गांवा आल्याती गव्हार त्येंचा खेळ गुढघ्या मांड्यावरी
जइता पहायाला गेली बहुर डोळ्यांनी ( नवर्यानें ) दापिली
बहुर म्होरं जइता मागं जइता आली घरायासी
घेतलि मोत्याची चुंबळ घेतलि खुटीची घागर
बहुराची एक खेप जइताच्या दोन खेपा
आग आग माजी आई पानी आंगुळीला ठेव
ठेवील तुजी जइतारानी ती तर देसारवली दास
बहुर तिथूनी निगाला गेला शिपीयाच्या आळीं
घेतला चार रुपयांचा बांड घेतली दोन आनीयाची चोळी
जइताला हाकलुनी दिली लागली राजस मारगीं
याक वन वलांडिलं दोन वनं वलांडिलीं
तीन वनं वलांडिलं चवथ्या पांचव्या वनायाला
आलं जइताचं म्हायारु जइता पाणवठ्याला बसली
भावजा आल्या पान्यायाला अग तूं कुनायाची कोन
मी ग देशावरली दास करीन तुमचं काम धाम
करीन तुमचं दळायान करीन तुमचं कांडायान
भावजा म्होरं जइता मागं जइता आली घरायासी
दिल पाइलीभर गहूं लागली दळान दळाया
विठू माजा हाई पिता साता तळायाची माडी
तितं नांदं जइता लाडी रखमीन माजी हाई माता
साता तळायाची माडी तितं नांदं जइता लाडी
बंदू माजा इंदूर तिसरी माजी त्येला ववी
साता तळायाची माडी तितं नांदं जइता लाडी
इंदूर तिथूनी निगाला आला जइताच्या सासरीं
अवो अवो अत्याबाई माजी जइता दिसत न्हाई
तुमची जइता बाळातीन हाई आंत घरायांत
तिथून इंदूर निगाला गेला सासर्या जवळी
तुमी सर्वे दिसता वो जइता माजी दिसत न्हाई
तुमची जइता बाळातीन हाई आंत घरायत
इंदुर तिथूनी निगाला गेला नवर्या जवळी
अवो अवो दाजीबा जइता माजी दिसत न्हाई
आज जइताची पांचवी पांचवी करीन वाटला
न्हेतो तिला म्हायारा माता मालनीला भेटाया
जइता कनकीची केली गोपा तांदळाचा कला
मखखली शालू दिला जइता वारूवरी आली
इंदूर तिथूनी निगाला लागला राजस मारगीं
एक वन वलांडिलं दोन वनं वलांडिलीं
तिसर्या चवथ्या वनायाला आगास मागास वायदळ
शालू वारीयानं गेला जइतावरी नदार गेली
जइता कनकीची केली घेतली सोन्याची कुराड
गेला चंदन बेटायाला दोन चंदन तोडीयीली
जइताला जाळून टाकीयीली चवथ्या पांचव्या वनायाला
इंदूर घरायासी आला आग आग माजे आई
जइता आपली आपल्या घरीं आनि त्वां का लावलं सोयर्याघरीं