मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय एकोणचाळिसावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशाय नमः ॥
श्रीमत्सद्‍गुरु राम समर्थ ॥ नमो आगमाचिया उगमा । साकार प्रणवा सद्‍गुरु रामा । आब्रह्मभुवना विश्रामधामा । परिपूर्णकामा मम ताता ॥१॥
अगा योगाचळींच्या सुप्रभा । एकाक्षरा हिरण्यगर्भा । सर्गस्थित्यंति वालभा । साक्षी स्वयंभा गुरुराया ॥२॥
अनकळ तुझ योगमहिमा । त्या तुज आकळवया रामा । गीर्तं गाऊनि; पूर्णब्रह्मा । पुरविती कामा निजदास ॥३॥
येणेंचि व्यासवाल्मीकि कवी । शुकशौनकादि महानुभवी । गीतीं गाऊनि, अप्राप्य पदवी । जोडले महीं असंख्य ॥४॥
नलगे व्रततप यज्ञ दान । नलगे कुल याति गोत्र वर्ण । सप्रेम अनन्यभावी शरण । जाहल्या, त्वच्चरण गिंवसती ॥५॥
ऐसें महानुभाव संतीं । अनन्या मातें करुणैकमूर्ति । सुलभोपायें निर्द्वन्द्व प्रीति । तव पदाप्रति मेळविले ॥६॥
अवो, जो ब्रह्मा तूंतेंचि शरण । विष्णु तोही तुज अनन्य । महेश तरी अखंड ध्यान । साधक म्हणवोनि करीतसे ॥७॥
त्या तुझी वानावया थोरी । केवीं मी सरे अज्ञाधिकारी ?  । नेति नेति निगम निर्धारी । तो तूं भक्तांकरीं गिंवससी ॥८॥
त्याग भोगादि सांडी मांडीं । न लगे करावी तडातोडी । स्वाश्रमीं ठायींचे ठायीं आवडीं । निजपदीं गुढी उभवावी ॥९॥
परिस त्या निजपदाचा ठावो । सघोष ध्वनींचा गर्भभावो । त्यामाजी मेळवूनि मन, पहा वो । करावा लयो निरंजनीं ॥१०॥
तैं तेथें हरपे देहभान । ध्याता ध्येयेसीं होय शून्य । निबिड कोंदटलें चैतन्य । साक्षी, द्रष्टेपण हरवोनि ॥११॥
इया परी ज्या संतश्रेणी । तेथें श्रीपति दीनवाणी । अनन्य होवोनि, लोटांगणीं । करुणा वचनीं विनवितु ॥१२॥
अहो जी करूणाकर कृपाळा । मागा मातें अरुष बाळा । आज्ञापोनी वेळोवेळां । सिध्द्चरित सोहळा वदविलाती ॥१३॥
सवर्म आपुलें कृपावधान । देऊनि, कीजेला ग्रंथ निर्माण । ’ सिध्द्चरित्र ’ नामाभिधान । परमपावन संस्थिलें ॥१४॥
यापरी एकांन्ती लोकान्ती । बालका आपुले कृपामूर्ति । सरते केलेति अनन्याप्रति । स्वानंदशक्ति वोपोनि ॥१५॥
येर्‍हवी मी मतिमंद खळ । कुटिल कृपण अमंगळ । ऐशिया करवीं सुरस रसाळ । वदविलें, नवल, सच्चरिता ॥१६॥
मोहें औटाकृति आकळोनि । कोऽहं भ्रमें दिनयामिनीं । तमान्धकूपीं निदसुरा प्राणी । त्या मज, निरंजनीं बैसविले ॥१७॥
या या सद्‍गुरु करुणाकरें । त्रिकुटवासी रामचंद्रें । सोऽहं भावाचियें गजरें । केले चेइरे असंख्य ॥१८॥
भवाच्या घोरांदर काचणीं । जाजावले असंख्य प्राणी । तयाच्या कणवा कैवल्यदानी । अवतरला मेदिनीं मम तात ॥१९॥
जयाचें दान तें सकृपोत्तर । परिसतां, भवभय स्वप्नाकार । भासोनि; निजानंदीं निर्भर । स्वसुखीं सुरनर विचरती ॥२०॥
अलक्ष लक्षी लक्ष्येविण । सदैव विलसती सुखसंपन्न । निःसंग त्रिवंदीचे साधन । सोऽहं स्मरणें आकळिलें ॥२१॥
आधारमणि जालंदरीं । प्रणा निजगजरें सोऽहंकारी । सैर सघोष सूक्ष्माक्षरी । मूर्ध्नि ब्रह्मगिरिये ठाकला ॥२२॥
तेथें दशा ना, देहभाव । विदेह म्हणणेंही जाहले वाव । मा त्या साक्षित्वा केउता ठाव । स्वसत्ते निर्वाह जाणावया ॥२३॥
ऐसी मुक्तदाशा सुलक्षणा । अपांगपातें श्रीरामराणा । सद्‍गुरु माझा, अनन्य जनां । देऊनि, निरंजना ने ठायीं ॥२४॥
मग तो निजभजनीं अभिन्न । अखंड विलसे सुखसंपन्न । भज्य भजक आणि भजन । मिळणीं मिळोन उल्हासे ॥२५॥
येपरी अवस्थातीत सहज । निवृत्त भाग्यास योगीराज । भोगिता, भोक्तपणी फुंज । नातळोनि; निजगूज भोगित ॥२६॥
तंव श्रोते म्हणती श्रीपति । हें निरुपण कीं ते स्तुति । ग्रंथरचना कीं ब्रह्मैक्यस्थिति । साहित्य संगति न कळेचि ॥२७॥
अरे मुमुक्षा व्हावे साधन । मुक्तासी सोलीव ब्रह्मज्ञान । अविकळ आतुडे अंकुरोन । येरां कर्मोपासनीं ठेविजे ॥२८॥
ऐसी निरुपण हातवटी । ते तूं विसरोनि, ब्रह्मैक्यपुष्टी । आघवी सभराभरित सृष्टी । भरोनि, वाक्पुटी ओतिसी ॥२९॥
तुझे एक एक वचन । परिसतां, स्वरुपाकार मन । होय;न तरी तें कथानुसंधान । केवी कळोन येवो सरे ॥३०॥
रे तव मुखींचे एकेक बोल । ते अतिरसाळ अति सखोल । मुमुक्षा निजसुखाची ओल । श्रवणेंचि अंकुरेल भूबीजें ॥३१॥
मात्र तें बीज म्हणाल कवण । तरी चतुष्टय साधनी संपन्न । होवोनि, सद्‍गुरुसी जाल्या शरण । तें बीज निर्वाण ये हातां ॥३२॥
जेणें व्यास वाल्मीक जनक । शुक शौनक याज्ञवल्क्य । प्रल्हाद नारद सनकादिक । हें क्षितीं असंख्य कें वानूं ? ॥३३॥
परि ते सद्‍गुरुवांचोनि । नलभे न ठके नाना साधनीं । निर्धार पारुषले प्रयत्नीं । त्याते ने कृपादानी निजलीलें ॥३४॥
ऐशियाचा प्रतापगौरव । मी कें वानूं मंद जीव । परी संत तुम्हीं कृपार्णव । मातें विभव भोगवीतसा ॥३५॥
तेणें कृपादानें पाही । मी सरता झालों तुमचे पायीं । अतर्क्य संत सामर्थ्य पाही । तुमची नवाई तर्केना ॥३६॥
म्हणवोनि न धरत प्रेमोल्हाळी । मिठी घातली चरणकमळीं । तैं एकत्व सुख-सुकाळीं । स्वानंदमेळीं तल्लीन ॥३७॥
होवोनि म्हणे, सद्‍गुरुराया । ग्रंथ तों आणिला कळसाध्याया । परी विनवणी एक ते पाया । परियेसी जी राया सुखसिंधु ॥३८॥
जे तव अगाध यशाची थोरी । वर्णनीं मुरडले साही चारी । तेथें मज जीवा कोणती परी । हें प्रत्ययें निर्धारी मी जाणे
॥३९॥
परी असोसीचि हांव । न धरे अनावर; घेतसे धांव । कां जें तव लीला यश वैभव । गाईन सदैव सप्रेमें ॥४०॥
यालागीं सुरतरुच्या आरामा । तव तळवटीं परिपूर्ण कामा । छाये राहुनि साकारब्रह्मा । याचिल्या निजनेमा चालवी ॥४१॥
चालवी चालवी चालवी, म्हणोनी । गडबडा पदकंजीं लोळणी । घालितां, सकृप कैवल्यदानी । बापें कळवळोनि उठविले ॥४२॥
अहो, त्या उठवोनि स्नेहाळी । अभिनव सुखाच्या सुखकल्लोळीं । कडकडोनि स्वानंदमेळी । निजह्र्त्कमळीं कळविला ॥४३॥
अहो आलिंगनाचे मिष । करोनि, ओपिला निजसौर । तदा श्रीपतीचा उल्हास । आब्रह्मभुवनासी दाटला ॥४४॥
तेव्हांची सिध्दीं पावला ग्रंथ । जे का नामें सिध्दचरित । साह्य सखा श्रीसद्‍गुरुनाथा । रघुवीर समर्थ सर्वस्वी ॥४५॥
श्रीआदिनाथ कुलावंतस । चिद्‍भाग्यनिधि परमहंस । भूतमात्रीं स्वयंप्रकाश । निजकृपा सौरस वोसंडी ॥४६॥
आपण होवोनि श्रोता वक्ता । स्वयें चालविलें सिध्दचरिता । श्रीपति नामेंचि केला सरता । ग्रंथी परमार्थी दावोनी ॥४७॥
परी ग्रंथारंभु । करोनि येथवरी सुप्रभु । आणिला, ज्यामाजीं प्रणवगर्भु । विवरिला सुलभु सविवेकें ॥४८॥
का ते माझे प्रणतजन । झणें एखादे पावतील शीण । ते दुःखा वरपडे जाल्या जाण । मज काय कारण बिरुदाचें ? ॥४९॥
माझ्या भाग्याचें भाग्य भूषण । मज षड्‍गुणैश्वर्याचें मण्डण । ते हेच माझे अनन्यजन । मज प्राणाचे प्राण ह्र्द‍गर्ब ॥५१॥
मज अव्यक्ता नाहीं उपाधि । तो मी निजभक्तां कडेखांदीं । वाहुनि, साकारपणें छंदी । नाचे आनंदी प्रेमसुखें ॥५२॥
मियां बहुविध व्हावयासी । कारण, भक्ताचे प्रेमपाशीं । बांधोनि, गिंवसलों एकत्वेंसी । ’ सो ’ या सूत्रेंसी निरवयवी ॥५३॥
ऐसे असोनि, लडिवाळा । कां गा नसताचि घेतिला चाळा । या सिध्द्चरित्रीचा सोहळा । अवधारी आगळा सद्‍भावा ॥५४॥
इया सिध्दचरित्रींचा भावो । एकाक्षराचा निजनिर्वाहो । अनन्य जनांसी निःसंदेहो । करील पहा वो क्षणार्धे ॥५५॥
हे सत्य सत्य साचार भाष । सद्‍गुरुरायें निजवरास । देऊनि, केला मही प्रकाश । निगम गर्भास विवरोनि ॥५६॥
कां जे भवाचिया भेणें । सदैव संचित केविलवाणे । ज्ञातेचि; परी पांगुळया मनें । ठेले निर्बुजोनि अनुपायी ॥५७॥
म्हणवोनि मम तातें तारुवेसी । क्षितीं विचरुनि लीला विलासी । संशयावर्ती कासाविशी । जाहल्या; अनन्यासी उध्दरिले ॥५८॥
ऐसे परमेष्ठी परात्परु । तदुपरी यतींन्द्र परमगुरु । महादेवें उपदेशिला श्रीरामतारुं । तोचि परमधारु श्रीपतीसी ॥५९॥
म्हणूनि बाह्या उभवूनि बाहे । मुमुक्षु साधकजनीं लवलाहे । म्हणे चला चला परमार्थपव्हे । घातली रघुरायें दीनार्थ ॥६०॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥६१॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सम्‍ सोऽहं हंसः ॥

॥ अध्याय एकोणचाळिसावा संपूर्ण ॥

कठिण शब्दांचे अर्थ:- तडाजोडी करणें = जबरदस्तीनें ताटातूट करणें (९) कीजेला = केला  (१४) सभराभरित = सरसकट
(२९) पारुषणें = थांबणें, संपणें, बंद होणें (३४) असोसीचि हाव = अमर्याद उत्साहाची हाव (४०) प्रणतजन = चरणीं नम्र झालेले
भक्त (४९)

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP