काय सांगूं माज्या इट्टलाचं ध्यान इटेवरी उभा सुकुमार चरन
पिवळी पितांबर नेसले कसून वैजयंती माळा घाली गळ्यांतून
जळूं जळूं दिष्ट ह्याला कशी झाली कोन्या चंडाळांनीं काय खोड केली
नाशवंती देवी टाका उतरूनी करा लिंबलोन सावळ्या वरूनी
इट्टल ग बाप आई रखमाई चंद्रभागा तीरीं पुंडलीक बाई
आपुली ग भैन गुरु चांदनी वाट ती ग पाही उभ्या अंगनीं
अग माया भैनी मधु चाखवीसी सुखाची ती वाट मला दावीसी
मिरवत निगाल इमानी गेल बंदु माज दोन इमानी कोन
चक्रभुज नाज धुरपती सारकी आपुली ती भैन भेटावी वाटती
भैनीला भाऊ शिकवी ग काई जन्माला येऊनी हरीनाम गाई
मजला म्हायारीं न्याव वो विठ्ठला म्हायारीं जाऊनी बसाव बंगलीं
पुसे कवतुक माजा पांडुरंग कवतिक माजें घन्यचि देवा
जाईन जाईन झिमगाला वारा चांदीचं घंगाळ रुप्याचे तांबे
आनि माजे बंधु पुंडलिक न्हाले चांदीच ग ताट कोण्याला भात
पिठी साखरनी भरीयीली मूठ खाजाव करंज्या अनारसी मऊ
बुंदीचे ग लाडू परकार बहू मुळ्या वाळकाची भाजी झाली थोडी
कवळ्या काकडीची कोशींबीर केली खोबर्या चटण्या कुटील्या भारी
तोंडीं लावायाला चटणी सुंदरी अशा परकारानं भरीलं ग ताट
चांदीची वजरी हाय तीनकोनी हात घाशीत्यात मावच्या भैनी
राधाबाई म्हने निवली माजी डोई अस हात मऊ धन्यचि बाई
राधाबाई म्हने निवली माजा माथा कासाई सुननीं हंडा केला रीता
न्हाऊनी धुवूनी सौभागी झाली सौभागी होऊनी म्हाईरी आली
आरशी घेऊनी मुखजी पहाती बुक्क्याचा चांदवा कपाळीं लेती
केली साडी चोळी गरायाची वटी वल्या नारळाचा परसाद वाटी
रथांत बसली धुवायाचे पायी पुंडलीक बंधु परतुनी पाई
नगरीच्या नारी उभ्या वाटवरी कवा आली राधाई आपुल्या घरीं
काय सांगूं बाई म्हायारीचं सूक आतां इसरवें परपंचाचं दूक