मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय तिसरा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय तिसरा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला गेला.


श्रीगणेशाय नम: ॥ ॐ नमो जी शंकरा । गौरीवरा गंगाधरा षडानन गजानन कुमरां । अंकीं घेऊनि शोभसी ॥१॥
देवा तुझे केशाग्रांचा । गंगा पावली आश्रयो साचा । म्हणोनि जग उद्धरावयाचा । भाग्योदय तिये अंगीं ॥२॥
येर्‍हवी आपगा अधोवाहिनी । केवीं ऊर्ध्वगति इयेचेनि । परी सदाश्रय करुनी । अघटित घटणीं सामर्थ्य ॥३॥
भाळी शोभे अर्धचंद्र । कंठीं रुळती पन्नगहार । गजचर्म व्याघ्रांबर । प्रावरण तुझें देवराया ॥४॥
लेवोनि अलंकारभूषणें । कंकण मुद्रिकादि आभरणें । हीं तंव जीवाचीं मंडणें । तूं जगद्‍भूषण जगदात्मा ॥५॥
जेधवां वाटे बहुतां रुपीं । होआवें, तेधवां स्वसाक्षेपीं । आब्रह्मस्तव जगद्‍रुपी । क्षराक्षरव्यापी निजसत्ता ॥६॥
तूं सगुण कीं निर्गुण । निवडितां वाचेसी पडे मौन । सगुण निर्गुण भिन्न भिन्न । तूं त्याहूनि आन जगद्गुरु ॥७॥
जे जे तूंतें भाविती जैसा । तयासी तैसाचि तूं परेशा । आदिमूर्ति चिद्विलासा । आदिमूला जगद्‍रुपा ॥८॥
धर्मग्लानि अतिशयेंसी । होतां, तयाच्या संस्थापनेसी । युगानुयुगीं अवतारासी । धरणें लागे विश्वेशा ॥९॥
कलियुग महापातकराशि । जन भुलले पाखांडासी । कोणी न जाणे निज तत्त्वासी । परोक्षज्ञाना अनुसरले ॥१०॥
त्या दीनांचा कणवा पाही । रामरुपें अवतार महीं । त्रिकूटाचळीं स्वलीळें पाही । राहूनि जगातें उद्धरी ॥११॥
देवाधिदेवा तुझें स्तवन । केवीं करुं मी मतिहीन । हृदिस्थ वदविसी तूंच पूर्ण । सत्य सत्य त्रिवाचा ॥१२॥
असो आतां, मागील चरितीं । सिद्ध येऊनियां पर्वतीं । मनकामनेसी रामाप्रति । पुसिलें अतुल आवडीं ॥१३॥
तेधवां रामें कर जोडून । पुसिलें संप्रदाय कवण । सिद्ध म्हणती सांगूं पूर्ण । इतुकें कथन पैं झालें ॥१४॥
आतां पुढील कथानक । सद्गुरु माझा रघुनायक । वदवील, त्यातें आवश्यक । श्रोतीं अवधान देइजे ॥१५॥
(१)सिद्ध म्हणती रामचंद्रालागुनी । धन्य धन्य बा तुझी वाणी । जे तुझिये प्रश्नेंकरुनी । आदिनाथा स्मरविलें ॥१६॥
काय वानूं संप्रदाया । धन्य धन्य गा शिष्यराया । तुझेनि तप:प्रभावें सखया । जीर्णोद्धार हें ज्ञान ॥१७॥
हें ज्ञानधन परम गुप्त । आदिपुरुषाचें निजदैवत । जगन्माता पार्वती सत्य । तिचेनि प्रगट पैं जालें ॥१८॥
ती आदिपुरुषाची चित्कळा । प्रणवरुपिणी वेल्हाळा । तिजविणें क्षण आदि गोपाळा । न गमेचि जाण सर्वथा ॥१९॥
ती निदेलिया हाही निजे । प्रबोध पावतां प्रबोधे सहजें । ब्रह्मादि बाळें पाळी चोजें । परी नेदी पाहूं आपणांतें ॥२०॥
ऐसी ज्ञानकला आदिमाता । तियेनें जगदुद्धाराकरितां । शंभु विनविला एकांता । कैलासपर्वतीं पाहुनी ॥२१॥
सुप्रसन्न पाहूनि वदन । परम विनीत नम्रवचन । करद्वयातें जोडून । काय विनविती  जाहली ॥२२॥
देवाधिदेवा भक्तवत्सला । त्रिभुवनपते अगाधलीला । दुधानिमित्त उपमन्यूला । क्षीरसागर दिधला त्वां ॥२३॥
दुर्धर विष कालकूट । तें जगद्‍रक्षणा केलें गट्ट । देवतांमाजीं तूं वरिष्ठ । उद्‍भटकीर्ते तुज नसो ॥२४॥
देवा मी तुमची अर्धांगी । विचरे पंचप्राणांचे संगीं । तूं नव्हेसी कामवश्य, योगी । मदनान्तका विश्वेशा ॥२५॥
देवा मी तुझी स्त्री म्हणवितां । लाज वाटे परम चित्ता । पदकिंकरी हेंही म्हणतां । गौण वाटे दयाळा ॥२६॥
‘दीनवत्सल’ ब्रीदासाठीं । भक्तातें रक्षिसी संकटीं । धांव घालिसी उठाउठी । कणवा मोठी दीनांची ॥२७॥
तूं निराकार निर्गुण । भक्तालागीं होसी सगुण । मियां वश केलें हा अभिमान । होतांचि, जाण दुरावसी ॥२८॥
ऐसिया सर्वेशा मजकारणें । त्वांचि सांगितली अठरा पुराणें । आणि इतिहास उपपुराणें । तींही कृपेनें वदलासी ॥२९॥
त्रिकाण्डवेद, स्मृति, शास्त्रें । परम पावन पुण्यपवित्रें । त्यांतील रहस्य जगदुद्धारें । मज दीनातें कथियेली ॥३०॥
इतुकेंही जाहले श्रवण । तेंही तव मुखेंकरुन । तथापि चित्ता समाधान । नोहेचि जाण सर्वथा ॥३१॥
तूं सदैव आनंदभरित । विदेहस्थिति समाधिस्थ । प्रेमभरें डुलसी सत्य । तो सुखानुभव मज देई ॥३२॥
(२)‘द्वा सुपर्णा सयुजा सखा’ । ऐसें श्रुति बोलती देखा । याचा अर्थ विवरुनि निका । मज दयाळा सांगावा ॥३३॥
दोन सुपर्ण ते कोण । कवणे वृक्षीं आरोहण । करिती, त्यांचें ऐक्य कैसेन । होतें तेंही सांगिजे ॥३४॥
जीवाचा सांडिजे अविद्योपाधि । आणि शिवाच मायोपाधि । उभया ऐक्य ब्रह्मपदीं । अनादसिद्ध असेंचि ॥३५॥
ऐसें वेदान्त शास्त्र गर्जत । परी अनुभवा नये सत्य । शाब्दिक ज्ञानें शुद्ध परमार्थ । कैसेनि करगत होय तो ? ॥३६॥
शब्दीं षड्रसान्नें वर्णिली । परी मुखीं एकही न घाली । तयाची चित्तवृत्ति धाली । ऐसें कैसेनि हो सरे ? ॥३७॥
यालागीं सद्गुरु प्राणेश्वरा । मी पात्र असेन कृपासागरा । तरी समाधियोग दीनोद्धारा । मज अनन्या निरुपिजे ॥३८॥
जन्ममरणाची येरझारा । ज्याचेनि योगें चुके निर्धारा । देहींच विदेहस्थिति साचारा । होय, तें ज्ञान मज सांगें ॥३९॥
अगा मेलियाउपरीं मोक्ष । लाहेन, म्हणे जो अप्रत्यक्ष । चहूंसी नागवे नतद्रक्ष । धर्मार्थ परोक्ष त्या कैचें ? ॥४०॥
यालागीं भवा भवान्तका । तुमच्या पदरेणुपादुका । शिरीं वाहूनि मी अशेखा । लाभेन असका परमार्थु ॥४१॥
सदया भानु जया सांगाती । त्यातें गिंवसेचि ना राती । कां जो कल्पतरु जोडल्या हातीं । याचना आनाप्रति न लगेचि ॥४२॥
मम मानसचकोरचंद्रा । लावण्यभरिता गुणगंभीरा । इतुकें वचन अंगीकारा । कारुण्यसमुद्रा श्रीशर्वा ॥४३॥
ऐसा आदिमायेनें जाणा । स्तविला भोळा पंचानना । मग धांवोनिया चरणां । धरियेले ते न सोडी ॥४४॥
ऐसें देखोनियां शंकरें । उचलिलीं द्वय-पंच-करें । हृदयीं प्रेमाचिया पडिभरें । आलिंगिली आल्हादें ॥४५॥
म्हणे प्राणसखये धन्य । तुझेनि मी रुपा आलों जाण । मज अनामयातें पुसे कोण । दुजेनवीण मी एकला ॥४६॥
लावण्यसरिते ज्ञानखाणी । ऐसिया प्रश्ना मातें कोणीं । मागें न वेचिली विमल वाणी । तो हा आज तुझेनि सुसंवादु ॥४७॥
बरवा तुझा प्रश्न चांग । जो हा चराचरा सन्मार्ग । अपर्णे तव उपकारें जग । उतरेल अव्यंग भवाब्धि ॥४८॥
तुझें कार्य सहज असे । परी जडमूढांचा उद्धार दिसे । जेवीं सगर-पितृरोद्धेशें । विलसे गंगा भूतळीं ॥४९॥
हा माझा निजगुह्य ठेवा । आजवरी गुप्त होता बरवा । परी तव स्नेहें उकलावा । लागे करावा प्रकटार्थु ॥५०॥
मी शिव पति तूं प्राणेश्वरी । सदैव नांदसी मज भीतरीं । जाणूनि पुससी बाह्यात्कारीं । तरी परिसे गौरी शुभांगें ॥५१॥
तुज मज नव्हे दुजा भाव । परी गुरुत्वें मज गौरव । देऊनि, पुससी हे अपूर्व । लोकसंग्रहा पद्माक्षी ॥५२॥
येर्‍हवीं तूं तरी निखिला । निजात्मज्योति ज्ञानकळा । तुझेनि हें घडामोडी सकळा । ब्रह्मा ब्रह्माण्डमाळा निर्मीतसे ॥५३॥
परी त्वां विश्वोपकारालागीं । प्रेमादरें इये प्रसंगीं । पुसिले गिरिजे कोमलांगी । म्हणवोनि आलिंगी शिव भोळा ॥५४॥
तया आलिंगनाचे पाठीं । विराली ध्येय ध्यानादि त्रिपुटी । निजानन्दें कोंदली सृष्टि । कैसेनि वाग्पुटीं अनुवादे ? ॥५५॥
अहो हिमनगाचे बालिके । ममाक्षचकोर - चंद्रकलिके । मानससरोवर - मराळिके । मम चित्तवेधके भवानी ॥५६॥
मी आवाप्तकाम कामारि । ऐसिया मातें सुंदरी । निर्वृत्तातें नामाकारीं । आणोनि, प्रश्नोत्तरी सुखविलें ॥५७॥
तरी आतां सावधान । परिसे निजवस्तु कारण । अपत्यें षडानन गजानन । तुझींच, परी न वदे त्यां ॥५८॥
शिवे ! साधनचतुष्टयीं । संपन्न असोनि सद्गुरुपायीं । दृढ विश्वासें अनन्य राही । तोचि लाहे या ‘निजातें’ ॥५९॥
असत्‍ मूढ, मूर्ख, मतिहीन । कुटिल कपटी कुलक्षण । अकारणीं अनृतवचन । वेंचोनि शीण न माजी जो ॥६०॥
ऐसियासी कवणे काळीं । देवों नये वो दक्षबाळी । देतां, पूर्वजांच्या ओळी । अनर्थकल्लोळीं पाडील ॥६१॥
पुरे असो हें इतुकेन । वागीश्वरीसी होतसे शीण । म्हणवोनि अपात्राचें वर्णन । वाढवितां, दूषण उभयातें ॥६२॥
तो हा मंत्रराज महामणि । मागा त्रिवर्गी ईशालागुनी । पुसिला; तेव्हां हे मांडणी । नव्हती कहाणी सृष्टयादि ॥६३॥
अहो नव्हता सृष्टयाकार । नव्हते आप तेज समीर । तैंहूनि आम्हीं आदि ईश्वर । विनविला साचार निज भावें ॥६४॥
(*)कां जें ब्रह्मा विष्णु हर । आम्ही गुणमयी अवतार । यालागीं तो परात्पर । स्वाद्धारार्थी विनविला ॥६५॥
ऐसे अधीर आतुर निकट । आम्हां त्यांहीं एकनिष्ठ । देखिलें; एकले एकट । तदा सघोषें स्पष्ट उपदेशिलें ॥६६॥
(*)तेणें आम्हां कृपावलोकनीं । माथा ठेवोनि वरदपाणि । वोपिल्या निजवस्तूलागोनी । तूंतें भवानी सांगेन ॥६७॥
(*)विधि सृष्टि-सृजन-व्यावृत्तीं । विसरला आपली निजात्मस्थिति । विष्णु तोही तैशाच रीतीं । मी मात्र दिनरात्रीं न विसंबे ॥६८॥
विधीचा उपदेश पवाड । जगत्सृजनाचें काबाड । सृजितां झाला तो जड । स्वाभिमानी मूढ विसरला ॥६९॥
विसरोनि झाला हळुवट । ना तो ब्रह्मा ज्ञानें वरिष्ठ । तैसा नोहे वैकुंठपीठ । जाणे चोखट निजवस्तु ॥७०॥
हे गोडाही गोड अतुल । परम सुखाचे अवाग्ज बोल । अंबिके उभयांही सखोल । परिसतां डोल नावरती ॥७१॥
मग म्हणे वो जय जया ताता । अव्यक्ता आदिनाथा । तुझेनि मुखें निजमूळ गीता । लाहोनी पावलें ॥७२॥
म्हणवोनि चरणसरोजीं भाळ - । ठेवोनियां, श्रीजाश्वनीळ - । प्रार्थोनि, म्हणती एक वेळ । दिधलेंचि अढळ पुन्हां दीजे ॥७३॥
तुझे एक एक बोल सुढाळ । निगमाब्धिमाजिलें मुक्ताफळ । कीं ते सुरस रसाळ । सुधाच केवळ सुखद जी ॥७४॥
ऐशियापरी त्यांही मातें । स्तवोनि घेतिलें वचनातें । तेंचि अपर्णे ज्ञानसरिते । वोपीन तूंतें अवधारी ॥७५॥
ऐकोनि हरिखली गोरटी । न धरत, न सांवरत मिठी । पदाब्जीं घालोनि करसंपुटी । रसने चाटी पदतळा ॥७६॥
आतां अपर्णेसी शंकर । उपदेशील निजगुज-सार । ते कथा अति नागर । भाविक श्रोते परिसोत ॥७७॥
जी अनादि सिद्ध द्वंद्वें । जगदुद्धारार्थी निजबोधें । परस्परांचें प्रेमसंवादें । लीला विग्रह दाविती ॥७८॥
हे कथा-लक्षण जहाज । भवसमुद्रीं घातले सहज । नावाडिया श्रीगुरुराज । परपारातें पाववी ॥७९॥
दीनदयाळा सद्गुरुराया । निरीक्षणें निरससी माया । श्रीपति शरण तुझिया पाया । करावी छाया कृपेची ॥८०॥
हृदिस्थ श्रीगुरु राम आपण । राहोनि, करवीं ग्रंथकथन । त्याचे चरणीं मस्तक ठेवून । तृतीय प्रकरण संपविलें ॥८१॥
स्वस्ति श्रीसिद्धचरित्र भाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥८२॥
श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंस: ॥
॥अध्याय तिसरा संपूर्ण ॥
==
तेधवां कळवळोनि देवी । माते प्रार्थी अनन्यभावी ।
पादांबुजा कवळोनि जीवीं । मस्तकु ठेवी नुचलेसा ॥६४॥
ही ओवी फक्त शिळा छाप पोथींत आढळते. या आवृत्तीसाठीं घेतलेल्या मूळ संहितेंत नाहीं. अशा फक्त शिळा छाप पोथींत असलेल्या ओव्या दर्शविण्यासाठीं --- असें तारकाचिन्ह घातले आहे; व त्या ओव्या ज्या त्या पुष्ठाखालीं नोंदविल्या आहेत. ओवीचा क्रमांक शिळा छाप पोथींतील आहे. (*)असे भरीव तारकाचिह्म घातलेल्या ओव्या फक्त मूळ संहितेंत आढळतात. शिळा छाप पोथींत त्या नाहींत. अमुक इतक्या ओव्या शिळा छाप पोथीत गळल्या आहेत. हें दर्शविण्यासाठीं, या आवृत्तींतील तशा प्रत्येक ओवीच्या सुरवातीस भरीव तारकाचिह्म घातलें आहे.

टीपा-(१)सिद्ध म्हणती रामचंद्रालागुनी-ओवी - सिद्ध म्ह. श्रीचूडामणि हे रामचंद्र नागपूरकरांना येथून पुढें अ १७, ९४ ओवीपर्यंत, मूळ आदिनाथ-पार्वतीपासून श्रीगुरुपरंपरा व मत्सेन्द्र गोरक्षादि नाथांचीं चरित्रें सांगत आहेत.

(२) `द्वा सुपर्णा सयुजा सखा' - ओवी ३३ : - `द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाथे । तयोरन्य: पिप्पलं स्वादु अत्ति, अनस्नन्‍ अन्य: अभिचाकशीति ॥' अशी मुंडकश्रुति आहे. या श्रुतीचा भावार्थ असा आहे की एकाच बुद्धिवृक्षाच्या
आधारावर जीव शिव (चिदाभास व कूटस्थ) हे दोन पक्षी नांदतात. एक पक्षी सुखदु:खरुपी फळ खातो व दुसरा कांहींही भोग न भोगतां (अनश्नन्‍) साक्षीरुपानें राहतो !
कठिण शब्दांचे अर्थ :- आब्रह्मस्तंबपर्यंत = ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत (६) पाखांड = वेदप्रामाण्य न मानणें (१०) कणवा = दया, करुणा (११) चोजें = कौतुकानें, लीलेनें (२०) उद्‍भटकीर्ते = महान्‍ ख्याति पावलेल्या (हे शंकरा) (२४) असका = संपूर्ण, सांगोपांग
(४१) द्वयपंचकरें = २x५ दहा हातांनीं (४५) वाग्पुटीं = वाचारुपी संपुटांत म्ह. वाणीच्या मर्यादित साधनानें (५५) मराळिका = राजहंसी (५६) शिवे = हे पार्वती (संबोधन) (५९) मंत्र - राज महामणि = सर्वश्रेष्ठ मंत्र (६३) सृजन व्यावृत्तिं = सृष्टि उत्पन्न करण्याच्या व्यवहारांत (६८) हळुवट = क्षीण, असमर्थ (७०).

N/A

References : N/A
Last Updated : February 19, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP