हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
तिथिप्रकरण

तिथिप्रकरण

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


तिथिप्रकरणम्

प्रतिपच्च द्वितीया च तृतीया तदनंतरम् ।

चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी चाष्टमी तथा ॥५६॥

नवमी दशमी चैकादशी च द्वादशी ततः ।

त्रयोदशी ततो ज्ञेयास्ततः प्रोक्ता चतुर्दशी ॥५७॥

पौर्णिमा शुक्लपक्षे सा कृष्णपक्षे त्वमा स्मृता ।

अन्योन्यं चंद्रसूर्यों तौ यदा तद्दर्श उच्यते ॥५८॥

तिथि तीस आहेत . १ प्रतिपदा , २ द्वितीया , ३ तृतीया , ४ चतुर्थी , ५ पंचमी , ६ षष्ठी , ७ सप्तमी , ८ अष्टमी , ९ नवमी , १० दशमी , ११ एकादशी , १२ द्वादशी , १३ त्रयोदशी , १४ चतुर्दशी , १५ पौर्णिमा आणि ३० अमावास्या . पौर्णिमेच्या पुढल्या म्हणजे सोळाव्या तिथीस षोडशी किंवा सत्राव्या तिथीस सप्तदशी अशी नांवें नसून प्रतिपदा , द्वितीया , इत्यादि क्रमानें चतुर्दशीपर्यंत म्हणण्याची चाल आहे . तिसाव्या तिथीला मात्र अमावास्या ( सूर्यचंद्रसंगम किंवा दर्श ) म्हणतात .

तिथींची उपपत्ति .

अर्काद्विनिःसृतः प्राचीं यद्यात्यहरहः शशी ।

तच्चांद्रमानमंशैस्तु ज्ञेया द्वादशभिस्तिथिः ॥५९॥

तिथि ह्या सूर्य - चंद्रांमधील अंतरावर अवलंबून आहेत . चंद्र व सूर्य हे ज्या दिवशीं एकत्र असतात त्या दिवसाला अमावास्या म्हणतात . अमा म्हणजे एकत्र आणि वस् म्हणजे राहणें असा अमावास्येचा अर्थ आहे . चंद्र आणि सूर्य एकत्र मिळाल्यानंतर दोघेही चालत असतात . चंद्राची गति सूर्यापेक्षां फार शीघ्र असल्यामुळें चंद्र नेहमीं सूर्याच्या पुढें जात असतो . सूर्याच्या पुढें प्रत्येक बारा अंश जाण्यास चंद्रास लागणारा जो काळ त्याच तिथी होत . उदाहरणार्थ , अमावास्येस चंद्रसूर्य एके ठिकाणीं जमून नंतर दोघेही चालूं लागले असें समजा . चंद्र शीघ्र गतीनें सूर्यापुढें जाऊं लागला , कीं पहिल्या तिथीस म्हणजे प्रतिपदेस आरंभ झाला . सूर्यापुढें चंद्र पूर्ण बारा अंश गेला कीं , प्रतिपदा संपली . बारा अंशांच्या पलीकडे गेला कीं द्वितीयेस आरंभ झाला , व हे दुसरे बारा अंश संपले कीं द्वितीया संपून तृतीयेस आरंभ झाला . याप्रमाणें इतर तिथींचे जाणावें . एका तिथीचे बारा अंश म्हणजे ३० तिथींचे ३६० अंश होतात . तिथींचा संबंध आरंभस्थानाशीं नसल्यामुळें सायन व निरयन तिथि सारख्या असतात .

तिथींच्या संज्ञा .

नंदा च भद्रा च जया च रिक्ता पूर्णिति सर्वास्तिथयः क्रमात्स्युः ।

कनिष्ठमध्येष्टफलास्तु शुक्ले कृष्णे भवंत्युत्तममध्यहीनाः ॥६०॥

नंदा , भद्रा , जया , रिक्ता आणि पूर्णा , अशा तिथींच्या पांच संज्ञा आहेत . ह्याच संज्ञा प्रतिपदेपासून अनुक्रमें पुनः पुनः येतात . जसें प्रतिपदा , षष्ठी , एकादशी ह्या नंदा तिथि होत . द्वितीया , सप्तमी , द्वादशी ह्या भद्रा तिथि होत . तृतीया , अष्टमी , त्रयोदशी ह्या जया तिथी होत . चतुर्थी , नवमी , चतुर्दशी ह्या रिक्ता आणि पंचमी , दशमी आणि पौर्णिमा ह्या पूर्णा तिथि होत . शुक्लपक्षांतील प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत पांच तिथि कनिष्ठ , षष्ठीपासून दशमीपर्यंत पांच तिथि मध्यम व शुक्ल एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पांच तिथि उत्तम होत . तसेंच , कृष्णपक्षांतील पहिल्या पांच तिथि उत्तम , षष्ठीपासून पांच मध्यम आणि एकादशी पासून पांच कनिष्ठ होत . हा नियम कोणत्याही महिन्यांतील तिथींविषयीं जाणावा .

शुभाशुभ तिथि .

द्वितीया पंचमी चैव तृतीया सप्तमी तथा ।

दशम्येकादशी कृष्णा प्रतिपच्च त्रयोदशी ॥६१॥

पौर्णिमा तिथयो ह्येताः सर्वकार्यशुभावहाः ।

अन्यास्तु तिथयो नेष्टाः प्रोक्तकृत्यशुभा मताः ॥६२॥

वर सांगितलें आहे त्याशिवाय शुक्ल व कृष्ण पक्षांतील द्वितीया , तृतीया , पंचमी , सप्तमी , दशमी , एकादशी , प्रतिपदा ( ही फक्त कृष्णपक्षांतील ) त्रयोदशी ( ही फक्त शुक्लपक्षांतील ) आणि पौर्णिमा ह्या तिथि सामान्यतः सर्व शुभ कार्यांना उक्त आहेत . यांशिवाय बाकी ज्या तिथि राहिल्या त्या म्हणजे चतुर्थी , षष्ठी , अष्टमी , नवमी , द्वादशी , चतुर्दशी आणि अमावास्या ह्या अशुभ तिथि होत . ह्यांना पक्षरंध्र तिथि म्हणतात . ह्या सर्व शुभकृत्यांसाठीं त्याज्य आहेत . तथापि संकटकाळीं पुढें सांगितल्याप्रमाणें आरंभींच्या कांहीं घटिका सोडून ह्या तिथींवर शुभकृत्यें करावीं . केवळ संपूर्ण तिथीचा त्याग न केला तरी चालेल .

अशुभ तिथींच्या त्याज्य घटिका .

वेदपटूवसुनंदार्कशक्रेपु तिथिपु त्यजेत् ।

वसुनंदेद्रतत्वाशापंचनाडयः क्रमात्सदा ॥६३॥

कृष्णा चतुर्दशी शुक्ला प्रतिप्रद्दर्शसंज्ञिकाः ।

एताः शुभेपु कार्येपु वर्जनीयाः प्रयत्नतः ॥६४॥

चतुर्थी , षष्ठी , अष्टमी , नवमी , द्वादशी , आणि शुक्ल चतुर्दशी ह्या तिथींवर कोणतेंहि कृत्य करावयाचें असेल तर , त्या तिथींच्या अनुक्रमानें पहिल्या आठ , नऊ , चवदा , पंचवीस , दहा आणि पांच घटिका सोडाव्या . म्हणजे चतुर्थीच्या आरंभापासून पहिल्या आठ घटिका , षष्ठीच्या नऊ घटिका , अष्टमीच्या चवदा घटिका , नवमीच्या पंचवीस , द्वादशीच्या दहा आणि ( शुक्ल ) चतुर्दशीच्या पांच घटिका सोडून बाकी राहिलेल्या तिथींवर शुभकृत्यें करावीं . कांहीं ऋषि सर्व पक्षरंध्र तिथींच्या प्रारंभाच्या केवळ दहा घटिका मात्र सोडाव्या असें म्हणतात . कृष्णपक्षांतील त्रयोदशी , चतुर्दशी , अमावास्या आणि शुक्ल प्रतिपदा ह्या तिथि मात्र संपूर्ण वर्ज्य कराव्या .

कुहू व सिनीवाली तिथि .

राकानुमत्याविति पौर्णमास्यौ रात्रिंद्युद्दष्टेंदुवशाद्भवेताम् ।

कुहूः सिनीवाल्यपि नष्टद्दष्ट - चंद्रे स्मृते चासितपंचदश्यौ ॥६५॥

ज्या पौर्णिमेला रात्रींच चंद्रोदय होतो तिला राका म्हणतात . आणि ज्या पौर्णिमेला दिवसा चंद्रोदय असतो तिला अनुमति अशी संज्ञा आहे ; त्याचप्रमाणें ज्या अमावास्येमध्यें चंद्रदर्शन होत नाहीं तिला कुहू आणि ज्या अमावास्येंत चंद्रदर्शन घडतें तिला सिनीवाली म्हणतात .

तिथींची क्षयवृद्धि .

मागें सांगितलें आहे कीं , चांद्रवर्षाचे दिवस ३५४ असतात , व तिथि ३६० असतात . याचा अर्थ असा कीं , ३५४ दिवसांत ३६० तिथि भुक्त होतात . म्हणजे सहा तिथींचें अंतर क्षयवृद्धि होऊन निघून जातें . ज्या वेळेस तिथींचें प्रमाण साठ घटिकांपेक्षां ज्यास्त असतें , त्या वेळेस तिथीची वृद्धि होते व साठ घटिकांपेक्षां कमी असतें त्या वेळेस तिथीचा क्षय होतो असें समजतात , पण तें बरोबर नाहीं . जी तिथि अनुक्रमानें दोन सूर्योदयांच्या वेळीं चालू असते , तिला वृद्धितिथि म्हणावयाचें ; आणि ज्या तिथिकालांत मुळींच सूर्योदय होत नाहीं त्या तिथीला क्षयतिथि म्हणावयाचें , हें योग्य होय .

वृद्धीचें उदाहरण --- प्रतिपदा रविवारीं ५७ घटिका आहे असें समजा . म्हणजे रविवारीं सूर्योदयापासून इतका काळ गेल्यानंतर प्रतिपदा संपून द्वितीयेस आरंभ झाला . द्वितीयेचें प्रमाण ६५ घटिका आहे , अशी कल्पना करा . म्हणजे प्रतिपदेनंतर चंद्राला सूर्यापुढें बारा अंश जाण्यास इतका काळ लागला . तेव्हां प्रतिपदा संपल्यानंतर रविवारच्या राहिलेल्या ३ घटिका , सोमवारच्या सर्व दिवसाच्या ६० घटिका व मंगळवारीं सूर्योदयानंतर २ घटिका , अशा एकंदर ६५ घटिका जातील तेव्हां द्वितीया संपेल . या उदाहरणांत सोमवारीं व मंगळवारीं अशी दोन दिवस सूर्योदयीं द्वितीया असल्यामुळें पंचांगांत दोन दिवस लिहिली पाहिजे , म्हणून येथें द्वितीयेची वृद्धि झाली , असें म्हणावें .

क्षयतिथीचें उदाहरण --- रविवारीं दोन घटिका प्रतिपदा आहे अशी कल्पना करा . नंतर द्वितीया लागली . द्वितीयेचें प्रमाण फक्त ५४ घटिका आहे , म्हणजे प्रतिपदेनंतर सूर्यापुढें चंद्राला बारा अंश जाण्याला इतकाच काळ पुरला . रविवारीं प्रतिपदेच्या २ घटिका व द्वितीयेच्या ५४ घटिका असा एकंदर सूर्योदयापासून ५६ घटिका काळ गेल्यानंतर म्हणजे दुसर्‍या दिवसाचा सूर्योदय होण्यापूर्वींच तृतीया लागली . या उदाहरणांत रविवारीं प्रतिपदा व सोमवारीं तृतीया लिहावी लागेल . द्वितीया कोणत्याही दिवशीं सूर्योदयाला नव्हती , म्हणून ती पंचांगांत दाखविण्याचें कारण नाहीं . कारण सूर्योदयीं जी तिथि किंवा जें नक्षत्र वगैरे असतें तेंच पंचांगांत दाखवितात . येथें द्वितीयेचा क्षय झाला , म्हणजे द्वितीया मुळींच नाहीं असा अर्थ नव्हे , तर ती सूर्योदयाला मात्र कोणत्याही दिवशीं नव्हती इतकेंच .

तिथींच्या क्षयवृद्धींचा दोष .

तिथीनां त्रितयं वारमेकं स्पृशति यत्र वै ।

अवमं तद्दिनं ज्ञेयं शुभकार्येषु संत्यजेत् ॥६६॥

वाराणां त्रितयं यत्र तिथिमेकां स्पृशेद्यदा ।

त्रिद्युस्पृक् चेति सा ख्याता न ग्राह्या मंगलादिषु ॥६७॥

कोणत्याही तिथीचा क्षय होतो तेव्हां एका वारीं तीन तिथींचा स्पर्श झालेला असतो ; आणि वृद्धि होते तेव्हां तीन वारांना एका तिथीचा स्पर्श होत असतो . वर क्षयतिथीचें उदाहरण दिलें आहे , त्यांत रविवारीं प्रथम २ घटिका प्रतिपदा , नंतर ५४ घटिका द्वितीया आणि नंतर ४ घटिका तृतीया होती , म्हणजे रविवाराला प्रतिपदा , द्वितीया आणि तृतीया अशा तीन तिथींचा स्पर्श झाला . तसेंच , वृद्धीचें उदाहरण पहा . प्रतिपदा रविवारीं ३ घटिका , सोमवारचा सर्व दिवस आणि मंगळवारच्या २ घटिका याप्रमाणें रविवार , सोमवार आणि मंगळवार अशा तीन वारांना प्रतिपदेचा स्पर्श झाला . धर्मशास्त्रकारांनीं क्षयवृद्धीच्या तिथि शुभकार्याला वर्ज्य मानिल्या आहेत . ‘ तथापि सबले भानौ लाभस्थे वा तथा विधा ’ या वचनाप्रमाणें बलवान् सूर्य किंवा बलिष्ठ चंद्र एकादश स्थानांत असेल तर क्षयतिथींचा आणि वृद्धितिथींचा दोष नाहींसा होतो . क्षयतिथीला ‘ अवम ’ तिथि म्हणतात , आणि वृद्धितिथीला ‘ त्रिद्युस्पृक् ’ तिथि म्हणतात .

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP