हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
महिने

महिने

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.


महिने.
मासश्चैत्रोऽथ वैशाखो ज्येष्ठ आषाढसंज्ञकः ।
ततस्तु श्रावणो भाद्रपदोऽथाश्विनसंज्ञकः ॥३८॥
कार्तिको मार्गशीर्षश्च पौषो माघोऽथ फाल्गुनः ।
एतानि मासनामानि चैत्रादीनां क्रमाद्विदुः ॥३९॥

महिने बारा आहेत. त्यांचीं नांवें - चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन.

मासनामांची उत्पत्ति.
यस्मिन्मासे पौर्णमासी येन धिष्ण्येन संयुता ।
तन्नक्षत्राहयो मासः पौर्णमासी तदाह्यया ॥४०॥

चैत्र, वैशाख इत्यादि मासनामें प्रथम नक्षत्रांवरुन उत्पन्न झालीं, म्हणजे प्रत्येक महिन्यांत ज्या नक्षत्राजवळ चंद्र पूर्ण होतो त्या नक्षत्रावरुन त्या महिन्याचें नांव पडलें. पौर्णिमेसच पूर्ण चंद्र असतो हें सर्वांस ठाऊक आहेच. अर्थात् प्रत्येक महिन्याच्या नांवाचें नक्षत्र सुमारें त्या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा एकदोन दिवस मागेंपुढें असतें. ह्याप्रमाणें बारा महिन्यांचीं निरनिराळीं बारा नांवें पडलीं तीं अशीं: -   

महिन्याचें नांव        नक्षत्राचें नांव
चैत्र.......                          चित्रा.
वैशाख.....                        विशाखा.
ज्येष्ठ.......           ज्येष्ठा.
आषाढ.....           उत्तराषाढा.
श्रावण.....                         श्रवण.
भाद्रपद.....                      पूर्वाभाद्रपदा.
आश्र्विन....                        अश्विनी.  
कार्तिक......                       कृत्तिका.
मार्गशीर्ष.....                       मृगशीर्ष.
पौष.....                              पुष्य.
माघ.....                             मघा.
फाल्गुन.....                        उत्तराफाल्गुनी.      

पण नेहमींच ही स्थिति असते असें नाहीं. कधीं कधीं दोन किंवा तीन नक्षत्रें सुद्धां पौर्णिमेच्या मागेंपुढें होतात. ही नक्षत्रांची अनियमित स्थिति ज्योतिष्यांच्या ध्यानीं आल्यावरच त्यांनीं माससंज्ञेचा दुसरा एक असा नियम बांधिला कीं.

मीनादिस्थो रविर्येषामारंभे प्रथमे क्षणे ।
भवेत्तेऽब्दाश्र्चांद्रमासाश्र्चैत्राद्या द्वादश स्मृताः ॥४१॥

म्हणजे ज्या चांद्रमासाच्या शुक्ल प्रतिपदेचा आरंभ मीन संक्रांतींत सूर्य असतांना होईल तो चैत्र. मेष संक्रांतींत होईल तो वैशाख. या प्रमाणें चैत्रादि द्वादश मासांविषयीं जाणावें. पण याचा अर्थ असा मात्र कोणीं समजूं नये कीं, त्या प्रतिपदेच्या आरंभक्षणींच त्या त्या संक्रांतीचा उदय झाला पाहिजे; किंवा संपूर्ण मासपर्यंत तीच संक्रांत असली पाहिजे. केवळ त्या महिन्याच्या प्रतिपदेचा आरंभ वरील नियमाप्रमाणें त्या त्या संक्रांतींत असावा म्हणजे झालें. मग प्रतिपदेच्या दुसर्‍या दिवशीं किंबहुना त्याच दिवशीं सूर्य पुढील राशींत जात असला तरी चालेल.

चांद्रमास.
चैत्रादिसंज्ञाश्र्चांद्राणां मासानां संप्रकीर्तिताः ।
श्रौतस्मार्तक्रियाः सर्वाः कुर्याच्चांद्रमसर्तुषु ॥४२॥
चांद्रस्तु द्विविधो मासो दर्शांतः पौर्णिमांतिमः ।
देवार्थे पौर्णमास्यंतो दर्शांतः पितृकर्मणि ॥४३॥

आपले चैत्र, वैशाख, इत्यादि वर सांगितलेले बारा महिने हेच चांद्रमास होत. व्रतें, हवनें, शांति, विवास, इत्यादि धर्मशास्त्रांतील सर्व कृत्यें नित्य चांद्रमासाप्रमाणेंच करावीं. चांद्रमास मोजण्याच्या दोन पद्धति आहेत. एक पूर्णिमांत मास आणि दुसरा अमांत मास. एका पूर्णिमेपासून दुसर्‍या पूर्णिमेपर्यंत जो महिना मोजितात, तो पूर्णिमांत मास; आणि एका अमावास्येपासून दुसर्‍या अमावास्येपर्यंत जे तीस दिवस, तो अमांत मास होय. पूर्णिमांत मास देवकार्यास उक्त मानिलेला आहे. म्हणून कार्तिकस्नानें किंवा माघस्नानें वगैरे पूर्णिमांत मासाप्रमाणें करितात; म्हणजे आश्विनकृष्णपक्ष प्रतिपदेपासून कार्तिकशुक्ल पूर्णिमेपर्यंत कार्तिक महिना समजतात. ह्याचप्रमाणें इतर मासांविषयीं समजावें. आतां चैत्र, वैशाख इत्यादि महिन्यांचा चांद्रमास म्हणतात. त्याचें कारण असें आहे कीं, हे महिने चंद्राच्या स्थितीवरुन आपणांस समजतात. (१) चंद्राच्या कलांचा पूर्ण क्षय होऊन ज्या रात्रीं चंद्र आपल्या दृष्टीस पडत नाहीं, त्या रात्रीपासून पुनः तो तसा दिसेनासा होईपर्यंत, म्हणजे एका अमावास्येपासून दुसर्‍या अमावास्येपर्य़ंत, अथवा (२) चंद्राच्या कलांची पूर्ण वृद्धि होऊन ज्या रात्रीं चंद्र आपणांस पूर्ण दिसतो, त्या रात्रीपासून पुनः तो आपणांस पूर्ण दिसेपर्यंत, म्हणजे एका पूर्णिमेपासून दुसर्‍या पूर्णिमेपर्यंत, मध्यें जे तीस दिवस जातात, त्यासच आपण एक महिना समजतों. हें आपणांस चंद्राच्या योगानें समजतें म्हणून त्याचें नांव चांद्रमास. चांद्रमासाचे दिवस सुमारें २९॥ असतात. ह्याप्रमाणें बारा चांद्रमासांचे म्हणजे एका चांद्रवर्षाचे ३५४ दिवस भरतात.

सौरमास.
मेषादि सौरमासास्ते भवंति रविसंक्रमात् ।
मधुश्च माधवश्चैव शुक्रः शुचिरथो नभः ॥४४॥
नभस्यश्चेष ऊर्जश्च सहश्चाथ सहस्यकः ।
तपस्यपस्यः क्रमतः सौरमायाह प्रकीर्तिताः ॥४५॥
सौरो मासो विवाहादौ यज्ञादौ सावनः स्मृतः ।
आद्बिके पितृकार्य़े च चान्द्रो मासः प्रशस्यते ॥४६॥

जे मास सूर्याच्या गतीच्या अनुरोधानें मोजले जातात त्यांस सौरमास म्हणतात. मागें मेषादिक ज्या बारा संक्रांति सांगितल्या आहेत, तेच बारा सौरमास होत. पण त्यांच्या संज्ञा निराळया आहेत. त्या येणेंप्रमाणें:--- १ मधु २ माधव ३ शुक्र ४ शुचि ५ नभ ६ नभस्य ७ इष ८ ऊर्ज ९ सह १० सहस्य ११ तप १२ तपस्य. पण व्यवहारांत मधुमास किंवा माधवमास असें कोणी म्हणत नाहीं. मेष संक्रांत किंवा वृषभ संक्रांत असेंच म्हणतात.  ह्या बारा सौरमासांचे दिवस सारखे नसतात. एकाद्या महिन्याचे तीस आणि एकाद्या महिन्याचे एकतीस दिवस असतात. बारा सौरमासांचे म्हणजे एका निरयन सौरवर्षाचे ३६५ दि. १५ घ. २३ प. इतके दिवस भरतात. बंगालांत व मलबारांत व्यवहारांत सौरमासच धरितात. आपलीं विवाहादि धर्मकृत्यें पूर्वी सौरमासाप्रमाणें होत असत. पण सांप्रत तीं चांद्रमासाप्रमाणेंच होतात. पितृकार्याला मात्र चांद्रमास प्रशस्त मानिलेला आहे. यज्ञ यागादि कर्में सावनमासाप्रमाणें करावीं.

सावन व नाक्षत्रमास.
त्रिंशद्दिनः सावनिको नाक्षत्रो विधुभभ्रमात् ।

पूर्ण तीस दिवसांचा जो एक महिना त्यास सावनमास म्हणतात. बारा सावनमास मिळून एका सावनवर्षाचे दिवस ३६० भरतात.

अश्विनीपासून रेवतीपर्यंत सत्तवीस नक्षत्रें चंद्राला भोगण्यास लागणारा जो काल त्यास नाक्षत्रमास म्हणतात. नाक्षत्रमासाचे दिवस २७ असतात.

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP