योग म्हणजे चंद्रसूर्याच्या राशि - अंश - कला - विकलात्मक स्पष्ट भोगांची बेरीज होय . प्रत्येक ८०० कला इतक्या बेरजेचा एक योग होतो . पहिल्या ८०० कला बेरजेपर्यंत विष्कंभ योग , त्याच्या पुढें १६०० कला बेरजेपर्यंत प्रीतियोग , याप्रमाणें सर्व योग होतात . नक्षत्रादिकांप्रमाणें आकाशांतील स्थितीशीं योगांचा कांहीं संबंध असावा असें वाटप नाहीं . हे योग सत्तावीस आहेत . त्यांचीं नांवें : ---
विष्कंभः प्रीतिरायुष्मान्। सौभाग्यः शोभनस्तथा ।
अतिगंडः सुकर्मा च धृतिः शूलस्तस्थैवच ॥१००॥
गंडो वृद्धिर्ध्रुवश्चैव व्याघातो हर्षणस्तथा ।
वज्रं सिद्धिर्व्यतीपातो वरीयान् परिघः शिवः ॥१०१॥
सिद्धः साध्यः शुभः शुक्लो ब्रह्मा चैन्द्रोऽथ वैधृतिः ।
सप्तविंशतियोगानां स्वनामसद्दशं फलम् ॥१०२॥
१ विष्कंभ
२ प्रीति
३ आयुष्मान्
४ सौभाग्य
५ शोभन
६ अतिगंड
७ सुकर्मा
८ धृति
९ शूल
१० गंड
११ वृद्धि
१२ ध्रुव
१३ व्याघात
१४ हर्षण
१५ वज्र
१६ सिद्धि
१७ व्यतीपात
१८ वरीयान्
१९ परिघ
२० शिव
२१ सिद्ध
२२ साध्य
२३ शुभ
२४ शुक्ल
२५ ब्रह्मा
२६ ऐंद्र
२७ वैधृति
अशुभयोग .
वैधृतिव्यतिपाताख्यौ संपूर्णो वर्जयेच्छुमे ।
वज्रविष्कंभयोश्चैव घटिकात्रयमादिकम् ॥१०३॥
परिघार्घ पंच शूले व्याघाते घटिका नव ।
गंडातिगंडयोः षट् च हेयाः सर्वेषु कर्मसु ॥१०४॥
वरील सत्तावीस योगांचीं त्यांच्या नांवांप्रमाणें फळें समजावीं . व्यतीपात व वैधृति हे दोन योग संपूर्ण अशुभ आहेत . ह्या योगांवर कांहींच शुभ कार्य करुं नये . परंतु कांहीं योग असे आहेत कीं , त्यांच्या आरंभापासून कांहीं घटिकांपर्यंत मात्र त्यांचा दोष असतो . ते योग येणेंप्रमाणें : --- विष्कंभ आणि वज्र या योगांचा दोष आरंभापासून तीन घटिकांपर्यंत असतो . परिघयोगाचा पूर्वार्ध संपेपर्यंत , शूल योगाचा पहिल्या पांच घटिकांपर्यंत , व्याघातयोगाचा नऊ घटिकांपर्यंत आणि गंड आणि अतिगंड योगांचा पहिल्या सहा घटिकांपर्यंत दोष असतो . म्हणून तेवढया घटिका सोडून त्या त्या योगांवर शुभकार्ये करण्यास कांहीं हरकत नाहीं .