मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय चौतिसावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय चौतिसावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशाय नमः ॥
ॐ नमो श्रीगुरु रामा । नमो सद्‍गुरु मंगलधामा । सज्जनाराम कल्पद्रुमा । अज अनामा नमो तूंते ॥१॥
आदि मध्य अवसान । हें तों नाशिवंत त्रिगुण । तें नाहीं जया मुळीहून । साष्टांगें नमन तया माझें ॥२॥
सागराची लहरी । पूजा समर्पी सागरी । माझें नमन तयापरी । श्रीगुरुवर्ये स्वीकारिजे ॥३॥
अहो गंगोदकें गंगें । जेवीं अर्ध्य द्यावया लागे । तेवी तुझे शक्तीचेनि वेगें । करुं लागे स्तवनातें ॥४॥
देह अहंभाव बुध्दि । नाशिली तुवां चिद्‍बोधी । परी देहावसानाधि । घडो त्रिशुध्दी तुझी सेवा ॥५॥
मुखें गावे तुझेचि गुण । लाडे करावे पूजन । श्रवणें तव गुणश्रवण । करावे जाण अहर्निशीं ॥६॥
चरणीं तव दर्शन यात्रा । सर्वदा करावी सुपात्रा । तुझे रुप पाहतां पवित्रा । व्हावा नेत्रा आल्हादु ॥७॥
तूं मूळ मायेचा भर्ता । सर्व करोनि अकर्ता । परावाचेहूनि परता । तारिसी आर्ता स्वनामें ॥८॥
सिध्दचरित्र ग्रंथ । जो तुझा निज गुह्यार्थ । ग्राहक संत श्रोते समर्थ । जाणोनि यथार्थ उघडिला ॥९॥
चकोरासाठी चंद्र । कमलिनीस्तव भास्कर । तैसें तुझें चरित । सुपात्रासाठीं श्रीरामा ॥१०॥
पूर्व प्रकरणाचे अंती । तारावया जनांप्रति । दावावया सत्य प्रतीति । राम विचरती मेदिनीं ॥११॥
श्रीवासुदेव स्वामीचें । ’ वाटेगांव ’ ग्राम साचें । तेथें येणें सद्‍गुरुचें । आपैसेचि जाहलें ॥१२॥
तेथील मुमुक्षु जनां । उपदेशी रामराणा । निरुपणीं आल्हाद मना । गुरुगम्य अनन्या सांगतां ॥१३॥
संस्थानीचें पुराणिक । आणिक तेथील ग्रामनायक । तैसेचि नरनारी अनेक । मुमुक्षु रंक उध्दरिले ॥१४॥
असो, मग तेथूनि पुढारा । अनन्य जनांचा सोयरा । पातला मार्तंडाचिया पुरा । ’ मंगसोळी’ अवधारा ज्या म्हणती ॥१५॥
अथणी ग्रामासन्निध । बेवनूर नाम प्रसिध्द । तेथील ग्रामलेखक शुध्द । वेदप्रबंध पाठक ॥१६॥
वैद्यशास्त्र निपुण । करिती सदा वेदपठण । नामें शंकर सुजाण । श्रीगजानन उपासक ॥१७॥
आधींच शुध्द ब्राह्मण । तयावरी वेदाध्ययन । तयाहीवरी गजानन । औपासन जयाचें ॥१८॥
या आचरणें चित्तशुध्दि । पूर्व सुकृतौघें सिध्दी । फळा येतां परमावधि । होय बुध्दि परमार्थी ॥१९॥
चौर्‍यांशी लक्ष जीवयोनी । भ्रमतां, पावलों चुकोनि । आतां नरतनु चुकल्या येथोनि । पुन्हा जन्ममरणी भ्रमूं का ? ॥२०॥
अहो तिर्यक्‍ पश्वादि देहीं । आहार निद्रादि पाही । भय मैथुन सर्वही । यांत नाहीं न्यूनाधिक ॥२१॥
एक ज्ञान मात्र नाहीं । इतर समान सर्वही । ज्ञानप्राप्ति याच्या ठायीं । यास्तव नरदेहीं प्रशंसा ॥२२॥
ऐसा नरजन्म पावुनी । व्यर्थ घालविला म्यां अयत्नीं । तरी आत्मघ्न मजहुनि । कोण जनीं दुसरा ? ॥२३॥
श्रीगुरु उपदेशाविण । ज्ञाता आन नाहीं साधन । माझा देव गजानन । श्रीगुरु चरण दावील ॥२४॥
जाऊं गणेशवाडीप्रति । प्रार्थू देव श्रीगणपती । करोनियां विचार चित्तीं । शंकर निघती गृहांतुनी ॥२५॥
मार्गी मंगसोळी ग्राम । तेथें भगिनीचें होतें धाम । म्हणवोनि शंकर घ्यावया विश्राम । आले परमसंतोषें ॥२६॥
तेथील ग्रामदैवत । श्रीमार्तण्ड म्हाळासाकांत । शंकर जाऊनियां तेथ । विश्रांति घेत बैसले ॥२७॥
इतुकियामाझारीं । श्रीगुरु रामाची अंतुरी । देवालयीं गमन करी । तो हा नेत्रीं अवलोकिला ॥२८॥
शंकरा पाहतां दृष्टीं । पुत्रस्नेह दाटला पोटी । आश्चर्य करी गोरटी । म्हणे गोष्टी काय हे ? ॥२९॥
अनोळखी हें बाळ । असतां, स्नेहाचे उमाळ । कां सुटती अळूमाळ । वेळोवेळ मजलागी ? ॥३०॥
देवदर्शन शीघ्रगती । घेऊनि, आली गृहाप्रति । झालें वृत्त पतिप्रति । सांगतां, हांसती श्रीराम ॥३१॥
राम विचारी मानसीं । म्हणे हा भक्त तेजोराशि । तियेतें बोलती वो गुणराशी । तूं माता होसी पूर्वजन्मी ॥३२॥
विना स्नेहाचा जिव्हाळा । नये प्रेमाचा कळवळा । ऐसें बोलोनि तये वेळां । राम राहिला स्वस्थचित्तें ॥३३॥
इकडे शंकर चिंताक्रांत । कैं तो भेटेल श्रीगुरुनाथ । माथा ठेवील पद्महस्त । चित्त शांत करील ? ॥३४॥
ऐसा निदिध्यास लागला । तो रात्रीं दृष्टांत जाहला । कीं तुजकरितां पातला । श्रीगुरु भोळा राम येथें ॥३५॥
अनंत जन्मीचें मायबाप । तुज करावया निष्पाप । येथें पातला आपोआप । जे सकृत भवतारुं ॥३६॥
तयाचा घेत उपदेश । सहज जगीं जगदीश । प्रकटेल हे घेई भाष । पाहोनि ऐसे, जागृति ये ॥३७॥
चित्ती आनंद वाटला । तों प्रातःकाळ जाहला । शंकर शुचिर्भूत होऊनि भला । दर्शना चालिला सद्‍गुरुच्या ॥३८॥
नयनीं देखोनिया रामा । सजलजलद मेघःश्यामा । म्हणे मज अनन्या विश्रामधामा । पाववी; निजनेमा देऊनियां ॥३९॥
जाहला तो दृष्टांत । निवेदिला तो यथातथ्य । राम म्हणे मी गृहस्थ । तुम्ही समर्थ विद्वज्जन ॥४०॥
आम्ही नेणों ब्रह्मज्ञान । किंवा उपदेश कारण । ऐकतां हें उदास वचन । भरले नयन शंकराचे ॥४१॥
कंठ जाहला सद्‍गदित । नेत्री लोटले अश्रुपात । केवढा मी म्हणे पतित । मज अव्हेरीत श्रीगुरु ॥४२॥
पाहोनि ऐसी अवस्था । कृपा आली श्रीगुरुनाथा । पद्मकर ठेविला माथा । भवव्यथा वारिली ॥४३॥
आधीच शंकर पवित्र । वरी जाणितले सच्छास्त्र । यास्तव रामकृपे पात्र । होय; चरित्र ऐका तें ॥४४॥
नळिकायंत्रीं दारु । भरोनि केली तयारु । होतां अग्निसंस्कारु । विधीं सत्वरुनि शहाणा ॥४५॥
तैसा शुध्द बहिःस्थिति । अंतरी जपे गणपति । ऐशा नियमें चित्तवृत्ति । शुध्द होती अन्तर्बाह्य ॥४६॥
रामें सन्मुख बैसवोनि । ’ तत्त्वमसि ’ उपदेशुनि । बहिःश्वास आवरोनि । अन्तःपवनी प्रवेशविला ॥४७॥
दावितां भ्रुसंकेत । चतुर जाणे मनोगत । कीं पक्षी अचुंबित । फळ देखत झेंपावे ॥४८॥
तैसा दाविता संकेत । शंकर होय समाधिस्थ । स्वानुन्दसुख भोगीत । वृत्तिरहित सर्वदा जें ॥४९॥
सागरामाजी लवण । मिळतां; सहसा द्वैतभान । उरेचिना एकहीपण । तैसें जाण शंकरा जाहलें ॥५०॥
गुरुशिष्याची मात । राहिली, एकीं एकान्त । सुखसोहळा भोगीत । ते गुरुपुत्र जाणती ॥५१॥
ऐसा पाहूनि शंकर । सुखावला श्रीरामचंद्र । म्हणे धन्य धन्य श्रीगुरुवर । कृपासागर पै माझा ॥५२॥
त्रितापशमन - शेखरें । मोहान्धकार दिवाकरें । भक्तमानसचकोर -चंद्रें । केले खरें बोल ते ॥५३॥
" पात्र पाहोनि उपदेश । करी; न धरी कांही आस । कृपेनें पाहसी जयास । त्यासी महेश तारील " ॥५४॥
आज्ञा जी जाहली । ती खरी करोनि दाविली । किती वानूं गुरुमाउली । महिमा वर्णिली न जाये ॥५५॥
ऐसा श्रीगुरुचा महिमा । स्मरतां, प्रेमा नावरे रामा । नाठवे देह गेह ग्रामा । तेथें सीमा मग कैची ? ॥५६॥
गुरुशिष्य समाधिस्थ । आनंदी आनंद भोगीत । बाह्य स्थितीचा वृत्तान्त । सरला प्रांत येथोनी ॥५७॥
ऐसा भोगीत सोहळा । कांही एक काळ गेला । रामें प्रेमभर आवरिला । पावला पूर्ण स्थितीसी ॥५८॥
जवं पाहे शंकराकडे । तंव ते परब्रह्म रुपडें । साकारले वाडेकोडें । अकर्तृत्व जोडे जयासी ॥५९॥
लाडें मुख कुरवाळोनी । वोसंगी घेत कृपादानी । मग पाठी थापटूनी । धन्य जनीं; म्हणती, तूं ॥६०॥
तुझें धन्य मातापितर । इष्टामित्र कुलगोत्र । धन्य धन्य तुझा आचार । उपास्य साचार धन्य तुझें ॥६१॥
अहो ग्रामांतरालागुनी । जातांचि, ते प्रथम दिनी । कार्य सहजीं सुखरुपपणीं । जरी कां जनीं साधेल ॥६२॥
तरी तोचि शुभशकुन । जाणोनि, कार्य होय पूर्ण । तैसें जाहले आम्हांलागून । निर्विघ्नपण प्रथमेंचि ॥६३॥
सुक्षेत्रामाजीं सुबीज । पेरितांचि विरुढे सहज । तैसें शिष्योत्तमा तुज । धन्य आज उपदेशुनी ॥६४॥
वचन ऐकोनियां गंभीर । सपुलक बाष्पयुक्त शरीर । अति गद‍गद रवें शंकर । प्रत्युत्तर काय बोले ॥६५॥
जी जी स्वामिया कृपाळा । स्वाश्रित भक्तजन प्रतिपाळा । निजात्मसुखाचा जिव्हाळा । दाविला मज दीनातें ॥६६॥
अनंत जन्मीचें दुःख । न लागतांचि क्षण एक । हरिलें; दीधलें बहुत सुख । आत्यंतिक दुर्मिळ जें ॥६७॥
जें न लाभे तीर्थकोटीं । करितां साधनांची अटाटी । शुध्द करुनियां दिठी । उठाउठी दाविलें ॥६८॥
नाना साधन भरोवरी । श्रमलों जी आजवरी । आजी श्रीगुरुपंचाक्षरी । धन्वंतरी भेटलासी ॥६९॥
अज्ञानांधकूप तिमिरीं । भ्रमलों नाना जठरकुहरीं । आजि ’ श्रीगुरु-तमारि ’ । दिशा भरी स्वप्रकाशें ॥७०॥
तुझिया उपकारा उत्तीर्ण । व्हावयासी वस्तु आन । शोधितां, हें त्रिभुवन । न मिळे जाण कदाकाळीं ॥७१॥
तूं देसी अविनाशपदा । निवारिसी सर्व आपदा । देवोनि नाशिवंत संपदा । उत्तीर्ण गोविंदा कैसेनि ? ॥७२॥
एक तनु मनु धन । हें करुनि उपायन । व्हावें तुज अनन्य । हेंचि जीवन दासातें ॥७३॥
ऐसें करोनियां स्तवना । वारंवार प्रदक्षिणा । करुनि, पाहे श्रीवदना । धणी नयना न पुरेंचि ॥७४॥
गडबडा लोळे चरणीं । प्रेमाश्रु पाझरें नयनीं । म्हणें धन्य मी त्रिभुवनीं । श्रीगुरुचेनि जाहलों ॥७५॥
माझे उपास्य दैवत । तूंचि होसी निश्चित । माय बाप गणगोत । तुजविरहित दुजे नाहीं ॥७६॥
श्रीगुरु पुसती प्रेमभरें । काय नवल देखिले बा रे ? । तो वृत्तान्त सांगे त्वरें । कां बावरे चित्त तुझें ? ॥७७॥
काय पावलासी सुख । अथवा वस्तु अमोलिक । संतोषलासी आत्यंतिक । सांग सम्यक कासया ॥७८॥
जोडोनिया दोन्ही कर । काय सांगतसे शंकर । सुखानुभावाचा विस्तार । तो अपार केवी वर्णू ? ॥७९॥
माथां ठेवितां पद्मकर । (१)ऊर्ध्व वोढितां सकार । पूर्ण तेजाचे धुधुःकार । अति सत्वर प्रकाशले ॥८०॥
अहो जी माझी उपासना । त्या प्रतिदिनीं गजानना । प्रार्थीतसे देई दर्शना । परी स्वप्नामाजींही न येचि ॥८१॥
ते अनंत गजवदन । म्हणती आम्ही सुप्रसन्न । जाहलो; माग माग वरदान । इच्छित मन असेल जें ॥८२॥
तैसेंचि सूर्यनारायण । लक्ष्मी उपेन्द्र उमारमण । आदिशक्ति आदिकरुन देवतागण देखिले ॥८३॥
ब्रह्मा तारक रुपें । देखिला जी साक्षेपें । माप नाही नाहीं कृपें । तुमच्या, लोपे कल्पतरु ॥८४॥
जी हे देवतागण । आराधितां देहावसान । जाहले; तथापि दर्शन । होता, कठिण जीवासी ॥८५॥
ते देवतागण समस्त । एक मस्तकीं वरहद्स्त । ठेवितां; जाहले करग्रस्त । ऐसा प्रशस्त कृपादानी ॥८६॥
अनंत विजांचे उमाळे । देखियले एके वेळे । परी दाहकत्व निराळें । ठेवूनि आले वाटती ॥८७॥
अंबरी मोतिये विखुरली । की तीं नक्षत्रे रिचवलीं । तया तेजीं वृत्ति निमाली । ती माजीं गुंतली निघेचिना ॥८८॥
समागमें श्रीगुरु । अससी तूं दीना आधारु । म्हणोनियां हा पामरु । पैलपारु पावला ॥८९॥
नातरी केउता केवा । जी हे देखावया देवा । तुमचे लीलेचे राणिवा । पात्र राघवा केलें मज ॥९०॥
अनुहताच्या घाई । दुमदुमिल्या दिशा दाही । सत्रावीचें अमृत तेंही । स्त्रवे पाही अखंडित ॥९१॥
ऐसा पाहात सोहाळा । पुढें देखिलें सहस्त्रदळा । तेथें श्रीगुरु सांवळा । अव्यक्त डोळ देखिला ॥९२॥
अनंत सूर्याचे प्रकाश । तैसें श्रीमुख सुहास्य । दृष्टी पाहतां सावकाश । धणी चित्तास न पुरेंचि ॥९३॥
तेथें देहेवीण पूजा । करीतसे गरुडध्वजा । उपकरण सामुग्री वोजा । मीचि सहजा जाहलों ॥९४॥
ध्येय आणि ध्याता ध्यान । पूज्य पूजक पूजा साधन । या त्रिपुटी गेल्या विरोन । वृत्ती लीन तव पदीं ॥९५॥
’ मी देही ’ हा हरला गर्व । फावले तव कृपा पर्व । ब्रह्माण्डभरीं मीचि सर्व । रिता ठाव नाहीं कोठें ॥९६॥
द्वैताची हरली मात । तेथें एकपणाचा प्रांत । सरे; निजी निज एकांन्त । आनंदभरित आनंदु ॥९७॥
तें सुख वर्णावया । शिणला सहस्त्रफणिया । जिव्हा दुखंड जालिया । ’ नेति ’ ठाया विवरोनी ॥९८॥
तेथें माझा केउता केवा । माझिया सुखाच्या सुदैवा । श्रीसद्‍गुरो कृपार्णवा । वर्णनीं हेवा कां धरूं ? ॥९९॥
देवा शिष्यचकोर -चंद्रा । निजानंदा चित्समुद्रा । काय वानूं मी उपकारा । चरणीं थारा सदैव असो ॥१००॥
औट हाताची उजरी । मानिली होती आजवरी । एकाएकीं ब्रह्माण्ड भरी । नवलपरीं हें केलें ॥१०१॥
मुळींचा सांगतां वृत्तान्त । वृत्ति तदाकार होत । शंकर जाहला समाधिस्थ । द्वैताद्वैत विसरला ॥१०२॥
जैसें पूर्ण देखोनि चंद्रा । भरतें दाटे समुद्रा । तैसे पाहोनि शंकरा । रामचंद्रा पूर्ण होतसे ॥१०३॥
सच्छिष्यासी पूर्ण ज्ञान । बिंबतां, वाटे समाधान । तें सद्‍गुरुचि जाणे आपण । इतरां जाण टकमक ॥१०४॥
पुत्रवतीची सुखें । वंध्या कैसी वोळखे । जन्मान्ध कौतुक न देखे । तेज -काळोखें सारिखेंचि ॥१०५॥
असो, राम आपुलें खुणें । पाचारुनि शंकरा म्हणे । करी समाधी पारणें । ताटास्थपणें न राहे ॥१०६॥
तुझा तूं ब्रह्माण्डभरी । भरलासी चराचरी । हें दावावया उजरी । समाधि साजिरी दाविली ॥१०७॥
येर्‍हवी अवस्था धरुनी । जें सुख राहे अनुदिनी । ते सुख वृत्त्यवसानी । जाय नासोनि सर्वदा ॥१०८॥
यास्तव सहज समाधी । जे सुख आहे निरवधि । तें भोगी वत्सा सुधी । अन्यथा बुध्दी न करी बा ॥१०९॥
तुझें संचित क्रियमाण । नाथिले अहंभावाचा शीण । होता; तो जळाला येथून । निजीं निजखूण बाणतां ॥११०॥
जो स्वप्नींचा रोगग्रस्त । तोचि चेईरा होता प्रशस्त । उपचारें वीण अस्त । रोग शाश्वत पावतसे ॥१११॥
तैसें आत्मज्ञान होतां । नाश क्रियमाण संचितां । होय; प्रारब्धभोग तत्त्वतां । देहावस्था भोगवी ॥११२॥
देह प्रारब्धा गांठी । घालूनियां, मुळी दृष्टी । ठेवूनि; न व्हावे कष्टी । जग राहाटी वर्तावे ॥११३॥
ऐसें वेदगुह्यसार । शंकरा बोधी रामचंद्रा । जी जी स्वामी म्हणोनि सत्वर । धांवोनि नमस्कार घातिला ॥११४॥
तुझी आज्ञा मज प्रमाण । तेंचि मज वेदानुशासन । ऐसें ऐकतां, सुप्रसन्न । राम वचन काय बोले ॥११५॥
नाथवंश विजयध्वजा । बोधसागरा ममात्मजा । राजयोग परिपक्वबीजा । बोधी प्रजा सुखें आतां ॥११६॥
जग भरलें आडरानीं । सत्य मार्गदर्शक कोणी । न दिसे, शोधितां अवनीं । दृष्टी झणी लागों पाहे ॥११७॥
(२)यास्तव जगदुध्दार । करावया न करी उशीर । कली प्रबल जाहला फार । जन पामर भुलविले ॥११८॥
मज ऐसे श्रीगुरुवरें । आज्ञापिले दयाशेखरें । त्यासी साह्य होई बा रें । परंपरे विस्तारी ॥११९॥
शरण येतील मुमुक्षु । त्यांसी शुध्द मार्गाचा पक्षु । दावी; राही अनपेक्षु । होसी दक्षु म्हणोनी ॥१२०॥
ऐसे होतां अनुशासन । शंकर घाली लोटांगण । म्हणे जी हें कार्य गहन । कैसेनि दीन संपादील ॥१२१॥
जी मी पादत्राणधर । सेवा कामुक दीनकिंकर । केउतें हे कार्य गंभीर । कैसा पामर साधील ? ॥१२२॥
तैसेंचि या थोरिवेतें । नको नको जी देऊं मातें । करीन चरणसेवेतें । या नेमातें नको चुकवूं ॥१२३॥
ऐसे विनवी दीन वाणी । प्रेमळ भक्त शिखामणि । संतोषला कैवल्यदानी । आशीर्वचनीं गौरविला ॥१२४॥
मेघापरी गंभीर वाणी । काय बोले चक्रपाणि । बा रे धन्य या त्रिभुवनीं । चिद्‍रत्नखाणी तूं होसी ॥१२५॥
विद्याविनयसंपन्न । तुजहुनिया न देखों आन । गुरुगौरव संपादून । दाविसी, धन्य म्हणवोनि ॥१२६॥
अधिकार पाहिल्याविण । कदापीही बा रे न बोलूं वचन । आमुची सेवा हेचि जाण । जे लावी जन सन्मार्गी ॥१२७॥
कैसा तरेन सागर । कुंभोद्‍भव न करी विचार । विंध्याचळीं ठाके नर । त्या स्वर्गद्वार सन्निध ॥१२८॥
घेउनियां श्रीगुरुनामा । कार्य साधी शिष्योत्तमा । त्याचा तो चालवी महिमा । वाहावे श्रमा कां आम्ही ? ॥१२९॥
ऐसें बोधूनि प्रशस्त । माथा ठेवोनि वरदहस्त । म्हणे आह्मां साह्यभूत । श्रीगुरुनाथें केलें तुज ॥१३०॥
तदा शंकरें वंदिले चरण । तुझी आज्ञा मज प्रमाण । म्हणे यापरी शिष्यरत्न । सुपात्र पूर्ण पैं केला ॥१३१॥
आणखी बोधिलें कोण कोण । तें पुढें करुं निरुपण । रामचरित्र कथा कहन । वर्णीसा कवण साद्यन्त ? ॥१३२॥
करितां पृथ्वेंचि पत्र । सागर तें मषीपात्र । लेखणी शाखा समस्त तरुवर । गुण अपार न वर्णवती ॥१३३॥
मोजवतील पर्जन्यधारा । वारा मापूं ये सुटे सैरा । परी राघव-गुणागारा । वर्णनीं गिरा कुंठित होय ॥१३४॥
रामचरित्र वर्णन । करितां, चहूं वेदीं मौन । धरिले; तेथें वाक्‍ शून्य । श्रीपति दीन केउतां ? ॥१३५॥
ह्र्दयीं वसोनि श्रीगुरु । चालवी कथाकल्पतरु । येर्‍हवी श्रीपति पामरु । काय विस्तारु करील ? ॥१३६॥
विशेष काय वदूं गोष्टी । स्वयें ग्रंथलेखनीं होती कष्टी । श्रीपति नाम मात्र शेवटीं । स्थापिती पोटी सदय ते ॥१३७॥
कैसे तरी सायास करुं । जगीं प्रसिध्द हो लेंकरुं । ऐसें चिंती मातापितरु । तोचि प्रकारु ये स्थळी ॥१३८॥
हे वाणी मिथ्या की सत्य । गुरुमाउली जाणी तथ्य । सहज लीला जियेची पथ्य । जनां कथ्य नव्हे तें ॥१३९॥
श्रीगुरु-माउलीची गरिमा । वर्णितां वेद उपरमा । पावले; तेथें श्रीपति सीमा । कैसी रामा पावेल ॥१४०॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥१४१॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सम्‍ सोऽहं हंसः ॥

॥ अध्याय चौतिसावा संपूर्ण ॥

टीप - (१) ऊर्ध्व वोढितां सकार.....तेजाचे धुधुःकार प्रकटले -ओवी ८० :-
मंगसोळी गांवी श्रीशंकरभट्ट नाम एका वैदिक, श्रीगणेश उपासक व तीव्र जिज्ञासु अशा ब्राह्मणांस श्रीतिकोटेकर
महाराजांचा उपदेश झाला. त्या वेळचे अनुभव शिष्य येथें सांगत आहे. पूर्वी एका टीपेत लिहिल्याप्रमाणें श्रीगुरुंचा शक्तिपात
होतांच कांहीं साधकांना ताबडतोब तेजाचे, नादाचे अनुभव येतात. या ओवीतील ऊर्ध्व वोढितां सकार हा चरण, सांप्रदायिक
साधकांन्दा नित्य अभ्यासाच्या दृष्टीने विशेष चिंतनीय आहे.

(२) यास्तव जगदुद्धार । करावया न करी उशीर - ओवी ११८ :-
या प्रकरणातील श्रीशंकर भटजींची उपासना, शुध्द मनोभूमिका व अनुग्रहानंतर ताबडतोब आलेली प्रचीति हें पाहून
श्रीरामचंद्र महाराजांनीं त्यांना, इतर जिज्ञासूंना दीक्षा देण्याचा अधिकारही दिला. महाराजांनी हजारो शिष्यरुपी लोहाचे सुवर्ण
तर केलेच पण अनेक सुवर्णरुपी अधिकारी शिष्यांना परिसत्वही दिले होते. त्यामुळें या गुरुपरंपरेचा श्रीतिकोटेकर
महाराजांपासून अनेक शाखारुपानें खूप विस्तार झाला. श्रीस्वामी स्वरुपानंदांचे परमगुरु श्रीरुकडीकर महाराज म्हणजे असाच
एक संप्रदायांतला ’ परिस ’ होता !

N/A

References : N/A
Last Updated : March 10, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP