वंदोनी श्रीकृष्ण चरण । हरुषें घाली लोटांगण ॥१॥
म्हणे तूंचि माझ्या मना । स्वस्थ करीं गा नारायणा ॥२॥
आश्रमासी येतां ऋषी । तोंवरी आयुष्य प्राणासी ॥३॥
ऐकतांचि हांसे देव । नदिसे प्राप्तीचा उपाव ॥४॥
अवकाळीं कैचें अन्न । विचारितां दिसे विघ्न ॥५॥
त्यांचें असो बळ तैसें । कांहीं वोपावें आम्हांस ॥६॥
स्वस्थ नव्हे माझें मन । क्षुधा लागली दारुण ॥७॥
ताटीं विस्तारिला मेवा । तुझा ऐकोनियां धांवा ॥८॥
न जेवितां आलों येथें । बहु झालों क्षुधाक्रांत ॥९॥
सत्वर मेळवीं भोजनीं । म्हणे नामयाची जनी ॥१०॥