मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय चौदावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय चौदावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशाय नम: ॥
योगीजन - मानस विश्रामा । निजानंदा पूर्णकामा । सर्वेश्वरा निजसुखधामा । श्रीगुरु रामा नमन तूंतें ॥१॥
शरण आलों तुझिया पायां । निरसावया मोह माया । तंव मायाचि गेली विलया । महिमा वर्णावया मति कैंची ? ॥२॥
सद्‍गुरुचें स्तवण करितां । हरे सर्व संकटव्यथा । मुक्ती पावे सायुज्जता । ऐशीं शास्त्रीं वचनें बहु ॥३॥
म्हणोनियां स्तवण करावें । ऐसें दृढ धरिलें जीवें । तंव जीवपण नेलें शिवें । कवणे भावेम वर्णूं मी ? ॥४॥
ॐकाराचें मूळ पीठ । परा वाचेच घडघडाट । तोही ग्रास करुनि निमूट । त्रिकूटस्थ तूं निराळा ॥५॥
आतां असाल तैसा असा । आपंगिलें; मज हाचि भरंवसा । पुढील ग्रंथार्थ सौरसा । नेणें तैसा न्यावा जी ॥६॥
माझें मीपणचि नाहीं । तेथें कर्तृत्व अभिमान काई ? । आवडी मिठी घालीन पायीं । हेंही म्हणणे न शोभे ॥७॥
ऐसें म्हणोनियां स्तब्ध राहिलों । वाचा मौनें भांबावलों । धांवोनियां चरणी लागलों । न बोलतां कांही एक ॥८॥
अर्धनारी नटेश्वर । (१)तेंचि रुप दिसें मनोहर । म्हणती स्तवन पुरें कर । ग्रंथ सादर चालवी ॥९॥
तीच आज्ञा शिरी वंदोनी । श्रोतया करीतसे विनवणी । चित्त असो द्या सावधानी । ग्रंथ श्रवणीं निश्वळ ॥१०॥
नाथ लाहोर ग्रामीं आले । तेथें एक नवल वर्तलें । ग्रामीं सावकार भले भले । असती धनिक बहुतचि ॥११॥
त्यांतील एक सावकार । नामें नंदराम वणिक् पुत्र । त्याचे वृध्द मातापितर । त्यांसी एकचि पुत्र हा ॥१२॥
धन संपत्ति असे बहुत । त्यासी अधिकारी एकचि सुत । पुत्रसंतांति व्हावी बहुत । म्हणोनि केल्या दोन जाया ॥१३॥
प्राक्तनाची गति गहन । वय पंचवीस संपूर्ण । स्त्रिया ऋतुमति सुलक्षण । तों काळें झडपण केलें तया ॥१४॥
एकाएकीं सर्पदंश जाहला । नंदराम पंचत्व पावला । एकचि हाहा:कार जाहला । तो वर्णिला नवजाये ॥१५॥
स्त्रिया वक्ष:स्थळ पिटिती । कुरळ केश हस्तें तोडिती । करें घेवोनिया माती । मुखीं घालिती आपुल्या ॥१६॥
म्हणती विसांविया प्राणनाथा । आम्हाम सोडोनि कोठें जातां ? । अग्नीसमक्ष देवोनि  शपथा । काय करिता अनुचित हें ? ॥१७॥
धर्म अर्थ कामना । तुमच्या पूर्ण करीन नाना । यांतील एका तरी वचना । सत्य केलें अंतीं काय जी ॥१८॥
आम्हांवांचून एक क्षण । तुम्हां होतसे युगासमान । आतां कां जी धरिलें मौन । कीर्तिस्तवन तें ऐका ॥१९॥
आमुचा कांहीं अन्याय झाला । असल्या; क्षमा पाहिजे केला । पायां पडतों जी वेळोवेळां । पदर दयाळा पसरितों ॥२०॥
विवाह जाहलियापासोन । वियोग न देती एक क्ष्न । आतां कठिण कां केले मन । मौन विसर्जन करावें ॥२१॥
ऐसें बोलोनि करुणावचन । धांवोनि उचलिती पाषाण । घेती कपाळावरी बडवोन । रुधित वाहे भडभडां ॥२२॥
तंव माता-पितर वृध्द फार । तयांसी कळला समाचार । धांवत येतां येतां सत्वर । मार्गी मूर्च्छागत पडियेले ॥२३॥
पुनरपि सावधान होउनी । प्रेतापाशी आले धांवोनि । पुत्राची विपरीत देखोनि करणी । मागुतीं मूर्च्छागत पडियेले ॥२४॥
एक मुहुर्तपर्यंत । उभयतां पडली प्रेतवर । श्वासोच्छ्‍वास न चले किंचित‍ । सुना बहुत घाबरल्या ॥२५॥
पति पावले मृत्यु-सदन । श्वशुरेंही जाहलीं प्राणहीन । आम्हीं अभागी झालों दीन । कवणा शरण जावें आतां ॥२६॥
म्हणोनि धांवोनि येती जवळीं । जळ घालिती मुखकमळीं । सावध होवोनि तये वेळीं । आकांत करिती बहुतचि ॥२७॥
माता म्हणे रे बाळका । मान्य करी वचना एका । एक वेळ बोलोनि निका । मग जाई परंधामा ॥२८॥
तूं भज देशी आनंद परम । म्हणोनि नांव ठेविलें ’ नंदराम ’ । तो तूं मज देवोनि दुःखधाम । कैसा विश्राम पावलासी ?॥२९॥
पुत्र व्हावा सुगुणधाम । म्हणोनि केले व्रतादि नियम । सफल झाला माझा काम । मध्यें हे श्रम कां आले ! ॥३०॥
ज्या ज्या देवा जें जें प्रार्थिलें । तें तिळमात्र बा रे नाहीं चुकले । ऐसे असोनि; कां बा कोपले । दैवत-गण मजवरी ? ॥३१॥
धांव धांव गे अंबाबाई । खंडेराया म्हाळसाबाई । तुमची ओटी भरीन लवलाही । माझी ओटी तुम्ही भरा ॥३२॥
पंढरीराया करीन वारी । अनवाणी पादुका घेऊन शिरीं । माझें संकट तूं निवारी । उठवा सत्वरी मम पुत्रा ॥३३॥
मस्तकीं करोनि अंगुलि भंगा । म्हण्ती कृतान्ता आमुतें कां गा । वांचवोनि; नेसी कुमरा संगा । निर्विष भागा आणोनी ? ॥३४॥
प्रेताचे मुखवरी मुख ठेवुनी । आक्रंदोनि रडे जननी । आम्हां वृध्दासी सोडोनी । कैसा विजनीं जातोसी ? ॥३५॥
तुझा जन्म झाला जैं पासुनी । तैंहुनि आनंदा नसे उणी । आतां अभागी झालों जनीं । काळें वदनीं कें वागूं ? ॥३६॥
वत्स प्रार्थितो, अर्धघडी । वचन बोलोनि; नेत्र उघडी । आम्ही मरण पावतो तांतडीं । मागें कांहीं घडो बाळा ॥३७॥
आजपर्यंत आमुचे वचना । उल्लंघिलें नाहीं पुत्ररत्ना । शेवटील ही विज्ञापना । कुळभूषणा नको मोडूं ॥३८॥
वत्सा फुटला की रे पान्हा । कोणासी पाजूं कमल नयना । माझ्या विसांविया गुणनिधाना । उठी स्तनपाना करी वेगीं ॥३९॥
ऐसे बोलोनि शब्द नाना । वक्ष:स्थळ पिटी; करी रुदना । पिता म्हणे पुत्रा सज्जना । विपरीत करणी केली त्वां ॥४०॥
पुत्रहस्तें तिलोदक । मिळतां; पावतो स्वर्गलोक । निपुत्रा गति नाहीं देख । म्हणोनि दु:ख वाटतसे ॥४१॥
एकचि पुत्र तूं संसारी । तेणें दुःखे विसरलों सारीं । धन्य मानीत होतों चराचरी । कवणेपरी राहावे ॥४२॥
काय सांगूं तुझ्या स्त्रियांसी । ज्या एक तुजविणें परदेशी । विटल्या सर्व वैभवासी । सती जावया सिध्द झाल्या ॥४३॥
वत्सा तुज जरी असती संतति । तरी आम्ही न करितों खंती । न कळे करणी, पडली भ्रांति । आतां विश्राम्ति नाही आम्हां ॥४४॥
ऐसा बहुतचि केला शोक । तो वर्णिता वाढेल दुःख । आप्त स्वजन इष्टमित्रादिक । बहुत जमले तये स्थानीं ॥४५॥
त्यांनीं करोनि सांत्वन । पुढील आरंभिलें विधान । स्त्रिया म्हणति जाऊं सहगमन । पतिप्रेतासवें आम्ही ॥४६॥
माता पिता म्हणती जनांसी । आधीं दहन करावे आम्हांसी । मग जाळावें या पुत्रासी । नातरी प्रेतासी न देऊं ॥४७॥
ऐसा दुराग्रह घेऊनि बैसले । तेथें जनांचें कांहीं न चले । तो सर्वांचें दैव उदेलें । नाथ पातले भिक्षार्थ ॥४८॥
पाहोनि एकचि हाहाःकार । द्रवले दयेचे सागर । म्हणती काय आहे गजर । कां जन समग्र मिलाले ? ॥४९॥
सांगितला सर्व वृत्तान्त । नाथ म्हणती दाखवावे प्रेत । घेवोनिया गेले त्वरित । जये स्थळीं नंदराम ॥५०॥
नाथें पाहोनियां प्रेतातें । कांही विदान मांडिलें तेथें । म्हणती वृध्द मातापितरातें । काय विपरीत मांडिलें ? ॥५१॥
स्त्रियांनीं जावे सहगमन । ऐसें धर्मशास्त्रीं असे विधान । तुम्हीं करोनि भगवद‍भजन । आयुष्यावघि राहावे ॥५२॥
ही मृत्युलोकींची वस्ती । न कळे मरावे दिवा की रातीं । वडिलांआधीं पुत्र जाती । स्त्रियाआधीं पति एक ॥५३॥
काळाची तों विपरीत करणी । न टळे ईश्वरावांचोनी । वृथा चिंता वाहणे मनीं । ही अज्ञ-जन प्रवृत्ति ॥५४॥
ऐसे नाथ सांगती गोष्टी । तों पित्यानें घातली चरणीं मिठी । माता धांवोनि लागे कंठी । म्हणती धूर्जटी तूं आमुचा ॥५५॥
आम्ही अनाथ भणंग देख । पुत्र-प्राणाची मागतो भीक । तूं राजाधिराज; नव्हेसी रंक । आम्हां विन्मुख नको करुं ॥५६॥
तुम्हासी देखतां सामोरी । आनंद वाटाला आमुचे अंतरी । कृपा करोनि दीनावरी । दु:खाबाहेरी काढावे ॥५७॥
तूं चिंतामणीचा चिंतामणि । कल्पवृक्षाचा होसी धणी ! देवाधिदेव -चूडामणि । कुळस्वामिनी तूं आमुची ॥५८॥
पुत्रासी उठवा सत्वर गति । अथवा आम्हांसी ज्या हो सांगाती । म्हणोनि चरणीं गडबडा लोळती । नाथ चित्ती सादर ॥५९॥
प्रेताचे मस्तकीं अमृत हस्त । (२)ठेवोनि धनंजय वाय केला प्रदीप्त । मस्तकवघ्राणे सत्य । कुंडलिनी ते आकर्षी ॥६०॥
तेणें सर्प -विष जाहलें दहन । देही संचारले पंचप्राण । प्रेत उठिले खडबडोन । म्हणे का निद्रा भग्न केली ? ॥६१॥
सिध्द कोण हे सांग मज । जनाचा कां जमला समाज ?। म्लानमुख कां बैसलेति आज । हें सर्व मज सांगावे ॥६२॥
माता म्हणे रे पाडसा । तुज होवोनि सर्पदंशा । मरण पावला होतासी राजहंसा । त्रिदिन आजि लोटले ॥६३॥
दैवें पातले योगिराज । म्हणोनि बा रे सुदिन आज । माता पिता महाराज । सर्वही तुज हे चरण ॥६४॥
ऐकोनियां ऐसें वचन । मस्तकीं धरी नाथ - चरण । नाथ आशीर्वाद देती गहन । म्हणती अनंत कल्याण तुज असो ॥६५॥
मग आणवोनि गंगाजळ । नाथचरण धुतले निर्मळ । त्या तीर्थी करिती आंघोळ । सस्त्रीक माता पितयानें ॥६६॥
देऊन पाद्यार्घ्य आचमन । मग आरंभिलें शुध्द स्नान । मंगल वाद्यें वाजती पूर्ण । नादें गगन कोंदाटलें ॥६७॥
धूप दीप नैवेद्य तांबूलीं । वस्त्राभरणीं दक्षिणा फळीं । शेवटी वाहूनि पुष्पांजुली । मग स्तवन प्रांजळीं आरंभिलें ॥६८॥
जय जयाजी पूर्णकामा । जय जयाजी आत्मयारामा । जय शोभती मस्तकालागुनी । मृगाछाला पांघरुनी । जनी वनीं वससी तूं ॥७०॥
अनंत कल्याण तुझे चरण । वदन आनंदानंद - सदन । जगाचें करावया कल्याण । पृथ्वीपर्यटण तूंतें हे ॥७१॥
आजानुबाहु रम्य सरळ । कटीं मेखळा अति सोज्वळ । शुभ्र कौपीन अति निर्मळ । शुध्द सत्त्वशील तव मूर्ति ॥७२॥
पांच जनांचें पंचप्राण । तुजवरी टाकूं वोवालून । तरी उपकारा नोहे उत्तीर्ण । भवमोचना तारका ॥७३॥
ऐसें बहुत करिती स्तवन । मग करिती साष्टांग नमन । उभे राहिले कर जोडून । मौन धरुन त्या काळीं ॥७४॥
नाथें देखोनि शुध्द भाव । पूजा स्वीकारिली सर्व । म्हणति बाप हो हा नवलाव । आघवी माव सद्‍गुरुची ॥७५॥
निरोप मागती जावयासी । तदा ते लागती पायांसी । म्हणती कृपा करुनि दीनासी । चतुर्मासीं राहिजें ॥७६॥
मान्य करोनिया वचना । नाथ तेथें राहिले जाणा । श्रुत होतांचि सर्व जनां । धांवती दर्शना लवलाहीं ॥७७॥
जगविख्यात जाहली कीर्ति । कामिक जन धांवोनि येती । तयांचे मनोरथ पूर्ण होती । वंध्या पावती पुत्ररत्नें ॥७८॥
कित्येकां लाविले सन्मार्गी । ध्यान धारणा नामसंगी । जें शुध्द सत्त्वाथिले अव्यंगी । तयातें योगी योग दे ॥७९॥
सोऽहं शब्दाची धारना । शुध्द मार्ग मिळतां जना । तो ठेंगणें मानी त्रिभुवना । मा इतर ज्ञाना कोण पुसे ! ॥८०॥
तळीं उपरीं द्र्व्य भरिलें । किल्ली न ठाऊकी; व्यर्थ गेले । बाहेर द्रव्य धुंडितां मेले । तैसें जाहले अभागिया ॥८१॥
ज्ञानें नाडिले सर्वजन । देहीं धरोनि ज्ञानाभिमान । म्हणती कैसे जावे शरण । शास्त्रज्ञ पूर्ण प्रतिष्ठित जे ॥८२॥
(३)इतरांची काय सांगू कथा । माझी पूर्वी हीच अवस्था । श्रीगुरुनीं लाविले पंथा । नातरी कथा जन्माची ॥८३॥
सोऽहं धारणा मार्ग सरळ । नेणोनि; जन झाले बरळ । श्रीगुरु माझे दीनदयाळ । कित्येक दुर्बल तारिले जन ॥८४॥
असो; नाथ कांही दिवस । राहोनियां त्या स्थळास । पावन करुनि बहुत जनांस । येतें जाहले जयपुरा ॥८५॥
हा अध्याय करील पठण । अथवा ग्रंथसंरक्षण । सर्प सोडोनि ते स्थान । अन्यत्र गमन करितील ॥८६॥
नित्य नेमे अध्याय पठतां । हारेले सर्व संकटव्यथा । अपमृत्यूची तरी वार्ता । स्वप्नीही सर्वथा नयेचि ॥८७॥
असो हा स्तुतिपाठ बहुत । भावार्थे पाहावी प्रचीत । वरदाता तो सद्‍गुरुनाथ । सिध्द मनोरथ पाववी ॥८८॥
काष्ठ पुतळी सभांगणीं । दावी नाना कळा करोनि । नाचविता वेगळा धनी । सर्व करणी त्या हातीं ॥८९॥
तैसें ग्रंथी श्रीपति नाम । ग्रंथ चालवी पुरुषोत्तम । त्रिकूटवासी श्रीगुरु राम । त्याचें नाम जपूं आम्ही ॥९०॥
नाम जपणें हाचि काम । तेणेचि आम्ही हो निष्काम । काम निष्काम हाही भ्रम । आनंदधाम चित्स्वरुप ॥९१॥
त्रिकूटवासी सद्‍गुरु रामा । दयासागरा मेघश्यामा । सप्रेमें गाऊनि तुझिया नामा । (४)संसृति पां मा दवडिली ॥९२॥
कनकगोफा मानूनि सर्प । अज्ञानरात्रीं धरिला दर्प । ज्ञान-सूर्य सत्य स्वरुप । दावोनि निर्भय मज केलें ॥९३॥
मी काय वानूं तूझें गुणा । मौनेंचि मिठी घातली चरणा । पूर्ण केलें चतुर्दश प्रकरणा । साष्टांग नमना करोनियां ॥९४॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्र भाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥९५॥
श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंस: ॥

॥ अध्याय चौदावा संपूर्ण ॥

टीपा - (१) अर्धनारी नटेशर ... रुप दिसे मनोहर -ओवी ९ :-
ह्या अध्यायाचें हे मंगलाचरण लिहीत असतांना श्रीपतींना श्रीसदागुरुंनी अर्धनारी नटेश्वराच्या अद्‍भूत रुपांत दर्शन दिलें असावें.
या ओवीतील उल्लेख स्वयंपूर्ण आहे व कोणताही पूर्वापार संदर्भ येथे नाहीं. " तुका म्हणे जे जे बोला । ते तें साजे या
विठ्ठला । " या साधूक्तीप्रमाणे गुरुभक्त देखील आपल्या गुरुंचें कोणत्याही रुपांत ध्यान करुन स्तवन करु शकतों.
कदाचित‍ याही दृष्टीने हया ओवीचा अर्थ लागतो.
(२) धनंजय वायु केला प्रदीप्त -ओवी ६० :- देहांमध्यें पांच मुख्य प्राण व पांच उपप्राण ( नाग, कूर्म, कृकल, देवदत्त व धनंजय )
आहेत. त्यांची देहांतील स्थानें ठरलेलीं आहेत. हा धनजय वायु- हा उपप्राण स्वाधिष्ठान चक्रापाशी असतों देहांतला मुख्य
प्राण निघून गेला तरी कांहीं वेळ हा वायु देहामध्यें राहतों. त्याचे योगानेंच मृत्यूनंतरही मनुष्य कांही वेळ टवटवीत
असतो; नंतर शरीरावर व मुद्रेवर पूर्ण प्रेतकळा पसरते.
(३) माझी पूर्वी हीच अवस्था- ओवी ८३, ८४ :- नंदराम - संजीवन प्रकरणाचा उपसंहार करतांना मध्येंच या दोन ओव्यांत
श्रीपतीनीं आत्मकथन केलें आहे. माझी म्हणजे श्रीपति पोथीकर्त्यांची होय.
(४) संसृति पां मा दवडिली -ओवी ९२ :- या चरणाचा दोन तर्‍हांनीं अर्थ होते तो असा : मा म्हणजे मग किंवा नंतर
आणि पां हें पादपूरक घेतले म्हणजे ’( तुझें नाम सप्रेम गायिले आणि ) नंतर संसार पिटाळून लावला. दुसरा अर्थ घेतांना
संसृति+ पा आणि मा असे संस्कृत शब्द घ्यावेत. मा म्ह. माया, सृति पा म्ह. संसंसृति टिकविणारी. अर्थात जन्म-मरणरुपी
संसार अखंड चालू ठेवणारी माया नाहीशी केली. दोन्ही प्रकारांनी अर्थ एकच होतो हें चाणाक्ष वाचक ओळखतीलच.
कठिण शब्दांचे अर्थ :- आपंगिले = अंगीकार केला (६) अंगुलीभंग = बोटें मोडणें (३४) ( स्त्रिया दृष्ट काढतांना कानशिलावर
बोटें मोडतात ) सस्त्रीक = स्त्रियांसहित (६६) मृगछाला = मृगाजिन (७०).

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP