आखाडमासी एकादशी, नागारपंचीम कोण्यादिशी साजणीबाई ग
या बाई पंचमीची लाही, बोलावा आलाया बाई, साजणीबाई ग
बोळण्या घेतें गोंड, गणपतीची वाकडी सोंड, साजणीबाई ग
गणपतीच्या हातीं लाडू, महालक्ष्मीला वाढूं, साजणीबाई ग
या बाई लक्ष्मीचीं पात्रं, घरांत आली पित्रं, साजणीबाई ग
पित्राची निसते डाळ, आली घटाची माळ, साजणीबाई ग
घटाची वो घाटीगटी, शिलंगनाची केली दाटी, साजणीबाई ग
शिलंगणाचं घेतें सोनं, दिवाळीनं केलं येणं, साजणीबाई ग
दिवाळीची पुजतें पंती, संक्रांत आली नेन्ती, साजणीबाई ग
संक्रांतीचं पुजतें सुगडं माही पुनव आली उघड, साजणीबाई ग
पुनवेची घेतें ओंबी, शिमगा खेळो झोंबी, साजणीबाई ग
शिमग्याचा जळती व्हळी, रंगपंचमी आली खेळी, साजणीबाई ग
रंगपंचमीचा रंग, पाडवा आला टोलेजंग, साजणीबाई
पाडव्याची उभारतें गुडी, आकितीनं मारली उडी, साजणीबाई ग
आकितीचा तळते वडा, आंब्याचा ग शेणसडा साजणीबाई ग
आंबा खाऊन झालें गार, पावसाची चळकदार, साजणीबाई ग