मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय दुसरा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय दुसरा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला गेला.


श्रीगणेशायनम: ॥
श्रीसद्गुरु रामचंद्राय नम: ॥ ॐ नमो सद्गुरु आदिनाथा । नासावया मोह ममता । गुरुकृपें प्रगटोनि तत्त्वतां । जनालागीं उद्धरसी ॥१॥
सिद्धचरित्र ग्रंथ गहन । माझिया मुखें करिसी कथन । जैसा पांवा मोहरी वाजवून । स्वयेंचि सुख मानिजे ॥२॥
शेषादिकांच्या कुंठित मती । वेद म्हणती नेति नेति । तेथें मी मंदमति किती । हृदिस्थ गुरुमूर्ति वदतसे ॥३॥
शिष्य म्हणती श्रीगुरुसी । सिद्धचरित्र कथा कैसी । ती सांगावी विस्तारेंसी । कृपा करोनि स्वामिया ॥४॥
श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । सिद्धचरित्र वर्णावयासी । सामर्थ्य असे पां कवणासी । परी यथामति वर्णावें ॥५॥
धन्य धन्य तुम्ही श्रोते । सिद्धचरित्र पुशिलें मातें । जी कथा वर्णितां पतितातें । पावन करी तात्काळ ॥६॥
श्रीसद्गुरु महादेवकथा । ऊर्वी न पुरे गुण लिहितां । पूर्ण ब्रम्ह दीनोद्धारार्था । मानवी वपु स्वीकारी ॥७॥
धर्मस्थापना करावयालागी । मज अवतरणें पडे जगीं । ऐसें गीतेमाजीं स्वांगी । बोलिले योगी श्रीकृष्ण ॥८॥
ती सत्य करावया प्रतिज्ञा । आणि उद्धरावया जनां अज्ञां । कलीमाजीं अवतार प्राज्ञा । धरणें प्राप्त जाहलें ॥९॥
माथा ठेवूनि तयाचे चरणीं । मतीतें सारीन गुरुवर्णनीं । जे वर्णितां समूळ धुनी । महत्‍ पापाची होतसे ॥१०॥
उत्तरदेशीं प्रख्यात नगर । नामें जाणावें नागपूर । तेथील राजा धुरंदर । चक्रवर्तीं जनपाळ ॥११॥
त्याचे पदरीं परम निपुण । राजकार्यी चतुर जाण। ‘रामचंद्र’ नामाभिधान । विश्वासूक रायाचा ॥१२॥
जो मंत्री रायाचें हित करी । त्यासी प्रजा द्वेष धरी । प्रजाहित जो अंगीकारी । तरी तो द्वेष्टा रायाचा ॥१३॥
ऐसी जगाची राहाटी । ती रामचंद्रीं न पडे दृष्टीं । प्रजा राजा अति संतुष्टी । पावती पुष्टी रामसंगें ॥१४॥
ज्याची कीर्ति जगविख्यात । परोपकारी अति उदित । पुत्रवत्‍ प्रजेतें पाळित । राजहित चुकवों नेदी ॥१५॥
प्रपंच आणि परमार्थ । दोन्ही चालवी यथास्थित । जैसा जनक राज्य करित । अणुही परमार्थ न चुकतां ॥१६॥
जगविख्यात श्रीपंढरी । तेथील रहिवासी अवधारी । सद्गुरु गुंडुराज निर्धारीं । (१)त्यांचे शिष्य हे श्रीराम ॥१७॥
सगुण साक्षात्कार पूर्ण । सिद्धी उभ्या कर जोडून । शांति क्षमा दया जाण । रामचंद्री विलसती ॥१८॥
बाह्य राजकार्य चालविती । परी न ढळे अंतर स्थिति । स्मरणासरसी सगुण मूर्ति । प्रत्यक्ष थावरे सामोरी ॥१९॥
राम विचारी निज मानसीं । सगुण साक्षात्कार नामयासी । परी गुरुमुखें निज तत्त्वासी । न पवतां धन्य नव्हे की ॥२०॥
जयविजयादिक मूर्ति । जयासी मुक्तित्रयाची प्राप्ति । त्यांसही जाहली पुनरावृत्ति । मग इतरांची गति कायसी ? ॥२१॥
करतलामलकवत्‍ जाण । ज्यासी नव्हे अपरोक्ष ज्ञान । जो राजयोगाची न जाणे खूण । त्या जन्म-मरण चुकेना ॥२२॥
ऐसें म्हणती साधुसंत । श्रुति - स्मृति हेंचि स्थापित । सनकादिकांचा हाचि सिद्धान्त । निज स्वरुप ओळखावें ॥२३॥
ऐसी चिंता राममनीं । तों काळ साह्य झाला त्यालागुनी । (२)गुप्त राहावे राजकारणीं । ऐसा प्रसंग पोहोंचला ॥२४॥
जनसमूह चिंताक्रान्त । परी राम चित्तीं आनंदभरित । म्हणे मम तप:फलितार्थ । प्राप्त झालासें वाटतें ॥२५॥
या कर्माची गति गहन । नळासी फिरविलें रानोरान । हरिश्चंद्र राजा प्रतापी पूर्ण । स्मशानरक्षक त्या केलें ॥२६॥
पांडव परम विष्णुभक्त । त्यांसी अज्ञातवास प्राप्त । हें सर्व रामचंद्र जाणत । म्हणोनि खेदरहित सदा ॥२७॥
सुखदु:खाची होता बाधा । साधु चित्तीं न मानिती कदा । गांठी घालूनि देहप्रारब्धा । स्वसुखें सदा विचरती ॥२८॥
एवं शाश्वत सुखाकरितां । ऐहिका रामें हाणोनि लाथा । गुप्त पंथें मार्ग क्रमितां । गिरिनार पर्वता पातले ॥२९॥
सर्व पर्वतांमाजीं जाण । गिरनार पर्वत श्रेष्ठ पूर्ण । जयाचे शिखरीं सिद्ध ऋषीजन । वास करिती अखंड ॥३०॥
तेथें रामचंद्र पावले । रम्य स्थळ विलोकिलें । चित्ता समाधान झालें । पर्वत दृष्टीं देखतां ॥३१॥
त्रेतायुगीं श्रीरामचंद्र । राज्य त्यागुनी गोदातीर । पाहुनी सुख झालें अपार । (३)तेवीं ‘या’ गिरिनारा पाहतां ॥३२॥
रामें विचारिलें निज मनीं । राजयोग अभ्यासावांचुनी । जन्ममरणाची कडसणी । कवणातेंही न सुटेचि ॥३३॥
श्रीसद्‍गुरुकृपेंविण । राजयोगाची न पवे खूण । रामें हें निज मनीं जाणून । तप दारूण मांडिलें ॥३४॥
नित्य ब्रम्हकर्म सारुनी । राम बैसे अनुष्ठानीं । अहोरात्र ईश्वरस्मरणीं । निदिध्यास धरियेला ॥३५॥
म्हणे कैं भाग्य येईल उदया । कैं मी देखेन श्रीगुरुपायां । कैं हे ओवाळुनी काया । मस्तक न्यासीन पदांवरी ॥३६॥
पिंड-ब्रम्हाण्ड एक रचना । ऐसें शास्त्रें बोलती नाना । परंतु प्रत्यया येईना । वृथा वल्गना कासया ॥३७॥
संपत्ति ऐश्वर्य सर्व गेलें । पुत्रकलत्रादि अंतरले । हें रामचित्तीं कधीं न आलें । तळमळे सद्गुरुप्राप्तीसी ॥३८॥
धन्य धन्य तोचि नरु । जो माने तृणवत्‍ संसारु । म्हणे सत्वर भेटो सद्गुरु । मज भवपार करावया ॥३९॥
राज्यसंपत्तीचा त्रास । सद्गुरु दर्शनीं हव्यास । तो एक आला नर जन्मास । ना ते खरसूकर जन्मोनी ॥४०॥
गुरु पाहतां उदंड । सांगती नाना परी थोतांड । परी सद्गुरु दुर्मिळ प्रचंड । कीर्ति जयाची भवशमनी ॥४१॥
श्रीहरिकृपेंवांचुन । ऐसा सद्गुरु न मिळे जाण । ऐसें रामें जाणोनि पूर्ण । आराधी चरण ईश्वराचे ॥४२॥
अनशन व्रत स्वीकारिलें । भूमिशयन आदरिलें । शरीर कर्वतीं घातलें । यमनियमांचे ते काळीं ॥४३॥
आधींच सद्भक्त आगळा । त्याहीवरी प्रेमळ भला । सद्गुरु प्राप्त्यर्थ आदरिला । योगयाग जयानें ॥४४॥
रामचंद्रें तप केलें । ऐसें कोणींही न आचरिलें । सकाम परी लोटूनि गेलें । निष्कामासी माघारीं ॥४५॥
एकवीस दिवस अहोरात्र । रामें तप केलें घोरांदर । त्या तपप्रभावें श्रीशंकर । अति आल्हाद पावले ॥४६॥
गिरिजेसी म्हणे शंकर । कृत त्रेत द्वापर । ये युगीं तपें यजती नर । परी कलीमाजीं कठीण हें ॥४७॥
सांगितलिया युगत्रयीं । तपा विघ्न करी कली पाही । परी त्याचेंच युगीं इहीं । (४)रामतपातें भी कली ॥४८॥
काय प्रताप बळिया गाढा । जो धैर्याचा महाहुडा । कली पळतसे धुडधुडा । बागुलभेणें बाळ जेवीं ॥४९॥
असो त्या निष्काम तपोत्कर्षीं । भार जाहला वैकुंठासी । म्हणे याचिया मनोरथासी । न करितां ब्रीदा ये उणें ॥५०॥
ऐसा प्रभुमनीं होता विचार । तो बाविसावा दिन उदेला पवित्र । अकस्मात्‍ राम दृष्टीसमोर । दिव्य पुरुष उभा ठाके ॥५१॥
सहस्त्र-भानु-तेज देख । दाहकत्व सांडोनि जाहले एक । तैसें तेज अलोलिक । रामचंद्रें देखिलें ॥५२॥
वदन सर्व सुखाचें सदन । चरण विष्णुहृदयभुवन । तेज:पुंज देदीप्यमान । अति मनोरम मूर्ति ज्याची ॥५३॥
भला रे भला भक्तसखया । तुझी पाहोनि शांति दया । तपप्रभावें करोनियां । प्रसन्न झालों मी तूंतें ॥५४॥
ईप्सित असेल तेंचि मागे । दानीं लाजावें हें मागे । ऐसें देऊं नि:शंक सांगे । भक्तराया सुजाणा ॥५५॥
तूतें उपदेशावयालागी । येणें मातें इया प्रसंगीं । घडलें म्हणे महायोगी । भक्तराया सुजाणा ॥५६॥
जन्ममरण यातायाती । येथून खुंटली तुझी संसृति । ऐसें म्हणोनि कृपामूर्ति । प्रेमभरें आलिंगी ॥५७॥
परम विनीत नम्र वचनीं । (५)प्रार्थिले श्रीगुरु चूडामणि । म्हणे येणें जाहलें कोठूनि । तें या दासा आज्ञापिजे ॥५८॥
तैसाचि संप्रदाय कवण । काय गुरुचे असे खूण । तेंही केलें पाहिजे कथन । या दासानुदासातें ॥५९॥
ऐसें रामें विनवितां पूर्ण । श्रीगुरु होऊनि सुप्रसन्न । करुनियां सुहास्यसदन । म्हणती वत्सा ऐकावें ॥६०॥
गोडाही गोड सिद्धचरित्र । पुण्यपावन अति पवित्र । श्रवणें सद्गुरु कृपा पात्र । होती बद्ध मुमुक्षु ॥६१॥
ते कथा अति रसाळ । पुढिले प्रसंगी होय प्रांजळ । गुरुकृपेची ओल प्रबळ । ग्रंथ सिद्धीं पावावया ॥६२॥
ए‍र्‍हवीं श्रीपति मतिमंद । हें जगविख्यात प्रसिद्ध । परी मूढाहातीं ग्रंथ प्रबंध । करविणें इच्छा हे त्याची ॥६३॥
हृदिस्थ श्रीगुरु आपण । राहूनि करवी ग्रंथकथन । त्यांचे चरणीं मस्तक ठेवून । द्वितीय प्रकरण संपविलें ॥६४॥
त्रिकूटवासी श्रीरामचंद्रा । श्रीपतिवरदा परमपवित्रा । अखंड चरणीं देई थारा । जगदुद्धारा कृपासिंधू ॥६५॥
स्वस्ति श्रीसिद्धचरित्र भाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥६६॥
श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंस: ॥
॥ अध्याय दुसरा संपूर्ण ॥
==
टीपा - (१) त्यांचे शिष्य हे श्रीराम - ओवी १७ :- या ओवीपासून ओवी ६४ पर्यंत आलेले राम, रामचंद्र हे उल्लेख श्रीगुंडा महाराज देगलूरकरांचे शिष्य श्रीरामचंद्र नागपूरकर महाराजांचे आहेत. श्रीपतींचे गुरु श्रीरामचंद्रमहाराज तिकोटेकर हे सदर रामचंद्रांचे प्रशिष्य होते.

(२) गुप्त राहावे राजकारणीं - ओवी २४ :- श्रीनागपूरकर रामचंद्रमहाराज हे भोसले सरकारचे अधिकारी होते. सरकार दरबारीं कांहीं वैमनस्य निर्माण होऊन महाराजांना नोकरीचा त्याग करावा लागला इतकेंच नव्हे तर परागंदा व्हावे लागले असें या उल्लेखावरुन दिसतें.

(३) तेवीं ‘या’ गिरनारा पाहतां - ओवी ३२ :- प्रभु रामचंद्रास गोदातीर पाहून जसा अत्यंत आनंद झाला तसा ‘या’ रामास गिरनारपर्वत पाहून आनंद वाटला.

(४) राम तपातें भी कली - ओवी ४८ :- श्रीरामचंद्र नागपूरकर महाराजांनीं केलेल्या तपश्चर्येपुढें कलि निष्प्रभ होतो.

(५) प्रार्थिले श्रीगुरु चूडामणि - ओवी :- श्रीरामचंद्राचें परमगुरु श्रीचूडामणि समाधिस्थ असूनही गिरनारला प्रकट झाले व त्यांनीं परंपरागत राजयोगाचा उपदेश केला (पहा अ १ टीप ८)

कठिण शब्दांचे अर्थ : - मतीतें सारीन = बुद्धीचा उपयोग करीन (१०) तप:फलितार्थ = तपश्चर्या सफळ होण्याचा सुप्रसंग (२५) कडसणी = सूक्ष्म विचार, निरगांठ (३३) भवशमनी = संसारताप शांत करणारी (४१) घोरांदर = तीव्र, उग्र, भयंकर (४६) महाहुडा = प्रचंड किल्ला (४९)

N/A

References : N/A
Last Updated : February 19, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP