श्रीगणेशायनम: ॥
नमो गुरुमूर्ति तुळजाभवानी । मोहमहिषासुर मर्दिनी । क्रोध-दंभ चंडमुंड निवटुनी । भक्तां निजपदीं स्थापिसी ॥१॥
(१)नवविधा भक्ति नवरात्र । घटस्थापना आधारचक्र । ज्योति अखंड निरंतर । निजप्रकाशें प्रकाशीत ॥२॥
नाना वासना सप्तधान्यें । विरुढती ऊर्ध्ववदनें । नवमी झालिया त्यांतें छेदणें । यथानिगुती बोलती ॥३॥
अष्टमी सख्य होता जाण । मग कैचें निद्राभान ? सहज घडे जागरण । श्रमरहित निजभक्तां ॥४॥
ऐसें घालितां नवरात्र । भक्त जाहले प्रीतिपात्र । सहज उत्थानीं उदितगात्र । होय मानस तुझें पैं ॥५॥
विजया-दशमी जनसमूहो । इंद्रियगणांचा होता लाहो । तेथें तुझीच राणीवो । दुजेपणेंविण शोभतसे ॥६॥
जन्ममरणावरी घावो । घालावया नसे ठावो । सहजानंदीं विजयी पहा वो, । गुरुमाउली अससी तूं ॥७॥
ऐसा उदेलिया दिन । मग सर्वही कु-वर्ण । जाऊनि, पहावे तें सुवर्ण । दृष्टिगोचर होतसे ॥८॥
ऐसे सद्गुरु अनादि माया । जी ब्रह्मादिकां न पडे ठाया । ती निजभक्तां येत आया । नवविधा भक्तिभावें ॥९॥
मातें तुझें वर्णन न करवे । अवनीचे कण न मोजवे । तूंतें नमन सर्वभावें । त्वदंशेंचि करीतसे ॥१०॥
श्रीसांबाची आज्ञा घेउनी । मच्छिंद्रनाथ निघाले तेथुनी । संचार करावया मेदिनी । गतकथार्थ इतुकाचि ॥११॥
साक्षात् विष्णूचा अवतार । त्यावरी वरद जाहला शंकर । करावया जगदुद्धार । सहज लीलें विचरती ॥१२॥
नाथें जयासी विलोकिलें । ते अंधही नेत्र पावले । मुके बोलूं लागले । बधीर ऐकती सुश्रवणें ॥१३॥
गलित् कुष्ठी शुद्ध होती । दरिद्री भाग्यातें पावती । अनाचारातें सांडूनि देती । शुद्धाचारा राहाटुनी ॥१४॥
जये देशीं नाथागमन । तेथें दरिद्राचें अवर्षण । कदाकाळीं न घडे जाण । अकाळीं मरण न पावती ॥१५॥
वसुमती होय सुपीक । स्वधर्मे राहाटती सर्व लोक । ऐसा गमनाचा प्रभाव देख । किती म्हणोन वर्णावा ? ॥१६॥
नाथाचें साद्यन्त चरित्र सांगे । ऐसा जाहला नाहीं मागे । तथापि यथामति प्रसंगें । त्याचे कृपेनेंचि वर्णावें ॥१७॥
जनसमूह सर्व अनाथ । त्यांसी करावया सनाथ । हा अवतार पूर्ण नाथ । आदिनाथेंचि धरियेला ॥१८॥
दु:ख पाहूनि जनांचें । मिष करुनि मच्छिन्द्रनाथाचें । आपणचि अवतरले साचे । श्रीआदिनाथ सांबमूर्ति ॥१९॥
येर्हवी तरी तदंशेविण । जगीं वर्तो जाणे कोण ? ज्याचे कीर्ति जगपावन । दीनजन-रक्षक ॥२०॥
असो, संचार करीत भूमीं । पावले बत्तीस - शिराळें ग्रामीं । (२)तेथें एक द्विज षतकर्मी । वेद निरंतर म्हणतसे ॥२१॥
नाथें नित्यकर्म सारोनी । समाधिसुख अनुभवोनी । जग तारावया भिक्षेलागुनी । ग्रामामाजी फिरतसे ॥२२॥
जो क्षीरसागरविहारी । लक्ष्मी जयाची अंतुरी । तो नाथ मार्ग दावावया निर्धारी । भिक्षेनिमित्त फिरतसे ॥२३॥
भिक्षाहारी निराहारी । भिक्षा महापरोपकारी । हे प्रकटावया जगदंतरी । भिक्षाटण करीतसे ॥२४॥
तो ब्राह्मण घरीं नसे । ब्राह्मणाची स्त्री घरीं वसे । ऐसिया समयीं अति उल्हासें । नाथें `आदेश' म्हणतिलें ॥२५॥
तंव ती शुष्क अन्न घेऊनि करीं । बाहेर आली विप्रसुंदरी । नाथें ते पाहोन अवसरी । सिद्धान्न दे म्हणे जननीये ॥२६॥
शुष्कान्न पाकासी इये वनीं । आम्हा कोठें माता बहिणी ? जरी सिद्धान्न देसी जननी । तरी क्षुधेतें निवारुं ॥२७॥
सत्समागमाचें फळ । फळा आलें तात्काळ । दुर्वासना जाऊनि, सुशील । विप्रपत्नी जाहली ॥२८॥
जैसा मैलागिरी चंदन । सन्निध असतां बाभळीवन । सुवासें करी आपणासमान । तेवींच झालें त्या स्त्रिये ॥२९॥
कीं ते कस्तुरीचे संगतीं । असती वस्तु सुगंध होती । तैसी घडतां सत्संगति । वृत्ति तियेची मुरडली ॥३०॥
अथवा पूर्वसुकृताचें फळ । फलोन्मुख जाहलें तात्काळ । म्हणोनि विप्रस्त्रीस दोन कवळ । सत्पुरुषीं द्यावेसे वाटले ॥३१॥
नातरी ती स्त्री महानष्ट । द्वारीं देखतां सत्पात्र वरिष्ठ । क्रोधें होय अत्यंत रुष्ट । म्हणे जाय अन्य गृहा ॥३२॥
परी नाथमहिमा अति विचित्र । पाषाणासी फुटती पाझर । (३)मा हे सचेतन शरीर । सुबुद्ध जाहल्या काय नवल ? ॥३३॥
उत्तम स्वामिया म्हणवोनि । भेंडियाची शाका घालुनी । अर्धी भाकर आणोनी । नाथाप्रति देतसे ॥३४॥
जठराग्नीस आहार देणें । इतुकेंच नाथाचें करणें । तियेचेंच घरीं बैसोनि, तेणें । दिधलें अन्न सेविलें ॥३५॥
नाथ सिद्ध सदा मुक्त । वर्णाश्रमभेदरहित । कर्मा अकर्मा विरहित । महीम विचरत स्वलीलें ॥३६॥
अहो ज्याचे नि:श्वसित वेद । तो कैसा होय कर्मबद्ध ? । कर्माकर्म विकर्म शुद्ध । तिहींसी तो वेगळा ॥३७॥
असो, दिधलें अन्न सेवूनी । जलप्राशनातें करुनी । नाथ बोलती प्रसन्न वदनीं । तुमचे आश्रमीं तृप्त झालों ॥३८॥
नाथ तृप्त होतांचि जाण । त्रैलोक्यही धालें पूर्ण । पाहोनि सुप्रसन्न वदन । बाई विनविती जाहली ॥३९॥
राया तूं तों सदा तृप्त । परी मज दीनातें कृतार्थ । करावयालागीं आजि समर्थ । पूर्वभाग्यें पातलासी ॥४०॥
जैसा ये गृहीम जाहलासी तृप्त । तेवींचि मातें करी सनाथ । तव दर्शनाप्रभाव अद्भुत । चिरकाल जागृत असावा ॥४१॥
तुझे चरण-चिंतामणि । दृष्टिगोचर मजलागुनी । होतांचि, तात माता दोन्हीं । उद्धरोनी धन्य जाहली ॥४२॥
तुझी कृपादृष्टि जोडे । तरी मुकेही वेद पढे । रंक इंद्रपदीं चढे । कृपालेशें तुझिया गा ॥४३॥
सिंधु भरला असे जळीं । तेथें तृषार्ता एक अंजुळी । कीं मेघ वर्षतां जलकल्लोळीं । चातका तृप्ति बिंदुवेंचि ॥४४॥
तैसे तुम्ही सिद्धयोगी । सामर्थ्ये प्रसिद्ध त्रिजगीं काय न कराल कृपापांगीं । म्हणोनि चरणा लागली ॥४५॥
ऐकोनि तियेची प्रार्थना । प्रसन्न जाहला सिद्धांचा राणा । म्हणे इच्छा असेल जे मना । तेंचि मागे गुणवते ॥४६॥
पूर्वीच सिद्धान्नें संतोष । त्यावरी केलासे वाग्विलास । तेणें झालें निर्भर मानस । वर द्यावया उदित असे ॥४७॥
ऐसें ऐकोनियां वचन । विप्रस्त्री विनवी कर जोडोन । (४)गृहस्वामीस वृत्तिदान । एक सहस्त्राचें असे पैं ॥४८॥
परी पोटीं नसे संतान । पुत्राविणें शून्य सदन । संततिविणें रात्रंदिन । तळमळ चित्तीं होतसे ॥४९॥
अंधार पडिला आमुचे कुळीं । पुत्र देऊनि दीप उजळी । कीर्ति होईल भूमंडळीं । सिद्ध पुरुषा दयाळा ॥५०॥
स्वामी ! ऋतु प्राप्त होऊनी । दोन तपें गेलीं लोटुनी । संतति-आशा मनींहुनी । दूर ठेली दयाळा ॥५१॥
जे जे काही नवस सायास । ते ते केले मियां बहुवस । परी कोणतेही दैवतास । करुणा नये आमुची ॥५२॥
आतां कैची पुत्रप्राप्ति । वृद्ध जाहलों निश्चितीं । तुमची प्रसन्नता देखोनि, चित्तीं । विनवावेसें उद्भवलें ॥५३॥
कल्पतरु आलिया घरां । (५)रत्नें काय न होतील गारा ? । (६)अगस्त्याश्रयें परपारा । सिंधूचिये कां न पावती ? ॥५४॥
तैसें देखोनि तव मुखचंद्रा । भरतें आलें उल्हाससमुद्रा । मनोरथ होईल माझा पुरा । ऐसें निश्चयीं वाटले ॥५५॥
ऐसी विनंती करोनी । स्तब्ध राहिली निजस्थानीं । नाथें विनवणी ऐकोनी । सुप्रसन्न जाहले ॥५६॥
साधू सहजचि दयाळ । त्यावरी बाईचे नम्र बोल । कृपेची दुणावली ओल । काय तिजप्रती बोलती ॥५७॥
म्हणती माते भस्म आणी । बाईनें दिधलें तात्काळ नेउनी । कृपाकटाक्षें विलोकुनी । तियेचे हाती दीधलें ॥५८॥
म्हणती शुचिष्मंत होवोन । भस्म सेवन करी त्रिदिन । तव मनोरथ ते पूर्ण । आदिनाथ करतील ॥५९॥
एक संवत्सराचे अंतीं । पुन्हां येऊनिया गृहाप्रति । तोंवरी होईल संतति । सुपुत्र नयनीं देखशील ॥६०॥
पुत्र होईल ऐसा बिंडा । जयाचा त्रैलोक्यामाजीं झेंडा । कीर्ति वाढवील प्रचंडा । चिंता कांहीं न करी हो ॥६१॥
ऐसा आशीर्वाद देऊनी । मच्छिंद्रनाथ निघाले तेथुनी । तीर्थक्षेत्रें पाहत अवनीं । संचार करीत चालले ॥६२॥
पुढें कथा काय वर्तली । श्रोतीं पाहिजे परिसली । उत्तर प्रकरणीं वहिली । सद्गुरुराज वदवील ॥६३॥
ती कथा अति नागर । परम सुंदर मनोहर । श्रोतीं व्हावे जी सादर । आलस्य निद्रा टाकोनी ॥६४॥
कलियुग केवळ महानष्ट । सर्व प्राण्यांसी केले भ्रष्ट । परमार्थमाग परम वरिष्ठ । कोणातेंही सुचों नेदी ॥६५॥
नाना कुमतें कुमार्गे । जन भरले आडमार्गे । त्यांसी लावावया सन्मार्गे । नाथें संप्रदाय वाढविला ॥६६॥
काय सांग नाथाची प्रौढी । जितुकी वर्णावी तितुकी थोडी । मनुष्यजन्मा येऊनि जोडी । या मार्गाची करावी ॥६७॥
सद्गुरु माझी राम माय । तेणें मज हे दाविली सोय । श्रीपति वंदुनी तियेचे पाय । पंचम प्रकरण संपविलें ॥६८॥
स्वस्ति श्रीसिद्धचरित्र भाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥६९॥
श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत् सोऽहं हंस: ॥
॥ अध्याय पांचवा संपूर्ण ॥
==
टीपा-(१) नवविधा भक्ति नवरात्र-ओवी २ ते ८ :-
श्रीगुरु स्वरुपावर देवीची भावना करुन येथें २ ते ८ ओव्यांतून नवरात्र, महोत्सवाचें उत्कृष्ट पारमार्थिक रुपके केलें आहे. घटस्थापना, अखंड नंदादीप, अष्टमीचें जागरण, दसर्याचें शिलंगण, धान्य, शस्त्रपूजा, सोनें वांटणे,-इत्यादि नवरात्राशी संबंधित सर्व गोष्टींचा अध्यात्मपर उल्लेख वाचनीय व चिंतनास फार उत्तम आहे. अशा रुपकास साहित्यशास्त्रांत `साड्ग रुपक' म्हणतात (पहा : श्रीज्ञानेश्वरींतील अध्याय १२,१५,१६ अध्यायांच्या सुरुवातीचीं रुपकें).
(२) द्विज षटकर्मी - ओवी २१ : - वेद शिकणे व शिकविणें, यज्ञ करणें आणि करविणें तसेंच दान देणें व इतरांनीं दिल्यास घेणें अशी ब्राह्मणाची सहाव विहित कर्मे म्हणून शास्त्रांत सांगीतलीं आहेत.
(३) मा हें सचेतन शरीर - ओवी ३३ :- `मा' याचा अर्थ `असें आहे तर मग' इतका आहे. श्रीनाथ कृपेनें दगडासारखे निर्जीव पदार्थ कठिणपणा सोडून पाझरतात, असें आहे तर मग ह्या जीवंत शरीरांतील बुद्धींत पालट कां होणार नाहीं ? अर्थात् होणारच असा या चरणाचा व एकूण ओवीचा भावार्थ आहे.
(४) गृहस्वामीस वृत्तिदान - ओवी ४८ : - पतीला एक हजार उत्पन्नाची जमीन वंशपरंपरा इनाम मिळाली आहे.
(५) रत्नें काय न होतील गारा ? - ओवी ५४ : - गारा काय रत्नें न होतील ? असा अन्वय. `गारगोट्यांचीं रत्नें होणार नाहींत का ?
(६) अगस्त्याश्रयें परपारा - ओवी ५४ :- अगस्ति ऋषींनीं समुद्र प्राशन केला होता (म्हणून) त्या ऋशींच्या आधारानें समुद्र सहज उल्लंघन करतां येईल त्याप्रमाणें हे नाथा, तुमच्या आशीर्वादानें प्रतिकूल प्रारब्धही बदलेल.
कठिण शब्दांचे अर्थ : - आया येणें = आकलन होणें (९) वसुमती = पृथ्वी (१६) अंतुरी = बायको (२३) `आदेश' म्हणितले = भिक्षेच्या वेळीं नाथपंथी साधु दाराशीं `आदेश' किंवा `अल्लख' पुकार करतात तो (२५) शुष्कान्न = कोरडी भिक्षा-पीठ, तांदूळ इ.; सिद्धान्न = शिजविलेलें अन्न (२६) भेंडियाची शाका = भेंड्याची भाजी (३४) कृपापांगीं = कृपाकटाक्षानें (४५)