मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय बारावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय बारावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला

श्रीगणेशो जयति ॥
मोहांधकार नासावया । तूंचि सूर्य सद्गुरुराया । म्हणोनि लागतसे पायां । गुण गावया मति देईं ॥१॥
आधींच वाराणशी पुण्य क्षेत्र । माजीं भागीरथी धन्य नीर । तैसा मूळ ग्रंथ सिद्धचरित्र । (१)त्याहीवरी तव सन्निधी ॥२॥
जंव जंव जळसिंचन घडे । तों तों वृक्ष असंभाव्य वाढे । तेवीं तव कृपा निवाडें । ग्रंथीं वोसंडे सुरस रस ॥३॥
कैसा होईल मम प्रतिपाळ । म्हणोनि चिंता न करी बाळ । परी माता परम स्नेहाळ । क्षणक्षणां सांभाळ करीतसे ॥४॥
त्याहूनि आगळी तूं गुरुमाउली । मम मती ग्रंथरचनीं प्रेरिली । ते सिद्धीस पाहिजे नेली । म्हणणें, माझीच मूर्खता ॥५॥
सेवकें करावे आज्ञापालन । त्याचा प्रभूसि आहे अभिमान । कार्य सिद्धीचें चिंतन । त्याचें त्यासीच लागलें ॥६॥
तैसे तुझे कृपेचे बळें । इये ग्रंथींचा विस्तार चाले । श्रीपति मतिमंद केवळें । आबाळवृद्ध जाणती ॥७॥
असो; कानिफें गोरखासी । पुसिलें सद्गुरु वृत्तान्तासी । तेंचि परिसा सावकाशी । एकाग्र चित्त करोनियां ॥८॥
गोरख म्हणती कानिफातें । गुरुदर्शनाची त्वरा मातें । तथापि तव गुरुच्या वृत्तातें । निश्चय शोधार्थी सांगेन ॥९॥
गौडबंगाला देशाधिपति । त्रिलोकचंद नामें नृपति । स्वरुपें सुंदर म्हणोनि बोलती । गुलाबचंदही तयातें ॥१०॥
तयाची मुख स्त्री मैनावती । उभयतां एकचित्तें असती । प्रथम पुत्र जाहला निश्चिती । नाम गोपीचंद ठेविलें ॥११॥
गोपीचंदाचे अष्टम वर्षी । त्रिलोकचंद जाहले कैलासवासी । मैनावतीचे सहगमनासी । पतिआज्ञा आड आली ॥१२॥
त्रिलोकचंद अंतकाळीं । स्त्रियेसी म्हणे ऐके गे वेल्हाळी । पुत्रस्नेहें प्रजेते पाळी । हेचि सेवा आमुची ॥१३॥
माझा गोपीचंद बाळ गुणराशी ।(२) उभयपक्ष न करी परदेशी । चिरकाल नांदावे तुज सहवासीं । इतुकें नसे मम भाग्य ॥१४॥
ऐसें बोलोनियां जाण । पावला त्रिलोकचंद निर्वाण । शोकें विव्हळ पतिव्रता पूर्ण । प्रजा संपूर्ण तैसीच ॥१५॥
दुर्धर कालगति जाण । न चुके ब्रह्मादिलागून । रायाचें उत्तरकार्य संपूर्ण । गोपीचंद हस्तें करविलें ॥१६॥
पतिआज्ञा वंदोनि शिरीं । पतिव्रता राज्य चालवी निर्धारी । परी तिळमात्र राज्य-भोगावरी । चित्त तियेचें न बैसे ॥१७॥
(३)न करी उत्तमान्न भोजन । न करी उत्तम वस्त्र परिधान । न घाली अलंकार भूषण । श्रीहरिचिंतनें रत सर्वदा ॥१८॥
पूर्णाधिकारी गुरु प्राप्त - । व्हावा; ऐसा चित्तीं हेत । धरिला; तों जालंधरनाथ । सहज तेथ पातले ॥१९॥
एके दिवशीं सायंकाळीं । मैनावती बैसली महालीं । तों जालंधर काष्ठ-मोळी । माथां वाहून चालती ॥२०॥
परी मस्तकापासून अंगुळें बारा । ऊर्ध्व राहिला काष्ट भारा । पाहूनियां, मैनावतीचे नेत्रा । अति आल्हाद जाहला ॥२१॥
मग त्याचा निवास-स्थान शोध । दूतीकरवीं करवोनि सुबद्ध । चरणचाली चालली, सिद्ध - । दर्शनालागीं त्वरेनें ॥२२॥
जावोनि केला नमस्कार । वचन बोले परम नम्र । जी या जन्माचा उद्धार । केला पाहिजे स्वामिया ॥२३॥
जालंधर म्हणती तियेसी । तुम्ही राजस्त्रिया निश्चयेंसी । आम्हां भिक्षुक याचकांसी । गुरुत्व तुम्हां केवीं घडे ? ॥२४॥
राणी म्हणे जी सद्गुरुनाथा । रंकासी राज्यपद तत्त्वतां । अथवा ब्रह्मदेवासी पदच्युतता । कृपें अवकृपें तुझ्या घडे ॥२५॥
तेथें आमुची कायसी गोष्टी ? । अवलोकनें कृपादृष्टि । मी अनन्य जी चरण-संपुटीं । हे श्रीचरण जाणती ॥२६॥
तिची पाहूनि दृढ भक्ति । जालंधर आनंदले चित्तीं । मगु सुदिन सुमुहूर्ती । दिव्य ज्ञान उपदेशिलें ॥२७॥
पद्मकर माथां पडतां । देहींच जाहली विदेहता । आत्मसुखालागीं तत्त्वता । सर्व दु:खें विसरलीं ॥२८॥
कर्तव्य तें गुरुसेवन । नाहींच राहिलें कार्य आन । ऐसें जाणोनि रात्रंदिन । गुरुसेवेसी न विसंबे ॥२९॥
दुर्जनांचें कुटिल चित्त । तयां कोणी न दिसे सद्भक्त । राजस्त्री दरिद्र्याची सेवा करीत । हें अनुचित-जन म्हणती ॥३०॥
गोपीचंद राजा पृथ्वीपति । द्वादश शत स्त्रिया असती । उप-स्त्रिया षोडश शती । सदा नृपति आनंदित ॥३१॥
एकान्त समय पाहूनि । कोणी स्त्रिया करिती विनवणी । राया आपुली जे जननी । हीनाचे सेवनीं रत झाली ॥३२॥
हें न माने आमुचे मना । राजा म्हणे ऐका वचना । तुम्ही नष्टा अशुचि अज्ञाना । न जाणा गुरुदास्य आवडी ॥३३॥
मैनावती माझी माता । धन्यधन्य पतिव्रता । योग्य गुरुची सेवा करिता । कोण वारिता असे तिये ? ॥३४॥
मनुष्य जन्म पावोनियां । जे न लगती गुरुचे पायां । जळो जळो त्यांची काया । द्विपद पशु त्यां म्हणावे ॥३५॥
ऐकोनि रायाची वचनोक्ति । सर्व स्त्रिया तटस्थ राहती । जैसी गर्जता सिद्धान्त श्रुति । गर्भगळित होती कोकशास्त्रें ॥३६॥
ऐसा कित्येक काल गेला । सुदिन पर्वकाळ आला । गोपीचंद राजाचा आरंभिला । मंगलस्नान उत्साहो ॥३७॥
द्वादश ते जाया बैसल्या पाठीं । तेवींच उपस्त्रियांची दाटी । उपचार घेऊनि करसंपुटीं । सेवार्थ निकटीं रायाचे ॥३८॥
एक करिती अंगमर्दन । एक करिती केशसंवहन । कोणी उत्तम तेल घेऊन । सुवर्ण-पात्र पुढे करिती ॥३९॥
कोणी तप्त करिती नीर । कोणी पाहोनि रौप्यपात्र । सुगंध द्रव्य करोनि मिश्र । स्नानोचित जल करिती एक ॥४०॥
असो; सर्व स्त्रियांचें कार्य । वर्णितां, ग्रंथ वाढेल असंभाव्य । प्रत्येक स्त्रीस वाटे, आर्य - । गोपीचंद सेवावा ॥४१॥
रत्नखचित चौरंग मांडिला । वरी गोपीचंद राजा बैसविला । जैसा मदनाचा पुतळा । तैसा शोभला नृपराज ॥४२॥
तो सोहळा पाहावया । मैनावती उपर-माडिया । उभी राहोनि लवलाह्या । पुत्र पाहोनि संतोषे ॥४३॥
आधींच गोपीचंद तेज:पुंज । भोंवता दिव्य स्त्रियांचा समाज । त्याहीवरी मातृप्रेमाचे भोज । अति आल्हादें नृत्य करी ॥४४॥
हर्षभरित मना । मैनावती पाहे पुत्रवदना । तों आठवला त्रिलोकचंद राणा । पतिव्रतेसी तेधवां ॥४५॥
म्हणे रुपें सुंदर देख । याहीहूनि दशगुणें अधिक । याचा पिता; परि कालमुख । क्षण न लागतां पावला ॥४६॥
तैसीच याची होईल गति । म्हणोनि दु:खाग्नि भडकला चित्तीं । ते अश्रु रायाचे पृष्ठीं पडतीं । स्फोटक उठती तरतरोनी ॥४७॥
राजा पाहे ऊर्ध्वमुख । तों माता करिताहे दु:ख । अर्धवस्त्र ओलें देख । घाबरा तैसाचि ऊठिला ॥४८॥
येवोनियां उपरीवरी । साष्टांगें नमस्कार करी । म्हणे कोणी गांजिलें सांग निर्धारी । वधीन निज करीं तयातें ॥४९॥
मैनावती म्हणे बाळका । तुजसारिखा पुत्र निका - । असतां; कोणाचा आवांका । श्रमवावया मजलागीं ? ॥५०॥
तरी कां जननिये केला शीण ? खेदें जाहले आरक्त नयन ? पाठीं तव आंसुवे पडतां, पूर्ण । पोळलें जाण अंग माझें ॥५१॥
तंव ते म्हणे बा तुझा तात । स्वरुपें लावण्य प्रतापी अद्भुत । परी काळें क्षणार्धांत । ग्रासलें अकस्मात महावीरा ॥५२॥
म्हणोनि वाटली परम चिंता । काय होईल तुझी अवस्था ! । येरु म्हणे : मृत्युलोक तत्त्वतां । ऐसाचि असे जननीये ॥५३॥
यासी तों नसेचि परिहार । माता म्हणे ऐक साचार । मस्तकीं पडतां सद्गुरु-कर । काया अमर होईल कीं ॥५४॥
राजा म्हणे मातेप्रति । ऐसे सद्गुरु कोठे आहेती ? माता म्हणे बा संप्रति । ग्रामीं असती याचि पैं ॥५५॥
जे शोधिता न लभेचि जाण । ते दैवयोगें जोडलें निधान । जालंधर महायोगी पूर्ण । तयाचे चरण सेवावे ॥५६॥
ऐसें ऐकोनियां जाणा । मातेसी म्हणे आजिचे दिना - । लोटतां; उदईक भोजना - । आणीन सिद्धराणा तव आज्ञें ॥५७॥
दर्शन जाहलिया पोटीं । सहज घडोन येईल गोष्टी । सर्वांवरी समान दृष्टि । करुणामृत-वृष्टि साधूची ॥५८॥
ऐसें समाधान करोनियां । गोपीचंद लागला पायां । माता म्हणे रे तान्हया । चिरायु राहे आकल्प ॥५९॥
मग सारोनि मंगलस्नान । बोलावूनि आणिले प्रधान । म्हणे जालंधरासी निमंत्रण । भोजनालागीं करावे ॥६०॥
तुम्हीं दक्षता राखावी पूर्ण । कांहीं न पडों द्यावे न्यून । पूजा साहित्य सिद्ध करुन । साधु-मन तोषवावे ॥६१॥
ऐसें आज्ञापूनि प्रधाना । दुसरे दिनीं राजेन्द्र, जाणा । चरण चालीं सिद्ध दर्शना - । जाता जाहला आनंदें ॥६२॥
चरणीं ठेवोनियां माथा । म्हणे कृपाळुवा दीननाथा । मम गृहातें येऊनि समर्था । पावन अनाथा करावे ॥६३॥
ऐसें विनवितांचि जाण । सुप्रसन्न जाहलें मन । तात्काळ आणवूनि सुखासन । जालंधरासी बैसविलें ॥६४॥
आपण घेऊनियां चामरें । वरी वारीतसे निर्धारें । समारंभे वाद्यगजरें । निजगृहासी आणिले ॥६५॥
षोडशोपचारें केलें पूजन । सुवर्ण ताटीं उत्तमान्न । - घालूनि, म्हणे करावे भोजन । यथारुचि समर्था ॥६६॥
मैनावती हर्षभरित । म्हणे मम भाग्यासी नाहीं अंत । चिरायु होवो माझा सुत । सद्ग्रुरु वरदें करोनियां ॥६७॥
येरु चामर घेउनी हातीं । मक्षिका वारीतसे निगुती । हात जोडोनि मैनावती । सद्गुरु सन्मुख उभी असे ॥६८॥
तंव ते म्हणे : सुतावरी । कृपा असावी निर्धारी । योगी अवचिता पाहतां वरी । गोपीचंदाते देखिलें ॥६९॥
नृपा बोलाविलें जवळ । हातीं होता जो अन्नकवळ । `बच्चा ये ले ? म्हणतां; तात्काळ । क्रोध आला रायातें ॥७०॥
जैसे परिणामीं रोगियासी । औषधचि विष वाटे तयासी । तेचि परी झाली रायासी । सिद्धें प्रसादासी ॥७१॥
स्तब्ध राहिला, देखोन - । जालंधरें ओळखिलें मन । मैनावतीचें अंत:करण । परम खेदा पावलें ॥७२॥
असो; भोजन जाहलियावरी । त्रयोदशगुणी तांबूल स्वीकारी । यथासुखें निद्रा करी । राजमंदिरें कृपाळु ॥७३॥
रायासी क्रोध नावरे मना । पाचारिले खळ दुर्जना । म्हणे उच्छिष्ट ग्रास देऊनि जाणा । केले अपमाना माझिया ॥७४॥
तरी याचा बरवा सूड । घेवोनि; करावे दृष्टीआड । ऐसें वदतां; दुर्जनीं दृढ - । मंचकासहित उचलिला ॥७५॥
नेवोनि अश्वशाळेमाझारीं । निजेलाचि निक्षेपिला गारीं । आच्छादनार्थी लोटली वरी । लीद उपरी सांचली जे ॥७६॥
ऐसें आचरोनि कर्म घोर । पातले रायाचें मंदिर । झाला-निवेदिला सर्व प्रकार । निरयास पात्र होवोनि ॥७७॥
राजा म्हणे बरवें केलें । दुष्ट स्वगृहासी गेले । अकृत्य कोणाही न कळे वहिलें । चांडाळ-चौकडीवांचून ॥७८॥
असो; मैनावती नारी । श्रीगुरु आठवोनि अंतरीं । शोकें विलोपोनि महीवरी । रडे पडे आक्रंदे ॥७९॥
म्हणे पुत्रें त्यागूनि प्रसादा । अहाहा साधिलें माझिये द्वंद्वा । आतां सद्गुरो पदारविंदा - । दावी सुखकंदा मज दीना ॥८०॥
इकडे गर्तेमाजी जाणा । अंतरिक्ष योगिराणा । मल-मृत्तिके नातळे सुजाणा । गोरक्ष म्हणे कानिफा ॥८१॥
ऐसें ऐकोनि वर्तमान । क्षुब्ध झालें कानिफाचें मन । माजा दयाळु सद्गुरु पूर्ण । कैं मी देखेन पद त्याचें ! ॥८२॥
गोपीचंद राज्यसहित । कां हो न केला भस्मीभूत ? ते कृपाळु परम समर्थ । क्रोध कैंचा त्या चित्तीं ! ॥८३॥
असो; मी तेथें उठाउठीं - । जाऊनि, सद्गुरु पाहोन दृष्टीं । पदरजां वंदूनि घालीन मिठी । जाहला कष्टी वियोगें जो ॥८४॥
इतुकें बोलोनि दोघेजण । येरयेरां करोनि नमन । उभयमार्गी श्रीगुरुदर्शन - । घ्यावया चालिले त्वरेनें ॥८५॥
ढवळ नगरीये प्रवेशतां । मैनावतीस कलली वार्ता । कानीफ गुरुबंधु तत्त्वतां । शिष्यांसमवेत पातला ॥८६॥
ऐकोनि हरिखली शुभांगी । चरणचाली दर्शनालागी - । ठाकली, जेथें कानीफ योगी; । नमिला साष्टांगें सद्भावें ॥८७॥
क्षेम कल्याण येररेरां । पुसोनि; म्हणे जालंधरा - । कोठें देखिलें ? सांग सत्वरा । बोलतां गहिंवरें दाटलीं ॥८८॥
माझा अनंत जन्मींचा तात । सांग कोठें सद्गुरुनाथ । तयाविणें जाहले अनाथ । दावी त्वरित बंधुराया ॥८९॥
ऐकोनि मैनावतीचें वचन । कानीफ झाला क्रोधायमान । म्हणे वो तुझा कुमर दुर्जन । घातकी पूर्ण तोच की ॥९०॥
यौवनमदें मातला भारी । सदा विचरे काम-कान्तारीं । तरी मी तयाचा दण्डधारी । कृतान्तसरी पातलों ॥९१॥
पुरोनि ठेवलें जालंधरा । जोडिले महानरक अघोरा । ते पुत्र - कृति लपवोनि साचारा । नमनादर दाखविसी ? ॥९२॥
जयाच्या पदरजाचा कण । इच्छिती ब्रह्मादि सुरगण । ऐसिया धरणीमाजीं पुरोन । - । ठेविलें छळोन दुर्जनें ॥९३॥
सक्रोध कानिफाची उक्ति । ऐकोनि थरथरा मैनावती - । कांपोनि; भयें पडली क्षितीं । म्हणे हा हा दुर्मति चांडाळा ॥९४॥
अरे त्वां येऊनि माझे उदरा । अनंत जन्मींच्या साधिलें वैरा । माझा इहपर सुख-सोयरा । जालंधर कष्टविला ॥९५॥
विकळ देखोनि आपुली भगिनी । कानिफें जाणितलें मनीं । म्हणे ही इयेसी न कळतां करणी - । जाहली; म्हणोनि उठविली ॥९६॥
सतीतें आश्वासोनि योगीन्द्र । म्हणे वो ना भी, धरी धीर । सत्वरचि तूंतें जालंधर - । भेटवीन जननीये ॥९७॥
येरी ऐकोनि दीन वदन । मिठी घालोनि धरिले चरण । म्हणे बांधवा तुजवांचोन । त्राता त्रिलोकीं मज नाहीं ॥९८॥
मातें नेणतां घोर कृति । केधवां आचरला दुर्मति । तरी यासी रक्षूनि; श्रीगुरुप्रति - । दावी कृपामूर्ति बंधुराया ॥९९॥
हा कुपुत्र जरी दुर्जन । तरी मोहें वेष्टिलें मजलागोन । यालागीं याचें क्षेमकल्याण - । करी गा पूर्ण बंधुराया ॥१००॥
योगमूर्ती तूं विश्व तारुं । कासेसी लावूनि, पैलपारु - । करावा गा भवसागरु । जालंधर श्रीगुरु भेटवोनी ॥१०१॥
पाचारोनि गोपीचंद । माता पुत्रीं पदारविंद - ॥ धरोनि, तयाचें अभयवरद । वचन सुसिद्ध घेतलें ॥१०२॥
असो; नाथें करोनि विचारा । तात्काळ आज्ञापिलें राजेन्द्रा । म्हणे धातुत्रयाच्या साचारा । मूर्ति त्रिप्रकारा करी वेगीं ॥१०३॥
हेम रौप्य आणिक ताम्र । धातुत्रया मेळवोनि एकत्र । चौथा लोह पृथक साचार । पुतळे करी का ॥१०४॥
निर्भीत राहोनि अंतरीं । आपणासम मूर्ति चारी - । करोनि आणी गा झडकरी । गोपीचंदा राजेन्द्रा ॥१०५॥
अवश्य म्हणोनि तये वेळां । निर्मोनि आणिले नाथाजवळां । जेथें जालंधर कूपीं टाकिला । ते स्थलीं पातला कानीफ ॥१०६॥
जैसा अभ्रें झांकिला मित्र । तैसाचि लिदीनें जालंधर । मग ते सत्वरा केली दूर । तैं तो योगीन्द्र देखिला ॥१०७॥
निधान साधावयालागोन । साधक लक्षिती लेऊन अंजन । तैशापरी श्रीगुरुकारण । नागरिक जन विलोकिती ॥१०८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP