मंगलाचरण आणि महत्व

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.


मंगलाचरण आणि महत्व
मंगलाचरण
प्रणम्य पार्वतीपुत्रं भारतीं भास्करं भवम् ।
वैकुंठवासिनं विष्णुं सानंदं सकलान् सुरान् ॥१॥
ज्योतिषं व्यवहारार्थ ग्रंथान संशोध्य यत्नतः ।
क्रियते बालबोधाय गोविंदेन यथामति ॥२॥

आरंभीं गणपति, सरस्वती, सूर्य, शंकर, विष्णु इत्यादि सर्व देवतांना मोठया आनंदानें नमस्कार करुन माझ्या अल्पमतीप्रमाणें अनेक ग्रंथांच्या आधारानें, ज्योतिषविषय ज्यांना अपरिचित आहे, त्यांच्यासाठीं मी ज्योतिर्मयूखनामक ग्रंथ लिहितों.

ज्योतिःशास्त्र शब्दाची व्याख्या.
ज्योतिःशास्त्रांत कालाचें विधान सांगितलेलें असतें. ज्योतिष हा शब्द ‘ ज्योतिः ’ ह्या संस्कृत शब्दावरुन मूळ निघाला आहे. ज्योतिः या शब्दाचा अर्थ तेज किंवा प्रकाशकारक अवयव असा आहे; आणि त्यावरुनच मराठींत ज्योत असा शब्द झाला आहे. दिव्याप्रमाणें जे प्रकाशदायक पदार्थ आहेत, त्यांच्या प्रकाशकारक अवयवास आपण ज्योत म्हणतों, हें सर्वांस ठाऊक आहेच. आकाशांतील गोलरुप चंद्रसूर्यादिक तेजःपुंज तारा दिव्याच्या ज्योतीप्रमाणें तेजस्वी आणि प्रकाशदायक असल्यामुळें तत्संबंधी विषयास लोक ज्योतिष म्हणूं लागले असावे, असें दिसतें. शास्त्र या शब्दाचा अर्थ अनुशासन, शिकविणें किंवा नियम असा आहे. तेव्हां ज्योतिषविषयासंबंधीं जें शिक्षण किंवा जे नियम तें ज्योतिःशास्त्र होय.

ज्योतिःशास्त्राचें महत्व.
यथा शिखा मयूराणां नागानां मणयो यथा ।
तद्वद्वेदांगशास्त्राणां ज्योतिषं मूर्धनि स्थितम् ॥३॥

शिक्षा, कल्प ( सूत्र ), व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष अशीं वेदाचीं सहा अंगें आहेत, म्हणून वेदाला षडंगवेद असें म्हणतात. ह्या सहा अंगांपैकींच जरी ज्योतिष हें एक अंग आहे, तरी इतर शास्त्रांहून ज्योतिःशास्त्राचें महत्व मोठें मानिलेलें आहे. ऋग्वेदज्योतिषाच्या शेवटच्या म्हणजे सातव्या खंडांतील जो श्लोक वर दिला आहे त्याचा अर्थ असा आहे कीं, मोराची शिखा म्हणजे तुरा जसा सर्वोगांत प्रधान अंग जें मस्तक त्या मस्तकावर शोभतो, किंवा सर्पमणि जसा सर्पाच्या फणेमध्यें असतो, त्याप्रमाणें वेदांचीं जीं सहा अंगें म्हणजे शास्त्रें आहेत त्या सर्वाच्या शिरोभागीं ज्योतिषाची गणना आहे. यावरुन ज्योतिःशास्त्राचें महत्व प्राचीन कालापासून फार मोठें मानिलेलें आहे हें स्पष्ट दिसतें.

ज्योतिःशास्त्राच्या शाखा.
सिद्धान्तसंहिताहोरारुपं स्कंधत्रयात्मकम् ।
वेदस्य निर्मलं चक्षुर्ज्योतिःशास्त्रमनुत्तमम् ॥४॥

सिद्धान्त, संहिता आणि होरा असे ज्योतिःशास्त्राचे तीन स्कंध म्हणजे तीन शाखा आहेत. हीं तीन अंगें मिळून झालेलें ज्योतिःशास्त्र वेदाचे केवळ नेत्र होत. सिद्धान्तग्रंथांत ग्रहांच्या कक्षा म्हणजे त्यांचे भ्रमणमार्ग, ग्रहादिकांच्या स्पष्टगतिस्थिति म्हणजे अमुक वेळेस अमुक ग्रह आकाशांत कोठें असेल हें ठरविणें, इत्यादि गोष्टींचा गणिताच्या साहाय्यानें निर्णय केलेला असतो, म्हणून सिद्धांतस्कंधाला गणितस्कंध असेंही म्हणतात. संहितास्कंधांत धूमकेतु, ग्रहणें, ग्रहादिकांचे उदयास्त इत्यादि आकाशस्थ गोलांच्या स्थितीमुळें जगाला होणार्‍या बर्‍यावाईट फलांचें वर्णन केलेलें असतें, आणि होरास्कंधांत एकाद्या मनुष्याच्या जन्मकाळच्या ग्रहनक्षत्रलग्नादिकांवरुन त्याला त्याच्या जन्मांत काय काय सुखदुःखें होतील इत्यादि गोष्टींचें कथन केलेलें असतें. होरास्कंधाला जातकस्कंध असेंही म्हणतात. ह्याप्रमाणें ज्योतिःशास्त्राच्या तीन शाखा आहेत. जातकाची ताजिक म्हणून एक पोटशाखा आहे. ताजिकग्रंथांत वर्षफलाची माहिती सांगितलेली असते. एकाद्याच्या जन्मकाळीं आकाशांत जितक्या राशिअंशादिकांवर रवि असेल तितक्या राशिअंशादिकांवर तो पुनः आला म्हणजे त्या मनुष्याच्या आयुष्याचें कोणतेंही एक वर्ष पूर्ण होऊन पुढील वर्ष सुरु होतें. त्या वेळेच्या लग्नकुंडलीवरुन त्या पुढील वर्षात त्याला काय काय सुखदुःखें होतील हें समजतें. त्या कुंडलीला वर्षफलकुंडली म्हणतात.

ग्रहज्योतिष आणि फलज्योतिष.
अप्रत्यक्षाणि शास्त्राणि विवादास्तेषु केवलम् ।
प्रत्यक्षं ज्योतिषं शास्त्रं चंद्रार्कावेव साक्षिणौ ॥५॥

ज्योतिषाचे दोन प्रकार आहेत. एक ग्रहज्योतिष व दुसरा फलज्योतिष. ग्रहज्योतिषाला खज्योतिष म्हणजे आकाशज्योतिष असेंही म्हणतात. चंद्र, सूर्य, ग्रह, नक्षत्रें व इतर तारा आकाशांत रोज उदयास्त पावून ज्यांची प्रत्यक्ष साक्ष देत आहेत, तें खगोल किंवा ग्रहज्योतिष होय. ग्रहज्योतिषाच्या आधारानें अमुक योग असतां अमुक घडेल, त्यापासून अमक्याला अमुक प्रकारचें सुख किंवा दुःख होईल, किंवा अमुक दिवसांनीं अमक्याची पीडा दूर होईल इत्यादि गोष्टींचें ज्ञान स्वानुभवावरुन विद्वान् ऋषींनीं जें अनेक ग्रंथांतून लिहून ठेविलें आहे तें फलज्योतिषशास्त्र होय. अमक्या योगाचीं अमुक फलें असें ज्या ग्रंथांत सांगितलेलें असतें, त्या ग्रंथाला फलग्रंथ असें म्हणतात.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-02-16T08:17:47.1300000