कल्याणीचें स्वरुप .
दैत्येंद्रैः समरेऽमरेषु विजितेष्वीशः क्रुधा द्दष्टवान्
स्वात्कायात्किल निर्गता खरमुखीद लांगूलिनी चक्रपात् ।
विष्टिः सप्तभुजा मृगेंद्रगलकक्षामोदरी प्रेतगा
दैत्यघ्नी मुदितैः सुरैस्तु श्रवणप्रांते नियुक्ता तु सा ॥१२७॥
दैत्य आणि देव या उभयतांच्या युद्धप्रसंगीं देवांचा पराभव होणार असें पाहून शंकर अत्यंत क्रुद्ध होऊन त्यानीं आपल्या देहांतून भद्रा नामक एक राक्षसी उत्पन्न केली . हिलाच विष्टि , कल्याणी अशीं दुसरी नांवें आहेत . हिचें स्वरुप अमंगळ आहे . ही गर्दभमुखी पुच्छवती , सप्तभुजा , सिंहासारखा गळा असलेली , कृशोदरी , प्रेतावर आरुढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून देवांनीं आपल्या कर्णप्रांतीं ठेविलेली आहे .
कल्याणीच्या तिथि .
अष्टम्यां पूर्णिमायां च भद्रा पूर्वदले स्मृता ।
एकादश्यां चतुर्थ्या च शुक्लपक्षे परे दले ॥१२८॥
सप्तम्यां च चतुर्दश्यां विष्टिः पूर्वदले भवेत् ।
दशम्यां च तृतीयायां कृष्णपक्षे परे पले ॥१२९॥
ही भद्रा किंवा कल्याणी शुक्लपक्षांत चार वेळ व कृष्णपक्षांत चार वेळ अशी महिन्यांतून नेहमीं आठ वेळ असते . म्हणजे शुक्लपक्षांत अष्टमी व पूर्णिमा ह्या तिथींच्या पूर्वभागांत आणि एकादशी आणि चतुर्थी ह्या तिथींच्या उत्तरभागांत कल्याणी असते . तसेंच , कृष्णपक्षांत सप्तमी आणि चतुर्दशी ह्या तिथींच्या पूर्वभागीं आणि दशमी आणि तृतीया ह्या तिथींच्या उत्तरभागीं कल्याणी असते . पूर्वभाग म्हणजे तिथीच्या एकंदर वेळाचा पूर्वार्ध ; आणि उत्तर भाग म्हणजे तिथीच्या एकंदर वेळाचा उत्तरार्ध समजावा . ही कल्याणी किंवा भद्रा म्हणजेच पूर्वी सांगितलेला विष्टि करणाचा काल होय .