आली वसाची पंचीम आली वर्साची पंचीम
उठली सकाळच्या पारीं गेली गाईच्या गोठ्यायाला
घेतलं मूठभर शेन घातलं सडासारवान
झालं सडासारवन सर्व धूनं गोळा केलं
बांधली धुण्यायाची मोट बांधली हासडून गांठ
घेतली नखा बोटावरी घेतली डुई शिरावरी
गेली वाड्याच्या भाईरी गेली वेशीच्या भाईरी
लागली राजस मारगीं लागली राजस मारगीं
एक वन वलांडिलं दोन वनं वलांडिलीं
तीन वनं वलांडिलीं चार वनं वलांडिलीं
पांचव्या साव्या वनायाला लागली यमुना दिसायाला
आली यमुनेजवळी गेली यमुनेच्या आंत
काळा खडा बघितला टाकली धुन्यायाची मोट
सर्व धुनं धुतीयलं सर्व धुनं वाळीवलं
काढली मधुपका चोळी फेडला पिवळा पितांबर
काढला नवलाखी हार ठेवला मूळ डोंबावरी
गेली यमुनेच्या आंत राधानं आंगूळ बा केली
आली यमुनेच्या वरी सर्व अंग पुशीयीलं
घातली मधुपका चोळी नेसली पिवळा पिंताबर
घेतली धुण्यायाची मोट आली नदीच्या भाईरी
लागली राजस मारगीं चारी वनं वलांडिलीं
पांचव्या साव्या वनायाला लागलं गांव दिसायाला
आली आपुल्या वाड्यायाला आली वाड्यायाच्या आंत
टाकली धुन्यायाची मोट घेतलं चवरंगी सूप
गेली पांची उतरंडी काडल्या साळी नी बा डाळी
पेटंविली वैलचूल ठेवली डेचकी लोटकं वर
लावल्या चंदनाच्या फाळी जाळ तिनं फुंकीयीला
राधानं सैंपाक बा केला गेली आपुल्या खोलीला
हातीं आईना घेतीला लागली मुखजी पहाया
सर्व अलंकार हाई नवलाखी हार न्हाई
टाकला हातचा आईना लागली धावाया पळाया
तितनं धांवत पळत आली वाड्याच्या भाईरी
लागली राजस मारुगी सर्व वनं वलांडिलीं
लागली यमुना दिसाया गेली यमुनेच्या आंत
गेली मूळ डोंबावरा नवलाखी हार न्हाई
झाली कावरी बावयीरी आली यमुनेच्या वरी
तितं गवळ्याचा गोइंदा त्येला बाई इच्यारती
आर तूं गोइंदा माज्या हार माजा देकीला का
हाराला हारकी काय ग काय तूं मला देशील
दीन साकरचं पोतं हार माजा द्यावा देवा
साकरचं पोतं काय पाहिलं का न्हाई मीं
आमी मथुरेचं वानी आमाला साकरचं काय?