हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
अंकसंज्ञा.

अंकसंज्ञा.

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.


एकं भूमींदुरुपं द्वावश्र्विपक्षाक्षिदोर्यमाः ।
त्रयः क्रमग्रामरामपुरलोकगुणाग्नयः ॥६॥
चत्वारोऽब्धिश्रुतियुगकृताः पञ्चेषुवायवः ।
भूताक्षौ षड्‍रसाडर्तुतर्काः सप्तर्षयः स्वराः ॥७॥
तुरडपर्वतौ चाष्टौ वसुसर्पमतंगजाः ।
नवसडया नन्दरन्ध्रनिधिगोऽडनभश्र्चराः ॥८॥
दशाशाः शून्यमभ्रं स्यादेकादश महेश्वराः ।
द्वादशार्कास्तथा विश्र्वे त्रयोदश चतुर्दश ॥९॥
मन्विंद्रभुवनं पंचदशतिथ्योऽथ षोडश ।
कलाष्टिराजोऽथात्यष्टिर्घनाः सप्तदश स्मृताः ॥१०॥
अष्टादश धृतिश्चातिधृतिरेकोनविंशतिः ।
विंशतिः स्युः कृतिनखाडलयोऽथैकविंशतिः ॥११॥
प्रकृतिर्मूर्च्छनास्वर्द्वाविंशतिर्जातिराकृतिः ।
विकृतिश्र्च त्रयोविंशत् संकृतिश्चार्हदित्यपि ॥१२॥
जिनाः सिद्धा चतुर्विशतिस्तत्त्वं पञ्चविंशतिः ।
पञ्चविंशस्त्वतिकृतिः षडिशतिरिहोत्कृतिः ॥१३॥
स्युः सप्तविंशतिर्भानिः द्वात्रिंशद्दशना द्विजाः ।
त्रयस्त्रिंशत्सुरास्तान ऊनपञ्चाशदित्यपि ॥१४॥
पर्यायशब्दैरपि कल्पनीयाः सडयाडसंज्ञाः सुधिया धियासाम् ।
सामान्यसंज्ञामभिधाय तां तां विशेषसंज्ञामधुनाभिधास्ये ॥१५॥

ज्योतिषग्रंथांत संख्या दाखविण्याकरितां अंकांच्या पारिभाषिक संज्ञा योजितात ही योजना फार सोयीची आहे. कारण तिच्या योगानें तद्विषयक पद्यें बरींच आटोपशीर होतात. आणि त्यामुळेंच बहुतेक ग्रंथकारांनीं ही पद्धति स्वीकारलेली आहे. या पुस्तकांत आलेलीं पद्यें निरनिराळया ग्रंथांतून घेतलेलीं असल्यामुळें अर्थात् अनेक ठिकाणीं त्यांत ह्या संज्ञा आलेल्या आहेत. म्हणून वाचकांच्या समजुतीकरितां आरंभींच त्याविषयीं माहिती देणें योग्य दिसतें. तथापि, वाचकांचा घोंटाळा होऊं नये म्हणून बहुतेक संख्यादर्शक कठिण शब्दांवर ती ती संख्या मांडली आहे. ह्या सर्व संज्ञा अन्वर्थक आहेत. उदाहरणार्थ, इंदु किंवा भूमि हे शब्द एक या संख्येचे वाचक ठरविलेले आहेत. याचें कारण इंदु म्हणजे चंद्र एकच आहे किंवा भूमि म्हणजे पृथ्वी एकच आहे. म्हणून एक ही संख्या दाखविण्याकरितां इंदु, भूमि इत्यादि शब्द योजितात. तसेंच वेद चार आहेत किंवा युगें चार आहेत म्हणून चार संख्या दाखविण्याकरितां युग, वेद इत्यादि शब्द घेतले आहे. त्याचप्रमाणें त्या त्या शब्दांचे दुसरे पर्यायशब्द घालण्याचाही परिपाठ आहे. उहाहरणार्थ, इषु म्हणजे पांच. पण इषु या शब्दाचे समानार्थक दुसरे शब्द बाण, शर हे होत; म्हणून पांच ही संख्या दाखविण्याकरितां इषु, बाण, शर किंवा या अर्थाचे दुसरे शब्द घालण्याची रीति आहे. याचप्रमाणें इतर अंकांचें जाणावें. संख्या कशा वाचितात किंवा मांडितात हें पुढें दाखविलें आहे. प्रथम अंकसंज्ञा सांगतों.

(१) एक, भूमि, इंदु, रुप इ०
(२) द्वौ, अश्वि, पक्ष, अक्षि, दो, यम इ०
(३) त्रयः क्रम, ग्राम, राम, पुर, लोक, गुण, अग्नि इ०
(४) चत्वारः, अब्धिः, श्रुति, युग, कृत इ०
(५) पंच, इषु, वायु, भूत, अक्ष, बाण, इंद्रिय इ०
(६) षट्, रस, अंग, ऋतु, तर्क इ०
(७) सप्त, ऋषि, स्वर, तुरंग, पर्वत, मुनि, अश्र्व इ०
(८) अष्ट, वसु, सर्प, मतंगज, नाग इ०
(९) नव, संख्या, नंद, रंध्र, निधि, गो, अंक, नभश्वर, ग्रह, खग इ०
(१०) दश, आशा, दिशा इ० ( ० )शून्य, अभ्र, आकाश, ख, अंबर इ०
(११) एकादश, महेश्र्वर, रुद्र, शिव इ०
(१२) द्वादश, अर्क, आदित्य, सूर्य इ०
(१३) त्रयोदश, विश्र्वे इ०
(१४) चतुर्दश, मनु, इंद्र, भुवन इ०
(१५) पंचद्श, तिथि इ०
(१६) षोडश, कला, अष्टि, राज इ०
(१७) सप्तदश, घन, अत्यष्टि इ०
(१८) अष्टादश, धृति इ०
(१९) अतिधृति, एकोनविंशति इ०
(२०) विंशति, कृति, नख, अंगुलि इ०
(२१) एकविंशति, प्रकृति, मूर्च्छना, स्वः इ०
(२२) द्वाविंशति, जाति, आकृति इ०
(२३) त्रयोविंशति, विकृति, संकृति, अर्हत् इ०
(२४) चतुर्विशति, जिन, सिद्ध इ०
(२५) पंचविशति, तत्व, अतिकृति इ०
(२६) षडिंशति, उत्कृति इ०
(२७) सप्तविशति, भ, नक्षत्र इ०
(३२) द्वात्रिंशत्, दशन, द्विज इ०
(३३) त्रयस्त्रिंशत्, सुर इ०
(४९) ऊनपंचाशत्, तान इ०

कार्यप्रकाशक चिन्हें.
+ हें बेरजेचें चिन्ह आहे. उदाहरणार्थ, ९+२=११ येथें नऊ आणि दोन या अंकांमध्यें + हें चिन्ह आहे, म्हणून त्यांची बेरीज करावयाची. याचप्रमाणें इतर चिन्हांविषयीं जाणावें.
- हें वजाबाकीचें चिन्ह आहे.
x हें गुणाकराचें चिन्ह आहे.
/ हें भागाकाराचें चिन्ह आहे.
= हें उत्तर दाखविणारें चिन्ह आहे.

संख्या मांडण्याची रीति.
अंकानां वामतो गतिः ।
संस्कृतांत अंकांची गति उलट असते. मराठींत जशी संख्या डावीकडून उजवीकडे मांडितात आणि तशीच वाचितात तसा प्रकार संस्कृत भाषेंत नाहीं. कोणतीहि संख्या संस्कृतांत उच्चारितांना उजवीकडून शेवटचा अंक प्रथम उच्चारितात व मांडतांनाहि अंकांचा उच्चार केल्याप्रमाणेंच उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे मांडीत येतात. उदाहरणार्थ, १९५३ ही संख्या घ्या; हे अंक संस्कृत पद्धतीप्रमाणें उच्चारावयाचे म्हणजे ३, ५, ९, आणि १ या अनुक्रमानें उच्चारिले पाहिजेत. जसें, " गुणबाणग्रहेंदुः " गुण म्ह ० ३ बाण म्ह ० ५ ग्रह म्ह ० ९ आणि इन्दु म्ह ० १. हे मराठीप्रमाणें मांडिले तर ३५९१ होतील, पण तसे मांडावयाचे नाहींत. अंकांचा उच्चार केल्याप्रमाणें प्रथम ३ हा अंक मांडावा आणि नंतर तिहींच्या पुढील उच्चारिलेला अंक ५ तो पुढें न मांडितां तिहींच्या मागें मांडावा. तसेंच, ९ पांचांच्या मागें आणि १ हा नवांच्या मागें मांडिला म्हणजे १९५३ झाले.

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP