मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय पहिला

श्रीसिद्धचरित्र - अध्याय पहिला

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला गेला.


श्रीगणेशानम: ॥
(१)श्रीमधवात्मज रघूत्तम तारकाचे । पादाम्बुजा नमुनि गुह्य वदेन वाचे ॥
सत्सार सोऽहमिति चिद्रुप भानु माझा । तो सद्गुरु नमित मी रघुनाथराजा ॥

नमूनि श्रीगुरु आदिनाथा । जागृत्‍ स्वप्न सुषुप्ति आतां । गाईन गुरुपायंपार्य गीता । श्रीरघुनाथपावेतों ॥१॥
आधींच इच्छा होती मनीं । वरी आज्ञापिलें स्वामींनीं । बा रे गुरुपरंपरा वाखाणी । चिद्ररत्नखाणी आपुली जे ॥२॥
ऐकोनि आवडीचे बोला । श्रीपदीं मस्तक ठेविला । तैं सुकृताचळीं उदया आला । प्रबोधभानु त्या कृपें ॥३॥
श्रीरघुनाथ माझा गुरु । त्याचा मी (२)करकंजोद्भव कुमरु । संताचा पादत्राणधरु । एकाक्षरु पाठक ॥४॥
तें एकाक्षर म्हणाल काई । (३)तंव तो वाड्मय उच्चार नाहीं । ज्याची गुरुपुत्र जाणती सोई । येरां नाहीं हा बोधु ॥५॥
वत्सा परेचां परती राहूनि । या अक्षराची मूळध्वनि । छत्तिसावेगळें करुनी । घोष निशिदिनीं ययाचा ॥६॥
सांडोनि अकारादि स्वरव्यंजना । सांडोनि दृश्यादि भास नाना । श्रीगुरु माझा रामराणा । दिधली धारना मज तेणें ॥७॥
इया सुलभ योगपंथे । इया सुलभ योगपंथें । पुत्रा येई मज सांगातें । हृदिस्थ श्रीगुरु रघुनाथातें । गावोनि गीतीं आळवूं ॥८॥
जेथें द्वंद्वाची नाहीं वार्ता । हारपले ध्येय ध्यान ध्याता । बोध्य बोधाची बोधकता । या येकान्ता ये वत्सा ॥९॥
या मदनुभव स्वानंदसुखा । बा रे तुजविण कोण निका । म्हणतां, धांवोनि देशिका - चरणीं मस्तक ठेविला ॥१०॥
मग आरंभिले स्तवना । हृदयीं उद्भविल्या अष्ट भावना । चौ वाचेस पडलिया मौना । इंद्रियें विगलित जाहलीं ॥११॥
मग पाठी थापटूनी । मातें सावधान करुनी । म्हणती वत्सा तीर्थप्रसाद सेवोनि । ऐसी अवस्था नसावी ॥१२॥
पुनरपि चरणीं मस्तक न्यासिला । शिरीं धरिले श्रीचरणांला । मग आरंभिलें स्तवनाला । बोबडीया बोलानें ॥१३॥
इया ग्रंथाचा मी कर्ता । म्हणतां होईन आत्महंता । श्रीगुरु हृदिस्थ वदविता । तेथें मी कोण दुसरा ॥१४॥
अनुशासनें देहत्व गेलें । पुनरपि नाहीं देखिलें । लवण जळामाजीं विरालें । काढितां वेगळें न येचि ॥१५॥
येथें स्तव्य स्तवक स्तवन । हें कोठूनि आणूं भिन्न भिन्न । तथापि वर्णावया गुरुचरण । अवश्य देहत्व स्वीकारिलें ॥१६॥
एकचि शरीर सर्वव्यापक । परंतु चालावया पदादिक । इतर कर्मा हस्तक । मानवे जैसे ॥१७॥
तैसें करावया गुरुवर्णन । मियां व्हावें बंदीजन । ऐसें करोनियां सुदृढ मन । मग स्तवना आरंभिलें ॥१८॥
ॐ नमो जी गुरुनाथा । तूंचि आदिमायेचा भर्ता । (४)चिदाकाशीं उठलिया विवर्ता । कर्ता हर्ता पाळिता तूं ॥१९॥
तुझी वर्णावया स्तुति । मज अतिमूढा कैची मति । परम निपुण जेथें थकती । तेथें किती पामर मी ॥२०॥
स्वलीलेनें जगदाभास । दावूनि करविसी निरास । तुझी धरिलियाविणें कास । मायार्णवास न तरवे ॥२१॥
तूंचि गणपति आदिकरुनी । सर्व देवांचीं रुपें धरुनी । ज्या ज्या जैसी आवडी मनीं । तें तें दयाळा पुरविशी ॥२२॥
तूंचि झालासी तुळजाभवानी । माझे कुळींची कुलस्वामिनी । मोह महिषासुर मर्दुनी । विजयी निज भुवनीं नांदसी ॥२३॥
माझें आराध्य दैवत । श्रीराम सद्गुरु निश्चित । कलीमाजीं मूर्तिमंत । दर्शन मातें दीधलें ॥२४॥
बाळकृष्ण नामें माझा पिता । राधा नामें माझी माता । उभयतांचे चरणीं माथा । ग्रंथारंभीं ठेविला ॥२५॥
उभयतांही योगभ्रष्ट । पूर्ण ज्ञानीं अति वरिष्ठ । संसारीं राहूनियां स्पष्ट । अलिप्त जैसें पद्मपत्र ॥२६॥
ऐहिक परत्र साधुनी । निजानंदें डुल्लती मनीं । उभय समाधी करवीरपट्टणीं । दक्षिण काशींत असती ॥२७॥
तो सद्गुरु माझा पिता । गायत्री उपदेशकर्ता । तैसेंच सांख्यशास्त्र तत्त्वतां । अल्पवयीं मज निरोपिलें ॥२८॥
म्हणते वत्सा वय लहान । परंतु प्रेमभरें नावरे मन । चित्तीं धरुनि सांख्यज्ञान । श्रीरामचरण आराधी ॥२९॥
ऐसी पावोनियां दया । मीं करें मस्तकीं धरिले पायां । म्हणे (५)धन्य धन्य सद्गुरुराया । कृतार्थ केलें त्वां मातें ॥३०॥
तत्त्वसंख्या निरुपिली । ती म्यां दृढ चित्तीं धरिली । परंतु समाधानाची किल्ली । पुसेन म्हणतां बुद्धि नसे ॥३१॥
ऐसी विनंती ऐकोनी । म्हणती वत्सा चिंता न करी मनीं । तुझिये वयाचे प्रबुद्धपणीं । पुन्हां समाधान करीन ॥३२॥
ऐसी आज्ञा जाहलियावरी । पुढें स्वल्प कालान्तरीं । समाधिस्थ करवीरीं । कालवश जाहले ॥३३॥
रामापूर्वी सीता सती । श्रीकृष्णापूर्वी रुक्मिणी निश्चितीं । तैसी मम मातामूर्ति । पित्यापूर्वीच निवर्तली ॥३४॥
उभयतांचें गुणगणनीं । कैची मति मजलागुनी । वर्णावें तंव तें विद्यमानीं । ग्रंथीं ग्रंन्थातर होऊं पाहे ॥३५
उभयतां स्वस्वरुपीं लीन । तयांचा श्रेष्ठ रघुनाथ नंदन । मम ज्येष्ठ भ्राता पूर्ण । कीर्ति जयाची असंभाव्य ॥३६॥
जयासी बाळपणापासोन । परस्त्री माउलीसमान । तत्पत्नी सीता नामें पूर्ण । उभयांही मज रक्षिलें ॥३७॥
बाळपणीचें जे जे लळे । पितृवत्‍ त्यांहीं चालविले । पुढें यौवनवयीं घडले । अपार दोष मजकरवीं ॥३८॥
परी श्रीगुरुकृपा पूर्ण । कालत्रयीं अबाधित जाण । (६)तिणें अजामेळवत्‍ अनुशासन । माझे ठायीं आरंभिलें ॥३९॥
एक संवत्सरपर्यंत । शरीर अति व्याधिग्रस्त । वाटलें नरदेहसम व्यर्थ । मूर्खत्वें दवडिलें भाग्य म्यां ॥४०॥
पुनरपि कृपादृष्टीं अवलोकिलें । शरीर सुदृढ जाहलें । परी चित्त चिंतार्णवीं बुडालें । श्रीगुरुस्मरन होवोनी ॥४१॥
म्हणे म्यां पुसावयाचें नाहीं पुशिलें । आतां कैं देखेन त्यांचीं पाउलें । ऐसें चिंतितां अपूर्व वर्तलें । तें परिसावें सज्जनीं ॥४२॥
(७)त्रिकूटस्थ श्रीरामचंद्र । करवीरीं उदेले योगीन्द्र । मुमुक्षुतारणीं अतिसान्द्र । कीर्ति जयाची विख्यात ॥४३॥
कलीमाजीं पूर्णावतार । पुन्हां धरिती श्रीरामचंद्र । करावया राजयोग जीर्णोद्धार । मुमुक्षु नर तारावया ॥४४॥
त्या अवतारीं रावणवध । या अवतारीं अज्ञानमोहछेद ॥ तेव्हां सोडविलें देव-वृंद । आंतां मुमुक्षु उद्धरिले ॥४५॥
ऐसी कीर्ति ऐकिनि श्रवणीं । दर्शनेच्छा उपजली मनीं । जाऊनियां श्रीचरणीं । मस्तक न्यासिता जाहलों ॥४६॥
पाहतांचि श्रीमुखचंद्रा । भरलें आलें प्रेमसमुद्रा । पूर्ण सुखानुभवाचा थारा । हाचि ऐसें वाटलें ॥४७॥
मग सर्व वृत्त निवेदिलें । म्हणती वत्सा मन कां भ्यालें ? तूंतें जें पूर्वी वचन दीधलें । तदर्थ आमचें आगमन ॥४८॥
सोऽहं शब्दाचा विचार । शास्त्राधारें पाहसी निर्धार । तोचि अंतर्दृष्टि करितां स्थिर । सुखसागर तूंचि पैं ॥४९॥
मग सुमुहुर्त पाहूनी । महावाक्यातें उपदेशोनी । वरद हस्त मस्तकीं ठेवुनी । कृतार्थ मज पैं केलें ॥५०॥
राजयोगाचा अभ्यास । सांगूनि दाविला चिद्‍विलास । क्षणामाजीं जगदाभास । मिथ्याच ऐसें वाटलें ॥५१॥
बा रे दासबोध ज्ञानेश्वरी । ग्रंथ अवलोकी निरंतरी । सदाचरणीं कालक्षेप करी । हीच आज्ञा आमुची ॥५२॥
तुज सांतितला अभ्यास । त्याचे ठायीं ठेवूनि विश्वास । सर्वभूतीं ईश्वरास । समसमान पाहिजे ॥५३॥
गुरुपरंपरेतें स्मरोनी । अखंड असावे समाधानी । मी एक जाहलों ज्ञानी । ऐसा अभिमान नसावा ॥५४॥
ऐसी मातें आज्ञा करोनी । जाते जाहले त्रिकूटस्थानीं । जाहलें वृत्त मियां कथनीं । कथारुपें वर्णिलें ॥५५॥
मूळ गुरु श्री आदिनाथ । त्यांचे शिष्य मच्छिंद्रनाथ । तयांचे वरद हस्तें सनाथ । गोरक्षनाथ पैं जाहले ॥५६॥
मग गोरक्षें दिव्य ज्ञान । उपदेशिलें गहिनीलागून । गहिनीनाथें परिपूर्ण । निवृत्तिनाथा दीधलें ॥५७॥
निवृत्तीचें कृपापात्र । जाहले श्रीज्ञानेश्वर । जे पूर्ण ब्रम्ह निराकार । जगदुद्धारार्थ साकारले ॥५८॥
श्रीज्ञानेश्वरें चूडामणि । निज कृपें केला पूर्ण ज्ञानी । त्यांनीं गुंडुराज महामुनि । उपदेशुनी धन्य केला ॥५९॥
गुंडुरायें रामाचंद्रास । कर्म उपासना भगवद्‍यश । (८)बीज अभावें राजयोगास । तेचि कारण पैं झालें ॥६०॥
पुढें प्राप्त काळ मांडणी । प्रगटोनि सद्गुरु चूडामणि । राजयोग कैवल्यदानी । रामाचेनि प्रगटविले ॥६१॥
ते मम गुरुचे परम गुरु । भवसागरीचे पूर्ण तारुं । त्यांनीं श्रीमहादेवाचे शिरीं करु । ठेवूनि कृतार्थ पैं केलें ॥६२॥
महादेवें अवलोकिलें  । श्रीरामचंद्र पूर्ण जाहले । जे सद्गुरु तयांचीं पाउलें । सदैव मम शिरीं असती ॥६३॥
श्रीआदिनाथापासोनि । श्रीरामचंद्रापर्यंत अकरा मुनी । जे परम सिद्ध पूर्ण ज्ञानी । जगदुद्धारार्थ अवतरले ॥६४॥
तयांचे चरणीं ठेवूनि मस्तक । गुरुपारंपर्य अलोकिक । कथीन, ज्याचे श्रवणें साधक । सिद्ध होती तात्काळ ॥६५॥
(९)जे माझे ज्येष्ठ सहोदर । सद्गुरुकृपेस जाहले पात्र । ज्यांच्या दर्शनें प्राणिमात्र । परम गतीसी पावले ॥६६॥
त्या ‘शंकरास’ नमुनी । ‘गोदावरी’ महाज्ञानी । ‘गोपलाख्य’ ही चिंतुनी । ग्रंथारंभा करीतसे ॥६७॥
ग्रंथा नाम सिद्धचरित्र । श्रवणें श्रीगुरुकृपे होय पात्र । एक आवर्तनें पवित्र । देह होय प्राणियाचा ॥६८॥
तीन आवर्तनें होतां । सायुज्यमुक्ति पावे तत्त्वतां । इतर कामना इच्छितां । सहज पुरती भावार्थे ॥६९॥
ऐसा वर इया ग्रंथातें । दीधला श्रीसदुग्रुनाथें । श्रवण करितां भावार्थे । परप्राप्तीतें पावेल ॥७०॥
या अध्यायीं मंगलाचरण । म्हणोनि मंगलाध्याय पूर्ण । श्रीपति नमूनि श्रीगुरुचरण । अध्याय पूर्ण करीतसे ॥७१॥
पुढें कथा अलोलिक । श्रीसद्गुरु वदवील देख । श्रोते ऐकावें नावेक । स्वस्थचित्तेंकरुनी ॥७२॥
स्वस्ति श्रीसिद्धचरित्र भाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्गुरु रामराव । त्यानें उपाव रचिलां हा ॥७३॥
श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंस: ॥।
॥ अध्याय पहिला संपूर्ण ॥
==
स्वस्ति श्रीसिद्धचरितामृते । क्षराक्षर अवाग्जवेदगर्भातें ।
करुनि मंगलाचरणातें । प्रथमाध्याय संपविला ॥७३॥
अशा तळटीपेंतील, तारकाचिन्हांकित ओव्यांचा खुलासा अ ३ / ओवी ६४ च्या तळाशीं व प्रस्तावनेंत पाहावा.

टीपा - (१) आरंभीचा श्लोक : श्रीमाधवात्मज रघूत्तम तारकाचे - श्रीमाधवाचा आत्मज म्हणजे मुलगा. रघूत्तम अर्थात्‍ श्रीरामचंद्र महाराज तिकोटेकर. गुरु-शिष्यसंबंध पितापुत्रासारखेच असतात म्हणून येथें आत्मज म्हटलें आहे. श्रीगुरु महादेवनाथांचा उल्लेख वृत्तसुखार्थ कवीनें ‘श्रीमाधव’ असा केला आहे.

(२) करकंजोद्भव कुमरु - ओवी ४ : - (कर+कंज)+उद्भव) हस्त कमळापासून उत्पन्न झालेला मुलगा. श्रीगुरु शिष्याच्या मस्तकीं हात ठेवतात व गुरुशिष्याचें नातें निर्माण होते म्हणून येथें करकंजोद्भव कुमरु याचा अर्थ शिष्य किंवा अनुग्रहीत असा करावा.

(३) तंव तो वाड्मय उच्चार नाहीं - ओंवी ५ : - या ओवीतील एकाक्षराचा म्हणजेच ॐ काराचा उच्चार वैखरी वाणीनें करावयाचा नाहीं. ती उच्चारपद्धति फक्त सांप्रदायिकांनाच कळूं शकते.

(४) चिदाकाशीं उठलिया विवर्ता - ओवी १९ - : घनदाट, एकच एक अशा परब्रम्ह स्वरुपांत ‘एकोऽहं बहु स्याम्‍ - ‘मी बहुविध व्हावे’ हें झालेलें स्फुरण असा अर्थ.

(५) धन्य धन्य सद्गुरुराया - ओवी ३० :- येथें ग्रंथकर्ते श्रीपति हे सद्गुरुराया या शब्दानें आपले मोक्षगुरु श्री तिकोटेकर महाराजांचा निर्देश करीत नसून, गायत्री उपदेश देणार्‍या जनक पित्यासंबंधीं कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.

(६) अजामेळवत्‍ अनुशासन - ओवी ३९ : - श्रीपति म्हणतात : महापातकी अजामेळाचा श्रीनारायणानें जसा उद्धार केला तसा वडिलांच्या व ज्येष्ठ बंधूंच्या सदुपदेशानें मीहि कालांतरीं सन्मार्गीच लागलो.

(७) त्रिकूटस्थ श्रीरामचंद्र - ओवी ४३ : - तिकोटे येथील श्रीरामचंद्र महाराज.

(८) बीज अभावे राजयोगास - ओवी ६० :- श्रीगुंडामहाराजांनीं श्रीरामचंद्र नागपूरकर यांना पंढरपुरांत, बीज अभावानें म्हणजे ज्ञानबीजखेरीज करुन, फक्त कर्म उपासना भक्तीचा उपदेश केला व त्या कर्म उपासनेच्या निरलस अनुष्ठानानेंच श्रीनागपूरकर महाराजांस राजयोगदीक्षा मिळण्याची म्हणजे आत्मज्ञानाचा उपदेश ग्रहण करण्याची योग्यता प्राप्त झाली (पाहा अ २ टीप ५)

(९) ज्येष्ठ सहोदर - ओवी ६६ :- हा सांप्रदायिक गुरुबंधु-भगिनींचा उल्लेख आहे. श्रीशंकरशास्त्री, गोपाळपंत बोडस व कोल्हापूरच्या गोदावरी माउली कीर्तने - हे तिघेहि श्रीतिकोटेकर महाराजांचे फार योग्यतेचे शिष्य होते. तिघांच्याही हकीकती सदर पोथींत उत्तरार्धांत वर्णिल्या आहेत. या ओवीवरुन श्रीपतींचा त्यांचे ठायींचा आदर दिसून येतो.
कठिण शब्दांचे अर्थ : - सुकृताचळीं = पुण्याईच्या पर्वतावर (३) द्वंद्वाची वार्ता = द्वैतबुद्धीची गोष्ट  (९) देशिक = दिशा दाखविणारा म्हणजे सद्गुरु
(१०) अनुशासन = उपदेश (१५) बंदीजन = भाट, स्तुतिपाठक (१८) अतिसांद्र = अत्यंत दयाळू, दयार्द्र (४३) अलोलिक = अलौकिक, अद्भुत (६५) एक आवर्तन = एक पारायण (६८) भव-गज-विदारक = संसाररुपी हत्तीचा विनाश करणारा (७३) कंठीरव = (गर्जनेने प्रसिद्ध असा) सिंह (७३)


N/A

References : N/A
Last Updated : February 19, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP