नारद सांगे मृत्युलोकीं । हरिश्चंद्र पुण्यश्लोकी ॥१॥
कैसा सत्त्वाचा समुद्र । ऐसा नाहीं नृपवर ॥२॥
नारदाची ऐकून गोष्ट । सुखावला तो वसिष्ठ ॥३॥
कोप विश्वामित्रा आला । कैसा वाढविता शिष्याला ॥४॥
तपतेजें सूर्यराशी । छळीन म्हणे हरिश्चंद्रासी ॥५॥
उदय पश्चिमे दिनकर । सत्त्व ढाळीना नृपवर ॥६॥
वसिष्ठाच्या ऐकुनी बोला । विश्वामित्रा क्रोध आला ॥७॥
जरी उतरेल माझ्या तुकीं । देईन आपुल्या तपासी ॥८॥
ऐसा दोघांचा संवाद । होतां उठला नारद ॥९॥
इंद्र म्हणे का निर्फळ । शब्दाशब्दीं वाढेल कळ ॥१०॥
ऐसें ऐकतां वचन । जनी म्हणे केलें गमन ॥११॥