मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय चाळिसावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसद्‍गुरु चरणारविन्दाभ्यां नमः ॥
नमो सद्‍गुरु अद्वयानन्दा । श्रीरामचंद्रा आनंदकंदा । दावोनि आपुले पादारविंदा । जीवित्वभेदा हरविलेसी ॥१॥
तुझिया नामाच्या निजगजरीं । श्रीरामचंद्र या पंचाक्षरी । श्रवणे भवभयाची बोहरी । क्षणाचि माझारी जाहली ॥२॥
ऐसा पंचाक्षरी तूं गुणी । पिंड ब्रह्माण्डाची झाडणी । हेळार्धेचि ठेली करोनी । कैवल्यदानी मम ताता ॥३॥
भवाचिया हलकल्लोळीं । पंचीकृत जीवा जाहली रवंदळी । गिंवसोनि संकल्पाविकल्प मेळीं । तापें तळमळी दिनराती ॥४॥
तेथ त्वां सदया करुणाकरु । धांवोनि आलासी कर्णधारु । बुडतया जीवां पैलपारु । देवोनि एकाक्षर तारिले ॥५॥
सोऽहं भावाचिया मेळा । मेळवूनि, भवसिंधूच्या जळा । दुर्जय कातरोनि अवलीळा । नेलेसी कृपाळा परतीरा ॥६॥
त्या तुझी वानावया थोरी । शेषादि धन्याच्या वैखरी । लाजोनि, मुरडले साही चारी । तेथ मी कवण्यापरी ठाकावे ? ॥७॥
हें साच मातें कळोनि कीरु । आणिक पुढत पुढती सद्‍गुरु । स्तवनीं धिंवसा उपजे थोरु । म्हणवोनि पदपद्मतांरु धरिले म्यां ॥८॥
कां जे आश्रिताचा अभिमान । आदरें वाहती भववज्जन । ऐसें विश्वतोमुखीं अनुदिन । जाहलें श्रवण सदनुग्रहें ॥९॥
यालागीं मियां दीने पाही । अनन्यपणें तयाचे पायीं । कव घालोनि ठेविली डोई । तैं अच्युत सुखसोई लाभलों ॥१०॥
म्हणोनि सादवितो त्रिलोक । जे का मुमुक्षु सभाग्य साधक । धावा पावा भवनाशक । पातला रघुनायक अवनीये ॥११॥
भवाब्धि अपरिमित पाही । खोली रूंदीची गणना नाहीं । तेथें येणें राजयोग-पव्हई । घालोनि अनुपाई उध्दरिले ॥१२॥
या रे या रे साने थोर । याती भलते नारी नर । नरतनु खेपे निखळ निर्भर । स्वानंदपूर उलथला ॥१३॥
भवार्णव खवळला देखोनि भारी । दयार्णव आम्हा अनन्यावरी । लोटला, उचलोनि स्वानंद लहरी । ’ नरकाय ’ क्षेत्री सुपर्वी ॥१४॥
म्हणवोनि धांवा पावा सर्व । कां जे सुदुर्लभ साच हें पर्व । माजी या पर्वाचा प्रभाव । तारीन जडजीव निमिषार्धी ॥१५॥
ऐसा अभिमान कैवल्यनाथें । वाहोनि माझिया सद्‍गुरु तातें । काल मृत्यु भय शोकातें । विरवोनि, सरतें मज केलें ॥१६॥
अहोमी जन्मजन्मान्तरीं । लक्ष चौर्‍यांशी योनिद्वारीं । वाव्हटलों माया नदीच्या पुरीं । तमान्ध कुहरीं गिंवसोनि ॥१७॥
तेथें हा कृपाळुवांचा राव । नेणवे, कैसी घेवोनि धांव । पातला; अतर्ध्य अगाध विभव । मुक्तीची राणीव घेवोनी ॥१८॥
चराचराचें अधिष्ठान । अशेख भूतांचें जीवन । साकार कैवल्याचें निधान । ना भी म्हणवोन ठाकले ॥१९॥
अनुपम स्वरुपाचें ध्यान । चारुगात्र आनंदघन । श्यामसुंदर देदीप्यमान । ना मी म्हणवोन ठाकले ॥२०॥
जगदानंद सुहास्यवदन । विमल कीर्तीनें आब्रह्मभुवन । कोंदाटलें, ते समपद ठाण । ना भी म्हणवोन ठाकले ॥२१॥
तैं म्यां पदकंजी समान । वाहिले बुका तुळसी सुमन । माझें आराध्य गुणनिधान । तात रघुनंदन सर्वार्थी ॥२२॥
जयाचे कृपालेशें करुन । श्रीसिध्दचरिताचें लेखन । जालें; न होतां कष्ट साधन । संकल्पहीन मुळीं मी ॥२३॥
ग्रंथीं आदि मध्यावसान । नेणेचि कांहीं मी वृत्तिशून्य । परी ती राममाय दयाघन । दासाभिमान वाहिला ॥२४॥
अभिमान वाहोनि, ग्रंथ सिध्दीं । नेवोनि; श्रीपति मंदबुध्दि । सरता केला सज्जनामधीं । चरणारविंदीं अर्पोनी ॥२५॥
नाहीं व्युत्पत्तीचें बळ । नाही बहुज्ञता, ज्ञान अढळ । परी ती मम मुखें सुरळ रसाळ । बोलावोनि बोल, डोलतसे ॥२६॥
मम ह्र्त्पालखाचे पर्यकीं । पहुडोनि, स्वयें लीला कौतुकीं । श्रुतिसार स्वानुभवा पोखी । बोलावोनि हरिखें डोलतसे ॥२७॥
गुह्यातिगुह्य सुरस सखोल । सा चौ अष्टादशाचे बोल । ऐक्यानुबोधें विवरोनि, अढळ । वोपिल प्रांजळ मजलागीं ॥२८॥
अनन्या मजलागीं ये मेदिनीं । आकारा आली माझी जननी । तिचें मी पदसुधा -पयपानी । अपत्य; वाखाणी सच्चरिता ॥२९॥
आपुले पादामृताची पुष्टी । देवोनि; सच्चरिताची गोठी । तन्मय राखूनि स्वपदांगुष्ठीं । बोलाविले होटी अतिगुह्य ॥३०॥
साच निजबोध निःसंग । सोऽहं अद्वय राजयोग । तत्त्वमस्यादीचे अव्यंग । वानिलें चांग निजबीज ॥३१॥
(१)मूळ बीज हें श्रीनारायणें । ’ तप तप ’ ऐसें संकेतवचनें । अवाग्ज वोपोनि चतुरानन । उपदेशूनि धन्य केला ॥३२॥
तेणेंचि योगें कमलासनु । उपदेशिला निजनंदनु । मग त्या नारदें द्वैपायनु । देवोनि निजखुणें, निवविलें ॥३३॥
तैं यासी जें उलथलें सुख । त्या सुखें आपुला एकुला एक । चोजें तृप्त केला श्रीशुक । वितृष्ण; त्रिलोक न मनी जो ॥३४॥
त्यापासाव उत्तरासूनु । अद्वय लाभला ब्रह्मनिधानु । ज्याचे परीक्षिति नामाभिधानु । ’ भागवत ’ ज्यापासूनि प्रकटले ॥३५॥
तया निगम तरुच्या बीजा । कैवल्यदानी श्रीगुरुराजा । कणवा ये क्षितीं आमुच्या काजा । पेरिले सहजा निजलीलें ॥३६॥
अहो जो देवांचा आदि देवो । सिध्द साधकां ज्याचेनि विभवो । तो आदिनाथ श्रीगुरुदेवो । सिध्दांचा रावो जगदानी ॥३७॥
तेणें आदिनाथें अवलीळा । सकृपें अपर्णेचा लळा । पुरवितां; तोचि निज जिव्हाळा । अवनीये जोडला अनंतु ॥३८॥
परी त्याही सागरातीरीं । अव्यक्तपणीं मच्छोदरीं । रिघोनि, परिसिलें साचोकारी । नाम, निजगजरीं संभ्रमें ॥३९॥
यालागीं ’ मच्छेन्द्र ’ महाबाहो । नामें पाचारिला देवाधिदेवो । जगदुध्दारार्थी लीला लाघवो । विचरे अनुसूयो निःसंगी ॥४०॥
तेनें सकृपें विप्रस्त्री एक । अनपत्य, विनवितां, प्रसाद भाक । दिधल्या; वरद वरें ’ गोरख ’ । जन्मला; त्रिलोक विख्याति ॥४१॥
त्याचा करकंजोद्‍भव अनुपम । विश्वोद्धारक गहिनी नाम । जन्मला, त्यापूनि निवृत्ताराम । ’ निवृत्ति ’ निर्भ्रम निपजला ॥४२॥
तेथोनि भवतारक सुतेज । योगांगणीचा विजयध्वज । कारुण्यमूर्ति प्रणव बीज । ’ श्रीज्ञानराज ’ जगदानी ॥४३॥
तयाचा ’ श्रीदेवचूडामणि ’ । जो का विज्ञानाची खाणी । जगदुध्दारक इये अवनीं । चिद्योग तरणि अवतरला ॥४४॥
तेणें ’ गुंडाख्या ’ केलें पावन । त्यांही ’ रामचंद्रा ’ सुखसंपन्न । केले; म्हणवोनि गुणनिधान । ’ महादेव ’ चरण भवतारुं ॥४५॥
तोचि मम गुरुचा तात । ज्याचेनि स-दैव ’ श्रीरघुनाथ ’ । जोडलों आम्ही; कृतकृत्यार्थ । भवबंध मुक्त जाहलों कीं ॥४६॥
जालों, जाहलों, जालो त्रिशुध्दी । लंघोनि त्रिदेह मकारसंधि । ठाकलों महाकारणाचे विदीं । चौबारामधीं प्रत्यगात्मीं ॥४७॥
इकार मात्रा तुरीयाश्रम । जेथ परात्पर माझा राम । नांदे आनंदानंद धाम । साकारब्रह्म विश्वगुरु ॥४८॥
त्रिकुट श्रीहाट गोल्हाट । बाधक त्रिदेहींचा घाट । परि तो लीलें उतरोनि सुभट । बोधक पीठीं बैसविलें ॥४९॥
त्रिशून्य त्यागाचें आगार । निरसोनि; सुभोग निजमंदिर । अद्वय कैवल्य भुवनीं स्थिर । संस्थिते साचार मजलागीं ॥५०॥
जे निःसंग निरंजन । निष्पाप निर्द्वन्द्व समाधान । जेथें रातले योगीजन । तये सुखसदनीं मज ठेले  ॥५१॥
यापरी चाळीस अध्यायपर्यंत । नीच नवा प्रमेयभरित । तया सुरसाध्याया समस्त । पुरविलें साहित्य अनुपम ॥५२॥
(२)प्रथमाध्यायीं मंगलाकारु । गणेश शारदा आणि सद्‍गुरु । एकाक्षरी अव्यक्त परू । स्तवनीं निर्धारु दाविला ॥५३॥
पाठी वर्णिली कुळदेवता । जे प्रणवरुपिणी विश्वमाता । औटपीठीं जियेची सत्ता । विश्व-विवर्ता जे मूळ ॥५४॥
तदुपरी आद्य तनु सुगम । ज्याचेनि पावलों उत्तमोत्तम । ते बाळकृष्ण - राधा नाम । तात माता वंदिली ॥५५॥
येथोनि पुढें सिध्दचरित । अंबेसी जगदुगुरु आदिनाथ । निगमगर्भीचा मथितार्थ । प्रेमें उपदेशित जगदात्मा ॥५६॥
ते उपदेश संवाद कथन । परिसतां, चित्त चिंता विसरून । स्वानंदपदीं जाहलें लीन । इतुकें कथन पैं जाहलें ॥५७॥
रामें राज्यभार सोडून । गिरनार पर्वता जाऊन । सद्‍गुरु प्राप्त्यर्थ तप दारुण । एकवीस दिन पैं केलें ॥५८॥
उपरीं चूडामणि देवें । इच्छित पुसोनि दिधले खेंवें । रामें गुरुसंप्रदाय बरवें । सांगावे; विनविलें द्वितीयांत ॥५९॥
श्रीशंकरें उमेलागुन । म्हणितलें, एकान्त पाहून । तुज सांगेन गुह्यज्ञान । जे निजनिदान निगमाचें ॥६०॥
तो लाभल्या एकान्तसमय । शिवें उपदेशिली दीन माय । तेथूनि हें ज्ञान प्रकट होय । तृतीयीं गुरुराय सांगती ॥६१॥
विष्णु अवतार मच्छेन्द्रनाथ । मच्छी उदरीं रिघोनि ऐकत । शिवें मागां कथिले संवित । पर्वत कन्यके लागोनि ॥६२॥
अंतरी जाणूनि ’ चतुर्थी ’ शिवें । विष्णूसी आज्ञापिलें बरवें । जया ज्ञानें जग आघवें । मही उध्दरावें विचरुनी ॥६३॥
भू भ्रमतां शिराळे ग्रामीं । भिक्षार्थ फिरतां नाथ स्वामी । एक विप्रस्त्री पुत्रकामी । प्रार्थूनि नमी नाथातें ॥६४॥
नाथ होऊनि प्रसन्न चित्त । प्रसाद रक्षा ईक्षूनि देत । म्हणती सेवन करी त्वरित । पुत्र निश्चित पावशी ॥६५॥
" येतां एकाब्दा फिरुन घरा । तंव पुत्र देखूं " ऐशा वरा । देऊनि, नाथ तीर्थक्षेत्रा । निघती सत्वरा पंचमाध्यायी ॥६६॥
गोरक्षाचें जन्मकथन । षष्ठमाध्यायीं झाले पूर्ण । ’ सप्तमी ’ मच्छेन्द्रें सांख्य ज्ञान । गोरक्षालागून सांगितलें ॥६७॥
आठव्या माजी गोरखातें । उपदेशिलें मच्छेन्द्रनाथें । नवव्यांत गोरखें उज्जनीशातें । करुनि कृपेतें उध्दरिलें ॥६८॥
मच्छेन्द्रनाथें स्त्री राज्यांत । पुत्र वांचवूनि, पद्मिनी कृतार्थ । करुनि, कीर्ति केली विख्यात । हा दहाव्यांत सारांश ॥६९॥
गोरखें मेदिनी प्रदक्षिणा । करोनि जातां गुरुदर्शना । मार्गी जालंदर शिष्य जाणा । कानीफराणा भेटला ॥७०॥
त्यांही परस्पर स्वसुखानुवाद । करितां; अवचितां सद्‍गुरु शोध । लागतां; तैसेचि उभय सिध्द । परमानंदें निघाले ॥७१॥
इतुकें वर्तलें ’ एकादशीं ’ । ’ द्वादशीं ’ जालंदर मैनावतीसी । भेटोनि; सकृप निवविले तिसी । स्वानंदसुखासी वोपोनी ॥७२॥
नाथपंथीचें मण्डण । ’ त्रयोदशीं ’ गोरक्ष गुणनिधान । भेटले मच्छेन्द्रालागून । वाद्यरव-खूण देवोनी ॥७३॥
लाहोर ग्रामीं धनिक कुमर । नंदराम नामें पावला परत्र । त्यातें कृपादृष्टी मच्छेन्द्र । जीवविती साचार ’ चतुर्दशीं ’ ॥७४॥
पंचदशीं येउनी जयपुरासी । चोहटीं आसनस्थ अंतरिक्षी । राहोनि, आश्चर्य अज्ञ जनांसी । दाऊनि, मार्गासी लाविले ॥७५॥
सोळाव्यांत अक्षयानंदी । मच्छेन्द्र बैसतां अचल समाधि । मिळूनि सुर नर साधुवृंदीं । जयजय शब्दीं वानिला ॥७६॥
सतराव्यामाजी रामराव । प्रार्थिला चूडामणी देव । तो अष्टादशीं स्वसुखानुभव । देऊनि सदैव सुखविला ॥७७॥
सइच्छ अवलिये गुंडाख्य मुनि । एकोनिसामाजीं देखिला वनीं । तृप्ति न होय म्हणवूनि जनीं । वीरेश नामीं जन्मा ये ॥७८॥
विसाव्यांत बाजिरायास उपदेश । करुनि, गुंडाख निजधामास । परम पावन विदेहवास । पंढरीसी राहिले ॥७९॥
एकवीसपासून चोवीसवरी । परमगुरुच्या लीलोद्‍गारीं । श्रीपति सप्रेम निजवैखरी । पावन करी सेवेसी ॥८०॥
उपरीं अध्यायद्वैं लीला । मत्ताताची पूर्वजमाळा । अशेख वर्णिली, संत कृपाळा । पावन मम कुळा करी जे ॥८१॥
सत्ताविसाव्यांत श्रीरघुनाथ । जन्मोनि बाळ लीलाचरित । दाविले अनन्या प्रेमभरित । जें कां अपेक्षित सुरनरीं ॥८२॥
नरहरी साधन चतुष्टयीं । संपन्नपणीं सद्‍गुरुपायीं । ध्यास लागलीया; देहगेहीं । उदासीन पाही, विचरतु ॥८३॥
तें देखोनि सुविनय सुत । सद्‍गुरु माझा श्रीराम तात । सखोल सुरस बोलें निववीत । स्वानन्दभरित पितयासी ॥८४॥
मग आनंदे तुरियाश्रमीं । विदेहवासी अखंड आरामी । अठ्ठाविसामाजीं निष्कामधामीं । ठेलें निर्भ्रमी नरहरी ॥८५॥
परी सुपुत्रीं वियोग विचार । न कंठें; यालागी गाणगापुर । पाहिलें; जेथें दत्तयोगीन्द्र । अनसूयापुत्र विराजे ॥८६॥
तया धन्योदयाचा योग । ’ एकोणतिशीं ’ वर्णिला सांग । देव भक्ताचा ऐक्यानुराग । पावोनि, महाभाग ये घरा ॥८७॥
तिसाव्यामाजीं दीनोध्दारु । जे का भवनदीचें तारुं । मम तातासी श्रीसद्‍गुरु । महादेव यतीन्द्र भेटले ॥८८॥
एकविसाव्यांत वरदकर । दानें गौरविला रामचंद्र । बत्तिसाव्यांत जगदुध्दार । कराया, साचार आज्ञापी ॥८९॥
तेहतिसाव्यांत शिवांगसंगिनी । तेवीं माझी जानकी जननी । रामें उपदेशिली निजकामिनी सपुत्रचरणीं लागली ॥९०॥
चौतिसाव्यांत मम सहोदर । राघवें उपदेशिला शंकर । पस्तिसांत गोपाळादि नर । बोधोनि परमार पावविले ॥९१॥
छत्तिसाव्यांत पद रज किंकरी । गौतमवरद गोदावरी । श्रीराम पदपद्म ब्रह्मगिरीं । त्याचेनि भूवरीं रुपा ये ॥९२॥
उपरीं प्रज्ञापुरींचा राव । परस्यार्थी अनन्यभाव । चरणीं लागतां, सद्‍गुरुदेव । मुक्तीची राणीव वोपिती ॥९३॥
इतुकें सदतिसाचे चरिती । पुढां तुरगाढपुराधिपति । रामानुग्रहें महासन्मति । इहपर विश्रांति पावला ॥९४॥
तैसाचि अनन्य बापू जन । त्यातें महासिध्दिदरुशत । जाहलें, नमितां सद्‍गुरुचरण । तें कथन वर्णनीं सरे ना ॥९५॥
ऐसे अनेक आश्चर्यभरित । मेदिनीं श्रीरामाचें चरित । वर्णील, ऐसा भाग्यवंत । न दिसे साद्यन्त मज कोणी ॥९६॥
तथापि आवडीच्या गुणीं । त्याचेचि पुनः पुन्हां पायवणी । पिऊनि, अगाध लीला कथनीं । वेंचीन वाणी अनुदिन ॥९७॥
तैं अवश्य म्हणोनि संतीं । सप्रेम आलिंगिला श्रीपति । म्हणती ’ वत्सा श्रीरामचरितीं । ऐसीच रति असों दे ’ ॥९८॥
ऐकोनि, पदकंजीं ठेविलें शिर । माथां घेतला अभयकर । म्हणे मी तुमचा आज्ञाधार । सेवेसी निरंतर वागवा ॥९९॥
ऐसें बोलोनि, क्षण निवांत । राहे; तों जानकीचें चरित । अंतरीं स्मरलें आश्चर्यभरित । बालक मृत उठविलें तें ॥१००॥
तैशीच समंधा दिधली गति । तें चरित वर्णिलें यथामति । मुक्त केली मयूर-सती । अडतिसा अंतीं हे कथा ॥१०१॥
रामकीर्ति क्षीरसागर । उचंबळला अनावर । त्यांतील गुप्त मुक्ते सुंदर । लेववूनि, सपूर ग्रंथ होय ॥१०२॥
अडतिशीं ग्रंथ आला कळसा । तथापि पूर्ण प्राप्तीचा वळसा । तो उगला न राहे सहसा । धरोनि धिंवसा बोलवी ॥१०३॥
श्रीरामकृपेची राणिव । बोलवी, पुढें घेऊनि धांव । नावे नावे धरवूनि हाव । बोध गौरव वाढवी ॥१०४॥
अडतिसावा पूर्ण कळस । त्यावरी ध्वज एकोणचाळीस । ’ चाळीशीं ’ शुध्द जनोपदेश । करोनि, समाप्तीस ने राम ॥१०५॥
एकोणचाळीस आणि चाळिस । येथें कळवळोनि ह्र्षीकेश । जनां लावावया सुपथास । तारकोपदेश स्वयें करी ॥१०६॥
चहूंवरी घातिले शून्य । तेथें चारी देह निरसन । होऊनि; शून्यचि झालें पूर्ण । नवल विंदान सद्‍गुरुचें ॥१०७॥
राजयोगी ब्रह्माण्डोदरीं । सद्‍गुरु आपण स्वयें मापारी । होऊनि; अनन्याचे पदरीं । इच्छिल्या परी वोपीत ॥१०८॥
ऐसे चाळीस अध्याय जाण । क्षराक्षराचें विवेचन । केवळ निजसुखाची खाण । सुरस विज्ञान प्रमेय ॥१०९॥
आपण स्वयें ह्रदयभुवनीं । बैसोनि माझिया आरुष वाणी । सार्थक वचनें कृपादानी । सरतीं सज्जनीं पैं केली ॥११०॥
भवभ्रमाचें मूळ माया । तीतें हेळार्धेचि नेलें विलया । जिणें ब्रह्मेन्द्रा तापसा आया । आणोनि, अपायीं घातिले ॥१११॥
कितीकीं जी भेणें उदकअन्न । वर्जोनि गृहा घेतिलें रान । कितीका व्रततप नेम साधन । करोनि, साभिमानें नाडिले ॥११२॥
चुकले सद्‍गुरुची सोई । साधन म्हणवोनि बंधन अपायीं । नामरुपात्मक शून्यत्रयीं । गिंवसोनि; ठायीं निमाले ॥११३॥
ऐसे निबिडतम अज्ञान । मायादेवीचें आवरण । ज्ञातेचि भुलविले गुणसंपन्न । भ्रम भेद भान लेववूनि ॥११४॥
त्रिपुटी त्रयावस्था तिमिर । निवटोनि; तुरीयेचें माजघर । जे निजकृपें दावी दिनकर । दीण जनोध्दर गुरुरावो ॥११५॥
असो, ऐसे सद्‍गुरुचरण । न लभतां न कळे परमार्थ खूण । तयाच्या कृपेचें अवलोकन । तें सुफल साधन साधकां ॥११६॥
परिस सुरतरु चिंतामणि । कामदुहा नवनिधीची श्रेणी । ओळंगती जयाचें चरणीं । सदैव दिनरजनीं सेवेसी ॥११७॥
ऐशिया सद्‍गुरुचें चरण । देखावया कवण साधन । नव्हते गांठी निष्काम पुण्य । परी तो सदय धांवोन दे भेटी ॥११८॥
अहो तो अद्वय पूर्णावतार । सद्‍गुरु माझा रामचंद्र । दासाभिमानी करुणाकर । केवीं मीं पामरें वानावा ? ॥११९॥
त्या सदयाच्या एकेक बोलें । अनकळ संदेह ठायीं निमाले । स्वानंदपुष्टी देवोनि वहिले । लीलेंचि तारिले जड जीव ॥१२०॥
नाही पाहिली गुणदोष याति । नाही पाहिली अर्थव्युत्पत्ति । पायां लागतां, पुनरावृत्ति । नेदिती; मागुती जन्मातें ॥१२१॥
जन्म दुःखाचा सागर । जन्म विपत्तीचे भांडार । जन्ममृत्या येवढे घोर । आणिक दुस्तर असेना ॥१२२॥
ऐशिया समर्थे एकेचि हेळा । एकेंचि अक्षरें अभेद लीळा । गुह्यगंभीर स्वानंदकळा । अक्षय अवलीळा दीधली ॥१२३॥
दृश्य द्रष्टेनसी हिरोनी भान । ध्येय ध्यानादि त्रिपुटी क्षीण । कर्म कर्तेनसी मीतूंपण । हरवोनि, परिपूर्ण स्थिति दे ॥१२४॥
जेथें युक्ति प्रमाणेंसी । विरुनि अप्रमाणाचे कुशीं । लपाली सबीजीं शून्यावकाशीं । विवेक बोधेंसी हडबडिला ॥१२५॥
चहूम वाचेसी पडिलें मौन । दृष्टान्त मुरडिले वाहूनि आण । नेति नेति वेदान्त वचन । बुधजनीं निर्वाण परिशिलें ॥१२६॥
ऐसियातें त्रिकुटवासी । सद्‍गुरु माझा कैवल्यराशि । श्रीरामराणा निमिषार्धेसी । सकृप अनन्यासी न ओसंडी ॥१२७॥
का जे व्रत तप नियमाचेनि । साध्य साधक नाना साधनीं । नोहे नोहें; सद्‍गुरुचरणीं । अनन्यपणीं न वचतां ॥१२८॥
अहा ते व्यक्त ना अव्यक्त ब्रह्म । अमूर्त अनाम ना मूर्ति नाम । सस्थूल प्रका ना तें सूक्ष्म । कैसेनि सवर्म ये हातां ? ॥१२९॥
शब्द मौनी ठेला निःशब्द । प्रमाणें अप्रमाणी मुग्ध । लाजोनि, साधनें झाली स्तब्ध । तेथें अबलावृंद केवीं तरे ? ॥१३०॥
यालागी माझी श्रीराममाये । कळवळोनि आकारा मेदिनी ये । (३)सोऽहं धारणा दे सदुपाये । जेणें शीण न होय साधका ॥१३१॥
ऐसें निजकृपा वोरसें । अनन्या स्वानुभव सौरसें । वोपिलें, पदपद्मसुधालेशें । भवभानापिसें हरवोनि ॥१३२॥
अहा तें कें वानूं चरणामृत । ब्रह्मादि देवां जें अप्राप्त । ज्याचेनि भक्तिज्ञानीं निरत । विचरती विरक्त निःपाशी ॥१३३॥
तो हा ब्रह्मविद्येचा सागर । स्वानंदसुखाचें आगर । भूतदयेचें तरी भांडार । तात रघुवीर जगदानी ॥१३४॥
तया अपरिमिताचे चरिता । केवी मी वानावया श्रोता । सरते व्हावे ? अच्युतानंता । सर्ग स्थित्यन्ता जे आदि ॥१३५॥
ऐशिया विश्वेशें वोसंगी । घेतिलें मातें कृपापांगीं । सतासत्‍ कर्माध्यक्ष अनेगी । निरखी जो जगीं कृतसाक्षी ॥१३६॥
तयाचे पदरजीं ठेवूनि भाळ । श्रीसिध्दचरितामृत रसाळ । वदविलें; वदलों, संतकृपाळ । अव्यंग अविकळ भवान्तकु ॥१३७॥
श्रीआदिनाथापासूनि देखा । मच्छेन्द्र गोरक्ष गहिनी निका । निवृत्ति ज्ञानेश निजाचा सखा । चूडामणि मोचक कर्मासी ॥१३८॥
तयाचा गुंडाख्य रामचंद्र । तेथूनि परमगुरु यतीन्द्र । जो मम तातासी परमाधार । जगदुध्दारी जगदीश ॥१३९॥
तिहीं रामचंद्री निज नेम पूर्ण । वोपूनि जेधवां अंतर्धान । पावले; (४)तईचे चरित्र सज्जन । स्फुरे, तें वदेन; वदवा जी ॥१४०॥
अहो भवाच्या भेणें विकळ । प्राणी जेधवां विव्हळ व्याकुळ । जाले, तदा हा सदय कृपाळ । मेदिनीं कनवाळू रुपा ये ॥१४१॥
भुक्ति मुक्तीचें भांडार । अनंत कल्याणाचें माहेर । अनिर्देश्यवपु, परी साकार । होऊनि, यतीन्द्र पातला ॥१४२॥
अप्रतिग्रही शांत दान्त । गृहापत्य -दारा वर्जित । सर्वानुग्रही भेदातीत । महीं विचरत चिद्‍भानु ॥१४३॥
जो अतीत पंचभूताहून । पंचवीस तत्त्वांहूनि सघन । निजात्मस्वरुपीं समाधान । विधिनिषेधहीन मोक्षद ॥१४४॥
हेतु मात आणि दृष्टान्त । वर्जित, सदैव समाधिस्थ । पिंड ब्रह्माण्ड अंतवन्त । जाळोनि, विभूति लेइलासे ॥१४५॥
परी या भवाचिया भेणें पाही । जडमूढ जन्ममृत्युप्रवाहीं । पडिले, त्या लावावया सोई । विचरे विदेही क्षितीसी ॥१४६॥
प्रकृति-पुरुषाहूनी पर । तेणें भासमात्र कलेवर । लेवूनि, करी जगदुध्दार । तंव श्रीरघुवीर देखिला ॥१४७॥
जो महाभाग भाग्यागळा । सहजें जयाची तारक लीळा । जॊ ब्रह्मविद्येचाचि पुतळा । अगुण आकारला जगतारुं ॥१४८॥
तो मम तात श्रीरामचंद्र । देखोनि महादेवें स्वकुलाचार । वोपोनि, आपण पावे परत्र । (५)त्या अष्टादश वत्सर लोटले ॥१४९॥
त्यावरी श्रोतेजन अवधारा जी । शके अठराशें चहूंमाजीं । चिंचणीग्रामी सुजन समाजीं । सद्‍गुरु निजनिजीं असतां ॥१५०॥
तैं चित्रभानु संवत्सर । मंगलामाजीं मंगलाकार । सुदिन तिथि, योग, नक्षत्र, वार । समाधि जीर्णोद्धार राम करी ॥१५१॥
ते समशेज योगासन । आराम रमणीय सुखसंपन्न । रचितां, नवल अतुल विंदान । पुनरपि दरुशन दे दासा ॥१५२॥
येथें अभाव भावी भावोन । सर्वथा विकल्पु श्रोतेजन । न धरोनि; आद्यन्त वर्तमान । जाले; तें परिपूर्ण अवधारा ॥१५३॥
अहो जे पूर्वील अमूपा अमूप । चिद्‍घनानंद स्वस्वरुप । भुवनत्रयासी द्योतक दीप । सम्यक‍ सद्रूप तैसेचि ॥१५४॥
संचले; देखोनि शिष्यसमुदायीं । अत्यानंदें परमोत्साहीं । नानोपायनेसी लवलाही । अर्चिले त्यांही उपचारें ॥१५५॥
परी तो स्वात्मसुखीं तल्लीन । लावूणि उन्मीलित लोचन । निर्माय विदेहानंदी सघन । ठेला निमग्न स्वरुपीं ॥१५६॥
ऐसा योगीन्द्र समाधिस्थ । निरावकाशीं स्वानंदभरित । केशर कस्तुरी सुगंधजात । आमोद वाहत अंगीचा ॥१५७॥
तैसेंचि बाहेर लवलाही । आणूनि, दिनत्रय महोत्साहीं । अहर्निशीं क्रमिल्या शिष्यसमुदाय़ीं । मागुतीं मूळ ठायीं संस्थिले ॥१५८॥
येथें हें अघट म्हणवोनि मनीं । झणीं विकल्प मानीळ कोणी । तरी सज्जना बहुतेक जनीं । देखिलें नयनीं ग्रामस्थीं ॥१५९॥
म्हणवोनि श्रीपति दत्तचित्त । आपुले परमगुरुचें चरित । आल्हादें वानूनि गीतीं गात । आनंदभरित सप्रेमें ॥१६०॥
आतां भद्रमूर्ति अनुत्तम । श्रीनाथपंथीचा विश्राम । माझे आनंदानंद धाम । सद्‍गुरु श्रीराम भवतारुं ॥१६१॥
अतीन्दिय द्रष्टा करूणाघन । निःसंग योगी निरंजन । वसवूनि, स्वरुप अनुसंधान । अखंड मनोन्मनी विचरतु ॥१६२॥
परम परमार्थ परिपूर्ण लक्षण । निर्माय निर्लोभ अभेद भजन । अक्रोध वैराग्य इंद्रियदमन । कृपेंचि अनन्या दे दानी ॥१६३॥
जयाच्या दरुषनें भय शोक चिंता । दिक्‍ प्रांत लंघोनि, जीवाचे घाता । करोनि निमाली; जी श्रोता । तैं भववार्ता कें कोठें ? ॥१६४॥
यापरी स्वेच्छा समाधानी त्रितनु विरहित ये मेदिनी । स्वरुपी विलसे समाधानी । निवृत्तचूडामणि योगीन्द्र ॥१६५॥
ऐसी अमूर्ता मूर्त माय । तियेचे श्रीपति जोडला पाय । म्हणवोनि आनंदे नाचे गाय । विधिनिषेधापाय । सांडोनी ॥१६६॥
तो हा सद्‍गुरु दीननाथा । आदि आनादि अपरिमित । पूर्ण ब्रह्मानंद शाश्वत । मायातीत निरंजनु ॥१६७॥
आम्हां दीन जनांची कणव । भक्तवत्सल महानुभाव । यालागीं विदेहावर्ती अभिनव । विचरे सदैव जगदुगुरु ॥१६८॥
तया अनादि सिध्दे पाही । श्रीसिध्दचरितामृत रससोयी । मातें चाखवोनि; कर्मप्रवाहीं । बुडतां; अनुपायीं तारिले ॥१६९॥
कर्मनदीचा प्रवाह घोर । मायाचक्राचे आवर्त थोर । अनंत जीवांचा जेथ संहार । विध्वंसिले सुरनर तपोनिधि ॥१७०॥
तेथें निगमागमाचें सार । अघोष अवाग्ज ह्र्त्तापहर । सुश्राव्य निरवयव एकाक्षर । वोपोनि, कृपाकर जन तारी ॥१७१॥
तयाचे, जन्ममरण मोचक । कवण्या भाग्यें पदपीयूख । सज्जना जोडला श्रीपति रंक । कृपा अलोलिक हे त्याची ॥१७२॥
येर्‍हवीं तो मी पतित थोर । पिंडपालकु दुराचार । असंग संगी अकर्मकर । नेणिले सत्सार निजहित ॥१७३॥
परि त्या कनवाळे सकृप झडपेसी । केघवां घालोनि, निजसौरसीं । मेळवोनि, स्वानंदसुख मिराशी । करोनि, अढळतेसी
संस्थिले ॥१७४॥
तयाचें कें वानूं महिमान । तयाचें कें वानूं उदारपण ? । सदये निजपदींच निजानन्य । कैवल्यभुवनीं बैसविले ॥१७५॥
श्रीसिध्दचरितामृताचे मिषा । करोनि मज आज्ञापी दासानुदासा । आणि तदाचि मद्‍ह्र्दयीं वास । अलिंगन सौरसें राहिला ॥१७६॥
याप्री श्रोता वक्ता तारक । उभयरुपी एकला एक । होऊनि; सद्‍गुरु रघुनायक । लीला कौतुक दावित ॥१७७॥
अहं देही, अल्प मी जीव । जन्म जन्मान्तरीं हाचि हा भाव । दृढाभ्यासें संकल्प ठेव । ठेवोनि, जीव निमाले ॥१७८॥
ऐसे फेरे कल्पकोटी । हा हा ! देहबुध्दीसाठीं । घेती; परी नेणती करंटी । सद्‍गुरु भेटी सदुपायें ॥१७९॥
अहो त्या माझिया उत्तमश्लोका । शुध्द सुकृतेंवीण आवांका । नाही नाही, सर्वव्यापका । देखणें मीमांसका कर्मिष्ठां ॥१८०॥
कां ते अनंत वाचक शास्त्रें । भिन्न भेदें चित्रविचित्रें । दाविती स्वर्गास्वर्गादि फळे स्वतंत्रें । कर्मानुसारें कर्त्यासी ॥१८१॥
ऋग्वेदें कथिला कर्माग्रहो । यजुर्वेदे ज्ञाननिर्वाहो । अथर्वणें उपासना अपूर्व । सामी गौरवो गायनाचा ॥१८२॥
न्यायशास्त्री भेदप्रतिष्ठा । जीव साना ईश्वरु मोठा । मीमांसा निर्धारी कर्मनिष्ठा । प्रकृति पुरुष चेष्टा सांख्याची ॥१८३॥
पातंजलीची योगसिध्दि । व्याकरण वदे शब्दानुविधि । वेदान्ती ब्रह्मैक्या प्रतिपादी । अद्वयानंदी अनुपम ॥१८४॥
यापारी मतामतांचा मेळा । नानौघ शास्त्राच्या शब्दमाळा । ओवितां, ठायीं न पडे चित्कळा । ते दे अर्धहेळा गुरुरावो ॥१८५॥
बाप सप्रेम खेंव व्याज । करोनि, वोपिलें स्वानंद भोज । निगम गर्भी जें ब्रह्मबीज । प्रणवरस्राज भवमात्रा ॥१८६॥
ऐसा भवरोग-वैद्य राम । मत्तात आनंदानंद धाम । त्रितापशमनी परिपूर्ण काम । निगमागमा अतर्क्य ॥१८७॥
तेथें म्यां आपुली अल्पबुध्दि । वेचोनि, आळवू कें कृपाब्धि । वाग्देवी लाजोनि पाउलें वंदी । तो मज करुणाब्धि वोळला जी ॥१८८॥
तेणेंचि हें सिध्दचरित । चाळीस अध्यायपर्यंत । कळसा आलें रसभरित । सप्रेम संत जाणती ते ॥१८९॥
ना तो मतिमंद मी विपक्ष विकळ । के क्रमी तव गुण-निराळ । जेथ शारदेही सर्वकाळ । न गणवे फणिपाळा तैसेचि ॥१९०॥
ऐशिया सद्‍गुरु अगाधगुणी । हातीं धरुनि माझा पाणि । श्रीसिध्दचरिताचे लेखनीं । देवोनि लेखणी वदवीतसे ॥१९१॥
म्हणवोनि क्षराक्षर विवेचन । सद्रसभरित सिध्दाख्यान । कळसा आलें निरुपण । सप्रेम सज्जन जाणती ॥१९२॥
कां तें चिदंबर विजन विहारी । मानसातीत मुक्त आहारीं । सहज सुवर्म क्षराक्षरी । निवडिते निर्धारी निज हंस ॥१९३॥
अहा ते क्षराक्षर परवडी । सद्‍गुरु सदयाविणें रोकडी । न लभे, न लभे; तपाच्या कोडी । करितां कडोविकडी अतिकष्टें ॥१९४॥
तें अगम्य अमित योगभांडार । निगमागमीचें निजसुखसार । गुह्यातिगुह्य स्वसुखोद‍गार । निवृत्तालंकारा मज ओपी ॥१९५॥
जेथें नाही साध्य साधन । निमोनि गेले अहंभान । परमानंदें त्रिपदें लंघोन । स्वानंदभुवनीं स्थिरावलों ॥१९६॥
ते अविनाश अच्युतानंत । निजात्मतृप्तीचे भावार्थ । स्वसुखोद्‍गारें श्रीसिध्दचरित । वदवी रघुनाथ निजलीलें ॥१९७॥
ते स्वानंदसुखसंपन्न । पुष्टी पावतां , चहुंसी शून्य । पडिलें, अवो जी संतसज्जन । यालागी परिपूर्ण चाळिसावा ॥१९८॥
चहुंवरी साचोकार । शून्य पडतांचि गुण गंभीर । स्थूल सूक्ष्मादि सालंकार । हरपले निर्धार अष्टधेंसी ॥१९९॥
देह गुण वाचाभिमान । क्रिया शक्ति वर्ण स्थान । एकाकी आघवे लोपतां पूर्ण । जाले मनोन्मन निजबोधी ॥२००॥
यालागी श्रीसिध्दाख्यान । चाळिसामाजींच झालें पूर्ण । वक्ता सद्‍गुरु गुणनिधान । तात आनंदघन रघुरावो ॥२०१॥
जे पूर्णत्वें परम पावन । श्रीसद्‍गुरुचें कृपायतन । तरोनि तारिते विश्वजीवन । सेवाचि निजधन गुरुचें ज्या ॥२०२॥
ऐसिया गुरुदास भक्त प्रेमळा । मी लोटांगणीं वेळोवेळां । कां ते ज्यांही आपुल्या कळवळा । पुरविला मज लळा बाळकाचा ॥२०३॥
ना ते माझी आरुष वाणी । शून्य वृत्ति सिध्दाख्यानीं । केवीं प्रवर्ते श्रोतेजनीं । कथा कथनीं आनुपम ? ॥२०४॥
परी त्यांतही प्रत्यगावृत्ति । नीच नवी अतुल स्थिति । ओपिली माते, अनन्यगति । जाणोनि, कृपामूर्ति सज्जनीं ॥२०५॥
तईचि तत्पदीं अवीट अढळ । विनटलों जी मी वाग्दुर्बळ । तेणें सच्चरित रसरसाळ । वदविले; कलिमल नाशक ॥२०६॥
हे सिध्दचरित्र अमृतकथा । सेविते कळिकाळाचे माथां । पावो देवोनियां तत्त्वता । कैवल्य परस्वार्था भोगिती ॥२०७॥
ह्या सिध्दचरिताचे लेखनी । सहज स्वभावें अनुदिनी । श्रवण पठणें कैवल्यभुवनीं । निश्चयेसी जनीं पाविजे ॥२०८॥
इया श्रीसिध्दचरिताख्याना । ज्याही पारायण प्रदक्षिणा । निष्काम हो कां सकाम साधना । करितां, भद्रासना पावती ॥२०९॥
अर्थावबोधाचा निवाड । करितां क्षराक्षर परमार्थ गूढ । जोडेल निरामय । निःशंक जोड । आन काबाड न कथा हे ॥२१०॥
हे सिध्दचरिताख्यान वोजा । सिध्दसाधकाची देवपूजा । मुक्ता हो कां मुमुक्षा सहजा । देईल निजकाजा निश्चयें ॥२११॥
हें सत्य सत्य त्रिसत्य अशेष । श्रीगुरु रघुराये निजवरास । देवोनि, कथेचा सौरस । चालविला सघोष अक्षरीं ॥२१२॥
हें सिध्दचरिताख्य वृंदावन । माजी पदरचना तुलसीबन । हरिगुरुचे प्रिय भूषण । वैष्णवजनीं आदरिजे ॥२१३॥
हें सिध्दचरित्र चिंतामणि । भक्तिभावार्थी आपुले सदनीं । संग्रही जो पठण अर्चनीं । त्याचा कैवल्यदानीं अंकिला ॥२१४॥
दीनोध्दरणाचीच हांव्व । धरोनि, सद्‍गुरु श्रीरामराव । ग्रंथीं एकाक्षराचाचि भाव । वदवी महानुभाव निजकृपें ॥२१५॥
श्रीसिध्दचरित्राख्य पंचानन । हाके गाजविता भव-वारण । हेळार्ध ऐकोनि सांडिला प्राण । गुरुभक्ति निजखूण जाणा हे ॥२१६॥
अधोर्ध्व हेळेचा प्रभाव । स्वर्गनरकादि त्रिलोक ठेव । मांडणी मांडोनि जीव समुदाव । गांजिले अपूर्व असद्‍ भयें ॥२१७॥
म्हणवोनि कैवल्याचा दानी । तात रघुराय दासाभिमानी । मेदिनीं अवतरलां माझा धनी । जयाचे पायवणिये भव धाके ॥२१८॥
त्या पदाम्बूचे सुखसोहळे । अक्रिय परि मी कृपाबळें । लाभलो; निजभाग्य आगळें । म्हणवोनि लोळे पदपद्मीं ॥२१९॥
जातिहीन मतिहीन । कर्म क्रियादि आघवा न्यून । श्रीपति त्वत्पदीचें पादत्राण । राखे रघुनंदना पदरजीं ॥२२०॥
अहा ते पदरज पीयूष गोडी । चाखितां अखंडही, वाटते थोडी । यालागीं अनन्य मी, तेथेंचि बुडी । द्यावया निजआवडी वांछित ॥२२१॥
ऐसें ऐकतांचि परमोत्साहें । ’ तथास्तु ’ म्हणोनि सद्‍गुरुरायें । मोहें निजांकी लवलाहे । कवळोनि बाहीं घेतले ॥२२२॥
तदा श्रीपतीच्या सुखा कैवाडे । दाटता, आब्रह्मभुवन थोकडें । जाहलें, यालागी पदरजीं पडे । जे दुर्लभ नातुडे सुरेन्द्रा ॥२२३॥
असो, हें सिध्दचरिताख्यान । परात्पर मोक्षश्रीचें भुवन । यालागीम अनुदिनी साधक जन । सेवोत सज्जन आवडी ॥२२४॥
सिध्दचरित्र कथा-सार । मुमुक्षूचें निज माहेर । जेथ परमार्थु एकाक्षर । प्रकटिला साचार गुरुरायें ॥२२५॥
सिध्द चरितींचा सौरस । क्षराक्षरभावी ब्रह्मोपदेश । राघवें अनिर्वाच्य सघोष । साधका निजविलास भोगविले ॥२२६॥
जे तुर्याश्रमी परमहंस । भोगिती योगानंद अविनाश । भोगिती परी अक्रिय अशेष । निवृत्त पदासी कवळिली ॥२२७॥
मीपण तूंपणेंसी घोटोनी । पिंड ब्रह्माण्डाची आटणी । करोनि, ते दे कैवल्यदानी । मजलागुनी रघुरावो ॥२२८॥
पदबंध रचना सरस संगीत । नमुजे कैसा करावा ग्रंथ । चातुर्य व्युत्पत्ति नेणेचि मात । ग्रंथीं रघुनाथ रंगला ॥२२९॥
ऐसें कौतुकें करुनि लाघव । अभंगीं श्रीपति म्हणवूनि नांव । घालोनि, सज्जनामाजीं गौरव । केला अभिनव कृपेचा ॥२३०॥
ऐसें रघुनाथें सिध्दचरित । चाळीस अध्यायपर्यंत । परिपूर्ण केलें रसभरित । कर्ता येथ मी नोहे ॥२३१॥
माझे दिनयामिनीचे आघवे । साक्षेपें की सहज स्वभावें । शयनाशन अटनादि जे व्हावे । तें तें रघुरायें कीजेले ॥२३२॥
एवं ह्रषीकेश रघुनायक । कर्म ज्ञानेंद्रियीं चालक । होऊनि; सिध्दचरितार्थ सुरेख । परमार्थ निष्टंक वदविला ॥२३३॥
यालागीं कर्तृत्वाची भुली । लाजोनि, निःशेष जीवें निमाली । तेणें मज त्रिविध सतासत्‍ बोली । जनांची जाहली हरिरुप ॥२३४॥
हे कृपानुग्रह श्रीराम बळ । अवस्थात्रयीं जाहलें अढळ । नातरी मी अभावी खळ । कोरडा निखळ परमार्थी ॥२३५॥
असो, ते रामकृपा येथ । भूतें साम्यासी आली समस्त । तेणें सिध्दी पावला ग्रंथ । दक्षिण काशींत करवीरीं ॥२३६॥
आतां या ग्रंथाचा पवाड । सकाम निष्कामाचे कोड । पुरवोनि, देईल परमार्थ जोड । जन्म जरा बेबुड करुनी ॥२३७॥
इये ग्रंथी सकाम कामना । लिहितां, बरवें न वाटे मना । तथापि अनाथाचिया प्रार्थना । कळवळोनि श्रीगुरुराणा आज्ञापी ॥२३८॥
होऊनियां शुचिर्भूत । धरोनि ग्रंथार्थी भावार्थ । श्रव्ण पठणीं सप्रचीत । पुरवील ईप्सित आदिगुरु ॥२३९॥
पुत्रार्थियानें द्विमास । मुख करोनिया पूर्वेस । प्रतिदिनीं एक सहस्त्र ग्रंथास । पढतां, निर्दोष यश पावे ॥२४०॥
ऋणमोचनार्थ त्रिसप्तक । शत्रुपराजय षण्मास देख । पिशाच्च अपस्मारादि नाश्क । फळदायक एक मासें ॥२४१॥
शत्रुपराजयार्थ दक्षिणे । द्रव्यार्थी पश्चिमाभिमुख बैसणें । उत्तराभिमुख ज्ञान जाणे । सप्रमाणें सांगतसे ॥२४२॥
किती सांगूं पृथक्‍ पृथक्‍ । दुर्घट दुर्जय कार्यादिक । तिही करावी सात सप्तक । तात्काळीक फळभागी ॥२४३॥
ब्रह्मचर्य आचरावे । सदा शुचिष्मंत असावे । कवणाचेंही न पाहावे । पैशुन्य; राहावे शुध्दचित्तें ॥२४४॥
पठण समयीं धूपदीप । आरंभीं षडक्षरी शिवजप । तेणे होवोनियां निष्पाप । शाप ताप दूर होती ॥२४५॥
यथानुशक्ति धर्मदान । सांगतार्थ करावे ब्राह्मणभोजन । इच्छा होईल परिपूर्ण । वित्तशाठय जाण न करावे ॥२४६॥
सकामा कामनिक हव्यास । निष्कामें अर्थ सावकाश । विवरुनि पाहतां, स्वप्रकाश । चिद्‍गगनासी व्यापूनि राहे ॥२४७॥
हें सिध्दचरिताख्य पावन । योगीश्वरांचे आनंदवन । तेथ सदैव अपर्णा-जीवन । आदिनाथ आपण क्रीडतु ॥२४८॥
ऐकोनि, सज्जनांचे वृन्द । अमृतोक्तीनें वदले वरद । " बा हा ग्रंथ -प्लव अढळ अगाध । तारील भवसिंधु हेळार्धे ॥२४९॥
श्रवण पठण निजध्यास । आदरें धरिल्या दिवसेंदिवस । विषयी भाळ्याभोळया जनांस । सन्मार्ग सुपथासी देईल हें " ॥२५०॥
तेथ श्रीपति जोडोनि पाणि । सद्‍गुरु सज्जनांचे लोटला चरणीएं । तैं कृपें तुष्टोनि श्रीराम धनी । निजालिंगनी मेळविला ॥२५१॥
मेळवोनि केला अचल अढळ । सप्रेम अनन्यभक्ती प्रांजळ । लेववूनि अलंकारिला बाळ । अतुल्ल कनवाळ गुरुमाय ॥२५२॥
चकवोनि काळाचे आघात । जन्ममृत्यूचे फाडिलें खत । सद्‍गुरु माउली कृपावंत । तात रघुनाथ जो माझा ॥२५३॥
ह्र्दयीं कवळोनि मी अनन्य । ग्रंथासी वरभाष्य दे वदान्य । जो हे श्रवण पठण अर्चन । करी त्याचा छेदीन भवबंधु ॥२५४॥
ऐसा त्रिसत्य वोपोनि वरु । माथा सदयामृत वरद करु । ठेवोनि; दासानुदास वाहणधरु । श्रीपति निजकिंकरु आपंगिला ॥२५५॥
यापरी श्रीसिध्दचरिता । वदवोनि, पायां पैं केला सरता । श्रीपति पूर्ण भाग्याचा पुरता । वानिला कवि श्रोता राम-दयें ॥२५६॥
आतां हा ग्रंथ पावनाख्यान । श्रीआदिनाथाचें निजजीवन । ऐकतां वाचितां अनुदिन । जानकीजीवन त्या न विसंबे ॥२५७॥
पद्मालय करवीर क्षेत्रीं । सुभानु नाम संवत्सरीं । शके अठराशे पंचोत्तरीं । ग्रंथ निर्धारी परिपूर्ण ॥२५८॥
मंगल मास कार्तिक शुध्द । षष्ठी रविवारेंसी सुसिध्द । श्रीसिध्दचरिताख्यान अगाध । ग्रंथार्थ प्रसिध्द पूर्ण केला ॥२५९॥
एवं अध्याय चाळीस । ग्रंथीं एकाक्षर रहस्य । वानिले, श्रीसिध्दचरित्र सुरस । जे इहपरास तारकु ॥२६०॥
म्हणवोनि श्रीपति जयजयकारीं । कवळोनि श्रीरामपदपद्मांघ्रि । उजळल्या भाग्यें अचलाकरी । पदरजावरी लोटला॥२६१॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥२६२॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सम्‍ सोऽहं हंसः ॥

॥ अध्याय चाळिसावा ( कलशाध्याय ) संपूर्ण ॥

श्रीसद्‍गुरु महाराज रामचंद्र योगिराट्‍ - त्याचे चरित्र कथा ही ॥ श्रीमहादेव सद्‍गुरु ॥ कर्पूरगंगातीर-चिंचणी क्षेत्र ॥
आदिनाथ संप्रदाय ॥ विहंगम मार्ग ॥ अलक्ष मुद्रा- सहजी योग ॥ भागवत धर्म - विष्णुउपासन ॥ उत्साह दिवस आश्विन वद्य तृतीया ॥

टीपा:- (१) मूळ बीज श्रीनारायणें .... वोपोनि चतुरानन धन्य केला ।- ओवी ३२ :- एकतिसाव्या ओवींत ’ सोऽहं राजयोग ।
चांग निजबीज ’ असे शब्द आहेत. असें हें निजबीज किंवा मूळ बीज म्हणजे सोऽहं बोधाचा भगवान्‍ आदि नारायणानें
ब्रह्मदेवास उपदेश केला. ३५ व्या ओवीपर्यंत आदिनारायण- ब्रह्मदेव - नारद - वेदव्यास - शुकाचार्य - परिक्षिति अशी श्रीमद्‍
भागवतांतील परंपारा निवेदन केली आहे. नाथपंथाचे आदिगुरु श्रीशंकर व भागवतधर्माचे आदिगुरु श्रीनारायण असे नामतः भिन्न असले तरी सोऽहं बोधाची दीक्षा एकच आहे हें येथें अगदीं स्पष्ट जाणवतें ।

(२) प्रथमाध्यायीं मंगलाकारु ....ऐसे चाळीस अध्याय जाण - ओव्या ५३ ते १०९ :-
श्रीपतींनीं या ओव्यांतून अध्यायवार विस्तृत सिंहावलोकन केलें आहे. ही या पोथीची ’ अवतरणिका ’ म्हणतां येईल.
अवतरणिकेच्या पठणानें सर्व ग्रंथपठण केल्यासारखें असते अशी श्रध्दा आहे.

(३) सोऽहं धारणा दे । शीण न होय साधका । ओवी १३१ :-
’ सोऽहं ’ धारणा हा मुक्तीचा क्लेशरहित मार्ग आहे ’ असा सोऽहं जपाचा आणखी एक उल्लेख येथें आढळतो. अध्यायाच्या
प्रारंभीं ६ व्या ओवींत ’ सोऽहं भाव मेळा -नेले परतीरा ’ असे म्हटलें आहे. या पोथींत आरंभापासून अखेरपर्यंत्त सोऽहं
राजयोगदीक्षेचे विपुल उल्लेख सांपडतात. किंबहुना श्रीसिद्धचरित्र या ग्रंथाचें हें असाधारण वैशिष्टयच म्हणावे लागेल.

(४) तईचें चरित्र स्फुरे तें वदेन - ओवी १४० :- सर्व अध्यायांचें सिंहावलोकन केल्यानंतर श्रीपतींनीं येथें आपले परमगुरु
श्रीमहादेवनाथमहाराजांच्या महासमाधीनंतर अठरा वर्षानीं घडलेला एक प्रसंग वर्णिला आहे. १४७ ओवीपर्यंत परमगुरुंचें
श्रेष्ठत्व सांगून प्रत्यक्ष चरित्रभागाला १४९ ओवीपासून प्रारंभ केला आहे.

(५) महादेव पावे परत्र । त्या अष्टादश वत्सर लोटले ओवी १४९ :-
 शके १७८६ मध्यें अश्विनवद्य तृतीयेस चिंचणी येथें श्रीमहादेवनाथमहाराज समाधिस्थ झाले. त्याला अठरा वर्षे उलटून
गेल्यावर श्रीतिकोटेकर महाराजांना शके १८०४ मध्ये समाधीचा जीर्णोध्दार करावयाचा दृष्टान्त झाला. या दृष्टान्तांतील अत्यंत
अद्‍भुत व लोकविलक्षण वाटेल असा भाग म्हणजे स्वतःचा देह अठरा वर्षानंतर बाहेर आणून समाधिस्थानाच्या अंतर्भागांत
कांहीं व्यवस्था करवून घेण्याची श्रीगुरुंची आज्ञा होती. त्या आज्ञेप्रमाणें करुन तीन दिवसांनी महादेवनाथांना देह श्रीमहाराजांनीं
पुन्हा समाधिगृहांत ठेवला. या एकूण हकीकतीबद्दल समकालिन व भावी काळांतल्या वाचकांना संशय वाटूं नये म्हणून
श्रीपतींनीं १५९ व्या ओवींत ’ देखिलें नयनीं ग्रामस्थीं ’ असा आवर्जून हवाला दिला आहे हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे.

कठिण शब्दांचे अर्थ :- रवंदळी होणें= ससेहोलपट, दुर्दशा होणें (४) पव्हई= चाररस्ते, चौक (१२) राणीव = राज्यपद, राजैश्वर्य
(१८) पोखी (क्रि)= पोषण करतो (२७) सा, चौ, अष्टादश = ६ शास्त्रें ४ वेद व १८ पुराणें (२८) द्वैपायन = महर्षि व्यास
(३३) वितृष्ण = तहान नसलेला, लाक्षणिक अर्थ विरक्त (३४) उत्तरासूनु = [ अभिमन्यु व ] उत्तरेचा मुलगा परीक्षिति
(३५) चोहाट = चव्हाटा, सार्वजनिक ठिकाण (७५) मयूर सती = मोरोपंताची बायको (१०१) सपूर = परिपूर्ण (१०२) उगला न राहणे=गप्प न बसणें (१०३) नावे नावे = वारंवार पुनःपुन्हां (१०४) अनुत्तम = अत्यंत उत्तम (१६२) उत्तम श्लोक = उत्कृष्ट कीर्ति असलेला (१८१ ) नीच नवी= नित्य नवी (२०६) ग्रंथप्लव = ग्रंथरुपी नौका (२५०)  

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP