्षी लोकानां धर्मो महिषवाहनः ॥ यमश्चंद्रोपरागोत्थां ग्रहपीडां व्यपोहतु ॥ रक्षोगणाधिपः साक्षान्नीलांजनसमप्रभः ॥ खड्गहस्तोतिभीमश्च ग्रहपीडां व्यपोहतु ॥ नागपाशधरो देवः सदा मकरवाहनः ॥ स जलाधिपतिर्देवो ग्रहपीडां व्यपोहतु ॥ प्राणरुपो हि लोकानां सदा कृष्णमृगप्रियः ॥ वायुश्चंद्रोपरागोत्थां ग्रहपीडां व्यपोहतुज ॥ योसौ निधिपतिर्देवः खड्गशूलगदाधरः ॥ चंद्रोपरागकलुषं धनदोत्र व्यपोहतु ॥ योसाविंदुधरो देवः पिनाकी वृषवाहनः ॥ चंद्रोपरागपापानि स नाशयतु शंकरः ॥ त्रैलोक्ये यानि भूतानि स्थावराणि चराणि च ब्रह्मविष्ण्वर्करुद्राश्च दहंतु मम पातकम् ॥ ” याप्रमाणें ह्या व वरुणदेवताक मंत्रांनीं वरील देवतांचें आवाहन कलशांवर करावें. तसेंच हे मंत्र स्वर्णपट्टावर किंवा ताम्रपट्टावर अथवा कोर्या वस्त्रावर लिहून यजमानाचे मस्तकावर ब्राह्मणांनीं तो पट्ट धरावा. नंतर ब्राह्मणांनीं नानाद्रव्यांसहित ते कलश हातांत घेऊन त्यांतील उदकानें भद्रपीठस्थित ( उच्च आसनावर बसलेल्या ) यजमानाला पूर्वोक्त मंत्रांनीं स्नान घालावें. नंतर वरुणसूक्तमंत्रांनीं अभिषेक करावा. नंतर आचार्याला स्वर्णपट्ट, आचार्यदक्षिणा, गोप्रदान, हीं यथाशक्ति द्यावीं. व्याह्रति मंत्रांनीं तिलहोम करावा, व यथाशक्ति दान करावें. असें केलें असतां कल्याण होतें. सूर्यग्रहणीं सूर्यनामयुक्त मंत्र म्हणावे. ह्या पूर्वोक्त विधीनें जो मनुष्य ग्रहणांत स्नान करील त्याला ग्रहणसंबंधी कोणतीही पीडा होणार नाहीं. ” याप्रमाणें ग्रहणशांति जाणावी.
भार्गवार्चनदीपिकायांब्रह्मसिद्धांते सर्वैः पटस्थितंवीक्ष्यखस्थंतैलांबुदर्पणैः ग्रहणंगुर्विणीजातुनपश्येतपटंविना तथा मंगलकृत्येषुवेधविशेषोहेमाद्रौ त्रयोदश्यादितोवर्ज्यंदिनानांनवकंध्रुवम् मांगल्येषुसमस्तेषुग्रहणेचंद्रसूर्ययोः प्रकारांतरंतत्रैवोक्तं द्वादश्यादितृतीयांतोवेध इंदुग्रहेस्मृतः एकादश्यादिकः सौरे चतुर्थ्यंतः प्रकीर्तितः इदंचपूर्णग्रासे त्र्यहंखंडग्रहेतयोरितितत्रैवोक्तेः इदंचग्रस्तास्तेत्रिदिनंपूर्वमितिनारदेनग्रस्तास्तेविशेषोक्तेर्ग्रस्तास्तभिन्नग्रहणपरं ज्योतिर्निबंधेच्यवनः ग्रहणोत्पातभंत्याज्यंमंगलेषुऋतुत्रयं यावच्चरविणाभुक्त्वामुक्तंभंदग्धकाष्ठवत् अन्यानिचाग्नेयादिमंडलानितत्फलंवर्णविकारादिफलंचदैवज्ञेभ्योज्ञेयम् ।
भार्गवार्चनदीपिकेंत - ब्रह्मसिद्धांतांत - “ ग्रहण पाहणें तें सर्वांनीं वस्त्र, तैल, उदक, दर्पण ( आरसा किंवा भिंग ) यांतून पाहावें. गर्भिणी स्त्रीनें तर वस्त्र आड केल्यावांचून कदापि ग्रहण पाहूं नये. मांगलिककृत्यांविषयीं ग्रहणसंबंधीं वर्ज्य दिवस सांगतो - हेमाद्रींत “ चंद्र सूर्य ग्रहण असतां सर्व मांगलिककृत्यांविषयीं त्रयोदशीपासून नऊ दिवस टाकावे. ” दुसरा प्रकार - तेथेंच सांगतो - “ चंद्रग्रहणीं द्वादशीपासून तृतीयेपर्यंत सात दिवस टाकावे, सूर्यग्रहणीं एकादशीपासून चतुर्थीपर्यंत नऊ दिवस टाकावे ” हा वेध पूर्ण ग्रास असतां जाणावा; कारण, “ खंडग्रास असतां तीन दिवस टाकावे ” असें तेथेंच सांगितलें आहे. हें वचनही, “ ग्रस्तास्त असेल तर पूर्वींचे तीन दिवस टाकावे ” असा नारदानें ग्रस्तास्त ग्रहणाचा विशेष सांगितला आहे म्हणून ग्रस्तास्तभिन्न ग्रहणविषयक जाणावें. ज्योतिर्निबंधांत - च्यवन “ ज्या नक्षत्रीं ग्रहणरुप उत्पात झाला असेल तें नक्षत्र सहा महिनेपर्यंत मंगलकार्याविषयीं वर्ज्य करावें. कारण, जोंपर्यंत रवीनें भोगून सोडलें
नाहीं, तोंपर्यंत तें नक्षत्र दग्ध काष्ठाप्रमाणें आहे. ” ( तीन ऋतु वर्ज्य हें चंद्रग्रहणनक्षत्राविषयीं आहे, सूर्यग्रहणनक्षत्र बारा महिन्यांवांचून पुनः सूर्यभुक्त होत नाहीं. ) ग्रहणसमयीं चंद्रसूर्याचे बिंबांचे ठायीं आग्नेयादि मंडलें होतात तीं व त्यांचीं फलें, वर्णविकारादि फलें हीं दैवज्ञां ( जोशां ) पासून जाणावीं.
पुरश्चरणचंद्रिकायाम् चंद्रसूर्योपरागेचस्नात्वाप्रयतमानसः स्पर्शादिमोक्षपर्यंतंजपेन्मंत्रंसमाहितः जपाद्दशांशतोहोमस्तथाहोमात्तुतर्पणम् तर्पणस्यदशांशेनमार्जनंकथितंकिल तत्रैवदेवतारुपंध्यात्वात्मानंप्रपूज्यच नमोंतंमंत्रमुच्चार्यतदंतेदेवताभिधाम् द्वितीयांतामहंपश्चादभिषिंचाम्यनेनतु तोयैरंजलिनाशुद्धैरेभिः सिंचेत्स्वमूर्धनि मार्जनस्यदशांशेनब्राह्मणानपिभोजयेत् जपोर्चापूर्वकोहोमस्तर्पणंचाभिषेचनम् भूदेवपूजनंपंचप्रकारोक्तापुरस्क्रिया तथा होमाशक्तौजपंकुर्याद्धोमसंख्याचतुर्गुणम् एवंकृतेतुमंत्रस्यजायतेसिद्धिरुत्तमा ।
पुरश्चरणचंद्रिकेंत - “ चंद्रसूर्यांचें ग्रहण लागलें असतां स्नान करुन एकाग्र मन करुन स्पर्शकालापासून मोक्षापर्यंत मंत्राचा जप करावा. जपाचे दशांश होम, होमाचे दशांश तर्पण, तर्पणाचे दशांश मार्जन करावें. त्या मार्जनाचा प्रकार - ज्या देवतेचा जप केला असेल त्या देवतेच्या रुपाचें ध्यान आपल्या ठिकाणीं करुन आपली पूजा करुन मंत्राचे शेवटीं ‘ नमः ’ शब्द लावून त्या मंत्राचा उच्चार करुन त्याचे शेवटीं द्वितीयाविभक्त्यंत असें देवतेचें नांव घेऊन ‘ अनेन अहमभिषिंचामि ’ असें म्हणून शुद्ध उदक अंजलींत घेऊन आपल्या मस्तकावर अभिषेक करावा. मार्जनाच्या दशांश ब्राह्मणभोजन घालावें. जप, पूजनपूर्वक होम, तर्पण, अभिषेक, ब्राह्मणपूजन, याप्रमाणें पांच प्रकार पुरश्चरणाचे होत. ” तसेंच - “ होम करण्याविषयीं शक्ति नसतां होमाच्या चतुर्गुण जप करावा. याप्रमाणें पुरश्चरण केलें असतां मंत्राची उत्तम सिद्धि होते. ”
ग्रहणप्रसंगात् कुरुक्षेत्रप्रतिग्रहेप्रायाश्चित्तमुच्यते तत्रारुणस्मृतौ प्रतिग्रहीकुरुक्षेत्रेनभूयः पुरुषोभवेत् तथापिमनसः शुद्ध्यैप्रायश्चित्तंसमाचरेत् तप्तकृच्छ्रद्वयंकुर्यादैंदवेनसमन्वितम् सत्रेणवायजेताथजपेद्वालक्षसप्तकम् वापीकूपतडागादिखननैर्विसृजेद्धनमिति एतच्च यद्गर्हितेनार्जयंतिकर्मणाब्राह्मणाधनम् तस्योत्सर्गेणशुद्ध्यंतिदानेनतपसैवचेतिमनूक्तेरुत्सर्गोत्तरंज्ञेयमितिदिक् ।
ग्रहणाच्या प्रसंगेंकरुन कुरुक्षेत्रीं प्रतिग्रह करणारास प्रायश्चित्त सांगतो - तेथें अरुणस्मृतींत - “ कुरुक्षेत्रीं प्रतिग्रह करणारा पुनः पुरुष होणार नाहीं, म्हणजे अधोगतीस जाईल, तथापि त्यानें मनाची शुद्धि होण्यासाठीं प्रायश्चित्त करावें; चांद्रायणासह दोन तप्तकृच्छ्रें करावीं; किंवा सत्रयाग करावा; अथवा सात लक्ष जप करावा; निर्जल प्रदेशीं वापी, कूप, तलाव बांधून द्रव्याचा व्यय करावा. ” हें प्रायश्चित्त “ ब्राह्मण निंद्य कर्म करुन जें द्रव्य संपादन करितात त्याचा उत्सर्ग, दान व तपश्चर्या करुन ते ब्राह्मण शुद्ध होतात ” ह्या मनुवचनावरुन घेतलेला द्रव्याचा उत्सर्ग ( त्याग ) केल्यावर जाणावें. ही दिशा दाखविली आहे.
ग्रहणांतरितस्यपूर्वसंकल्पितद्रव्यस्यद्वैगुण्यंभवतीतिशिष्टाः पठंतिचलघुब्रह्मवैवर्ते दातव्यमितिनोकाश्यांवक्तव्यंकुत्रचित्क्कचित् अहोरात्रमतिक्रम्यतद्दानंद्विगुणंभवेत् दशोत्तरंपर्वसुस्याच्छतंचंद्रग्रहेभवेत सूर्यग्रहेसहस्त्रंतन्मरणेनंतकंस्मृतमिति अत्रमूलंचिंत्यम् ।
ग्रहणाच्या पूर्वीं संकल्पित जें द्रव्य तें ग्रहणोत्तर दिलें असतां द्विगुण देण्यास योग्य होतें, असें शिष्ट म्हणतात व लघुब्रह्मवैवर्तांतील वचन सांगतात - ‘‘ काशीक्षेत्रीं ‘ दातव्यं ’ ( द्यावयाचें ) असें कोठें कधींही बोलूं नये. कारण, ‘ द्यावयाचें ’ असें बोलून तें न देतां अहोरात्र गेलें तर तें दान द्विगुण देण्यास योग्य होतें. पर्व ( अमावास्या अथवा पौर्णिमा ) गेल्यावर दसपट होतें. चंद्रग्रहण गेल्यावर शंभरपट देण्यास योग्य होतें. सूर्यग्रहण गेल्यावर सहस्त्रपट देण्यास योग्य आणि मेल्यावर अनंतपट होतें. ” याविषयीं मूल चिंत्य होय.
अत्रकेचिद्वौद्धतुल्याआहुः ग्रहणस्यनिमित्तत्वेनतन्निश्चयस्यप्रयोजकत्वाज्ज्योतिः शास्त्रादिनाज्ञानस्यनिमित्तत्वेप्राप्तेपि स्नानंदानंतपः श्राद्धमनंतंराहुदर्शने, चंद्रसूर्योपरागेतुयावद्दर्शनगोचर इतिजाबाल्यादिवचनेषुदृशिप्रयोगाच्चाक्षुषज्ञानस्यैवोपसंहारन्यायेननिमित्तत्वम् अन्यथादृशौलक्षणास्यात् तेनमेघाच्छादनेंऽधादीनांजन्मसप्ताष्टेत्यादिनिषिद्धदर्शनानांचस्नानश्राद्धादौनाधिकार इति कल्पतरुरप्याह दर्शनशब्देनचाक्षुषज्ञानंगृह्यतेनज्ञानमात्रम् अज्ञातस्यनिमित्तत्वासंभवान्निमित्तमहिम्नैवज्ञानलाभेनदर्शनपदवैयर्थ्यापत्तेः तेनचाक्षुषधीयोग्यः कालः पुण्यः योग्यत्वंचप्रयत्नानपनेयचाक्षुषज्ञानप्रतिबंधकराहित्यं तेनमेघच्छन्नेयोग्यताभावान्नस्नानादीति निर्णयामृतेप्येवम् ।
ह्या ग्रहणाविषयीं केचित् बौद्धतुल्य ग्रंथकार असें सांगतात - स्नानादिकांना ग्रहण हें निमित्त आहे खरें, परंतु तें निमित्त निश्चया ( खर्या ज्ञाना ) वांचून संभवत नाहीं, याकरितां ग्रहणाचें खरें ज्ञान निमित्त आहे, म्हणून ज्योतिःशास्त्रादिकांवरुन झालेलें ज्ञान तें निमित्त असें प्राप्त झालें तरी तें निमित्त नाहीं. कारण, ‘ स्नानं दानं० ’ , चंद्रसूर्यो० ’ , ह्या जाबालिप्रभृतींच्या वचनांमध्यें दृश् धातूचा प्रयोग आहे. ‘ दृश् ’ याचा अर्थ ‘ चक्षूनें पाहाणें ’ असा आहे, म्हणून उपसंहारन्यायानें ( पूर्वी सांगितलेला विषय अनेक प्रकारचा असल्यामुळें शेवटीं त्याचें एका विषयावर पर्यवसान करणें ह्या न्यायानें ) त्या जाबालिप्रभृतींनीं चाक्षुष ज्ञानावर उपसंहार केला असल्यामुळें ग्रहणाचें चाक्षुषज्ञानच स्नानादिकांना निमित्त आहे. चाक्षुषज्ञान निमित्त नाहीं, सामान्य ज्ञान निमित्त असें मानलें तर ‘ दृश् ’ धातूचा मुख्यार्थ - डोळ्यांनीं झालेलें ज्ञान - हा सोडून लक्षणा करुन सामान्यज्ञान असा लाक्षणिक अर्थ करावा लागेल, याकरितां चाक्षुषज्ञान निमित्त आहे असें झालें. त्या योगानें असें झालें कीं, मेघाच्छादित असतां सर्वांना चाक्षुषज्ञान नसल्यामुळें स्नानादिकांविषयीं अधिकार नाहीं. अंधादिकांना व ज्यांच्या राशीस अथवा सातवें किंवा आठवें ग्रहण असेल त्यांना दर्शनाचा निषेध असल्यामुळें त्यांना स्नानादिकांविषयीं अधिकार नाहीं. कल्पतरुही सांगतो - ‘ दर्शन ’ या शब्दानें चाक्षुषज्ञान घ्यावयाचें, सामान्यज्ञान घ्यावयाचें नाहीं; कारण, ज्ञानावांचून निमित्तत्वाचा असंभव असल्यामुळें, ज्यापेक्षां ग्रहण हें निमित्त म्हणून शास्त्रानें सांगितलें, त्यापेक्षां त्याचें ज्ञान असलें पाहिजे. ( जसें संक्रांति स्नानादिकांना निमित्त सांगितलें त्यावरुन संक्रांतीचें ज्ञान अर्थात् निमित्त तद्वत् ). यावरुन ज्ञानाला निमित्तत्व सिद्ध झालें असतां पूर्वोक्त वचनांत दर्शनपद व्यर्थ होईल ! याकरितां चाक्षुषज्ञान निमित्त असें झाल्यानें
चाक्षुषज्ञानाला योग्य जो काळ तो पुण्यकाळ सिद्ध झाला. येथें योग्यता म्हणजे प्रयत्नानें दूर करण्यास न येणारें असें जें चाक्षुषज्ञानाला प्रतिबंधक तद्रहितत्व होय. ही योग्यता मेघाच्छादित नसतां येते. ती अशी - प्रयत्नानें दूर करण्यास येणारें वस्त्रादि, न येणारा असा जो मेघ चाक्षुषज्ञानाला प्रतिबंधक तद्रहितत्व आहे. मेघाच्छादित असतां तद्रहितत्व नाहीं, म्हणून ही योग्यता नसल्यामुळें स्नानादिक करुं नये. निर्णयामृतांतही असेंच आहे.
तदेतत्तुच्छम् यदिचाक्षुषज्ञानंनिमित्तंस्यात्तदा सूर्यग्रहोयदारात्रौदिवाचंद्रग्रहस्तथा तत्रस्नानंनकुर्वीतदद्याद्दानंनचक्कचिदितिवाक्यंव्यर्थंस्यात् चाक्षुषज्ञानाभावेनप्राप्त्यभावात् तत्पूर्वकत्वाच्चनिषेधस्य नचेदंग्रस्तास्तपरं रविचंद्रयोरस्तानंतरंरात्रिदिवाग्रहत्वादितिवाच्यम् तत्रपदस्यग्रहपरत्वेऽधिकरणत्वायोगान्निमित्तपरत्वेचतद्ग्रहनिमित्तकस्नानादेरस्तात्प्रागप्यभावापत्तेः अथतत्रेतिरात्रिदिनेउच्येतेसावैश्वदेवीतिवद्गुणभूतेअपि तन्न तादृशमंत्रलिंगाभावात् तयोर्निमित्तत्वेऽधिकरणत्वेवाऽन्यप्रयुक्तस्नानाद्यभावापत्तेश्च किंवा नेक्षेतोद्यंतमादित्यंनास्तंयं तंकदाचन नोपरक्तंनवारिस्थंनमध्यंनभसोगतमितिमनुवचनंबाध्येत दृष्टोरिष्टप्रदोराहुरित्यादिच नचात्रविहितेदर्शनेनिषेधाप्रवृत्तिवत्पर्युदसनीयतापिनयुक्तेतिवाच्यम् दर्शनस्यानुवादेनविधेयत्वाभावात् एतच्चाग्रेवक्ष्यामः तत्त्वेवाविरुद्धत्रिकद्वयापत्तेः अस्तुसकृद्दर्शनविधानेनसंकोचइतिचेन्न मुक्तिंदृष्ट्वाततः स्नायादितिमुक्तिस्नानेपिचाक्षुषज्ञानस्यनिमित्तत्वापत्तेः अस्तु किंनश्छिन्नमितिचेत् न ग्रस्तास्ते तयोः परद्युरुदयेदृष्ट्वाभ्यवहरेच्छुचिरितिदर्शनोत्तरंभोजनविधानादंधस्यपूर्वंवेधकाल इवयावद्दर्शनंभोजननिषेधापत्तिः मध्येंऽधीभूतस्यसुतरांयावच्चक्षुः प्राप्त्युपवासप्रसंगश्च ।
तें हें सारें मत तुच्छ आहे. कारण, जर चाक्षुषज्ञान निमित्त होईल तर “ जेव्हां सूर्यग्रहण रात्रीं आणि चंद्रग्रहण दिवसा असेल तेव्हां स्नान करुं नये व दानही देऊं नये ” हें वाक्य व्यर्थ होईल; कारण, ह्या स्थलीं सूर्यचंद्रग्रहणांचें चाक्षुषज्ञान नसल्यामुळें स्नानादिकांची प्राप्तीच नाहीं; प्राप्ति असेल तर निषेध पाहिजे, प्राप्ति नसल्यामुळें निषेधाची गरज नाहीं. शंका - हें ( सूर्यग्रहोयदा० ) वाक्य ग्रस्तास्तविषयक आहे. ग्रस्तास्तस्थलीं चाक्षुषज्ञान असल्यामुळें स्नानादिकांची प्राप्ति येते, आणि सूर्यचंद्रांच्या अस्तानंतर रात्रीं व दिवसा ग्रहण असल्यामुळें या वचनानें स्नानादिकांचा निषेध केला आहे. असें म्हणूं; तर तसें म्हणतां येत नाहीं; कारण, त्या वचनांतील ‘ तत्र ’ या पदाचा अर्थ ‘ ग्रहण ’ असा घेतला तर तें स्नानादिकांना अधिकरण ( आधार ) होत नाहीं. ‘ निमित्त ’ असा घेतला तर तद्ग्रहणनिमित्तक स्नान करुं नये असा अर्थ झाल्यानें अस्त होण्यापूर्वीं देखील स्नानाचा अभाव ( निषेध ) होऊं लागेल. आतां ‘ तत्र ’ या पदानें रात्रीं व दिवसा घेतों. जसें - “ तप्ते पयसि दध्यानयति सा वैश्वदेव्यामिक्षा ” असें श्रुतिवाक्य आहे. त्याचा अर्थ - तापलेल्या दुधामध्यें दही घातलें म्हणजे ती विश्वेदेव देवांची आमिक्षा ( हवनीयद्रव्य ) होते. या स्थलीं दुधांत दहीं घालून जें द्रव्य होतें तें प्रधान व दूध हें गुण ( अप्रधान ) आहे तरी त्या वाक्यांतील ‘ सा ’ या पदानें दुधाचें ग्रहण केलेलें आहे, तसें - प्रकृत स्थलीं प्रधान ग्रहण व अप्रधान ( गुण ) रात्रि दिवस असले तरी ‘ तत्र ’ या पदानें ते घेतों, असें म्हणाल तर तें म्हणणें बरोबर नाहीं; कारण, वरील श्रुतिवाक्यांत ‘ सा ’ शब्दानें गुणभूताचें ग्रहण करण्यास मंत्र प्रमाण आहे, या ठिकाणीं तसें घेण्यास मंत्र प्रमाण नाहीं. आणि असें असूनही जर ‘ तत्र ’ पदानें रात्रि दिवस घेतले तर त्यांना निमित्तत्व मानलें असतां त्या रात्रिदिवसांचे निमित्तानें अथवा अधिकरणत्व मानलें तर त्या दिवशीं स्नान करुं नये, असें झाल्यानें इतरप्रयुक्तही स्नानादिकांचा अभाव होऊं लागेल; आणखी चाक्षुषज्ञान निमित्त मानलें असतां अर्थात् राहुदर्शन करावें, असें झाल्यानें “ उदय पावणारा, अस्तास जाणारा, राहूनें ग्रासलेला, उदकांत प्रतिबिंबित झालेला, आणि मध्यान्हीं असलेला असा सूर्य पाहूं नये ” या मनूच्या वचनामध्यें राहुग्रस्त सूर्य पाहूं नये, असा जो निषेध त्याचा बाध होईल. तसाच “ जन्मराशीस व जन्मनक्षत्रास वगैरे राहू असतां जर पाहिला तर अरिष्टकारक होतो, म्हणून पाहूं नये ” या निषेधाचाही बाध होईल. शंका - या ठिकाणीं दर्शन विहित असल्यामुळें मनूनें केलेला ( राहुग्रस्त सूर्य पाहूं नये ) हा निषेध प्रवृत्तच होत नाहीं, मग त्या निषेधाचा बाध कोठून होणार ? आतां त्याचा अर्थ कसा करावा असें म्हणाल तर ‘ उपरक्तं आदित्यं नेक्षेत ’ म्हणजे ग्रस्त आदित्यविषयक ईक्षणविरुद्ध व्यापार करावा, असा पर्युदास करावा असेंही म्हणतां येत नाहीं; कारण, जसा निषेध प्रवृत्त होत नाहीं, तसा येथें पर्युदासपक्षीं आर्थिक निषेध होतो म्हणून तोही करणें युक्त नाहीं, याकरितां चाक्षुषज्ञान निमित्त मानण्यास अडचण नाहीं. समाधान - दर्शनाचा अनुवाद करुन स्नानादिकांचें विधान असल्यामुळें दर्शन विधेय ( विहित ) नाहीं. हा प्रकार पुढें सांगूं. ज्याचा अनुवाद त्याला विधेयत्वही मानलें तर विरुद्ध त्रिकद्वय प्राप्त होईल. असूं द्या त्रिकद्वय, असें म्हटलें तरी पुनः मनूनें केलेला निषेध व्यर्थ होतो, म्हणून चाक्षुषज्ञान निमित्त मानितां येत नाहीं. असें जर आहे, तर मनूनें केलेला दर्शननिषेध ग्रहण आहे तोंपर्यंत आहे, म्हणून ‘ राहुदर्शने ’ इत्यादि वचनानें एकवार दर्शन विधान करुन त्या मनूच्या निषेधाचा संकोच करितों, म्हणजे दर्शनक्षणव्यतिरिक्तक्षणीं निषेध प्रवृत्त होतो, असें झाल्यानें मनुवचन व्यर्थ होत नाहीं, असें जर म्हणाल, तर तसेंही म्हणतां येत नाहीं; कारण, ‘ मुक्ति पाहून नंतर स्नान करावें ’ असें वचन असल्यामुळें मुक्तिस्नानाविषयीं देखील चाक्षुषज्ञान निमित्त होऊं लागेल ! होऊं द्या ! आमचें काय नुकसान आहे, असें जर म्हणाल तर तसें म्हणतां येणार नाहीं; कारण, ग्रस्तास्तस्थलीं “ त्या चंद्रसूर्यांचा दुसर्या दिवशीं उदय झाला असतां शुद्ध बिंब पाहून आपण स्नान करुन शुद्ध होऊन नंतर भोजन करावें ” या वचनानें दर्शनोत्तर भोजन विहित असल्यामुळें, अंधाला पूर्वीं वेधकालीं जसा भोजननिषेध तसा दर्शन होईपर्यंत भोजननिषेध प्राप्त झाला ! ग्रस्तास्तानंतर त्याचा उदय होई इतक्या कालामध्यें जो अंध झाला असेल त्याला तर भोजनाचा अत्यंत निषेध प्राप्त झाल्यामुळें चक्षु प्राप्त होईपर्यंत उपवासप्रसंगही आला.
अथान्नलोलुपतयातत्रज्ञानमात्रंविवक्ष्येततत्पूर्वेमपिनिर्लज्जेनस्वीक्रियताम् एतेनयत्केनचिदुक्तंस्पर्शस्नानं मुक्तिस्नानंचयस्यदर्शनंतेनैवकार्यम् नान्येन क्त्वाप्रत्ययेनसमानकर्तृकत्वावगतेरिति तन्निरस्तम् कातर्हितस्यगतिः दृशेरुद्देश्यविशेषणत्वाद्र्गहैकत्ववदविवक्षयार्थतः सिद्धज्ञानमात्रानुवादत्वेसर्वंसुस्थम् अंगुलाद्यनादेश्यग्रहव्यावृत्त्यावादर्शनस्यार्थवत्त्वम् नचोक्तयोग्यतापिसाध्वी दर्शनोत्तरंमेघच्छन्नेयोग्यताभावापत्त्यादानाद्यभावापत्तेः तेनतत्तद्रेखावच्छेदेनज्योतिः शास्त्रावेद्यत्वमेवयोग्यता किंच रजसोदर्शनेनारीत्रिरात्रमशुचिर्भवेदित्यत्राप्यंधस्त्रीणामाशौचाभावप्रसंगः ।
आतां तो अंध अन्नाविषयीं लोलुप ( लुब्ध ) असल्यामुळें त्या ठिकाणीं सामान्य ज्ञानच घ्यावयाचें असेल तर तें ज्ञान पूर्वी देखील निर्लज्जानें स्वीकारावें. यावरुन ( सामान्य ज्ञानाला निमित्तत्व स्वीकारल्यानें ), जें कोणी सांगितलें कीं, स्पर्शस्नान व मुक्तिस्नान हें ज्याला ग्रहणाचें दर्शन असेल त्यानेंच करावें, इतरानें करुं नये; कारण, ‘ मुक्तिं दृष्ट्वा ततः स्नायात् ’ या वचनांत ‘ दृश् ’ धातूच्या पुढें असलेल्या ‘ क्त्वा ’ प्रत्ययानें, ज्यानें मुक्तीचें दर्शन केलें त्यानेंच स्नान करावें, म्हणजे दर्शनाचा जो कर्ता तोच स्नानाचा कर्ता आहे, असें बोधित झालें आहे; असें कोणाचें मत तें खंडित झालें. आतां सामान्यज्ञानाला निमित्तत्व मानलें म्हणजे ‘ राहुदर्शने ’ इत्यादि वाक्यांतील दर्शनपदाची गति कोणती ? असें म्हणशील तर सांगतों - ‘ राहुदर्शने ’ याचा अर्थ ‘ राहुदर्शन असतां ’ म्हणजे दर्शनाला विषय राहू असतां असा आहे. ‘ यावद्दर्शनगोंचरः ’ या ठिकाणीं तर ‘ जोंपर्यंत दर्शनाला विषय चंद्रसूर्यग्रहण ( राहु ) आहे, असा अर्थ स्पष्टच आहे. या ठिकाणीं स्नानाला उद्देश्य जो राहु त्याला ‘ दृश् ’ म्हणजे दर्शन हें विशेषण असल्यामुळें जशी ग्रहाची एकत्व संख्या अविवक्षित तसें येथें उद्देश्याचें विशेषण जें दर्शन तें अविवक्षित ( सार्थकत्वेंकरुन अप्रयुज्यमान ) असल्याकारणानें आर्थिक सिद्ध जें सामान्य ज्ञान त्याचेंच हें दर्शनपद अनुवादक आहे असें झालें असतां सर्व व्यवस्थित होतें, म्हणजे कोणतीही आपत्ति येत नाहीं. अथवा अंगुलादि न्यून असलेले जें ग्रहण सांगण्यास योग्य नाहीं त्याची व्यावृत्ति ( निवारण ) होण्यासाठीं दर्शन पदाला सार्थकत्व येतें. वर सांगितलेली जी योग्यता ( प्रयत्नानें दूर करण्यास न येणारें असें जें चाक्षुषज्ञानाला प्रतिबंधक तद्रहितत्व ) तीही चांगली आहे असें नाहीं; कारण, दर्शनोत्तर मेघानें आच्छन्न असतां योग्यतेचा अभाव प्राप्त झाल्यामुळें दानादिकांचा अभाव प्राप्त होईल. म्हणून त्या त्या रेखांहींकरुन ज्योति शास्त्रानें आसमंतात् जाणण्याला योग्य असणें हीच योग्यता समजावी. आणि सर्वत्र दर्शनपदानें चाक्षुषज्ञान घेतलें तर ‘ रजोदर्शन झालें असतां स्त्री तीन दिवस अशुचि होते ’ या स्थलींही आंधळ्या स्त्रियांना चाक्षुषज्ञान नसल्यामुळें अशुचित्वाच्या अभावाचा प्रसंग येईल.
यत्तुवर्धमानेनोक्तम् ज्ञानोत्तरंत्वधिकारोनज्ञानकाले स्नानकालेज्ञानाभावात् एवंदर्शनोत्तरंमुक्तिपर्यंतमस्त्येवयोग्यतेति तदपिप्रतिज्ञामात्रम किंच ग्रस्तास्ते तयोः परेद्युरुदयेदृष्ट्वाभ्यवहरेच्छुचिरित्यादिवाक्यवैयर्थ्यापत्तिः चाक्षुषज्ञानान्यथानुपपत्त्यैवार्थादुदयेस्नानसिद्धेः ननौ मुक्तिस्नानेशास्त्रीयमेवज्ञानंनिमित्तंनचाक्षुषं चंद्रसूर्यग्रहेनाद्यात्तस्मिन्नहनिपूर्वतः राहोर्विमुक्तिंविज्ञायस्नात्वाकुर्वीतभोजनमिति वृद्धगौतमेनविज्ञायेतिज्ञानमात्रोक्तेः यत्तु मुक्तिंदृष्ट्वातुभोक्तव्यंस्नानंकृत्वाततः परमिति तदपिज्ञानमात्रपरम् मेघमालादिदोषेणयदिमुक्तिर्नदृश्यते आकलय्यतुतंकालंस्नात्वाभुंजीतवाग्यत इति गौडनिबंधेवचनात् मैवम् अज्ञातस्यनिमित्तत्वाभावेन निमित्तमहिम्नैवज्ञानलाभेवाक्यवैयर्थ्यात् ग्रस्तास्तेपितदापत्तेश्च ।
आतां जें वर्धमानानें सांगितलें कीं, ‘ ज्ञानोत्तर स्नानादिकांविषयीं अधिकार, ज्ञानकालीं अधिकार नाहीं; कारण, ज्ञान कालीं अधिकार मानला तर स्नानकालीं ज्ञानाचा अभाव असल्यामुळें अधिकार नाहींसा होईल. याप्रमाणें ‘ दर्शनोत्तर मुक्ति पर्यंत योग्यता आहेच ’ असें तेंही सामान्यतः सांगणें आहे. आणखी ‘ मुक्तिं दृष्ट्वा ततः स्नायात् ’ म्हणजे ‘ मुक्ती पाहून नंतर स्नान करावें ’ या ठिकाणीं मुक्तिस्नानाला चाक्षुषज्ञान निमित्त असें मानलें असतां, ग्रस्तास्तस्थलीं “ दुसर्या दिवशीं त्या चंद्रसूर्यांचा उदय झाल्यावर पाहून शुद्ध होऊन भोजन करावें ” या वाक्याला व्यर्थत्व प्राप्त होईल; कारण, अन्यथा म्हणजे उदयावांचून चाक्षुषज्ञानाची अनुपपत्ति असल्यामुळें अर्थात् उदय झाल्यावर स्नान सिद्ध आहे; त्याकरितां वाक्याची गरज नाहीं. शंका - मुक्तिस्नानाविषयीं शास्त्रीयच ज्ञान निमित्त, चाक्षुषज्ञान निमित्त नाहीं; कारण, “ चंद्रसूर्यग्रहण ज्या दिवशीं असेल त्या दिवशीं पूर्वीं जेवूं नये; ग्रहणाची मुक्ति जाणून नंतर स्नान करुन भोजन करावें, ” ह्या वचनांत वृद्धगौतमानें ‘ विज्ञाय ’ ( जाणून ) असें सामान्य ज्ञान सांगितलें आहे. आतां जें “ मुक्ति पाहून नंतर स्नान करुन भोजन करावें ” असें वचन तेंही सामान्यज्ञानविषयक आहे; कारण, “ मेघमाला इत्यादि दोषांमुळें जर मुक्ति झालेली दिसणार नाहीं, तर मुक्ति - कालाचें आकलन करुन ( शास्त्रादिकानें ज्ञान करुन घेऊन ) स्नान करुन भोजन करावें ” असें गौडनिबंधांत वचन आहे. अर्थात् मुक्तिस्नानाविषयीं सामान्य ज्ञान निमित्त असें म्हणतो ? समाधान - असें म्हणतां येणार नाहीं; कारण, अज्ञात जो ग्रहणमोक्ष त्याला निमित्तत्वाचा अभाव असल्यामुळें ज्यापेक्षां निमित्त म्हणून सांगितलें त्यापेक्षां निमित्ताच्या महिम्यानेंच ज्ञान असलें पाहिजे असें झालें असतां ‘ राहोर्विमुक्तिं विज्ञाय ’ हें वृद्धगौतमाचें वचन व्यर्थ होईल. आणि ग्रस्तास्तस्थलीं देखील मुक्तिज्ञानानंतर भोजन प्राप्त होईल.
किंच दर्शनंपुंसोविशेषणमुपलक्षणंवा नाद्यः दर्शनावच्छिन्नेकालेस्नानतुलादानादेर्बाधात् दर्शनविच्छेदे कृतमपिस्नानादिनग्रहणनिमित्तंस्यात् नांत्यः यावद्दर्शनगोचर इतियावत्पदवैयर्थ्यप्रसंगात् दृष्टग्रहस्यग्रहणोत्तरमपिस्नानाद्यापत्तेश्च ज्ञानपक्षेप्येषदोषस्तुल्य इतिचेत् मूर्खोसि यदिज्ञानवाचकंपदंश्रूयेत ततस्तस्यान्वयोविचार्येत दृशिस्तुश्रूयत इतिवैषम्यम् कथंतर्हिज्ञानंलभ्यते संक्रांतौस्नायादितिवदर्थादित्यवेहि अश्रुतत्वादेवनोद्देश्यविशेषणविवक्षाकृतोवाक्यभेदोपि अस्तुतर्हिदृष्टंग्रहणंनिमित्तमितिचेत् ग्रस्तास्तेऽस्तोत्तरंस्नानापत्तेः विशिष्टोद्देशे वाक्यभेदाच्च तवाप्येतत्तुल्यमितिचेत् यावद्दर्शनगोचर इतिवचनेनतन्निषेधात् तवत्वन्यग्रह इवग्रस्तास्तेपिस्यात् ।
आणखी ‘ राहुदर्शने ’ या ठिकाणीं जर दर्शनपद विवक्षित आहे, तर तें दर्शन पुरुषाचें विशेषण आहे किंवा उपलक्षण आहे. विशेषण म्हटलें म्हणजे दर्शनयुक्त जो पुरुष त्यानें स्नानादि करावें, असा अर्थ होतो. पहिला पक्ष विशेषण म्हणतां येत नाहीं; कारण, दर्शनयुक्तकालीं स्नान, तुलादान इत्यादिकांचा बाध ( असंभव ) आहे. दर्शन नसतां स्नानादि केलें तरी तें ग्रहणनिमित्तक होणार नाहीं. दुसरा पक्ष उपलक्षण. तेंही म्हणतां येत नाहीं; कारण, ‘ यावद्दर्शनगोचरः ’ म्हणजे ‘ जोंपर्यंत दर्शनाला विषय आहे, तोंपर्यंत अधिकार ’ ह्या वाक्यांतील यावत्पद व्यर्थ होईल. आणि ज्यानें ग्रहण पाहिलें त्याला ग्रहणोत्तर कधींही स्नानादिक प्राप्त होईल. ज्ञानपक्षीं देखील हा दोष सारखाच आहे, म्हणजे ज्ञान विशेषण मानलें तर ज्ञानकालीं स्नानादिकांचा बाध व ज्ञानाचा विच्छेद झाला असतां केलेलें स्नानादिक ग्रहणनिमित्तक नाहीं. उपलक्षण मानलें तर यावत्पदाला व्यर्थत्व; आणि ज्ञान झाल्यावर कधीही स्नानादिक प्राप्त होतील. हा दोष येतोच असें म्हणशील तर तूं मुर्ख आहेस ! कारण, जर ज्ञानवाचक पद असेल तर त्याच्या अन्वयाचा विचार केला जाईल ! पण ज्ञानवाचकपद नाहीं. दर्शनपद प्रत्यक्ष श्रुत आहे असें ज्ञानपक्षाहून दर्शनपक्षीं वैषम्य आहे. जर ज्ञानवाचकपद नाहीं तर ‘ राहुज्ञान झालें म्हणजे स्नानादि करावें ” या ठिकाणीं ज्ञान हा अर्थ कसा लब्ध होतो ? असें म्हणशील तर ‘ संक्रांतीस स्नान करावें ’ ह्या स्थलीं जसें संक्रांतिनिमित्तक स्नान सांगितल्यानें अर्थात् तिचें ज्ञान प्राप्त होतें त्याप्रमाणें येथेंही ‘ ज्ञान ’ हा अर्थ अर्थात् प्राप्त होतो, असें जाण. ज्ञानवाचकपद श्रुत नाहीं म्हणूनच उद्देश्याचें विशेषण विवक्षित असल्यानें जो वाक्यभेद होत असतो तोही येथें होत नाहीं. आतां पाहिलेलें जें ग्रहण तें स्नानादिकांला निमित्त असूं द्या ? असें जर म्हटलें तर ग्रस्तास्तस्थलीं अस्तोत्तर स्नान प्राप्त होईल. आणि दर्शनविशिष्ट ग्रहणाचा उद्देश केला असतां ‘ दर्शन करावें ’ हें एक वाक्य आणि ‘ दर्शनयुक्त ग्रहण असतां स्नान करावें ’ हें दुसरें वाक्य. याप्रमाणें वाक्यभेदही होईल. तुला ही ( ज्ञातग्रहण निमित्त असें म्हणणारालाही ) हा दोष ( ग्रस्तास्तीं अस्तोत्तर स्नानापत्तिरुप ) सारखा आहे असें म्हणशील तर ‘ यावद्दर्शनगोचरः ’ ह्या वचनानें दर्शनपर्यंत अधिकार सांगितल्यानें अस्तोत्तर स्नानादिकाचा निषेध आहे. तुझ्या मतीं तर इतर ग्रहणाविषयीं जसें दृष्टग्रहण निमित्त असें ग्रस्तास्तस्थलीं देखील दृष्टग्रहण असल्यामुळें स्नानादिक प्राप्त होईल. आमच्या मतीं “ यावद्दर्शनगोचरः ” याचा अर्थ जोंपर्यंत दृष्ट ( पाहिलेलें ) ग्रहण आहे तोंपर्यंत अधिकार असा केल्यामुळें या वचनानें निषेध होत नाहीं.
किंच दर्शनस्यविधिरनुवादोवा आद्ये ग्रहणोद्देशेनदर्शनविधिरुतदर्शनविशिष्टस्नानविधिरुतस्नानोद्देशेनदर्शनविधिः नाद्यः ग्रहोद्देशेनस्नानविधानेदर्शनविधानेचवाक्यभेदात् एतेनद्वितीयोपिपरास्तः नतृतीयः स्नानस्याप्राप्तेः दर्शनस्यनिमित्तत्वेनाविधेयत्वाच्च अन्यथासोमवमनादौप्रसंजनविधिः केनवार्येत ।
आणखी ‘ राहुदर्शने ’ येथें दर्शनाचा विधि आहे किंवा अनुवाद आहे. पहिल्यापक्षीं ( विधिपक्षीं ) ग्रहणोद्देशेंकरुन दर्शनाचा विधि, किंवा दर्शनविशिष्ट स्नानविधि अथवा स्नानोद्देशेंकरुन दर्शनाचा विधि. या तिघांमध्यें पहिला पक्ष युक्त नाहीं; कारण, ‘ ग्रहण असतां स्नान करावें ’ असें ग्रहणाच्या उद्देशानें स्नानाचें विधान आणि ‘ ग्रहण पाहावें ’ असें ग्रहणाच्या उद्देशानें दर्शनाचें विधान केलें असतां वाक्यभेद होतो. येणेंकरुन दुसराही पक्ष खंडित झाला. तिसराही पक्ष युक्त नाहीं; कारण, स्नान अप्राप्त असल्यामुळें त्याचा उद्देश करितां येत नाहीं. आणि दर्शन निमित्त असल्यामुळें त्याचें विधानही होत नाहीं. अन्यथा म्हणजे जें निमित्त असतें त्याचें विधान मानलें तर ‘ सोमाचें वमन झालें असतां सोमेंद्र देवतेला श्यामाकचरुचा निर्वाप ( होम ) करावा ’ असें सांगितलें आहे. या ठिकाणीं श्यामाकचरुला निमित्त सोमवमन आहे. या स्थलीं ‘ सोमवमन करावें ’ असा सोमवमनाचा विधि प्रसक्त झाला त्याचें वारण कशानें होणार ? याकरितां निमित्ताचें विधान होत नाहीं, असें म्हटलें पाहिजे.
अथनानावाक्येषुक्कचिद्दर्शनविशिष्टस्नानविधिः क्कचिच्चप्राप्तंदर्शनंनिमित्तीकृत्यस्नानमात्रविधिः तन्न स्नानस्यप्रधानस्याप्राप्तौतदंगदर्शनप्राप्तिः तस्यांचनिमित्तेसतिस्नानमित्यन्योन्याश्रयात् एवंदर्शनविधौसतितन्निमित्तकस्नानविधिः सतिचप्रधानस्नानविधौतदंगदर्शनविधिः एवमधिकारेप्रयोजकत्वेचयोज्यम् क्त्वार्थपूर्वकालत्वविधौचास्त्येववाक्यभेदः अन्यथास्नानोत्तरमपिदर्शनमंगंस्यात् नद्वितीयः तत्रापिदर्शनग्रहयोर्निमित्तत्वेस्नानद्वयापत्तेः दर्शनावृत्तौनैमित्तिकावृत्तिप्रसंगात् दर्शनविशिष्टग्रहस्यविशिष्टस्यानुवादेवाक्यभेदापत्तेः नचहविरार्तिवद्विशिष्टंनिमित्तमितिवाच्यम् आर्तिमात्रस्यहिनिमित्तत्वेनिमेषाद्यार्तेरपितत्त्वापत्तेर्नैमित्तिकत्वभंगाद्युक्तंविशिष्टोद्देश्यत्वम् इहतुग्रहणमात्रस्यनिमित्तत्वेनकाचित्क्षतिः तस्माद्दर्शनवाक्यानांग्रस्तास्तविषयत्वादनादेश्यग्रहपरत्वाद्वाज्ञानस्यचार्थतः प्राप्तेस्तदेवनिमित्तं तेनमेघाद्याच्छादनेंऽधादेश्चस्नानादिभवत्येवेत्यलंवेदबाह्मैः संलापेन इतिग्रहणनिर्णयः ।
आतां नाना वाक्यांमध्यें क्कचित्स्थलीं ( ‘ मुक्तीं दृष्ट्वा ततः स्नायात् ’ मुक्ति पाहून स्नान करावें, इत्यादि स्थलीं ) दर्शनविशिष्ट स्नानाचा विधि. क्कचित्स्थलीं ( ‘ राहुदर्शने ’ इत्यादि स्थलीं ) प्राप्त जें दर्शन त्याला निमित्त करुन स्नानाचाच विधि आहे. हें म्हणणें बरोबर नाहीं; कारण, ‘ दर्शन करुन स्नान करावें, असें झाल्यानें प्रधान स्नान त्याची प्राप्ति असेल त्या वेळीं त्याची अंगभूत जी दर्शनाची प्राप्ति ती येणार, आणि दर्शनाची प्राप्ति निमित्त झालें असतां स्नानाची प्राप्ति येणार, असा अन्योन्या श्रय ( परस्परसापेक्षत्व ) रुप दोष येतो. याप्रमाणें दर्शनविधि असतां दर्शननिमित्तक स्नानविधि, आणि प्रधान स्नानविधि असतां तदंग दर्शनविधि. यासारखेंच अधिकाराविषयीं योजावें. तें असें - दर्शनाधिकार असतां तन्निमित्तक स्नानाधिकार, प्रधानस्नानाधिकार असतां तदंग दर्शनाधिकार. असेंच प्रयोजकत्वाविषयींही योजावें. आतां या स्थलीं ( ‘ मुक्तिं दृष्ट्वा ततः स्नायात् ’ येथें ) वचनांत दोघांचें विधान असल्यामुळें वाक्यभेद नाहीं, असें म्हणशील तर ‘ दृश् ’ या धातूहून ‘ त्वा ’ प्रत्यय आहे, त्याचा अर्थ पूर्वकालत्व त्याचें विधान करतेवेळीं वाक्यभेद आहेच. तो असा - ‘ मुक्ति पूर्वकालीं पाहावी ’ असें भिन्न वाक्य करुन पूर्वकालाचें विधान केलेंच पाहिजे, नाहीं केलें तर स्नानोत्तरही त्या स्नानाचें अंग दर्शन होईल म्हणजे त्या वाक्याचा ‘ स्नानोत्तर दर्शन करावें ’ असाही अर्थ होईल. आतां दुसरा पक्ष म्हणजे प्राप्तदर्शनाला निमित्त करुन स्नानाचाच विधि. हा पक्षही युक्त नाहीं; कारण, एक दर्शन निमित्त व दुसरें ग्रहण निमित्त अशीं दोन निमित्तें झालीं असतां दोन स्नानें प्राप्त होतील. दर्शनाची आवृत्ति झाली असतां नैमित्तिक जें स्नान त्याच्या आवृत्तीच्या प्रसंग येईल. आतां दर्शनाचा अनुवाद या पक्षीं दर्शनविशिष्ट जें ग्रहण तें निमित्त, असा विशिष्टग्रहणाचा अनुवाद केला असतां ( म्हणजे ‘ दर्शन करावें, तें झालें असतां स्नान करावे ’ असा ) वाक्यभेद प्राप्त होतो. शंका - आतां असें म्हणतों कीं, जशी - हविरार्ति ( हविर्विशिष्ट आर्ति ) हें विशिष्टनिमित्त पंचशरावओदन यागाला आहे, तसें येथें दर्शनविशिष्टग्रहण असें विशिष्ट निमित्त आहे असें म्हणूं ? तर तसें म्हणतां येत नाहीं; कारण, त्या ठिकाणीं सामान्य आर्ति म्हणजे पीडा ही त्या यागाला निमित्त असें म्हटलें तर त्या मनुष्याच्या निमेषादि आतींलाही निमित्तत्व प्राप्त होईल, तसें झालें म्हणजे पंचशरावओदनयागाला नैमित्तिकत्व येणार नाहीं, म्हणून विशष्टाला ( हविर्विशिष्ट आतींला ) उद्देश्यत्व ( निमित्तत्व ) युक्त आहे. येथें तर सामान्य ग्रहणाला निमित्तत्व मानलें असतां कोणताही दोष येत नाहीं; म्हणून दर्शनविशिष्ट ग्रहणाला निमित्तत्व नाहीं. या कारणास्तव दर्शनपदयुक्त जीं वाक्यें ( मुक्तिं दृष्ट्वा ततः स्नायात् ’ इत्यादि व ‘ स्नानंदानंततः श्राद्धमनंतंराहुदर्शने ’ इत्यादि ) तीं ग्रस्तास्ताची व्यावृत्ति करणारीं अथवा अनादेश्य ( सांगण्यास अयोग्य ) असे जे अंगुलादि न्यूनग्रह त्यांची व्यावृत्ति करणारीं आहेत, व ज्ञान तर संक्रांत्यादिप्रमाणें अर्थात् प्राप्त आहे म्हणून अर्थात् प्राप्त झालेलें जें ज्ञान तेंच स्नांनादिकांला निमित्त आहे. त्या कारणानें मेघादिकानें आच्छादित असतां व अंधादिकांना स्नानादि होतच आहे. आतां वेदबाह्यांशीं ( नास्तिकांबरोबर ) संलाप ( संभाषण ) पुरे करितों. याप्रमाणें ग्रहणाचा निर्णय समाप्त झाला.