सूर्व्याची कन्या राधिका बत्तीस लक्षणी देवंता
उठली कोंब्या फटफटीं पेटविल्या चंदनवाती
केला केर नी वारा गेली बागाईच्या गोठ्यां
आणलं गुळीभर शेंण केलं सडा सारवण
घातली कणा रांगूयीळी घेतली तांब्या घागयीर
घेतली मोत्या चुंबयीळ घेतली गजनी चोळी
घेतला पिवळा पितांबर राधिका नेसून निघायीली
गेली यमुनेच्या तिरीं उतरली तांब्या घागयीर
ठेवली मोत्या चुंबयीळ ठेवली गजनी चोळी
ठेवला पिवळा पिंताबर घातला गळ्याखाली हात
काढला नवलाखी हार ठेवला कलम रुक्षावरी
राधानं आंगूळ बा केली कपाळीं कुंकू लावीयलं
सुर्व्या नमस्कार केली नेसली पिवळा पितांबर
घातली गजनी चोळी घेतली मोत्या चुंबयीळ
घेतली तांब्या घागयीर लागली राजस मारगीं
आली घराजवयीळी वतली घागर घंगायीळी
लावली माळ्याला शिडी काढले चंदन सलपे
पेटविल्या तांब्या चुली काढले साळी तांदूयीळ
घंगाळी आदणीं वैरीयीले मुगाचं वरण करीयलं
केली वाग्यांयाची शाक राधिकां सैपाक बा केला
वाढला सासूसासर्याला वाढला दीर जावयीला
वाढला आपुल्या भर्ताराला वाढलं नणंदबाईला
केलं आपुलं बा ताट राधिका जेवाय बसयीली
राधेला अपसकून झाला पैला घास धरनीला
दुसर्या घास गळीं आला घातला गळ्याखालीं हात
नाहीं नवलाखी हार राधा मनीं चरकली
गेली यमुनेच्या तिरीं बोलली कलम रुक्षायाला
माजा नवलाखी हार कुठं गेला सांग दादा
कलमावरच गुरुयीड तो बा बोलूं लागयीला
तुजा नवलाखी हार नेला गवळ्याच्या वाड्या
आरं तूं गवळ्या गोइंदा दे बा माजा हार
नवलाखी हार दिल्यावर काय ग राधे देशील
दीन पांच सुपार्या दीन पांच नारयीळ
आमी मथुरेचे वानी आमां नारळसुपारीचं काय?...