हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
शककर्ते

शककर्ते

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.


युधिष्ठिरो विक्रमशालिवाहनौ ततो नृपः स्याद्विजयाभिनंदनः ।
ततस्तु नागार्जुनभूपतिः कलौ कल्की षडेते शककारकाः स्मृताः ॥१९॥

कलियुगांत एकंदर सहा शककर्ते होतील असें विद्वान् ऋषीनीं लिहून ठेवलें आहे. त्या सहांतून तीन होऊन गेले आणि तीन अद्यापि व्हावयाचे आहेत. ते शककर्ते कोणते व कोणाचा शक कोठें स्थापित होऊन किती वर्षे चालेल हें खालीं दिलें आहे.

पहिला - इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली येथें युधिष्ठिरशक    ...        ...        ३०४४ वर्षे.
दुसरा - उज्जयिनी येथें विक्रमशक ( संवत् )               ...        ...          १३५
तिसरा - पैठण येथें शालिवाहनशक                           ...        ...      १८,००० "
चौथा - वैतरणेच्या कांठीं विजयाभिनंदनशक              ...        ...      १०,००० "
पांचवा - बंगाल देशांत धारातीर्थी नागार्जुनशक           ...       ...   ४,००,००० "
सहावा - कर्नाटकांत करवीरपत्तनीं कल्कीशक              ...       ...            ८२१ "
                                                                                              -----------------
                                एकंदर कलियुगाचीं  ४,३२,००० वर्षैं
सांप्रत शालिवाहनाचा शक चालू आहे.

शलिवाहनशक.
शक या शब्दाचा अर्थ व्यवहारांत काल असा समजतात. पण वास्तविक अर्थ निराळा आहे. प्राचीन काळीं शककुलोत्पन्न राजे होते. त्यांच्या वर्षास शककाल किंवा शकनृपकाल म्हणजे शककुलांतील राजांचीं वर्षै असें म्हणत असत. त्यांचा काल संपल्यानंतर पुढें शालिवाहनाचा काल सुरु झाला, त्यास शालिवाहनाचा काल असें न म्हणतां काल शब्दाऐवजीं पूर्वींचा शक शब्द कायम ठेवून लोक शालिवाहनाचा शक असें म्हणूं लागले. सुमारें ४०० वर्षापूर्वी शालिवाहनशकालाही शककाल किंवा शकनृपकाल असें म्हणत असत. सारांश, शक हें वस्तुतः प्रथम एका कुलाचें नांव असून हल्लीं तो शब्द कालबोधक समजतात.
गोदातीरीं पैठणक्षेत्रामध्यें शालिवाहन या नांवाचा राजा होता. त्यानें विक्रमाच्या शकानंतर १३५ वर्षानीं आपला शक सुरु केला म्हणून त्याच्या शकास त्याच्या नांवावरुन शालिवाहनशक असें म्हणतात. ह्या शकाचा वर्षारंभ चैत्रशुक्ल प्रतिपदेस होतो. म्हणून त्या दिवसास वर्षप्रतिपदा म्हणतात. शालिवाहनशक नर्मदानदीच्या दक्षिणेकडे म्हणजे महाराष्ट्रांत फार प्रचारांत आहे. शालिवाहनशक आणि इसवीसन ह्यांमध्यें ७८। वर्षाचें अंतर आहे.

विक्रमसंवत्.
उज्जयिनीस विक्रमादित्य नांवाचा राजा होऊन गेला. त्यानें इसवीसनापूर्वी सुमारें ५६।५७ वर्षें आपला शक सुरु केला. ह्याच्या शकास संवत् असें म्हणतात. संवत् हा संवत्सर ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. ह्या शकाचा वर्षारंभ कार्तिकशुक्ल प्रतिपदेस होतो. व्यापारी लोकांचें व्यापारासंबंधीं ह्या दिवशीं वर्ष बदलतें. गुजरातेंत कित्येक ठिकाणीं ह्या वर्षाचा आरंभ चैत्रांत व कित्येक ठिकाणीं आषाढांत होतो. नर्मदेच्या उत्तरेकडे म्हणजे गुजरातप्रांतांत विक्रमसंवत् फार प्रचारांत आहे. नर्मदेच्या दक्षिणेकडे व्यापारी लोक मात्र आपल्या व्यापारासंबंधीं लिहिण्यांत संवत् मानितात. शालिवाहनशकांत १३५ मिळविले म्हणजे कार्तिकांत शुक्ल प्रतिपदेस आरंभ होणार्‍या वर्षारंभाचा संवत् निघतो.

युरोपियन शक.
इंग्रजी राज्यामुळें तिथीपेक्षां तारखेची गरज अलीकडे विशेष लागते, म्हणून लोकांच्या सोयीसाठीं पंचांगांतून इंग्रजी तारखा व महिने वगैरे लिहिण्याची चाल पडली आहे. म्हणून त्याविषयीं खालीं माहिती देतों.
युरोपियनांच्या म्हणजे ख्रिती लोकांच्या शकास इसवीसन असें म्हणतात. सन हा शब्द मूळचा यवनी आहे आणि इसवी हा कदाचित् येशूशब्दाचा अपभ्रंश असेल. ह्या शकाचा आरंभ येशूख्रिस्ताच्या जन्मापासून धरिला आहे. आणि त्याचा वर्षारंभ जान्युआरी महिन्याच्या पहिल्या तारखेस होतो. शालिवाहनशकांत ७८। मिळविले किंवा विक्रमसंवतांतून ५६ वजा केले म्हणजे इसवीसन निघतो. ह्याचा अर्थ असा कीं, शालिवाहनशक इसवीसनानंतर ७८। वर्षानीं सुरु झाला व विक्रमसंवत् ५६ किंवा ५७ वर्षें इसवीसनापूर्वी सुरु झाला. ह्याचें सायन सौरमानाचें म्हणजे ३६५ दिवसांचें वर्ष आहे. सूक्ष्म मानानें ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटें ४६ सेकंद इतक्या काळाचें एक सायन सौरवर्ष होतें. व त्यांच्या वर्षाचे दिवस फक्त ३६५ असतात; आणि वरचा ५ तास ४८lll मिनिटांचा फरक नाहींसा व्हावा, म्हणून दर चार वर्षानीं फेब्रुआरीचे २९ दिवस धरितात. त्यांच्या बारा महिन्यांचे दिवस सारखे नसतात. जान्युआरी ३१ फेब्रुआरी २८ मार्च ३१ एप्रिल ३० मे ३१ जून ३० जुलई ३१ ऑगस्ट ३१ सप्टेंबर ३० आक्टोबर ३१ नोव्हेंबर ३० डिसेंबर ३१ याप्रमाणें असतात. ज्या वर्षी फेब्रुआरीचे २९ दिवस धरितात त्या वर्षास लीप म्हणजे अधिकावर्ष म्हणतात. ज्या सनास चोहोंनीं पूर्ण भाग जातो तें लीपवर्ष होय. उदाहरणार्थ, १८९२, १८९६, इत्यादि. तसेंच जेव्हां सनाच्या शेवटीं दोन शून्यें असतात, तेव्हां जर त्या सनाला ४०० नीं निःशेष भाग जात असेल तरीही तें लीप वर्ष समजावें. परंतु निःशेष भाग जात नसेल तर तें लीपवर्ष होत नाहीं. उदाहरणार्थ, सन १७००, १८०० किंवा १९०० ह्या सनाला ४०० नीं भागिलें असतां निःशेष भाग जात नाहीं, म्हणजे भागाकाराची बाकी शून्य राहात नाहीं, म्हणून ह्यांपैकीं कोणतेंही लीपवर्ष नव्हे. पण सन १६०० किंवा २४०० ह्याला ४०० नीं भागून पूर्ण भाग जातो, म्हणून हीं लीपवर्षें होत. याप्रमाणें प्रत्येक ४०० वर्षात तीन ( लीप ) दिवस वजा होतात. याचें कारण असें आहे कीं, दर चार वर्षानीं फेब्रुआरी महिन्याचा जो एक दिवस अधिक धरितात, त्यांत हिशेबापेक्षां सुमारें पाऊण तास अधिक धरिला जातो; म्हणजे दर चारशें वर्षात तीन दिवस जास्त मोजले जातात. ही चूक नाहींशी व्हावी म्हणून दर चारशें वर्षात तीन दिवस वजा करावे लागतात.

यवनी शक.
मुंबई, पुणें इत्यादि ठिकाणच्या पंचांगांतून बहुधा यवनी शक दाखवितात, याकरितां त्यांपैकीं कांहीं शकांचीं संक्षिप्त माहिती येथें सांगतों.

हिजरी सन--- हिजरा या यवनी शब्दाचा अर्थ पळून जाणें असा आहे. महंमद पैगंबर इसवीसन ६२२ तारीख १५ जुलई रोजीं मक्केहून मदिना येथें पळून गेला आणि त्या दिवसापासून ह्या शकाची सुरवात झाली, म्हणून त्यास हिजरी सन म्हणतात. ह्या सालाचा वर्षारंभ मोहरम महिन्याच्या पहिल्या तारखेस होतो. ह्याचें चांद्रमासाचें वर्ष आहे. अमावास्येनंतर ज्या रात्रीं प्रथम चंद्रदर्शन होईल तो महिन्याचा प्रथम दिवस समजतात. चंद्रदर्शन झाल्यावेळेपासून महिन्याचा आरंभ होत असल्यामुळें वाराचा आरंभ अर्थात् रात्रीपासून होतो. म्हणजे आपली शनिवारची रात्र ती त्यांची आदित्यवारची रात्र असते. महिन्याच्या दिवसाला पहिला चंद्र, दुसरा चंद्र असें म्हणतात; किंवा तारीख शब्दाचाही उपयोग करितात. त्यांचे बारा महिने हिंदूंच्या चांद्रमासांबरोबर असून सर्व महिन्यांचे दिवस सारखे नसतात. म्हणजे आपल्या महिन्याचे जसे कधीं २९ आणि कधीं ३० दिवस होतात, त्याप्रमाणेंच त्यांच्या महिन्यांचे कधीं २९ आणि कधीं ३० चंद्र होतात; आणि वर्षाचे दिवस ३५४ भरतात. पण मुसलमान लोक आपल्याप्रमाणें अधिक महिना धरीत नाहींत, त्यामुळें त्यांच्या वर्षाचा सौरवर्षाशीं मेळ नसतो. ज्या वर्षी आपला अधिकमास येतो, त्या वर्षी त्यांचा मोहरम एक महिना मागें जातो. ह्याप्रमाणें दर तिसर्‍या वर्षीं एक महिना मागें गेल्यामुळें दर ३२ किंवा ३३ वर्षांनीं त्यांच्या सनाचा एक अंक वाढतो. त्यांच्या बारा महिन्यांचीं नांवें - १ मोहरम २ सप्फर ३ रबिलावल ४ रबिलाखर ५ जमादिलावल ६ जमादिलाखर ७ रज्जब ८ साबान ९ रमजान १० सवाल ११ जिल्काद १२ जिल्हेज.

२ फसली सन--- पेरणीचे सुमारास ह्या सनाचा वर्षारंभ होतो म्हणून याला फसली सन म्हणतात. फसल शब्दाचा अर्थ पेरणें, शेत करणें असा आहे. दक्षिण हिंदुस्थानांत शहाजहान नांवाच्या बादशहानें इसवी सन १६३६ त ह्या सनाचा आरंभ केला; पण त्यापूर्वींच सुमारें ८० वर्षें अकबरानें उत्तरहिंदुस्थानांत हा सन प्रचारांत आणिला होता. फसलीस फारशी असें सांप्रत म्हणतात. पंचांगांतून फारशी तारखा असतात, त्या फसली महिन्याच्याच होत. पारशी व फारशी सन निराळे आहेत पण महिन्यांचीं नांवें मात्र एकच असतात. मुंबई प्रांताच्या पंचांगांतून फसली सनाचा फक्त वर्षारंभ दाखवितात, पण तारखा दाखवीत नाहींत. हा वर्षारंभ जून महिन्याच्या सुमारें सातव्या तारखेस असतो. थोडया वर्षापूर्वीं माजी निजामसरकारांनीं जुन्या फसलीच्या तारखेंत फेरफार करुन आजूर महिन्यापासून सनाचा आरंभ ठरविला आहे. तो भाद्रपद किंवा आश्र्विन या महिन्यांत असतो. फारशी महिन्यांचीं नांवें - आजूर ३० दय २९ बहमन ३० इस्पिंदाद ३० फरवर्दीं ३१ आर्दिबेहस्त ३१ खुर्दाद ३१ तीर ३१ अमरदाद ३१ शहरेवार ३१ मेहेर ३० आबान ३० ह्याप्रमाणें एकंदर वर्षाचे दिवस ३६५ असतात. दरवर्षात पूर्ण वर्षाचा काल भरण्यास सुमारें सहा तास कमी पडतात. म्हणून इंग्रजी पद्धतीप्रमाणें ज्या फसली सनाच्या अंकांस चार या संख्येंनें निःशेष भाग जातो त्या सालीं दय महिना ३० तारखेचा धरितात. ह्या सनाला मूळ आरंभ इसवी सन ५९० म्हणजे शके ५१२ या वर्षीं झाला. फसली साल हिजरी सालाप्रमाणें चांद्रमानाचें नसून सौरमानाचें असल्यामुळें दर ३३ वर्षांनीं त्या दोहोंत एक वर्षाचें अंतर पडतें.  

अरबी सन--- ह्याला सुरुसन किंवा शाहुरसन म्हणतात. ह्या सनाचा आरंभ इसवी सन ५९९ या वर्षी म्हणजे फसली सनानंतर नऊ वर्षांनीं झाला. फसली सनाप्राणेंच मृगनक्षत्रीं सूर्य जातो त्या दिवशीं याचा वर्षारंभ होतो. याचें वर्ष सौरमानाचें आणि महिने चांद्रमानाचे आहेत. त्यामुळें दर तिसर्‍या वर्षीं एक वर्ष तेरा महिन्यांचें होतें.

पारशी शक.
पारशी लोकांच्या शकाला एजदीजर्द असें म्हणतात. हाही आपल्या पंचांगांत दाखवितात. हा शालिवाहन शकाच्या ५५२ वर्षानंतर आणि इसवी सनाच्या ६३० वर्षानंतर पारशी लोक हिंदुस्थानांत आले. ते परशिआ देशांतून आले म्हणून त्यांस पारशी म्हणतात. पारशी लोकांना हिंदुस्थानांत येऊन सुमारें १३०० वर्षें होऊन गेलीं. ह्यांचा महिना सावन म्हणजे पूर्ण तीस दिवसांचा असतो. अर्थात् वर्षाचे दिवस ३६० होतात. परंतु सौरवर्षाशीं मेळ बसावा म्हणून हे लोक वर्षाच्या शेवटीं पांच दिवस अधिक धरितात, त्यांस गाथागंबर असें म्हणतात. हे दिवस पारशी लोक फार महत्वाचे समजतात. त्यांच्या महिन्यांचीं नांवें:- १ फरवर्दिन २ आर्दीबेहस्त ३ खोरदाद ४ तीर ५ अमरदाद ६ शहरेवर ७ मेहर ८ आबान ९ आजूर १० दय ११ बहमन १२ इस्पिंदाद.

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP