कनकन कनानीलं वारुळ दनानीलं
चांगुनेच्या घरीं हृषी देव आल
आल तर येऊं द्या परसदारानं येऊं द्या
आल परस दारानं पाट बसाया टाकीला
झारीभरून पानी दिलं घेतलं चवरंगी सूप
गेली पांचव्या उतरंडी काढल्या साळी नी बा डाळी
पेटविल्या कातीव चुली लावल्या चंदनाच्या फाळी
पाणी घंगाळ सारीलं उठा देवा भोजनाला
आमां भोजन कशायाचं येळल्या साळी नी बा डाळी
साळी डाळीयाचं आमच्या न्हाई आवडीचं
सत्वाची ग चांगुणा गेली देवाच्या खोलीं
घेतला बंदा रुपाया निगाली वो बाजायीरी
ऊर बाई उडयीतो मोत्याचं ग इंजान
गेली खाटक्याच्या आळीं खाटक्या मैतर हूशीयील
मगरमासा तूं देशील होय म्हनूनी बोलला
घेतला मगरमासा आली आपुल्या वाड्याला
गेली देवायाच्या खोलीं घेतलि सोनीयाची सुरी
शीरकमळ उतरीलं देवापुढं ठेवीयीलं
कांढून कुटून शिजविलं दिली हिंग फोडयीनी
ऊठा देवा जेवायाला आमां जेवण कशायाचं
कलं मगरमाशायाचं आमच्या न्हाई आवडिचं
तुमां भोजन काय बा करूं आमां भोजन बाळायाचं
आमां आवड चिलीयाची पोटीयीच्या पुत्राची
गेली देवाच्या खोलीं घेतली गुळायाची वाटी
गेली तडक गलीयीला हांक दिली बाळायाला
कडी तोडीयाच्या बाळा कंबरीं करदूड्याच्या बाळा
दंडीं वाकीयाच्या बाळा अंगड्या टोपड्याच्या बाळा
गळीं पेटीयाच्या बाळा कानीं डुलायाच्या बाळा
ये रे माज्या लाडक्या बाळ धांवत पळत
हातीं दिली गुळवाटी कडी घेतला उचलूनी
आली आपुल्या घराला गेली देवाच्या खोलीला
घेतली सोनीयाची सुरी शीर बाळाचं उतरीलं
शीर ठेवलं शिंक्यावरी धड कांडून कुटीयीलं
दिली हिंग फोडनी भोजन तयार झालं
उठा देवा भोजनाला आमां भोजन कशायाचं
केलं धडायाचं बा आमां नको धडायाचं
तुमां भोजन कशायाचं चिलीयाच्या शिरायाचं
शीर कांडून कुटूयीन केलं भोजन तयार
दोन पाट टाकीयील दोन ताटं मांडीयीलीं
दोन तांबे भरीयीले दोन पेले ठेवीयीले
अग तूं सत्वाची चांगुना दोन पाट कुनायाला
एक ताट देवायाला एक शिराळ राजाला
ताट आनी एक कर तांब्या आनी एक भर
ताट तांब्या कुनायाला एक चिलार बाळायाला
बाळ आतां कुटीयीलं अग तूं सत्वाची चांगुना
जा ग देवाच्या खोलीयीतं घे ग हातीं गूळवाटी
दे ग हांक बाळायाला काप माजी करंगळी
बाळ साजिवंत झालं बाळ जेवायाला निगालं
बाळ धांवत पळत येऊन बसलं पाटावर
बाळा भोजन बा केलं देवा भोजन बा केलं
सत्वाची ग चांगुयीना न्हाई हरली सत्वायाला
देव उठूनी बा गेल लागली राज करायाला