मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
व्रताचे आरंभ

प्रथम परिच्छेद - व्रताचे आरंभ

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


व्रतारंभेचविशेषः मदनरत्नेसत्यव्रतेनोक्तः उदयस्थातिथिर्याहिनभवेद्दिनमध्यभाक् साखंडानव्रतानांस्यादारंभश्चसमापनमिति देवलः अभुक्त्वाप्रातराहारंस्नात्वाचम्यसमाहितः सूर्यायदेवताभ्यश्चनिवेद्यव्रतमाचरेत् मदनरत्नेभविष्ये क्षमासत्यंदयादानंशौचमिंद्रियनिग्रहः देवपूजाग्निहवनंसंतोषः स्तेयवर्जनं सर्वव्रतेष्वयंधर्मः सामान्योदशधास्मृतः अग्निहोमस्तद्दैवत्यः व्याह्रतिहोमोवेतिवर्धमानः ।

व्रताचे आरंभाविषयीं विशेष सांगतो.
मदनरत्नांत - सत्यव्रत - " जी तिथि सूर्योदयव्यापिनी असून मध्यान्हीं नाहीं ती खंडा तिथि, त्या खंडातिथीचे ठायीं व्रतांचा आरंभ व समाप्ति हीं करुं नयेत. " देवल - " प्रातःकालीं कांहीं न खातां स्नात करुन व आचमन करुन शांतपणानें सूर्य व अन्य देवता यांना निवेदन करुन व्रत ग्रहण करावें. " मदनरत्नांत - भविष्यांत - " क्षमा, सत्यभाषण, दया, दान, स्वच्छता, इंद्रियनिग्रह, देवपूजा, अग्निहोम, संतोष, चोरी न करणें हे दहा धर्म सामान्येंकरुन सर्वव्रतांचे ठायीं जाणावे. " अग्निहोम म्हणजे ज्या व्रताची जी देवता त्या देवतेच्या उद्देशानें होम, किंवा व्याह्रतिहोम असं वर्धमान म्हणतो.

यत्तुतेनोक्तं सर्वपदमेतत्पुराणोक्तप्रकृतव्रतपरं व्रतांतरेतुविध्यंतरसत्त्वेहोमोऽन्यथान अतएवैकादश्यांशिष्टानांहोमानाचरणमिति तन्न जपोहोमश्चेतिवक्ष्यमाणैकवाक्यत्वेनास्यकान्यव्रतसमाप्तिपरत्वात्‍ तत्त्वं तुसाप्तदश्यस्यपशुमित्रविंदादिप्रकरणस्थेनेवतत्तद्रतविशेषहोमविधिभिरस्योपसंहार इति ।

आतां जें त्यानें ( वर्धमानानें ) सांगितलें कीं, ’ ह्या वचनांतील सर्वपद ह्या भविष्यपुराणोक्त जीं प्रकृत ( चाललेलीं ) व्रतें, त्यांविषयीं आहे, अन्यव्रतांत होमाविषयीं दुसरा विधि असेल तर होम करावा, नसेल तर होम करुं नये असें आहे, म्हणूनच एकादशीस शिष्ट होम करीत नाहींत, हें त्या वर्धमानाचें म्हणणें बरोबर नाहीं; कारण पुढें सांगावयाच्या ’ जपोहोमश्च० ’ या अग्निपुराणवचनाशीं एकवाक्यता पावून हें होमबोधक वचन काम्यव्रताच्या समाप्तिविषयक आहे. खरा प्रकार म्हटला तर - जसा - ’ सप्तदश सामिधेनीरनुब्रूयात्‍ ’ हें वाक्य कोणत्याही प्रकरणांत पठित नाहीं, प्रकरणाच्या बाहेर आहे. सामिधेनी म्हणजे अग्नि पेटविण्याच्या ऋचा, त्या सतरा म्हणाव्या, असा त्याचा अर्थ. ज्या पशुयाग, मित्रेविंदादिक इष्टि सांगितल्या आहेत, त्यांच्या प्रकरणामध्यें पठित जीं सप्तदशसामिधेनीबोधक वाक्यें त्यांच्याशीं हें वाक्य एकवाक्यता पावून त्या पशुयागादिकांतील सप्तदशसामिधेनीबोधक वाक्यांनीं या वाक्याचा उपसंहार ( संकोच ) केला, त्याप्रमाणें त्या त्या विशेषव्रताच्या होमविधायक वाक्यांनीं ह्या वाक्याचा उपसंहार ( संकोच ) केला आहे असें समजावें.

विष्णुधर्मे तज्जप्यजपनंध्यानंतत्कथाश्रवणादिकं तदर्चनंचतन्नामकीर्तनश्रवणादयः उपवासकृतामेतेगुणाः प्रोक्तामनीषिभिः कौर्मे बहिर्ग्रामांत्यजान्सूतिंपतितंचरजस्वलां नस्पृशेन्नाभिभाषेतनेक्षेतव्रतवासरे पृथ्वी चंद्रोदयेअग्निपुराणे स्नात्वाव्रतवतासर्वव्रतेषुव्रतमूर्तयः पूज्याःसुवर्णमय्याद्याःशक्त्यावैभूमिशायिना जपोहोमश्चसामान्यंव्रतांतेदानमेवच चतुर्विंशद्वादशवापंचवात्रयएवच विप्राभोज्यायथाशक्तितेभ्योदद्याच्चदक्षिणां अत्रविप्राइतिपुंल्लिंगनिर्देशात्पुमांसएवभोज्याः नतुस्त्रियः एवंसहस्त्रभोजनादावपि विरुपैकशेषस्यप्रमाणांतरंविनाऽयुक्तत्वात् अतएव द्वयोर्यजमानयोः प्रतिपदंकुर्यात् बहुभ्योयजमानेभ्य इत्यादौविरुपैकशेषायोगात् पत्नयभिप्रायंद्वित्वंबहुत्वंवानसंभवतीत्युक्तमाचार्यैः पार्थसारथिनाच एतेनैकस्यब्राह्मणस्यावृत्त्याभोजनंपरास्तं बहुत्वस्यैकपदश्रुत्याब्राह्मणान्वितत्वेनभोजनान्वयाभावादित्यन्यत्रविस्तरः ।

विष्णुधर्मांत - " ज्या देवतेचें उपोषणव्रत असेल त्या देवतेचा मंत्रजप, ध्यान, कथाश्रवण, पूजा, तन्नामाचें कीर्तन, श्रवण इत्यादिक हे उपवास करणारांचे गुण ऋषींनीं सांगितले आहेत. " कूर्मपुराणांत - " व्रती यानें व्रतदिवशीं महार, अंत्यज, सूतिका, पतित, रजस्वला, यांला स्पर्श करुं नये व त्यांच्याशीं संभाषण करुं नये व त्यांना पाहूं नये. " पृथ्वीचंद्रोदयांत - अग्निपुराणांत - " सर्व व्रतांचे ठायीं व्रती यानें स्नान करुन ज्या व्रताच्या ज्या देवता असतील त्यांच्या सुवर्णादि प्रतिमा करुन त्या व्रतमूर्तीची यथाशक्ति पूजा करावी; भूशयन करावें; जप, होम, व्रताच्या अंतीं दानें; चोवीस, बारा अथवा पांच किंवा तीन विप्रांला भोजन देऊन त्यांला यथाशक्ति दक्षिणा द्यावी. हे सर्व व्रतांचे सामान्य धर्म होत. " ह्या वरील वाक्यांत ‘ विप्राः ’ असा पुल्लिंगनिर्देश केला आहे यास्तव पुरुषविप्रांलाच भोजन घालावें ; स्त्रियांला घालूं नये. सहस्त्रभोजनादिविषयींही हाच निर्णय जाणावा. आतां, एथें ‘ विप्राः ’ म्हणजे विप्रस्त्रिया आणि विप्रपुरुष हे एकशेषसमास केला तर घेतां येतील; परंतु तसा एकशेषसमास करण्याविषयीं दुसरें प्रमाण असल्याशिवाय एकशेष करणें अयुक्त आहे. इतर प्रमाणावांचून स्त्रीवाचक व पुरुषवाचक यांचा एकशेष करितां येत नाहीं, म्हणूनच ‘ द्वयोर्यजमानयोः प्रतिपदं कुर्यात्‍, बहुभ्यो यजमानेभ्यः ’ म्हणजे दोन यजमानांला किंवा बहुत यजमानांला प्रतिपत्‍ ( म्हणजे शस्त्र म्हणून ज्या ऋचा त्यांपैकीं पहिली ऋचा ती ) करावी. या ठिकाणीं यजमानांचें द्वित्व किंवा बहुत्व यजमानस्त्री व यजमानपुरुष असें धरुन संभवत नाहीं, असें आचार्यांनीं सांगितलें आहे; व पार्थसारथीही असेंच सांगतो. यावरुन एका ब्राह्मणासच पुनः पुनः भोजन घातलें असतां संकल्पोक्त ब्राह्मणभोजन होतें, असें जें मत तें खंडित झालें. कारण, ‘ ब्राह्मणान्‍ भोजयेत्‍ ’ ह्या वाक्यांतील ‘ ब्राह्मण ’ या एकपदांत श्रुत जें बहुवचन त्याचा अन्वय ( संबंध ) ब्राह्मणासच असल्यामुळें भोजनाला बहुत्वाचा अन्वय होत नाहीं. इत्यादि विस्तार ग्रंथांतरीं आहे.

शूद्रस्यतुप्रतिष्ठादिवद्विप्रद्वाराव्याह्रतिहोमइतिवर्धमानः व्रतमूर्तयोव्रतदेवताप्रतिमाः प्रतिमास्वरुपं चमदनरत्नेभविष्ये अनुक्तद्रव्यतत्संख्यादेवताप्रतिमानृप सौवर्णीराजतीताम्रीवृक्षजामार्तिकीतथा चित्रजापिष्टलेखोत्थानिजवित्तानुरुपतः आमाषात्पलपर्यंतंकर्तव्याशाठ्यवर्जितैः ।

शूद्राला देवप्रतिष्ठादिक अनुष्ठानांत जसा ब्राह्मणद्वारा होम सांगितला आहे त्याप्रमाणें व्रतांतही ब्राह्मणद्वारा व्याह्रतिहोम करावा, असें वर्धमान सांगतो. व्रतमूर्ति म्हणजे व्रतदेवताप्रतिमा. प्रतिमास्वरुप सांगतो - मदनरत्नांत - भविष्यांत - " ज्या ठिकाणीं अमुक द्रव्याची व अमुक मानाची देवताप्रतिमा सांगितली नाहीं, त्या स्थलीं सुवर्णमयी, रौप्यमयी, ताम्रमयी, काष्ठमयी, मृन्मयी, चित्रजा, पिष्टमयी किंवा भिंत इत्यादिकांवर लिहिलेली आपल्या वित्ताला अनुसरुन एक माशापासून पलपर्यंत प्रतिमा करावी, वित्तशाठ्य करुं नये. "

तत्रैवब्राह्मे आज्यंद्रव्यमनादेशेजुहोतिषुविधीयते मंत्रस्यदेवतायाश्चप्रजापतिरितिस्थितिः मंत्रानुक्तौसमस्तव्याह्रतिरुपोमंत्रः प्रजापतिश्चदेवतेतिकल्पतरुः ।

मदनरत्नांत - ब्राह्मांत - " जेथें द्रव्य सांगितलें नाहीं तेथें होमाविषयीं आज्य द्रव्य ग्रहण करावें; जेथें मंत्र उक्त नसेल तेथें समस्तव्याह्रति मंत्र, व जेथें देवता उक्त नाहीं तेथें प्रजापति देवता घ्यावी " असा ब्राह्मवचनाचा अर्थ कल्पतरु सांगतो.

वर्धमानधृतदेवीपुराणे होमोग्रहादिपूजायांशतमष्टाधिकंभवेत् अष्टाविंशतिरष्टौवायथाप्राप्तिविधीयते मदनरत्ने अनुक्तसंख्यायत्रस्याच्छतमष्टोत्तरंस्मृतं वर्धमानधृतवृद्धशातातपः उपवासंद्विजः कृत्वाततोब्राह्मणभोजनं कुर्यात्तेनास्यसगुण उपवासोऽभिजायते

वर्धमान ग्रंथांत - देवीपुराणांत - " ग्रहमख इत्यादिक अनुष्ठानांत ज्या ठिकाणीं होमसंख्या उक्त नाहीं तेथें एकशेंआठ, अठ्ठावीस, आठ यांतून यथाशक्ति घ्यावी. " मदनरत्नांत - " जेथें संख्या उक्त नाहीं तेथें १०८ संख्या घ्यावी. " वर्धमानग्रंथांत वृद्धशातातप - " उपोषण केल्यावर व्रताचे सांगतेसाठीं ब्राह्मणभोजन करावें, तेणेंकरुन त्याचा उपवास यथासांग होतो. "

व्रतोद्यापनानुक्तौपृथ्वीचंद्रोदयेनंदिपुराणे कुर्यादुद्यापनंतस्यसमाप्तौयदुदीरितं उद्यापनंविनायत्तुतद्रतंनिष्फलंभवेत् यदिचोद्यापनंनोक्तंव्रतानुगुणतश्चरेत्‍ वित्तानुसारतोदद्यादनुक्तोद्यापनेव्रते गाश्चैव कांचनंदद्याद्रतस्यपरिपूर्तये अशक्तौनारदीये सर्वेषामप्यलाभेतुयथोक्तकरणंविना विप्रवाक्यंस्मृतंशुद्धं व्रतस्यपरिपूर्तये यथाविप्रवचोयस्तुगृह्णातिमनुजः शुभं अदत्वादक्षिणांपापःसयातिनरकंध्रुवं भारते वेदोपनिषदेचैवसर्वकर्मसुदक्षिणा सर्वत्रतुमयोद्दिष्टाभूमिर्गावोथकांचनं बैजवापः शिवनेत्रोद्भवंयस्माद्रजतंपितृवल्लभं अमंगलंतद्यत्नेनदेवकार्येषुवर्जयेत् टोडरानंदेदेवीपुराणे व्रतेचतीर्थेध्ययनेश्राद्धेपिचविशेषतः पराब्रभोजनाद्देवियस्यान्नंतस्यतत्फलम् ।

ज्या व्रताचें उद्यापन सांगितलें नाहीं त्याविषयीं सांगतो - पृथ्वीचंद्रोदयांत नंदिपुराणांत - ज्या व्रताला जें उद्यापन उक्त असेल तें व्रताच्या समाप्तीस करावें. जें व्रत उद्यापनविरहित तें निष्फल होतें. जर उद्यापन उक्त नसेल तर त्या व्रताला योग्य असें उद्यापन करावें व द्रव्यानुसार गोप्रदान व सुवर्णदान करावें, त्या योगें व्रताची सांगता होते. " - अशक्ति असतां नारदीयांत - " सर्वांचाही अलाभ असेल तर यथाविधि केल्यावांचूनही केवळ ब्राह्मणाच्या वचनानें व्रताची सांगता होते. जो मनुष्य ब्राह्मणास दक्षिणा दिल्यावांचून ब्राह्मणवचन घेतो तो पापी होऊन नरकास जातो. " भारतांत - " व्यास म्हणतो - सर्व कर्मांविषयीं वेदांत व उपनिषदांत उक्त भूमि, गाय, सुवर्ण ही दक्षिणा मी सांगितली आहे. " बैजवाप - " शिवनेत्रापासून रौप्य उत्पन्न झालें आहे म्हणून तें पितरांला प्रिय व अमंगल आहे, यास्तव तें देवकार्यांत वर्ज्य करावें. " टोडरानंदांतदेवीपुराणांत - " व्रत, तीर्थ, अध्ययन, श्राद्ध यांचे ठायीं परान्नभोजन केलें असतां ज्याचें अन्न त्याला त्याचें फल होतें. "

पृथ्वीचंद्रोदयेऽग्निपुराणे नित्यस्नायीमिताहारोगुरुदेवद्विजार्चकः क्षारंक्षौरंचलवणंमधुमांसंचवर्जयेत् क्षारास्तुतत्रैवोक्ताः तिलमुद्रादृतेशैब्यंसस्येगोधूमकोद्रवौ धान्यकंदेवधान्यंचशमीधान्यंतथैक्षवम्‍ स्विन्नधान्यंतथापण्यंमूलंक्षारगणः स्मृतः गोधूमानांतुतत्रैवप्रतिप्रसवः व्रीहिषष्टिकमुद्राश्चकलायः सतिलंपयः श्यामाकाश्चैवनीवारागोधूमाद्याव्रतेहिताः कूष्मांडालाबुवार्ताकपालंकीज्योत्स्निकास्त्यजेत् चतुर्भैक्षंसक्तुकणाः शाकंदधिघृतंमधु श्यामाकाः शालिनीवारायावकंमूलतंदुलं हविष्यव्रतनक्तादावग्निकार्यादिकेहितं मधुमांसंविहायान्यद्रतेवाहितमीरितमिति शमीधान्यंमाषादि पालंकीमध्यदेशेपोईइतिप्रसिद्धा ज्योत्स्निकाकोशातकी ।

पृथ्वीचंद्रोदयांत - अग्निपुराणांत - " व्रती यानें नित्यस्नायी; मिताहारी, गुरु, देव व द्विज यांची पूजा करणारा असें असावें; व क्षार, क्षौर, लवण, मद्य, मांस हीं वर्ज्य करावीं. क्षारगण त्याच ठिकाणीं सांगितला तो असाः - " तिल व मूग ह्यांवांचून शेंगेंत उत्पन्न होणारीं चवळ्या इत्यादिक धान्यें गहूं, कोद्रव, धणे, देवभाताचे तांदूळ, शमीधान्य ( माषादि ), गुळ, काकवी, भर्जित धान्य ( पृथुकादिक ), पण्य ( त्या दिवशीं विकत घेतलेलें ), मुळा हा क्षारगण जाणावा. " गव्हांविषयीं त्याच ठिकाणीं प्रतिप्रसव ( निषेधबाध ) सांगतो - " साळी, षष्टिक ( साठेंभात ) मूग, वाटाणे, तिल, दूध, सांवे, नीवार ( तृणधान्य ), गहूं इत्यादिक हे व्रताविषयीं हितकारक होत. कूष्मांड, भोपळा, वांगें, पालंकी ( पोईशाक ), कोशातकी ( घोसाळीं ) हीं वर्ज्य करावीं. चार घरांचें भिक्षान्न, पीठ, कण्या, शाक, दधि, घृत, मधु, श्यामाक, साळी, नीवार, यव, मुळी, तांदुळजा हे पदार्थ हविष्यव्रत, नक्त इत्यादिकांविषयीं व अग्निकार्य इत्यादिकांविषयीं हित होत. अथवा मधु व मांस वर्ज्य करुन इतर पदार्थ व्रताचे ठायीं हित होत. "

मिताक्षरायांगौतमः चतुर्भैक्षसक्तुकणयावकशाकपयोदधिघृतमूलफलोदकानिहवींष्युत्तरोत्तरप्रशस्तानि पयोदधिघृतंचगव्यमिति अन्येचविशेषाएकादशीचातुर्मास्यादिप्रकरणेवक्ष्यंते ।

मिताक्षरेंत - गौतम - " चार घरमें भिक्षान्न, पीठ, कण्या, यव, शाक, दूध, दधि, घृत, मुळें, फळें, उदक हीं हविष्यें होत, हीं उत्तरोत्तर प्रशस्त जाणावीं. दूध, दधि, घृत हीं गाईचीं प्रशस्त होत. इतर विशेष निर्णय एकादशी, चातुर्मास्य इत्यादि व्रतप्रंसगीं पुढें सांगूं.

गृहीतव्रतत्यागेतुमदनरत्नेछागलेयः पूर्वंव्रतंगृहीत्वायोनचरेत्काममोहितः जीवन्भवतिचांडालो मृतः श्वाचाभिजायते तत्रप्रायश्चित्तमुक्तंपृथ्वीचंद्रोदये अग्निगारुडपुराणयोः क्रोधात्प्रमादाल्लोभाद्वा व्रतभंगोभवेद्यदि दिनत्रयंनभुंजीतमुंडनंशिरसोथवेति प्रायश्चित्ताम्नानादतिक्रांतव्रतानुष्ठानंनास्तीतिगम्यते यत्तु प्रायश्चित्तंततः कृत्वापुनरेवव्रतीभवेदितिवचनात्‍ यच्चातिक्रांतमपिव्रतंकार्यमेवेतिशूलपाणिः तन्मध्येलोपेव्रतशेषसत्त्वेज्ञेयं एतच्चशक्तविषयम् ।

व्रतग्रहण करुन तें टाकिलें तर सांगतो - मदनरत्नांत - छागलेय - " जो मनुष्य पूर्वीं व्रत ग्रहण करुन नंतर काममोहित होऊन तें टाकितो तो जीवंत असेपर्यंत चांडालसदृश होऊन मृत झाल्यानंतर कुत्रा होतो. " त्याविषयीं प्रायश्चित्त सांगतो - पृथ्वीचंद्रोदयांत - अग्नि व गरुडपुराणांत - " क्रोधानें, प्रमादानें, अथवा लोभानें जर व्रतभंग होईल तर तीन दिवस उपोषण करावें, अथवा शिरोमुंडन ( क्षौर ) करावें " असें प्रायश्चित्त सांगितलें आहे म्हणून जें व्रत अतिक्रांत झालें तें पुनः करावयास नको, असें बोधित होतें. आतां जें " व्रतभंग झाला असतां प्रायश्चित्त करुन पुनः व्रत धारण करावें " ह्या वचनावरुन अतिक्रांत असलेलेंही व्रत करावेंच, असें शूलपाणि सांगतो; तें मध्येंच व्रताचा लोप झाला व कांहीं शेष कर्तव्य राहिलें असेल तर त्याविषयीं जाणावें. हें पूर्वोक्त ( उपवास ) शक्तविषयक आहे.

अशक्तौतुकालहेमाद्रौपुराणांतरे उपवासासमर्थश्चेदेकविप्रंतुभोजयेत्‍ । तावद्धनादिवादद्याद्भुक्तस्य द्विगुणंतथा भुक्तःकृतभोजनः ब्राह्मणभोजनंविनेतिशेषः सहस्रसंमितांदेवींजपेद्वाप्राणसंयमान्‍ कुर्याद्दादशसंख्याकान्यथाशक्त्यातुरोनर इति शुद्धितत्त्वेमात्स्ये उपवासेत्वशक्तानांनक्तंभोजनमिष्यते मदनरत्नेवायवीये द्रव्यदातोपवासस्यफलंप्राप्नोत्यसंशयं तथापरार्केदेवलः ब्रह्मचर्यंतथाशौचंसत्यमामिषवर्जनं व्रतेष्वेतानिचत्वारिवरिष्ठानीतिनिश्चयः मात्स्ये तस्मात्कृतोपवासेनस्नानमभ्यंगपूर्वकं वर्जनीयंप्रयत्नेनरुपघ्नंतत्परंनृप अन्येचनियमास्तत्रतत्रान्वेषणीयाः ।

अशक्ताविषयीं सांगतो - कालहेमाद्रींत - पुराणांतरांत - " जो मनुष्य रोगादिकानें उपोषण करण्याविषयीं असमर्थ असेल त्यानें एका ब्राह्मणाला भोजन द्यावें; अथवा तितकें द्रव्य द्यावें, ब्राह्मणाला भोजन दिल्यावांचून भोजन करील तर भोजनाचे द्विगुणित द्रव्य द्यावें. अथवा सहस्त्रगायत्रीजप किंवा बारा प्राणायाम, हें प्रायश्चित्त करावें. " शुद्धितत्त्वांत - मत्स्यपुराणांत - " अहोरात्र उपवास करण्याविषयीं जे अशक्त त्यांनीं नक्तभोजन करावें. " मदनरत्नांत - वायुपुराणांत - " द्रव्य देणारा याला उपवासाचें निःसंशय फल प्राप्त होतें. " तसेंच अपरार्कांत देवल - " ब्रह्मचर्य, शुचिर्भूतपणा, सत्यभाषण, आमिषवर्जन हीं चार कर्मैं व्रताविषयीं श्रेष्ठ होत. " मत्स्यपुराणांत - " तस्मात्‍ ज्यानें उपवास केला असेल त्यानें अभ्यंगस्नान करुं नये, तें रुपाची हानिकारक होतें. " इतर नियम त्या त्या व्रतप्रकरणीं पहावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP