हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
विविध योग

विविध योग

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


अमृतसिद्धियोग .

रवौ हस्तो भृगश्चंद्रे गुरौ पुष्योऽश्विनी कुजे ।

अनुराधा बुधे शुक्रे रेवती रोहिणी शनौ ॥११९॥

अमृतः सिद्धियोगः स्यात्सर्वकार्यार्थसिद्धिदः ।

यथा सूर्यस्तमो हंति दोषसंघांस्तथा त्वयम् ॥१२०॥

अमुक वारीं अमुक नक्षत्र आलें तरच अमृतसिद्धियोग होतो . जसें - रविवारीं हस्त , सोमवारीं मृग , मंगळवारीं अश्विनी , बुधवारीं अनुराधा , गुरवारीं पुष्य शुक्रवारीं रेवती आणि शनिवारीं रोहिणी . खालीं लिहिलेला अपवाद खेरीज करुन * अमृतसिद्धियोग सर्व कार्यास शुभ मानिलेला आहे .

अनिष्ट अमृतसिद्धियोग .

गुरुपुष्यं विवाहे च प्रयाणे शनिरोहिणीम् ‍ ।

भौमाश्विनीं प्रवेशे च त्यजेदेतत्प्रयत्नतः ॥१२१॥

पंचम्यादि तिथौ त्याज्या हस्तार्काद्याः क्रमाच्छुमे ।

योगश्चामृतसिद्धयाख्यो अन्ये सर्वार्थसाधकाः ॥१२२॥

गुरुवारीं पुष्यनक्षत्राच्या योगानें झालेला अमृतसिद्धियोग विवाहास वर्ज्य करावा . शनिवारीं रोहिणीनक्षत्रामुळें होणारा अमृतसिद्धियोग प्रयाणास वर्ज्य करावा आणि मंगळवारीं अश्विनीनक्षत्र आल्यानें जो अमृतसिद्धियोग होतो तो गृहप्रवेशास वर्ज्य करावा . कारण हे योग अत्यंत निंद्य मानिलेले आहेत . तसेंच , आदित्यवारीं पंचमी , सोमवारीं षष्ठी , मंगळवारीं सप्तमी , बुधवारीं अष्टमी , गुरुवारीं नवमी , शुक्रवारीं दशमी , आणि शनिवारीं एकादशी ह्या तिथि त्या त्या वारीं असून अमृतसिद्धियोग असेल तर तोही वर्ज्य करावा . उदाहरणार्थ , रविवारीं हस्त नक्षत्र आलें तर प्रथम लिहिल्याप्रमाणें सर्व कार्यांना शुभ असा अमृतसिद्धियोग होतो खरा , पण त्याच दिवशीं पंचमी तिथि असेल तर तोच योग निंद्य होतो ; याच प्रमाणें इतर वारतिथींविषयीं समजावें . हे अपवाद खेरीज करुन बाकी सर्व अमृतसिद्धियोग शुभ होत .

मृत्युयोग .

अनुराधा रवौ सोमे उत्तराषाढमं त्यजेत्। ।

बुधेऽश्विनी मृगो जीवे शुक्राश्लेषा शनौ करः ।

भौमे शतभिषक चायं मृत्युयोगोऽर्थनाशकः ॥१२३॥

रविवारीं अनुराधा नक्षत्र आलें तर मृत्युयोग होतो . तसेंच सोमवारीं उत्तराषाढा , मंगळवारीं शततारका , बुधवारीं अश्विनी , गुरुवारीं मृगशिर , शुक्रवारीं आश्र्लेषा आणि शनिवारीं हस्त , असे योग आले म्हणजेही मृत्युयोग होतो . तो प्रयाणास किंवा कोणत्याही शुभकार्यास वर्ज्य करावा .

दग्धयोग .

द्वादश्यर्कें विधौ रुद्रा भौमे पंच बुधेऽग्नयः ।

गुरौ षष्ठयष्टमी शुक्रे दग्धाख्यो नवमी शनौ ॥१२४॥

रविवारीं द्वादशी , सोमवारीं एकादशीं , मंगळवारीं पंचमी , बुधवारीं तृतीया , गुरुवारीं षष्ठी , शुक्रवारीं अष्टमी आणि शनिवारीं नवमी असे योग आले म्हणजे दग्धयोग होतो ; तो सर्व शुभ कार्यास वर्ज्य करावा .

यमघंटयोग .

मघार्कवारे शशिने विशाखा आर्द्रा कुजे चेंदुसुते च मूलम् ।

वह्रिर्गुरौ शुक्रदिने विधाता हस्तं च सौरे यमघंटयोगः ॥१२५॥

गृहप्रवेशश्च सुरप्रतिष्ठा तथा प्रयाणं यमघंटयोगे ।

प्राप्नोति कृत्वा भयमेव नित्यं जातः शिशुः संततरोगवान्स्यात् ॥१२६॥

रविवारीं मघा , सोमवारीं विशाखा , मंगळवारीं आर्द्रा , बुधवारीं मूळ , गुरुवारीं कृत्तिका , शुक्रवारीं रोहिणी आणि शनिवारीं हस्त असे योग आले म्हणजे यमघंटयोग होतो . यमघंटयोगावर प्रयाण , गृहप्रवेश , देवाची स्थापना हीं कृत्यें करुं नयेत ; केलीं असतां संकटें उत्पन्न होतात . यमघंटयोगावर जन्म झाल्यास बालकाला क्लेश होतात , परंतु शान्ति केली असतां तो दोष दूर होतो .

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP