हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
सूर्यनक्षत्रें

सूर्यनक्षत्रें

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


सूर्यनक्षत्रें .

पंचांगांत प्रत्येक तिथीपुढें जों नक्षत्रें लिहिलेलीं असतात तीं चंद्राचीं नक्षत्रें आहेत ; म्हणजे त्या नक्षत्रांजवळ त्या त्या दिवशीं चंद्र असतो . ह्या नक्षत्रांस दिन किंवा दिवसनक्षत्रें असें आपण म्हणतों . जशीं हीं चंद्राचीं , तशींच सूर्याचीं नक्षत्रें आहेत . सर्व नक्षत्रांतून सूर्य एका वर्षात एकदां फिरतो . एका नक्षत्रांतून फिरण्यास सूर्याला तेरा किंवा चवदा दिवस लागतात . म्हणजे सुमारें तेरा चवदा दिवसांनीं प्रत्येक सूर्यनक्षत्र बदलतें . सूर्यनक्षत्राला महानक्षत्र असेंही नांव आहे . पंचांगांत सर्व कोष्टकांच्या बाहेर ‘ भरण्यर्कः ’ ‘ कृत्तिकार्कः ’ ‘ मृगार्कः ’ ‘ पुष्यार्कः ’ ‘ उत्तरार्कः ’ वगैरे जीं नक्षत्रें लिहिलेली असतात , तींच सूर्यनक्षत्रें होत . ह्या नक्षत्रांपैकीं ज्या नक्षत्रांजवळ सूर्य आला म्हणजे पाऊस पडतो , त्या नक्षत्रांस पावसाचीं नक्षत्रें असें म्हणतात . तीं आर्द्रापासून चित्रापर्यंत नऊ आहेत . कोणी मृगापासून हस्तापर्यंत नऊ मानितात . हीं नऊ सूर्यनक्षत्रें मात्र पावसामुळें शेतकरी वगैरे सर्व लोकांस ठाऊक असतात . मृगनक्षत्र ज्या वारीं असतें , त्याच वारीं बहुतकरुन पावसाचीं सर्व पुढील नक्षत्रें असतात .

ह्या पावसाच्या नऊ नक्षत्रांविषयीं अशी एक आख्यायिका आहे कीं , एका गृहस्थानें सत्तावीस नक्षत्रें मनांत आणून एका मुलाला विचारलें कीं , सत्ताविसांतून नऊ गेले तर बाकी काय राहील ? मुलानें , बाकी अठरा राहील , असें बरोबर उत्तर दिलें . तथापि तो गृहस्थ म्हणाला , " मुला , तूं चुकलास . " नंतर त्या गृहस्थानें मुलाला समजावून सांगितलें . तो म्हणाला , " मुला , सत्ताविसांतून नऊ गेले तर बाकी मृत्तिका राहिली . " याचा अर्थ असा कीं , सत्तावीस नक्षत्रांतून पावसाचीं नऊ नक्षत्रें फुकट गेलीं , म्हणजे जर पाऊस पडला नाहीं , तर जगांत मातीवांचून दुसरें काय सांपडणार !

दिवसनक्षत्र काढण्याची रीति .

चैत्रादि द्विगुणं कृत्वा मिश्रितं तिथयो गताः ।

कारयेत् त्रीणि हीनं च शेषं दिवसभं ध्रुवम् ॥९३॥

ज्या महिन्यांतील नक्षत्र पाहिजे असेल त्या महिन्यासुद्धां चैत्रापासून सर्व महिने मोजून त्यांची दुप्पट करावी ; अधिक महिना असेल तर तोही मोजावा . नंतर ज्या तिथीचें नक्षत्र आपणास पाहिजे असेल , त्या तिथीचे अंक , महिन्याच्या दुप्पट केलेल्या अंकांत मिळवावे . कृष्णपक्षांतील तिथि असेल तर त्या तिथींत शुक्ल पक्षांतील पंधरा तिथी मिळवून नंतर ते अंक महिन्याच्या दुप्पट केलेल्या अंकांत मिळवावे . त्या बेरजेंतून तीन वजा करावे . बाकी जो अंक राहील तें नक्षत्र जाणावें . बाकी राहिलेला अंक सत्ताविसांपेक्षां जास्त असेल तर त्यांतून सत्तावीस वजा करुन जो अंक राहील , तें नक्षत्र समजावें . ही रीति सुमाराची असल्यामुळें ह्या रीतीनें कधींकधीं सुमारें पाव नक्षत्राचा म्हणजे पंधरा - वीस घटिकांचा फरक पडेल . परंतु हा फरक ज्या तिथीचें नक्षत्र पाहिजे असेल त्या तिथीपूर्वी त्या महिन्यांत एकाद्या तिथीची किंवा चालू नक्षत्रमालेपैकीं म्हणजे अश्विनी नक्षत्रापासून एकाद्या नक्षत्रांची क्षयवृद्धि असेल तरच बहुधा पडतो . अशा वेळेस तिहींच्या जागीं दोन वजा केले तर हा फरक प्रायः पडत नाहीं ; तथापि ही रीति स्थूलमानाची आहे , हें ध्यानांत ठेवावें .

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP