मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय नववा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय नववा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला

श्रीगणेशायनम: ।
ॐ नमो सद्गुरु पंचानना । तुझा आश्रयो घडलिया जनां । दुर्घटही माया कानना- । माजीं फिरतां, भय कैचें ? ॥१॥
कामादिक जे षड्‍वैरी जाण । ते या काननीं मत्त वारण । तव आश्रित जनांस पाहून । शक्ति-क्षीण ते होती ॥२॥
तेथें तार्किकादि मतभेद । ऐसे क्षुल्लक जे पशुवृन्द । त्यांचा करावया उच्छेद । आश्रिता खेद कायसा ? ॥३॥
या दुष्ट प्राणियांचा संहार होतां । तेंचि सुस्थळ पावे अतिरम्यता । दुर्घटता जाऊनि सुघटता । सहज येत अनायासें ॥४॥
कारागार परम कठिण । तेचि राजाश्रिताचे स्वाधीन । तेथील जे दु:खदायक जन । तेचि याचे आज्ञांकित ॥५॥
तैसी माया दुर्घट इतरां । परी तुझिया चरणाचा धरितां थारा । तैं सुटका जी दातारा । दीनोद्धारा कृपानिधि ॥६॥
तुझिये प्रतापा वर्णने । काय म्यां वर्णावे वाकहीनें ? परी मुक्यामुखें सिद्धान्त बोलवणें । इच्छा समर्था ही तुझी ॥७॥
असो, पूर्व प्रकरणाशेवटीं । गोरखें श्रीचरणां घातली मिठी । सद्‍गदित होउनी कंठीं । आज्ञा घेऊनि निघाले ॥८॥
गुरुचरणाचा वियोग क्षण । गोरखें मानिला युगासमान । परी आत्मलाभानुसंधान । जीवनहेतु ते होय ॥९॥
असो, फिरत फिरत क्षिति । पावले श्रीकरवीराप्रति । जे महा क्षेत्र विख्याति । दक्षिण काशी जन वदे ॥१०॥
जेथें नांदे आदिमाया । श्रीदत्तात्रेय योगिराया । ऐसें पुण्यस्थळ जाणोनियां । गोरखनाथ पातले ॥११॥
करवीर क्षेत्र परम पावन । महिमा ज्याचा अतिगहन । ग्रंथविस्तार - भयेंकरुन । विशेष वर्णन न करी मी ॥१२॥
क्षेत्र पश्चिम दिकसंधीं । ब्रम्हेश्वर नामें प्रसिद्धि । देवालय अनादिसिद्धि । तेथें राहिले प्रीतीनें ॥१३॥
करुनियां गंगास्नान । घेतलें जगदंबेचें दर्शन । पुन्हां स्वस्थळीं जाऊन । निजासनीं बैसले ॥१४॥
दिवस आला दोन प्रहर । सोटयास झोळी अडकविली सुंदर । त्यासी आज्ञा केली साचार । ग्रामीं भिक्षार्थ हिंडावया ॥१५॥
सजीवा निर्जीव निर्जीवा सजीव - । करणें; ही ज्याची सहज राणीव । त्यासी सोटा फिरविणे अपूर्व । कायसें असे ? जाण पां ॥१६॥
आपण बैसले समाधिस्थ । झोळी हिंडे गांवांत । ब्रह्मवृन्दांचे घरीं तिष्ठत । अन्य गृहीं न राहे ॥१७॥
लोक करिती आश्चर्य । म्हणती हें दिसते अघटित कार्य । अन्नपूर्ति होतांचि आर्य । झोळी निघे स्वस्थळा ॥१८॥
तों श्रीदत्तात्रेयांची स्वारी । भिक्षेस निघाली ग्रामान्तरीं । तंव सोटा झोळी ते अवसरी । दृष्टि गोचर जाहली ॥१९॥
दत्तात्रेयें आनंद मानुनी । झोळी नेली स्वसदनीं । अविश्रम यथेच्छ भक्षूनी । रिती झोळी पाठविली ॥२०॥
झोळी रिकामी पाहुनी । नाथ विस्मित झाले मनीं । म्हणती माझे झोळींतील अन्न घेउनी । भक्षण करणार दिसेना ॥२१॥
ऐसा कोण आहे योगिराज । त्यांचें दर्शन घडेल सहज । झोळी सोटयास म्हणती : `काज - । साधा त्यास दाखवुनी' ॥२२॥
पुढें सोटा झोळी मागे नाथ । आले देवीचे देवळांत । तों सव्यभागीं उत्तरें श्रीदत्त । महायोगी बैसले ॥२३॥
सोटा झोळी जाऊनि तेथ । करुनि दत्तात्रेया प्रणिपात । मर्यादेरुप तिष्ठत । तदा श्रीनाथें ओळखिलें ॥२४॥
गोरखें करुनियां नमन । जाणोनि पुसती; आपण कोण ? दत्त म्हणती दुजेपण । सांगावया येत नाहीं ॥२५॥
योगसिद्धि काय खूण ? म्हणवोनि नाथें केला प्रश्न । (१)दत्त म्हणती मी तूं पण । विरे हेंचि योगसिद्धि ॥२६॥
ऐसीं संभाषणें करितां । समाधिस्थ झाले उभयतां । तो सोहळा श्रीगुरुसुता - । वांचोनि अन्य कोण जाणे ? ॥२७॥
श्रीदत्ताची आज्ञा घेऊनी । नाथ आले स्वकीय स्थानीं । त्रिरात्र वास क्षेत्रीं करुनी । उत्तरपंथें निघाले ॥२८॥
स्वेच्छाचारें मार्ग क्रमितां । कर्‍हाड क्षेत्रा पावले तत्त्वतां । कृष्णा ककुद्मती प्रीति ऐक्यता । जाहली असे जये स्थानीं ।
॥२९॥
दक्षिण प्रयाग म्हणती जयासी । नाथ पावले त्या स्थळासी । पाहूनि प्रीतिसंगमासी । आनंद मनीं वाटला ॥३०॥
पृथ्वीवरी संगम उदंड । परि या संगमाची ख्याति प्रचंड । समसाम्य धारा अखंड । उभयमिळणी मिळाल्या ॥३१॥
नाथें तेथें करुनि स्नान । राहिले ग्रामामाजीं जाऊन । श्रीमारुति देवालयीं जाण । वसतिस्थान योजिलें ॥३२॥
दिवस राहिला एक प्रहर । नाथ सहज लीले पाहे साचार । जन लीला देखती अपार । तों अद्भुत चमत्कार वर्तला ॥३३॥
बाजारांत एके दुकानीं । भगवंता यादव नामें करुनी । गांजा तमाखू व्यापार अनुदिनीं । करीत असे निर्धारें ॥३४॥
त्याच्या अनंत पुण्याच्या राशि । एकदांच आल्या फळासी । म्हणोनि नाथें तयापाशी । ज्ञानवल्ली मागितली ॥३५॥
तैं यादव बोले उत्तर । रोख पैसे किंवा उधार ? नाथ म्हणती अतिथि साचार । द्रव्य अणुमात्र न दिसे पैं ॥३६॥
पुनरपि व्यापारी बोले । जें तुम्हापासी असेल वहिलें । तेंचि देऊनियां मोलें । गांजा विकत घेइजे ॥३७॥
नाथें केलें हास्यवदन । म्हणती आम्हापाशीं जें धन । तें पाहिजे तुजलागून । तरी गांजा अमूप देइजे ॥३८॥
ऐसें बोलतां ते अवसरी । गांजा घातला नाथाचे पदरीं । नाथें पद्मकर ठेवोनि शिरीं । स्वस्थानासी पैं गेले ॥३९॥
भगवंता झाला भगवद्रूप । हरला मायेचा संकल्प । समाधि जाहला निर्विकल्प । निजानंदीं निमग्न ॥४०॥
दुसरे गिर्‍हाईक आलें । गांजा घेऊं म्हणती मोलें । परी देणारा समाधिसुखें डोले । हें अज्ञजन नेणती ॥४१॥
दुकानदाराचे स्त्रियेलागुन । जाऊन सांगती वर्तमान । म्हणती कोण कानफाट्या येऊन । तुझ्या भ्रतारा मोहिलें ॥४२॥
ऐकोनि घाबरी जाहली कामिनी । शिर, वक्ष:स्थळ घेत पिटोनी । शोध करीत ये तये स्थानीं । जेथें नाथ उतरले ॥४३॥
तों नाथ बैसले आसनावरी । हातीं गोरख-लकडी घेतली निर्धारी । स्वसुखें आनंदें निर्भरी । डुल्लताती सप्रेमें ॥४४॥
स्त्रियेनें करोनि साष्टांग नमन । विनवीतसे कर जोडून । म्हणे देइजे चुडेदान । स्थितीसी आणोनि भ्रतारा ॥४५॥
काकुलती येत नारी । म्हणे स्वामिया तारी तारी । नाना प्रकारें विलाप करी । भ्रतार भ्रमिष्ट म्हणवोनी ॥४६॥
जैसें साधितां निधान । विवशी पडे गळां येऊन । तैसें यादवा झालें पूर्ण । स्त्रियेनें विघ्न मांडिलें ॥४७॥
म्हणे स्वामिया जें मागसी । ते ते देईन मी वस्तूसी । परी स्मृतीवरी मम पतीसी । कृपामूर्ती आणिजे ॥४८॥
ऐकोनि स्त्रियेची विनवणी । नाथ बोलती हास्य वदनीं । बाई एक शेर गांजा आणोनी । आम्हालागीं देइजे ॥४९॥
म्हणजे सद्गुरु कृपेंकरुनी । स्मृति येईल भ्रतारालागोनी । ऐसी आज्ञा श्रवण करुनी । गांजा आणूनि दीधला ॥५०॥
नाथासी परम आश्चर्य वाटे । म्हणती कलीचें माहात्म्य मोठें । लाभ झालियाही अवचटें । शाश्वत राहणें,पूर्वपुण्य ॥५१॥
ऐसें मनीं आणोनि, सत्वर । आणविला तियेचा भ्रतार । मस्तकीं ठेवोनियां कर । समाधि विसर्जन करविली ॥५२॥
यादव घाबरा चहूंकडे पाहे । तों सद्गुरुमूर्ति उभी राहे । धांवोनियां लवलाहे । चरण मस्तकीं वंदिले ॥५३॥
कोण माझें पूर्वपुण्य । कृपापात्र जाहलों म्हणवोन । जन्मान्धा दीधले नयन । ज्ञानघना कृपाळुवा ॥५४॥
तुज देऊं मातेची सरी । तरी ती केवळ जन्मदात्री । तुवां जन्ममरणा केली बोहरी । काय उरी उरलीसे ॥५५॥
जे जे देऊं दृष्टान्तास । त्या सर्वांसी आहे नाश । तूं चिद्‍घन अविनाश । दुजी उपमा तुज कैंची ? ॥५६॥
ऐसें नाना प्रकारें स्तवन करुनी । चरणीं गडबडा घाली लोळणी । म्हणे समाधिसुखावांचुनी । क्षण एक न ठेवी स्वामिया ॥५७॥
तेंचि सुख देइजे कृपाळे । म्हणवोनि पुनरपि चरणीं लोळे । नाथ म्हणती तये वेळे । स्त्रियेतें पुसी एकदां ॥५८॥
ती आम्हांवरी जाहली रुष्ट । तिचे मनोरथ करी तुष्ट । ऐसे ऐकोनियां; स्पष्ट -। काय बोले भगवंता ॥५९॥
म्हणे अज्ञान स्त्रियेची जाति । ती काय जाणेल कृपामूर्ति । देहेविरहित मी हे स्फूर्ति । कृपेनें तुझिया स्वामिया ॥६०॥
कोणाची स्त्री कोणाचें घर । अवघा माया वोडंबर । अनित्य भासतसे शरीर । याचा भरवंसा कायसा ? ॥६१॥
नाथें कर्णावरी ठेविला हात । यादव म्हणे स्त्रियेनें केला घात । आक्रंदोनि रुदन करीत । दृढ पदातें धरोनियां ॥६२॥
म्हणे अनंत जन्मांचिये अन्तीं । नरदेहाची लाभली प्राप्ति । माजीं जोडली तव संगति । ती जीव गेल्या न सोडी ॥६३॥
इकडे करी स्त्री रुदन । म्हणे बाळें लहान अज्ञान । यांतें संरक्षिता असे कोण ? म्हणोनि चरणीं लागली ॥६४॥
ऐसा देखोनि संकट समय । नाथें आश्वासिला यादवराय । म्हणती गुरुबालका धैर्य । नेदी चुकूं आपुलें ॥६५॥
जो जाहला राजबालक । तयासी वश्य प्रजा सकळिक । तैसें तुज समाधिसुख । वश राहील सर्वदा ॥६६॥
प्रपंचसंग आंदोलायमान । ते स्थिति न मानिती सज्जन । सहजेंचि राहे समाधान । पूर्णापूर्णातीत जें ॥६७॥
ऐसा पूर्ण बोध ठसवुनी । सुखिया केला यादवमुनि । प्रपंच परमार्थ साधोनी । अक्षय आनंदी ठेविला ॥६८॥
मग पुसोनियां दंपतीसी । नाथ पावले श्रीउज्जयनीसी । तेथील अपूर्व कथेसी । चित्त देऊनि परिसिजे ॥६९॥
तेथील राजा क्षत्रिय जाति । परम धार्मिक विख्यात कीर्ति । तयाची स्त्री पद्मावती । स्वरुपवती अनुपम ॥७०॥
रंभा उर्वशी तिलोत्तमा । या स्वर्गी रुपवती अति उत्तमा । परी पद्मावतीची रुपसीमा । कोणासीही न करवे ॥७१॥
जियेच्या रुपातें देखोनी । नाचे शफरीध्वज येवोनी । वसंत घालितसे लोळणी । सुगंधा वेंधून तियेच्या ॥७२॥
ऐसी रुपवती परमसुंदर । पतिभजनीं अति तत्पर । उभयतांचें एक अंतर । धर्मतत्पर समभावी ॥७३॥
स्त्रीपुरुषांचे भिन्न चित्त । जळो त्याचा प्रपंच व्यर्थ । तो गृहीं असतांही अनर्थ । सुख स्वार्थ न पवेचि ॥७४॥
तैसी नव्हे पद्मावती । पतिसेवेसी अहोरातीं । झिजवितसे देह, संपत्ति - । तुच्छ मानी त्यापुढें ॥७५॥
रायाचें पूर्ण मन तियेवरी । ज्यास मातेसमान परस्त्री । पद्मावतीवांचोनि क्षणभरी । न पडे चैन राजेन्द्रा ॥७६॥
ऐसे अति प्रीतीनें उभयतां । संसारामाजीं वर्तत असतां । तों एकाएकी कालसत्ता। पद्मावतीवरी पातली ॥७७॥
काळ न म्हणे प्रीतिभंग - । होईल, चालला अव्यंग । प्रपंच होऊं द्यावा सांग । अथवा परमार्थ सांग घडों द्यावा ॥७८॥
हा हा ऐसी काळाची धाडी । पद्मावतीची मुरडी नरडी । राजा विव्हळ होऊनि, तांतडी - । मूर्छागत्‍ पडियेला ॥७९॥
सेवकीं करोनि उपचार । रायासी आणिलें शुद्धिवर । चिता रचिली प्रचंड थोर । प्रेतसंस्कार पैं केला ॥८०॥
राजा धबधबा घे बडवोन । म्हणे मजही लावा अग्न । प्राणप्रियेवांचोनि क्षण । मज सचेतन न राहवे ॥८१॥
नाना प्रकारें केला बोध । परी मोहव्याळें दंशिला शुद्ध । तेणें योगें राजा विषयान्ध । झाला; कांहीं ऐकेना ॥८२॥
चितेभोंवती प्रदक्षिणा करी । म्हणे येणेंचि तुष्टेल मदनारि । माझी मज देईल अंतुरी । कृपा भारी तयासी ॥८३॥
ऐसें म्हणोनि भोंवता फिरत । प्रधानादि जे सेवक समस्त । तेही तैसेंचि आचरत । राज-भयें करुनियां ॥८४॥
नाथें ऐसें चरित्र देखिलें । म्हणे रायासी तों मोहें व्यापिलें । मृत स्त्रीसाठीं आरंभिलें । अनुष्ठान विपरीत ॥८५॥
अहो मोहाची अगाध कीर्ति । ज्ञानियासीही पाडिले भ्रांतीं । जन्म हरिण योनीप्रति । भरतालागीं पशुमोहें ॥८६॥
यासी सदुपदेश करितां । व्यर्थ होईल, वाटे चित्ता । तरी कंटकें कंटक तत्त्वतां । तैसें विपरीतें काढिजे ॥८७॥
ऐसें मनीं विचारिती । आणि राजयासवें चितेभोंवतीं । नाथ आपणही फिरुं लागती । परी राजा न पुसे कोण तुम्ही ?
॥८८॥
ऐसें पाहूनियां नाथें । मृद्-भाण्ड जें हातीं होतें । तें बळेंचि आपटुनी भूमीवरुतें । रुदन करी अट्टाहासें ॥८९॥
माझा तुवां परम सुंदर । रुप लावण्य मनोहर । तो फुटोनि गेला साचार । आतां म्या काय करावे ? ॥९०॥
ऐसे गुण आठवोनियां । शोक करीत तया ठायां- । राहिल; पुढें मार्ग जावया - । नाहींसा झाला सर्वांसी ॥९१॥
प्रजा सर्व अवलोकिती । म्हणती याची अलौकिक गति । सिद्ध महंत प्राज्ञ दिसती । आणि लीला विपरीत मांडिली ॥९२॥
रायासी जाहला मायिक गर्व । तो नासावया, सिद्धराव । अथवा कोणी गणगंधर्व । किंवा गुरुदेव असावा ॥९३॥
आपुली क्रिया सांडूनि भूपति । पुसता जाहला नाथाप्रति । किमर्थ रुदसी तूं निश्चिती । सांगे निगुती वृत्तान्ता ॥९४॥
नाथ उत्तर देती तयासी । अधिक रडोनि उंच स्वरेंसी । म्हणती तुंबा भंगला ! या नेत्रांसी । पाहणें दैवा कां आलें ? ॥९५॥
राजा सेवकांसी आज्ञापित । उत्तम तुंबे पांच आणा त्वरित । सेवक गेले धांवत । तुंबे पांच आणिले ॥९६॥
भूपति बोलिले नाथासी । एक तुंबा फुटला निश्चयेसी । तरी पांच तुंबे घेऊनि; त्वरेंसी - । मार्ग सोडोनि परता हो ॥९७॥
नाथ म्हणती जो फुटला । तोचि तुंबा देई वहिला । राजा म्हणे तुमच्या बोला । आश्चर्य फार वाटते ॥९८॥
जो फुटला तुंबा तत्त्वतां । तोचि कैसा येईल मागुता ? नाथ म्हणती : चितेभोंवता । तरी कां फिरसी राजेंद्रा ॥९९॥
स्वयें तूं बाह्यान्तरीं अज्ञ । आणि मातें सांगसी पूर्ण ज्ञान । राया पाहे विचारुन । स्त्रीपुत्र धन कोणाचें ? ॥१००॥
मृत स्त्रीकारणें शोक करिसी । आणि स्वहितातें मुकतोसी । राया पूर्ण विचारी मानसीं । स्त्री सुखद कीं दु:खद ? ॥१०१॥
एका स्त्रियेचिया पायीं । त्यजिले बाप आणि आई । ज्यांचे उपकाराची नवाई । कोण वर्णूं शके पां ? ॥१०२॥
न मातु: परदैवत । ऐसें वेदशास्त्र गर्जत । तें सांडोनि, अधर्मी वर्तत । स्त्री घातक किती सांगूं ? ॥१०३॥
जैसी बचनागाची कांडी । खातां लागे गोड तोंडीं । परी प्राणाची कुरमुंडी । करिता वेळु नलगे पैं ॥१०४॥
तैसें स्त्रीरुपी मोहन । परमेश्वरें निर्मिलें जाण । जियेकरितां सर्वस्वें जन । स्वार्था नागवण पावले ॥१०५॥
ऐसियेचा सुटता संग । ईश्वरीकृपा मानूनि चांग । संतोष निर्भर व्हावे अंग । कीं रडावे ? सांब बा ॥१०६॥
कर्मेन्द्रिय पंचकातें । विषय तन्मात्रा - पंचक सुखदाते । हे पशुपक्षी आणि मानव जन्मातें । समसमान असती ॥१०७॥
मनुष्यजन्माची दुर्लभ प्राप्ति । यांतही विषयचि सेविती । तरी ते गेले अधोगति । देखत देखती नागवले ॥१०८॥
ऐसी नाथमुखींची वाणी । ऐकतां, राजा विचारी मनीं । म्यां मूर्खे काय केली करणी । जन मज काय म्हणतील ? ॥१०९॥
परम अनुतापें संतप्त । नाथासी साष्टांग प्रणिपात - । करोनि, चरणावरी लोळत । पदरजा वंदित मस्तकीं ॥११०॥
म्हणे माया - मोह सर्प । मज गिळीत होता दावूनि दर्प । सद्गुरु - गारुडी येऊनि; कंदर्प - । पाशांतूनि सोडविले ॥१११॥
मियां जो नाहीं आराधिला । आदरें नाहीं सन्मानिला । परी सहज कृपाळुत्वें धांवला । स्वामी माझा मजलागीं ॥११२॥
ऐसे आठवोनि स्वापराध । गडबडा लोळे, करी खेद, । येऊनियां नाथासन्निध । चरण दृढ धरियेले ॥११३॥
म्हणे मी अधम, परम चांडाळ । परि तूं पातलासी दयाळ । आतां त्याग न करी हा खळ । स्वसेवें योजी गुरुराया ॥११४॥
ऐसी उपरती देखोनी । नाथ आनंदले मनीं । म्हणती जगदुद्धारालागुनी । आम्हां अवनीं विचरणें ॥११५॥
म्हणवोनि मस्तकीं ठेविला कर । करविला गुरु-पीठिकेचा उच्चार । मंत्र सांगितला एकाक्षर । जपतां राजेन्द्र समाधिस्थ ॥११६॥
एक दिवस अहोरातीं । समाधीची सुखसंपत्ति । भोगवूनि राजाप्रति । पुनरपि पूर्वस्थितीं आणिला ॥११७॥
राजा म्हणे गुरुराया । आतां न विसंबे मी या पायां । राज्य भोगादिक वांया । मिथ्या सुखें तीं न लगतीं ॥११८॥
तयासी नाथें आज्ञापिलें । देह प्रारब्धीं ठेवोनि; वहिलें - । समाधि सुखासी भोगी अवलीले । आतां उरलें तें काय ? ॥११९॥
विषयिक बा रे जें सुख:दु:ख । याच न मानावा हरिख । नित्यानित्य वस्तूचा विवेक । करुनि सुखी असावे ॥१२०॥
ऐसी आज्ञा कृपासागरें । केली, ती शिरीं वंदूनि राजेन्द्रें । मूर्ति पाहिली भरोनि नेत्रें । आनंदें गात्रें विव्हळ ॥१२१॥
मग सुखासनीं बैसवोनी । सद्गुरुसी आणिले राज्यभुवनीं । आपण शिरीं पादुका घेउनी । सेवा अनुदिनीं करीतसे ॥१२२॥
श्रीपति श्रोतया करी विनंति । अवधान देवोनियां, चित्तीं - परिसा सिद्धचरित्रसंगति । पुढील कथा अतिगहन ॥१२३॥
सिंहलद्वीप अतिविख्यात । तेथें जातील मच्छेन्द्रनाथ । पद्मिनी राणीसी करितील कृतार्थ । तें पावन चरित्र ऐकिजे ॥१२४॥
राममाय कृपामूर्ति । हृदयीं वसोनि करी स्फूर्ति । तीच लिहीतसे ग्रंथीं । येर्‍हवीं मंदमति मी असे ॥१२५॥
योगिजनांचिया विश्रामा । जडजीव तारका श्यामा । किती वानूं तुझा प्रेमा । दयाळू रामा तूं एक ॥१२६॥
कामधेनूचिया कांसें । लागल्या; काय उणें असे ? तैसें मी एक पिसें । चरणीं तुझिया जडियेलों ॥१२७॥
स्वस्ति श्रीसिद्धचरित्रभाव । भवगज विदारक कंठीरव । तारक सद्गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥१२८॥
श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंस: ॥
॥ अध्याय नववा संपूर्ण ॥
==
टीपा - (१) मी - तूं पण विरे । हेंचि योगसिद्धि-ओवी २६:- जोंपर्यंत मीपण स्थूल व सूक्ष्म देहाशीं खिळलेलें असतें तोंपर्यंत, सर्वव्यापक अशा चैतन्यावर भासणार्‍या नामरुपात्मक पदार्थाच्या वेगळेपणाची जाणीव बुद्धींत कायम असतें. `अलंकारपणें झांकले । बाळा सोनें वांया गेले । तैसें नामींरुपीं दुर्‍हावलें । अद्वैत जया ॥' असें या रजोगुणात्मक द्वैतबुद्धीचें श्रीज्ञानदेवांनीं यथार्थ वर्णन केलें आहे. तात्पर्य, मीपण जीवंत आहे तोपर्यंत तूं, तें हें-असें द्वैत कायम राहात असतें. हें देहाला चिकटलेंलें मीपण तेथून सोडवून सर्वव्यापी परमात्मस्वरुपाला जडविण्याची हातोटी श्रीसद्गुरु शिकवितात. ह्या गुरुपदिष्ट सोऽहंचा अभ्यास पूर्णत्वास गेला म्हणजे अहं हास: आहे, परमात्मा आहे ही अभ्यास करणारी वृत्तीही नाहींशी होते. अर्थातच देहापासून सोडविलेला अहंभाव स:मध्यें संपूर्ण विलीन होऊन फक्त `स:' उरतो. सोऽहंचा निश्चय करणारी बुद्धि आत्म्यांत मिळल्यानें) वेगळेपणाचें भान राहतच नाहीं. मी तूंपण संपूर्ण विरुन जाते. हीच योगसिद्धीची खूण होय असें श्रीदत्तप्रभु गोरक्षनाथांना सांगत आहेत.

कठिण शब्दांचे अर्थ : - सद्गुरु पंचानन = सद्गुरु हाच सिंह
(१) मत्तवारण = माजलेले हत्ती
(२) कृष्णा ककुद्मती प्रीतिऐक्यता = कर्‍हाड येथील कृष्णा कोयनेचा प्रीतिसंगम
(२९) ज्ञानवल्ली = गांजा
(३५) विवशी = पिशाच, चेटकीण
(४७) बोहरी करणें = हकालपट्टी करणें, नाहींसे करणें
(५५) शफरीध्वज = मदन-शफरी म्ह. मासोळी. मूर्तिमंत चांचल्याचें निदर्शक ही मासोळी, अर्थात् - चित्तांत चांचल्य उत्पन्न करणें ही ज्याची खूण (ध्वज) तो म्हणजेच मदन होय
(७२) मोहव्याळें = मोहरुपी सर्पानें (सं=व्याल)
(८२) किमर्थ = काय हेतूनें ?
(९४) बचनाग = एक प्रकारचें जालीम विष
(१०४) गुरुपीठिका = गुरुपरंपरा (११६).

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP