मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय विसावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय विसावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशाय नमः॥
ॐ नमोजी सद्‍गुरुनाथा । भावें चरणी ठेवितां माथा । क्षालुनिया पापें सर्वथा । मोक्ष पंथा लाविशी ॥१॥
ग्रंथारंभी गणेश नमन । उचित म्हणती सकल जन । परी आवडी घेत माझे मन । सद्‍गुरु भजन करावया ॥२॥
अहो येर्‍हवी तरी विवेकें । पाहतां बुध्दीस दिसे निकें । कीं गुरुचि भजावा सप्रेम सुख । तया न तुके ईशही ॥३॥
नातरी हे माझीच उक्ती । कही न मानावी जी श्रोतीं । गीतेमाजीं अर्जुनाप्रति । हेचि श्रीपति बोलिला ॥४॥
किंबहुना म्हणे यदुवीर । तो आत्माची मी शरीर । ऐसा बोले भक्त प्रियकर । मी किंकर तयाचा ॥५॥
यालागीं सद्‍गुरुचि श्रेष्ठ । तात्काळ पुरवी मनीचें इष्ट । केलिया गुरुभजनासी सुष्ठु । भगवंत तुष्टे सहजचि ॥६॥
ऐसिया सद्‍गुरुचे चरण । वंदुनि तयाचें वास स्थान । कथितो, अवधारा श्रोते जन । सदैव सज्जन जेथ वसे ॥७॥
तेथें देहत्रयादि अवस्था । कालत्रयादि शक्ति समस्ता । समसाम्यबोधें अद्वैतता । विचरती तत्त्वता अनुदिनीं ॥८॥
य़ालागी त्रिकुटाची आवडी । म्हणवोनि दिधली तेथेंच दडी । त्या श्रीराम भेटीची तांतडी । घडी घडी गाढी होतसे ॥९॥
तेथें सुकृतें सत्संग जागरीं । अवचटे पातलों गोदातीरीं । तियेचे दर्शनेंचि अंतरीं । आनंदलहरी दाटल्या ॥१०॥
तेथ मायबाप सद्‍गुरु राम । जो कां कल्पवृक्षाचा आराम । देखिला आनंदानंद धाम । परिपूर्ण काम विश्वात्मा ॥११॥
तदा गंगेहूनि गोदास्थान । वाटले मजला परमपावन । (१)जियेचे तीरीं श्रीराम चिदघन । साकार सगुण देखिला ॥१२॥
नवल देखा गुरुस्तवन । करुं जातां; गोदास्थान । कां आठवलें ? तें कारण । एकचि जाणे ह्रदिस्थु ॥१३॥
अहाहा जनस्थान पंचवटी । श्रीराम शोभे गोदातटीं । म्हणोनि त्या रामनामापाठी । गोदा चोखटी आठवली ॥१४॥
ती सर्व तीर्थांचें आयतन । सर्व ज्ञानेंसी परिपूर्ण । जिये घालोनि दृष्टीचें स्नान ।  मज पावन कीजेले ॥१५॥
जरी नव्हती ही महानदी । तरी केवीं भेटता हा रामामृताब्धि । जयाची उन्मनी कैवल्यपदीं । अचल समाधी अच्युत ॥१६॥
अहो महानदीच्या वोघी । रामामृताब्धीसी मी अमार्गी । मीनलो झालों जी सभागी । जन्म-मरणपांगी पांगिला जो ॥१७॥
इनें नानौघे वाग्जाल मता । मोडोनि; श्रीरामपदामृता । पाजोनि; मोक्षपदीं केला सरता । तेव्हांचि राम गीता गाये मी ॥१८॥
जन्म मरणें शिणशिणोनी । मूढ मी श्रमलों अनंत योनी । तैं इयेनें श्रीरामचरणीं । घालोनि, पायवणी पाजिलें ॥१९॥
राम सद्‍गुरु पीयूषाब्धीनें । दुर्यज दुराविली जन्ममरणे । एकचि हेळा अर्धमात्रेनें । (२)’ सो ’ या स्मरणें निवविले ॥२०॥
य़ालागी श्रीरामचरण । हेंचि माझें शिरोभूषण । करो जियें संसारतरण । जन्म मरण निवारी ॥२१॥
तैसेंचि अमॄतौघकल्लोळीं । गौतमवरद गोदाजळीं । होऊनि राहिलों मासोळी । पाप ताप जाळी अनन्याचे ॥२२॥
अहो मी अनंत जन्मींचा गदी । त्या मज घालोनि श्रीरामपदीं । जन्मम्ररण मोचक औषधि । देवविली निधि अर्धमात्रा
॥२३॥
तियेचे उपकारा उत्तीर्ण । कैसेनि होऊं मी हीन दीन ? । जियेनें भवाब्धीचें तर्ण । दिले रामचरण सुप्लव ॥२४॥
यालागीं तिचें कृपाजीवन । तेंचि माझें निजजीवन । तें परतें होतां एक क्षण । कासावीस प्राण होतासि ॥२५॥
देखोनि ऐसा हा अतिशय । श्रोती न घ्यावा संशय । गोदावर्णनीं अभिप्राय । सद्‍गुरुरावो स्तवावा ॥२६॥
जरी बालकें स्तविली माता । तरी उणाचि नव्हे मातेचा पिता । कां जो भवतारक ज्ञान दाता । तोचि तत्त्वतां मज होय ॥२७॥
॥२७॥
असो; तयाचें लीला स्तवन । विस्तार देखोनि श्रोतेजन । म्हणती तुझे सुरस भाषण । ग्रंथारंभण करी वेगीं ॥२८॥
प्रसंग ऐसा पूर्वाध्यायीं । निश्चय कीजेला बाजीरायें । शरण जावे गुंडाख्यपायीं । त्वरा लवलाही भेटीची ॥२९॥
गुरु करावा गुंडाख्यमुनि । यापरी इच्छा वाढली मनीं । यालागी तो दिन यामिनी । सिध्दता सदनी संपदादि ॥३०॥
मग एकदां सहपरिचारी । बाजिराय आला पंढरपुरी । जेथ आर्ताचा कैवारी । वास करी गुंडाख्य ॥३१॥
रायें अत्यानंदी सादर । नयनी देखिला गुरुवर । वंदोनि पदीं वारंवार । जोडोनि कर विनवीतसे ॥३२॥
दैवें अवतरली हे मूर्ति । आर्ताचिया कामपूर्ति । ऐकोनि सद्‍गुरु तुझी कीर्ति । दीन दर्शनार्थी पातलों ॥३३॥
धन्य धन्य मी, आजि हे माय । पाहिले सद्‍गुरो तुझे पाय । तीर्थ देवोनि गुरुराय । तारी भवभयापासोनी ॥३४॥
सद्‍गुरो तव पदीं मी अनन्य । पद रजाचा वांछित कण । पादाम्बु देऊनि कीजे पावन । म्हणवोनि चरण धरियेले ॥३५॥
ऐकोनि बाजिरायाची वाणी । गुंडाख्य भक्त शिरोमणि । जो चैतन्यरत्नाची खाणी । काय हांसोनि बोलिला ॥३६॥
बाजिराया तूं विप्रवर । नृपासमान ऐश्वर्य थोर । संग्रहीं पंडित शास्त्रकार । असती अपार तुझे पैं ॥३७॥
ऐसें असोनि; आम्हापाशीं । व्यर्थ कासया आलासी ? । आम्ही दारिद्याची राशी । अरण्यवासी संतजन ॥३८॥
आम्रवृक्ष वसंतकाळीं । सांडोनि, सेवी जो बाभळी । तया नराच्या कपाळी । ऊन तळीं - वरी कांटे ॥३९॥
या बोलाचा अभिप्राय । जाणोनि, सखेद बाजीराय । म्हणे सज्जना तुझे पाय । त्याहूनि ऐश्वर्य्ब न मानी मी ॥४०॥
जरी आम्ही विभवपति । तरी सद्‍गुरुविना कीर विपत्ति । यालागीं तव पदीं कृपामूर्ति । अनन्यगति मी असे ॥४१॥
मागां बहुत राजे झाले । चंद्रसूर्य वंशज भले । परि ते सद्‍गुरुचेनि कृतकृत्य झाले । देव ऋषि आगळे प्रतापी ॥४२॥
एवं सद्‍गुरुवांचोनी । कल्याण नसे जनीं वनीं । यालागी लागलो चरणीं । कृपा स्वामीनी करावी ॥४३॥
परिसोनि बाजीची प्रार्थना । गुंडाख्ये दिधली आज्ञा । नेम सारोनि सदना । यावे दर्शना सद्‍गुरुच्या ॥४४॥
होतांचि ऐसा निरोप । संतुष्ट जाहला बाजी भूप । मग पूजासाहित्य साक्षेप । हरुषें अमूप मांडिले ॥४५॥
नानापरींची सुगंध । पुष्पें धूप दीप गंध । फल तांबूल नैवेद्य । साहित्य सिध्द करुनि घे ॥४६॥
उत्तम वस्त्र अलंकार । गीत नृत्य छत्र चामर । ऐसे नाना राजोपचार । नृपें साचार आदरिले ॥४७॥
सिध्द्ता करुनि ऐशियापरी । बाजी चरणचाली सत्वरी । येऊनि सद्‍गुरुचे द्वारी । साष्टांगें करी प्रणिपात ॥४८॥
म्हणे धन्य धन्य मी आज । देखिलें आपुलें चरणांबुज । जे भवाब्धिमाजिलें सतेज । तारक जहाज मज दीना ॥४९॥
ऐसें विनवोनि अनन्योत्तरें । रायें भक्तिपुरस्परें । गुरुदंपतीची सर्वोपचारें । पूजा साचार आरंभिली ॥५०॥
अंगी मर्दूनि सुगंद्ध तैलें । अभ्यंग स्नानासी घातलें । अंग पुसोनि बैसविले । तया नृपाळें आसनीं ॥५१॥
गंध लावोनि केशरी सुबक । वरी ठेविला कस्तुरी तिलक । कुंकुम सौभाग्यदायक । लावी भाविक गुरुपत्नीतें ॥५२॥
मागुती सुमनांच्या माळा । अर्पिल्या उभय दंपतीच्या गळा । बुका अर्गजा परिमळा । चरणकमळा लाविलें ॥५३॥
मग धूपदीपादि संभार । मधुर नैवेद्य राजोपचार । दक्षिणा वस्त्र अलंकार । नृपें सादर आर्पिले ॥५४॥
मग सद्‍गुरुच्या गळय़ांत । हार अर्पूनि रत्नखचित । सती केली अलंकृत । नखशिखान्त भूपाळें ॥५५॥
तये वेळीं शोभा किती । वर्णू उभय दंपती ? । घेऊनि जैसा पार्वती सती । कैलासपर्वतीं शिव बैसला ॥५६॥
नातरी जो जनार्दन । जें सर्व जीवांचें आयतन । बैसे रमेसी अंकी घेऊन । तैसें उभयासनीं शोभले ॥५७॥
ऐसी स्थित सपर्या यथार्थ । झालियावरी, सद्‍गुरुनाथ । दीधले बाझिस चरणतीर्थ । तया पुनीत व्हावया ॥५८॥
तीर्थ घेऊनि बाजिरायें । वंदिले सद्‍गुरुचे पाय । हात जोडोनि उभा राहे । निजिच्छाये सद्गद ॥५९॥
देखोनि राजयाची भक्ति । गुंडाख्यें पुशिलें तयाप्रति । इच्छा जे होय चित्तीं । ते नरपती बोलिजे ॥६०॥
परिसोनि स्वामीचिया प्रश्ना । परम आल्हाद वाटला मना । म्हणे, स्वामी एक चिंतना । रात्रंदिन लागले ॥६१॥
हें अंतरीचें जाणोनी । पुशिलें स्वामी मजलागोनी । तरी एक वसे चाड मनीं । ती सद्‍गुरुंनीं पुरवावी ॥६२॥
ऐसें करिजे सद्‍गुरुराय । कीं जोवरी हे चंद्रसूर्य । तोंवरी निश्चित निर्भय । राज्य अक्षय चालावे ॥६३॥
ऐकोनि रायाची उक्ति । म्हणे अंतरी गुंडाख्य यति । अहो हा केवढा विषयस्वार्थी । याची मति ऐहिक ॥६४॥
जरी द्यावया सिध्द दाता । तरी याचका व्हावी चातुर्यता । मोक्षाची प्रौढी न जाणतां । वर मूर्खता याचिला ॥६५॥
एवं ऐशापरी हे बापुडे । विषयगर्तेमाजिले किडे । सदा परमार्थी वांकडे । केवी आवडे मोक्ष तया ! ॥६६॥
बैसोनि कल्परुचे बुडी । जैसा अभाग्य इच्छी कवडी । तैसा नृप राज्याचे चाडी । परमार्थ दवडी हातींचा ॥६७॥
हें असो; मग बाजीप्रत । काय बोलिले सद्‍गुरुनाथ । कीं जंव गुंडा असे जिवंत । तोवरी सतत राज्य चाले ॥६८॥
परि या बोलाचा अंतर्गत । ध्यानीं नाणितां भावार्थ । बाजी होऊनि कृतार्थ । ग्रामाप्रति निघाला ॥६९॥
मग बाजीरायें एके दिवशीं । ऐसें विज्ञापिलें श्रीगुरुंसी । मज कर्महीन सेवकासी । कांही आज्ञापी पदसेवा ॥७०॥
ऐसी इच्छा माझे मनीं । गज -वाजी -शिबिकायानी । अर्पावे सद्‍गुरुचरणीं । सेवेलागुनी अहर्निशी ॥७१॥
ऐकोनि, सद्‍गुरु महानुभव । म्हणे उपाधीचा गौरव । कासया करिसी उपद्रव ? । आम्हा द्रव्य ते मृत्तिका ॥७२॥
परि अंतरी निश्चय वेगळा साचा । धनांशु नेघेचि बाजीचा । म्हणोनि वदे ऐसी वाचा । व्यामोही द्रव्याचा संपूर्ण ॥७३॥
जरी दीधलें त्रैलोक्य राज्य तेणें आम्हां काय चोज । जे का आमुचे भोज । आनंदकार परब्रह्म ॥७४॥
ऐकोनि ऐसे सरोष वचन । बाजीराय अंतरी झाला खिन्न । म्हणे धन्य धन्य संतजन । त्यांचे महिमान नेणवे ॥७५॥
असो आतां ; पुण्यनगरीं । बाजी परतलिया माघारी । नवल झाले कैशापरी । तें यानंतरी परिसिजे ॥७६॥
कोणी एक ब्राह्मण । करंदीकराख्य कुलोत्पन्न । वासुदेव नामेंकरुन । देश कोंकण जयाचा ॥७७॥
बहुकाळ स्वामीपाशीं । वासु राहिला सेवेसी । ऐसें असतां एके दिवशीं । वार्ता कैसी जाहली ॥७८॥
पत्रिका आली पित्याकडून । आम्हां उभया वृध्दपण । यालागीं दंपति रात्रंदिन । तुमचें लग्न इच्छितों ॥७९॥
तरी कुल शील रुपसंपन्न । घटी लक्षितांही बरवे पूर्ण । परी आमुचें अकिंचन जाणून । चिंता दारुण लागली ॥८०॥
तरी तूं मुद्रिकाशत चारी । आणोनि; साधी हे नोवरी । आमुच्या चिंतेसी दूर करी । येऊनि झडकरी पुत्रराया ॥८१॥
ऐशिया परी निज पितयाची । वासुदेवो पत्रिका वाची । लग्न वार्ता ऐकताचि । मति तयाची चचळे ॥८२॥
अशनी शयनी अहोरात्रीं । लोपवी सारासार विचारी । चित्त-चतुष्पद विषयाकारी । कांता - कान्तारी भ्रमवीत ॥८३॥
सतासत्‍ कर्मे भाव दोन्ही । अस्तासी गेला बोध -तरणि । कामुकें कान्तेचे चिंतनीं । विपरीत करणी मांडिली ॥८४॥
ऐका येणे परते नवल । (३)सद्‍गुरुची अपूर्व अमोल । तस्करबुध्दी हरण शाल । करुनि, कुटिल कार्य साधी ॥८५॥
एवं अहाहा आश्वर्य थोर । विषयार्थी नेणती आपपर । प्रत्यक्ष गुरुसी दुराचार । वंचोनि, अपहारी वस्तूतें ॥८६॥
अहो जे श्रीगुरुतें उतराई । नोहेचि; शिष्यें केलिया कांही । ऐसियासी जो झकवूं पाही । नरका जाई निश्चित ॥८७॥
आतां आसो हें कथन । पुढें काय वर्तमान । घडले, तें चित्त देऊन । श्रोतेजनीं परिसिजे ॥८८॥
मग तया दुष्टे पूर्व दिनीं । जैसा संकेत केला मनीं । तैशापरी वस्त्र घेउनी । पापखाणी पळाला ॥८९॥
हें ’ वीरा ’ सी अकस्मात । अंतरी जाणवलें अकर्मकृत्य । म्हणे वासुदेव निश्चित । केलें विपरित क्रियेसी ॥९०॥
म्हणवोनि वीरें लवडसवडी । धांव घेतल्ली तांतडी । वासुदेवासी कडोविकडी । धिक्कारुनि, वोढी फिरविला ॥९१॥
फिरवूनि आणिला श्रीगुरुपाशीं । वीरें आद्यन्त वर्तल्यासी । सांगतां; येरु खिन्न मानसीं । अधोवदनेंसी लज्जित ॥९२॥
देखोनि तयाए अधोवदना । अंतरी कळवळला श्रीगुरुराणा । म्हणे काय केलेस विचक्षणा । वीरा सुजाणा हे गोष्टी ? ॥९३॥
(४)कनक कान्तादि स्व-कलेवर । असत‍ क्लेशाचें भांडार । तेथें अहं ममतेचा विचार । सुज्ञ साचार स्वीकारी ना ॥९४॥
अरे तूं ऐसिया विचारा । बरवें पाही कीं शिष्य ’ वीरा ’ । जें हें देखोदेखी असताकारा । तया अंबरा इच्छिसी ? ॥९५॥
तरी जाण पां तेंचि परिधान । वेंचोनि, अनाथाचें लग्न । होऊनि; झालिया वंशवर्धन । धन्य कीं न्य़ून विचारी ॥९६॥
या उभयामाजी मातें । सांगें श्रेयस्कर कोणतें ?। ऐकोनि सद्‍गुरुच्या बोलातें । वीरा लज्जेतें पावला ॥९७॥
बोलोनि ऐसें वीरेशासी । निरोप दिधला वासुदेवासी । येरें वंदोनि गुरुपदासी । निरग्रामासी निघाला ॥९८॥
आताम सिंहावलोकनीं । अवधारिजे श्रोतेजनीं शाल सत्पात्री विप्रालागुनी । गुंडाख्य मुनीनें अर्पिली ॥९९॥
मागां वर्णिलें; कृपावंत । गुंडाख्य चरणीचें तीर्थ । घेवोनि, आपुले मनोरथ । केले तृप्त बाजीनें ॥१००॥
तैसेंच दुजें वासुदेवाचें । कृत्रिम कर्मा वर्णिलें साचें । त्याहूनि पुढें महाकुटिलाचें । पडिले वाचे बोल भागा ॥१०१॥
तो हा ऐसा चमत्कार । वर्णू आतां सविस्तर । जेथूनि गुंडाख्याची थोर । कीर्ति साचार वाढली ॥१०२॥
संत बहुत जगी असती । ज्ञानी म्हणवोनि मिरविती । गावोनियां आत्मकीर्ति । द्रव्य लुटिती शिष्याचें ॥१०३॥
ऐसें उपदेशिते दांभिक । पंढरीत होते अनेक । सदा चिंतिती विषयसुख । जैसे बक मच्छार्थी ॥१०४॥
ऐसिया ’ संतांमाझारीं ’ । कोणी एक महामत्सरी । गुंडाख्य यश परोपरी । खुपे नेत्रीं तयाच्या ॥१०५॥
उपदेश घेऊनि श्रीमंतांनीं । गुरु केला गुंडाख्यमुनि । शब्द रिघतांचि ऐसे कानीं । खवळे मनीं दुर्जन ॥१०६॥
बाजीनें आपुला उपदेश । घ्यावा ऐसी तयाची आस । परि ते भंगतांचि; तद‍ द्वेष । धरोनि; नाश आरंभिला ॥१०७॥
गुंडाख्य ते एके दिनी । श्रोतेसी सभामंडपस्थानीं । बैसले असतां भगवदभजनीं । सन्निधानीं श्रीविठठलाच्या ॥१०८॥
इतुक्यामाजी एक उत्कट । आलें स्वामीवरी अरिष्ट । जे, शत्रुनें प्रेरिली मूठ । आली नीट अंतरिक्षी ॥१०९॥
देखोनि दुर्धर अद‍भुत । शिष्य झाले भयाभीत । म्हणती हाय हाय घात । झाला निश्चित सद्‍गुरुचा ॥११०॥
जाणोनि परिजनांची स्थिती । गुंडाक्य त्यांते अभय देती । बाप हो आघवें निश्चितमती । विठ्ठ्लमूर्ति चिंतावी ॥१११॥
ऐसें बोलोनि धिक्कारिली । तंव ते तात्काळ पसरली । जावोनि त्यातेंच आदळली । जिये प्रेरिली स्वामीवरी ॥११२॥
देखोनि ऐसा चमत्कार । सर्वांसी वाटले नवल फार । म्हणती आम्ही नेणों पामर । महिमा थोर साधूचा ॥११३॥
नेणोनि सद्‍गुरु सामर्थ्य । आम्हासी वाटली भीति व्यर्थ । देखे केवढा हा अनर्थ । क्षणार्धात निवारिला ॥११४॥
अहो जैं लांडगा ओरडे । ऐकोनि ’ अजा ’ भीति ती पडे । परि त्या अल्पजीवें बापुडे । सिंहापुढे काय कीजे ! ॥११५॥
नातरी वृक्ष झंझावात । उपडोनि पाडी क्षणांत । म्हणोनियां तो काय शक्त । होय पर्वत-उन्मूलनीं ? ॥११६॥
ना ते जेवीं मरीचिवरी । चूळ सांडिल्या फिरे मघारी । तेवीं त्या कु-मतीसी झाली परी । निजांगावरीच आदळली ॥११७॥
अहो सज्जनाचा छ्ळ । मूर्खत्वें करिती दुष्ट खळ । तरी त्या दोषाचें लागवेग फळ । कुकर्मे तात्काळ पावती ॥११८॥
असो, यापरी तो शठ । देखोनि माघारा फिरली मूठ । विवंचोनि मनीं अवीट । दुजें कपट चिंतितसे ॥११९॥
म्हणे गुंडाख्यतपावरी । क्रिया आमुची न चले बरी । यालागीं तच्छिष्यावरी । मंत्रकुसरी चालवावी ॥१२०॥
तंव तो अवसर घडोनि । आला; ऐकिजे श्रोतेजनीं । एके समयीं सिंकतांगणी । ’ वीरेश ’ कीर्तनीं ठाकला ॥१२१॥
सहस्तावधी श्रोते संत । कीर्तनासी बैसले होते । तें अवसरी मूठ तेथें । दुष्टें अहितें प्रेरिली ॥१२२॥
मूठ पावली तिये ठायीं । देखोनि अंचचलित ह्र्दयीं । प्रतिकारार्थी लवलाही । अंगुली तयीं फिरविली ॥१२३॥
तंव काय जाहले नवल । अंबरी तप्त लोह गोल । विद्युल्लतेपरी चंचल । अंतरिक्षी अचल फिरतसे ॥१२४॥
जे हे अलातचक्रापरी । अग्नि गोळ भ्रमे अंबरीं । देखोनि श्रोतयांचे अंतरी । भीति ते अवसरीं दाटली ॥१२५॥
देखोनियां भीत वदना । वीरेश देई आश्वासना । मा भैषी ऐसिया वचना । बोलोनि जना थापटी ॥१२६॥
म्हणे आज्ञेवांचोनि कोणी । न वचिजे मात्र सभेंतुनी । इतुकी कृपा श्रोतेजनी । आजचे दिनी करावी ॥१२७॥
तैं ऐसी वदलिई गंभीर । वीरेशवाणी अभयोत्तर । तंव हरिनामाचा गजर । निःशंक निर्भर चालिला ॥१२८॥
यापरी भजनाचा कडाखा । चालिला आहे; तोंवरी देखा । शत्रूसी ऐसी वाटली शंका । निजयत्न फुका होईल कीं ॥१२९॥
म्हणोनि तो दुराचारी । दुजेनि आणिक प्रेरी । सणसणोनि आली बाणापरी । वीज अंबरीं जेवीं का ॥१३०॥
जाणोनि दुरात्म्याचे कपट । वीरेश फिरवी अंगुली उलट । मागुती ते पूर्ववत्‍ मूठ । फिरे नीट गरगरा ॥१३१॥
यापरी ते उभय गोल । अंबरामाजी भ्रमती वर्तुळ । देखोनि आश्चर्य; भयाकुल । श्रोते सकळ विस्मित ॥१३२॥
तंव ते निशी याम एक । जाहली म्हणोनि श्रोते सकळिक । सूचनार्थी श्रीगुरुसी सम्यक । विनित सेवक विज्ञापिती ॥१३३॥
ऐकोनि वीर्श ते वेळा । कीर्तनान्ती उत्साह सोहळा । आरती करोनि घननीळा । प्रसाद सकळां वांटिला ॥१३४॥
मग तो निर्द्वद्व योगीश्वर । निजकरांबुजीं घेवोनि शस्त्र । वामांक चिरोनि मूठ साचार । गुरुनाम गजरें निक्षेपी ॥१३५॥
तेवींच सव्याक चिरोनि पाही । दुजी आवाहिली लवलाही । तीही गुंडाख्य नामोत्साहीं । सशांत समाये शरीरीं ॥१३६॥
असो, यापरी जयजयकारी । वीरेशें आज्ञापितां नरनारी । जाती आपुलाले मंदिरीं । धन्यता अंतरी न समाये ॥१३७॥
एक वानिती गुंडोराया । एक लागती वीरेश पायां । एक म्हणती पंढरिराया । नेणवे माया अघट तुझी ॥१३८॥
येर येरां अलौकिक । वनिती वीरेश कौतुक । म्हणती गुंडाख्याहुनि देख । येणें अलोकिक दाविलें ॥१३९॥
यानंतरें लोटतां निशी । वार्ता दुमदुमली पंढरीसी । विश्वतोमुखीं गुंडूरायासी । विदित आपैसी जाहली ॥१४०॥
वीरेश कीर्ति आयकोनी । संतुष्ट जाहला गुंडाख्यमुनि । वीरासी बहु परी वाखाणी । देखोनि करणी तयाची ॥१४१॥
धन्य धन्य बा रे शिष्या । सार्थक्य कीजेले आयुष्या । किती मी वानूं तुझिया यशा । अतुल संतोष देतसे ॥१४२॥
मी तो मुठी धिक्कारिली । परि तुवां तें अंगीकारलि । मजपरिसही तुवां केली । कीर्ति भली महीवरी ॥१४३॥
असो यानंतरीं श्रीगुरु । जो विज्ञान-वनींचा सुरतरू । निजान्तरीं करीत विचारु । देहादर सांडोनी ॥१४४॥
ब्रह्मी लीन जालियावरी । जो राहाटे देहधारी । काय तया चाड दुसरी । महीवरी जियावया ? ॥१४५॥
तरी त्यांचें मुख्य व्रत । हेंचि होय जे निश्चित । की जे संसारी पतित । तयांचे हित करावया ॥१४६॥
परी आतां ही कर्तव्यता । पुरली आमुची तत्त्वतां । जो माया-तमाचा हर्ता । वीरेश सविता उदेला ॥१४७॥
यालागीं निज सिंहासनीं । स्थापावा शिष्य-शिरोमणि । ’ वीर ’ विज्ञानाची खाणी । कंठमणी जीवींचा ॥१४८॥
ऐशियापरी विवंचोनि । सद्‍गुरु बैसले पद्मासनीं । ब्रह्माण्डीं प्राण आकर्षोनि । तट्स्थ तत्क्षणीं जाहलें ॥१४९॥
देखोनि तया समाधिस्थ । शिष्य गजबजलें समस्त । म्हणती काय हा अकस्मात । आम्हां अनर्थ वोढवला ! ॥१५०॥
एकाएकी सद्‍गुरु आम्हां । सोडोनि गेले परंधामा । स्थान नाहींच विश्रामा । सरली सीमा सुखाची ॥१५१॥
ऐशापरी शोक करिती । दोहीं हातें ह्र्दय पिटिती । वारंवार पास सेविती । गुण गाती सद्‍गुरुचे ॥१५२॥
मग तयामाजीं सुज्ञ एक । आवरोनि दुःखासी, नावेक । म्हणे बाप हो पुरे शोक । पुढील तांत्रिक विचारा ॥१५३॥
ऐकोनि तयाची वाणी । शोक सांडिला शिष्यजनीं । पुढील कृत्य आणोनि मनं । तयाचे यत्नीं लागले ॥१५४॥
इतुकियामाजी तेथ । गुरुपत्नी आली धावत । जाणोनि स्वामीचें इंगित । शिष्यांप्रति वदतसे ॥१५५॥
अरे हो काय हा अनर्थ । तुम्हीं मांडिला आजि व्यर्थ । मातें पुशिल्यावीण अवचित । प्राणनाथ केवीं जाय ? ॥१५६॥
परी हे सतीचे शब्द चित्ता । कोणीच नाणिती तत्त्वता । म्हणती आमुची भोळी माता; । विलंब आतां न कीजे ॥१५७॥
अहो लेशही नसे श्वास । लोपता नयनींचा प्रकाश । ठेवितां स्त्री-शब्दी विश्वास । होईल उपहास लौकिकीं ॥१५८॥
ऐशियापरी तियेची उक्ति । शिष्य अवघे धिक्कारिती । इतुक्यामाजी सौभाग्यवती । स्नान करिती जाहली ॥१५९॥
मग ते गुंडाख्याची रमणी । नित्य नेमादि पूजा सारुनी । पतीपुढे दीनवाणी । जोडोनि पाणि बैसली ॥१६०॥
भावें विनवी भ्रतारासी । स्वामिया हे तुमची दासी । चरणतीर्थ घ्यावयासी । चरणापाशीं पातली ॥१६१॥
परि हे कांतेची दीन वाणी । रिघों न शके गुंडाख्य श्रवणीं । जे लागोनि गाढ उन्मनी । स्तब्धासनीं बैसले ॥१६२॥
मग दीर्घ स्वरें पतिव्रत्ता । अहो जी म्हणे प्राणनाथा । सांडोनि हे मौनावस्था । देई पदतीर्थ दासीतें ॥१६३॥
ऐसा आपुला संप्रदाय । पुशिल्याविना कोठें न जाय । परी आजिचें हें भलतेंच काय । सद्‍गुरुराया आठवलें ? ॥१६४॥
जरी झाली वेडीपिशी । तरी मानवली ही तुम्हासी । मग आजचि कां हे दासी । अव्हेरिसी सांग पां ? ॥१६५॥
काय म्या कीजेला अपराध । जेणें आला इतुका क्रोध ? । अथवा आज्ञेसी तरी विरोध । नेणवे कधीं आणिला ॥१६६॥
नातरीं; हा विनोद नोहे कीं ! । परी न साजे हें वार्धक्यीम । हसें होईल सर्व लोकीं । गोष्टी निकी अवधारी ॥१६७॥
बोला बोला पतिराय । केवीं सांडू मी हे पाय । अवघें कारुण्य्य सरलें काय ? । यापरी माय विनवीत ॥१६८॥
विनविता सतीचा वदनेन्दु । पाझरी वचनामृताचा बिंदु । तेधवां तो कारुण्यसिंधु । नेत्रारविंद विकासी ॥१६९॥
देखोनि प्रियेतें अग्रभागीं । काय बोलो गुंडाख्य योगी । सरले आमुचें कर्तव्य जगीं । यालागी बरवें हें ॥१७०॥
ऐकोनि पतीचे भाषण । म्लान झालें तियेचें वदन । म्हणे मी ऐशी अनाथ दीन । जगी राहून काय करुं ? ॥१७१॥
आम्हां स्त्रियांचे आभरन । सांडोनि सज्जना तुझे चरण । जगामाजी जें संसरण । याहुनि मरणा मी मानवे ॥१७२॥
अगा परिसे प्राणनाथा । आधींचि तूं माझा भर्ता । माजीं झालासी मोक्षदाता । चरणतीर्था देवोनी ॥१७३॥
ऐसा उभयपक्षीं मजला । झालासी विजयध्वजु तूं आगळा । तरी सांडूनि या चरणकमळा । मी विरहानळा के साहूं ? ॥१७४॥
तुमच्या वियोगें लोक सकळ । अगा जाहले बहु व्याकुळ । तरी हे कांताचि मी, विव्हळ । होय; हें नवल कायसें ? ॥१७५॥
तैं प्राणनाथा येतुलें कीजे । दीन प्रार्थने चित्त दीजे । जाणेंचि; तरी इया भाजे । संगें नेइजे निजधामीं ॥१७६॥
नातरी माझिये तनूची । अवधि असे जेतुली साची । तेतुली कांता, मर्त्युलोकींची । वस्ती नियमेंचि पाहिजे ॥१७७॥
या उभयांमाजी मना । मानवे तें करी सज्जना । दोहींवेगळें हे अंगना । अणुमात्र स्वीकारीना अनर्थु ॥१७८॥
ऐकोनि सखीचें भाषण । विरालें तयांचे अन्तःकरण । जेवी उदकीं टाकितां लवण । तेवीं तो स-करुण वदतसे ॥१७९॥
सुगुणी तुझी मनोरथ । भंगणें; मातें नव्हे उचित । तरी आणिक एक संवत्‍ । राहेन जगांत तुजसाठी ॥१८०॥
ऐसी ऐकोनि अभयवाणी । आनंदाश्रु लोटले नयनी । जेवीं गर्जतां मेघध्वनि । हर्षे मनीं चातक ॥१८१॥
देखोनि ऐसे सतीचे चरित । शिष्य झाले आश्चर्यभरित । म्हणती आम्ही प्रमादी मत्त । माता व्यर्थ निंदिली ॥१८२॥
अहो जयाचा जाहला लोप । ऐसा सद्‍गुरु-प्राण-दीप । घालोनि स्वभक्तीचें तूप । सतीनें कुलदीप उजळिला ॥१८३॥
ऐसी आमुची पूज्य माता । जे अद्वितीय पतिव्रता । नेणोनि तियेची सामर्थ्यसत्ता । आम्ही वृथा धिक्कारिली ॥१८४॥
यापरी अनुतापा चित्ती । पावोनि ; मातेसी विनविती । आम्ही अज्ञ मूढमति । अपराध क्षांति असावी ॥१८५॥
असो आतां आणिक एक । सांगेन सद्‍गुरुचें कौतुक । चित्त देऊनि नावेक । श्रोती सम्यक परिसावे ॥१८६॥
एके दिवशीं गुंडाख्यांनी । ऐसा विचार आणिला मनीं । कीं स्वभार्या पति-सेवनीं । सत्त्वें कसोनि पहावी ॥१८७॥
म्हणवोनि योगबळें नावेक । सर्वांगीं उठविले स्फोटक । रक्त पूय दुर्गंधी देख । कृमि अनेक तयामाजीं ॥१८८॥
कोणी नये आसपासी । शिष्य कंटाळले मानसीं । सती सत्त्वशील तेजोराशि । ऐशिया अवस्थेसी विटेना ॥१८९॥
नित्यनेमें प्रातःकाळीं । उष्ण निर्मळ गंगाजळीं । पतीसी घालोनि आंघोळी । अंग क्षाळी तयाचें ॥१९०॥
निवडूनि कृमी आपुल्या हातें । स्वच्छ पुसोनि अंग -क्षतें । लावी सती औषधातें । पळही रितें न वचेचि ॥१९१॥
निजवोनि कांतातें मंचकावरी । अनुदिनी सन्निधी सुंदरी । स्वहस्तें घेऊनि चामरी । स्वयें निवारी मक्षिका ॥१९२॥
ऐशियापरी ती सुंदरी । नित्यनेमें नाना उपचारीं । प्राणपतीची सेवा करी । परी व्याधी बरी नोहेचि ॥१९३॥
लोक म्हणती गुंडाख्यासी । आपण उपदेशिलें बाजीसी । म्हणवोनि या शरीरासी । प्राप्त ऐसी दुर्दशा ॥१९४॥
शिष्य-पातकाचें फळ । गुरुप्रति फळलें तात्काळ । ऐसे नानापरी वाचाळ । करिती बरळ वल्गना ॥१९५॥
पुरुषा बाधती स्त्रियेचे दोष । पुत्रसंतानें पावे मोक्षास । अथवा परान्नें पुण्य-नाश । ऐसी भाष शास्त्राची ॥१९६॥
परी या कर्ममार्गीच्या वल्गना । काय बाधिती साधुजनां ? । जयांचे चित्त निरंजना । सनातना मिळालें ॥१९७॥
परी न करोनि वाग्वादासी । गुंडाख्य ’ हो जी ’ म्हणे सर्वांसी । जिही ज्या केलें व्यवसायासी । भोगणें तयासी सहजेंचि ॥१९८॥
असो, जैं सरलें संवत्सएर । तेचि दिवशीं तच्छरीर । पूर्वील जैसें मनोहर । त्याहुनि सुंदर जाहलें ॥१९९॥
जैसा राहुग्रस्त दिनकर । पर्वकाळीं स-तिमिर । परि तोचि पर्वानंतर । अत्यंत रुचिर शोभतसे ॥२००॥
नातरी जैसा हुताशन । धूम्रीं वसे परिच्छिन्न । परि त्याचें होतां निवारण । भासे नयना सोज्ज्वळ ॥२०१॥
अथवा जैसें गंगाजळ । जंववरी असे पर्जन्यकाळ । तंववरीच दिसे गढूळ । मागुती निर्मळ होय जैसें ॥२०२॥
तैसा गुंडाख्य कृपानिधि । जो बळेंचि पांघुरला व्याधि । झाल्या संवत्सर संकेतावधि । तेजोनिधि भासला ॥२०३॥
येर्‍हवी तरी जे आत्मजाया । तियेची भक्ति देखावया । करुनि व्याधिग्रस्त काया । दाविली माया गुरुरायें ॥२०४॥
परी नवल ते सुंदरी । अनन्यभावें सेवा करी । जैसा सांब वेषधारी । श्रियाळीं स्वकरें सेविला ॥२०५॥
असो, मग तो करुणानिधि । म्हणी आतां पुरली अवधि । घ्यावया देहान्त समाधि । स्नाना नदिये पातला ॥२०६॥
मग चंद्रभागेचें स्नान । करुनि पांडुरंगाचें पूजन । बोलावूनि शिष्यजन । भगवद‍भजन आरंभिलें ॥२०७॥
सभोवती मांदी भक्तजन । माजीं घातलें पद्मासन । त्यावरी गुंडाख्य बैसोन । ब्रह्मी लीन जाहलें ॥२०८॥
शुध्द तृतीया आश्विन मास । सहा घटिका आला दिवस । गुंडाख्य सद्‍गुरु योगाधीश । समाधिसुखासी मीनले ॥२०९॥
प्रयाणकाळीं ऐशी आज्ञा । गुंडाख्यें दिधली शिष्यजनां । की बा तुम्ही बाजीचे धना । चरम विधाना न लाविजे ॥२१०॥
मग सद्‍गुरुचें चरणदर्शन । घ्यावया आले सकळ जन । स्वकष्टें आर्जिलें संचित-धन । करिती अर्पण गुरुपदीं ॥२११॥
लोक मिळाले असंख्यात । समारंभें गात नाचत । शंख, भेरी आणि नौबात । वाद्यें अगणित नानाविध ॥२१२॥
ऐसा वाद्यघोष गंभीर । माजी हरिनामाचा गजर । तेने दुमदुमिलें अंबर । पंढरीनगर आघवे ॥२१३॥
घेवोनि निशाणें भगवी करीं । गात नाचत वारकरी । पुष्पें उडविती गुंडाख्यावरई । नवल वैखरी न बोलवे ॥२१४॥
ऐसा समाधि उत्साह । संपादोनि जनसमूह । परतोनि येतां; श्रीगुरुविरह । अति दुःसह वाटला ॥२१५॥
श्रीपुंडलीक भक्ताचे सन्निधी । जेथ वाहे भीमानदी । तेथ सद्‍गुरुची समाधी । शिष्ये आनंदे बांधिली ॥२१६॥
ऐसा हा अध्याय विसावा । जे गुंडाख्य कथा अभिनवा । अल्पमति वर्णूनि; देवाधिदेवा । अर्पिले केशवा निजदासें ॥२१७॥
इति श्रीसिध्दचरित्र भाव । भवगज विदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥२१८॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंसः ॥

॥ अध्याय विसावा संपूर्ण ॥


टीपा :- (१) जियेचे तीरी श्रीरामचिद्‍घन । साकार सगुण देखिला -ओवी १२ :-
येथील १० ते १३ ओव्यांचा अर्थ पाहतां असें दिसतें कीं ह्या विसाव्या अध्यायाचे ओवीकर्ते ’ कृष्णसुत ’ यांना सद्‍गुरु
श्रीतिकोटेकर महाराजांचे प्रथम दर्शन श्रीगोदावरीकांठी नाशिक क्षेत्रीं झालें असावें. श्रीगुरुंचें नांवहि श्रीराम असल्यामुळे
पुढील २६ व्या ओवीपर्यंत श्रीरामप्रभु व गोदावरी तीर्थाच्या मिषानें कृष्णसुतांनीं सद्‍गुरु स्तवन केले आहे.

(२) ’ सो ’ या स्मरणें निवविलें -ओवी २० :- श्रीरामचंद्रयोगी महाराजांनी ’ सोऽहं ’ जपाची धारणा देऊन त्रिविध तापांची
बोळवण केली. जन्ममरण परंपरेवर मात करण्याचें साधन सांगून आत्मतृप्त केलें असा अर्थ आहे

(३) सद्‍गुरुची अपूर्व शाल.....कार्य साधी -ओवी ८५ :-
ह्या ओवीचा अर्थ घेतांना पदांचा अन्वय असा: [तो] कुटिल [ वासुदेव ] सद्‍गुरुची अपूर्व अमोल शाल तस्करीबुध्दी हरण
करुनि कार्य साधी. ओवी ७७ पासून एक नवा चरित्रप्रसंग वर्णिला आहे. वासुदेव नांवाच्या गुंडा महाराजांच्या एका
सेवेकर्‍यानें स्वतःच्या लग्नासाठी कोंकणांत गांवीं जाण्याकरितां व विवाहाकरितां द्रव्याची तरतूद करावी या हेतूने श्रींची
भारी शाल चोरली अशी कथा आहे.

(४) कनक कांतादि ....वीरा लज्जेते पावला -ओव्या ९४ ते ९७ :- कोणत्याही प्रकारच्या उत्कृष्ट चरित्र चित्रणांत स्वभावदर्शन
हा एक महत्त्वाचा घटक असतो. ८९ ते ९७ या नऊ ओव्यांतून वासुदेव, वीराप्पा व श्रीगुंडा महाराज यांचे स्वभावदर्शन
कवीनें थोडक्यांत फार मार्मिकतेनें घडविलें आहे. साधुपुरुषांच्या सेवेंत राहणारे सर्वच लोक वैराग्यशील व पारमार्थिक
कृपेसाठीं सेवा करतात असें नाहीं हे वासुदेवाच्या वर्तनावरुन दिसतें. वीरप्पांसारखे जे कोणी वैराग्यसंपन्न व मुमुक्षु वृत्तीचे
सेवेकरी असतात त्यांना स्वतःच्या शुध्द वर्तनामुळें इतर कोणाचे कसलेहि गैरवर्तन सहन होत नाहीं व त्याची प्रतिक्रिया
चटकन बोलण्या वागण्यांत होते याचें दिग्दर्शन वीराप्पांच्या कृतींतून दाखविलें आहे. ’ सर्वत्र सर्वकाळ एक श्रीहरीच आहे ’
अशा बोधावर असलेले सद्‍गुरुनाथ हे परमकारूणिक असतात त्यामुळें शिष्याकडून घडलेल्या अपराधांची क्षमा करुन ते
त्याला सुधारण्याची संधि देतात. हा स्वभावविशेष श्रीगुंडामहाराजांच्या चित्रणांत दिसतो. विरक्त व मुमुक्षु वृत्तीच्या साधकाला
ही क्षमाशिलता अंगीं पक्की बाणविणें जरुर असते व म्हणूनच सद्‍गुरु अशा शिस्तप्रिय पण विरक्त साधकाला अशा
प्रसंगी मुद्दाम तत्त्वबोध करतात आणि तो साधकही ’ हे समस्तही श्रीवासुदेव ही धारणा राखण्यांत आपलें स्खलन झाले.’
असे समजून लज्जित होतो. वासुदेवासारख्या विषयासक्त सेवेकर्‍याला उपदेश करुन कांहीं उपयोग नसतो हेंहि श्रीगुरु
ओळखून असतात व म्हणून ९८ व्या ओवींत कवि म्हणतात, ’ बोलोनी ऐसे वीरेशासी । निरोप दिधला वासुदेवासी ।
कठिण शब्दार्थ : सुष्ठु = उत्तम, चांगले  (६) अवचटें = अवचित, अकस्मात (१०) नानौध = [ नाना=ओघ ] अनेक प्रवाह
(१८) नदी= गद म्ह. रोग नदी म्ह. रोगी (२३) सुप्लव = चांगल्ळी नौका (२४) सपर्या = पूजा (५८) गजवाजी = हत्ती घोडे,
शिबिकायान = पालखी हे वाहन (७१) झकविणें = फसविणें (८७) देखोदेखी = उघड उघड; अंबर = आकाश, वस्त्र ( येथील अर्थ )
(९५) मच्छार्थी = माशाची इच्छा करणारा [बगळा] (१०४) अज, अजा = बोकड, शेळी (११५) मरीचि = सूर्य
(११७) सिकतांगण = वाळूचे अंगण, लक्षणेनें पंढरीचें वाळवंट (१२१) अलातचक्र = [ अंधारांत ] कोलीत [ अलात ] फिरविल्यावर
जे प्रकाशाचें वर्तुळ [ चक्र ] भासते तें (१२५) मा भैषी = भिऊं नका (१२६) भाजे = [मूळ भाजा -सं. भार्या ] बायकोला (१७६)
सत्त्वें कसोनि = सत्त्वपरीक्षा करुन ( १८७) जाया = (सं) धर्मपत्नी (२०४) चरम विधि = शेवटचा संस्कार अर्थात अंत्यविधि (२१०)

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP