श्रीसिद्धचरित्र - अध्याय सव्विसावा
श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.
श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसद्गुरु प्रसन्न ॥ नमन माझे गुरुवर्या । सुखमूर्ति करूणालया । स्वयंज्योति स्वप्रकाशमया । आद्यन्तमाया कारणा ॥१॥
तत्त्वमसि महावाक्य । विवरितां, जीवशिवाचें ऐक्य । होय, तुमचें घडतां सख्य । महिमा अतर्क्य तुमचा जी ॥२॥
माझा मी मातें चुकलों । दशदिशा धुंडितां भागलों । तुमचिया कृपें पूर्ण धालों । लाभलो आत्मभेटीसी ॥३॥
संसार मोह माया विपिनीं । भ्रमत होतों दिनयामिनीं । तूं नरकेसरी कृपादानी । अभय देऊनि मुक्त केलें ॥४॥
कलीमाजी दुष्ट जन । पापा देती अनुमोदन । नसते कुमार्ग स्थापून । भोळे जन ठकविती ॥५॥
जैं पापपुण्यें सम होती । तैंच नरदेहाची प्राप्ति । अवचित; लाभे पुनरावृत्ति । घडतां सत्संगति चुके येथें ॥६॥
ऐसा नरदेहा दुर्लभ परम । परी बहुपुण्यें जाहला सुगम । तथापि नावडे सत्कर्म । क्रोध काम खवळती ॥७॥
ऐशियाही कोणी विरळ । पूर्वसुकृतौघें विनटला । निजहितातें विवरूं लागला । स्वोध्दारार्थी श्रीगुरु ॥८॥
बहु शास्त्रें अवलोकिलीं । सत्समागमें वृत्ति निवळली । भेट्ल्याविना सद्गुरु माउली । न जाहली सुटका कोणासी ॥९॥
आतां कैं वोळेल कृपाघन सिध्द । मज चातका करावया बोध । म्हणे सद्गुरुचा करुं शोध । ऐसा वेध लागला ॥१०॥
सांडिलें सांसारिक सुख । त्यजिली कांता, गृह बाळक । वनोपवन गिरिगुहादिक । गुरुकारणें देख धांडोळिली ॥११॥
कोणी धूम्रपान करिती । कोणी सर्वाम्गी भस्म चर्चिती । जटाभार शिरीं धरिती । परी न करिती सुविचार ॥१२॥
नाना साधन संभार । वर्म राहिलें तें दूर । ऐशियांच्या उपदेशें नर । कैसेनि भवपार होतील ? ॥१३॥
म्हणती चारी धाम करा । गुरुगृहीं संपत्ति भरा । मग मोक्षाचिया विचारा । मार्ग साचारा दाखवूं ॥१४॥
मुळें सद्गुरुचें मन । न सोडी कृपणावरी धन । तेथें शिष्याचें समाधान । कैसेनि जाण होईल ? ॥१५॥
सेवा दक्षिणा तात्काळ । मोक्ष प्रत्यय उधार सकळ । ऐशिया वचना झकेल । कवण पुरुष पाहे पां ! ॥१६॥
तैसा नोहे माझा सद्गुरु । जो शिष्य याचकां कल्पतरु । ज्याचिया दृष्टीं संसारज्वरु । जाय क्षणमात्र न लागतां ॥१७॥
पुत्राहुनि पुढतपुढती । शिष्यावरी बहुत प्रीति । न पाहे तयाचे दोषाप्रति । कळा चढती प्रेमाची ॥१८॥
शिष्याचें न पाहे धन । अथवा सेवादि कारण । एक अभ्यासी दृढ मन । ठेवितां, संपूर्ण पावले ॥१९॥
उपदेशाचा तरी बडिवार । किती सांगूं वारंवार । जीवासी ब्रह्मसाक्षात्कार । माथां कर ठेवितांचि ॥२०॥
नाकीचें मोती सुढाळ । कंठी घालोनि वेल्हाळ । विसरोनि होय विव्हळ । म्हणे मुक्ताफळ हरवलें ॥२१॥
शोधीत आड, भिंती सांदी । केर पाखडोनि पाहे बिदीं । म्हणे न करितां अवधि । मुक्त शोधी ऐसा कवण ? ॥२२॥
ऐसा कांहीं काळ गेला । यत्न सुचला तितुका केला । मुक्त न सांपडे ऐसा जाहला । निश्चय भला तिचे मनीं ॥२३॥
तों तीस सद्गुरु भेटला । त्यानें ’ आदर्श ’ पुढे केला । स्वकंठींच मुक्ताफळाला । दावितां, वेल्हाळा तटस्थ ॥२४॥
कंठीचे मुक्ताफळ दावितां । वेळ न लागे आदर्शवंता । तैसीच ब्रह्मतादात्म्यता । शिष्यासी दावितां, न वेळ ॥२५॥
त्या सद्गुरुचे पूर्वजांचा । वंशविस्तार वर्णिला साचा । पूर्व प्रकरणी कथेचा । भाग शेवटीचा इतुका ॥२६॥
कीं विठ्ठलाचे उदरीं । चवथे पुत्र नरहरी । अवतरले, ती कथा चतुरीं । श्रोती विस्तारी परिसावी ॥२७॥
वसुदेवाचे जन्मकाळीं । देवें दुंदुभी वाजविल्या निराळी । कीं याचे उदरीं वनमाळी । उर्वीतळीं जन्मेल ॥२८॥
तैसेंचि नरहरीचें जनन । होतां सर्वांसी समाधान । वाटलें; दुःख आणि दैन्य । गृहांतून पळालें ॥२९॥
ज्यासी बाळपणापासून । परनारी मातेसमान । परद्रव्य जैसे वमन । कीर्ति जघन्य जयासी ॥३०॥
अष्टाम वर्षी उपनयन । होतां, वडिलीं वेदाध्ययन । पढवोनि, न्यायनीतीचें लक्षण । सुशिक्षण करविलें ॥३१॥
जैसें सुभूमिकें बीज वाढे । कीं शुक्ली चंद्रप्रभा चढे । तैसें नरहरीस सांकडें । शिकवितां, न पडे शिक्षका ॥३२॥
गायन नडीपरीक्षा न्यायें । यास गुरु बोलिला आहे । परी जन्मस्वभाव पाहे । तरीच होय विस्तार ॥३३॥
तैसी गुरुंनी न्याय नीति । शिकविलीसे नरहरीप्रति । ती पूर्ण धरोनि चित्ती । प्रकाशविती स्वबुध्दि ॥३४॥
कोणी क्रोधें गिळूं आला । तरी शांति न सोडी याला । नरहरीच्या ऐकतां बोला । क्रोध पळाला गजवत ॥३५॥
ऐसी व्यावहारिक स्थिति । परी परमार्थावरी बहु प्रीति । जे ब्रह्मनाळकर साधु विख्याती । त्यांसी मानिती सद्गुरुत्वें ॥३६॥
निर्गुण जाणोनि सम्यक । सगुणीं प्रीति आत्यंतिक । ध्यान मानसपूजादिक । यथासांग संपादिती ॥३७॥
सर्वत्र सम देवाची वस्ती । ऐसी सद्गुरुकृपें स्थिति । बाणली, म्हणोनि सेवकाप्रति । पाचारिती सत्कारें ॥३८॥
अपत्याहुनिही गाढें । सेवकावरी प्रेम वाढे । परपीडेनें बहुत पीडेन । परसुखें जोडे बहु सौख्य ॥३९॥
श्रेष्ठ ज्या मार्गे जाती । इतर जन तेंचि आचरिती । कैसी करावी संसृति । आचरोनि दाविती नरहरी ॥४०॥
ऐसी संसृति करुनि उत्तम । मग घेती चतुर्थाश्रम । टाकोनियां काम्यकर्म । मोक्षधर्म आचरिती ॥४१॥
तो आश्रमामाजीं वरिष्ठ । जो मोक्षद्वाराची वाट । तो संन्यास साधूनि उद्भट । संदेह नष्ट छेदिले ॥४२॥
समाधिस्थ चिंचणीमाझारीं । श्रीपांडुरंगाचे शेजारीं । सव्यभागीं मंडपद्वारी । ब्रह्मविहारी जाहले ॥४३॥
ऐशी नरहरीची कथा । यथामति वर्णिली तत्त्वतां । ग्रंथ विस्तरेल जी श्रोता । म्हणोनि त्रुटितार्था बोलिलों ॥४४॥
यासी पुत्रसंतति तीन । त्यांतील ज्येष्ठ जे नंदन । त्यांचें ’ आप्पा ’ नामाभिधान । शास्त्रव्युत्पन्न ते होते ॥४५॥
तैसेच लेखन विद्येत । परमनिपुण; शुचुष्मंत । ज्यचें उपास्यदैवत । श्रीमत् दत्तयोगीन्द्र ॥४६॥
श्रीगुरुचरित्र वाचिल्याविण । जे कदा न सेविती अन्न । ऐसा ज्यांचा नेम पूर्ण । आजन्ममरण चालिला ॥४७॥
जगाची पापप्रवृत्ति पाहुनी । आप्पा विचार करिती मनीं । म्हनती परवशतेहुनी । नरक नव्हे दुसरा कीं ॥४८॥
म्हणोनि पराधीनता । नावडे तयांचिया चित्ता । वडिलोपार्जित संग्रह होता । त्यावरी चरितार्था चालविलें ॥४९॥
श्रीमहादेवापासुनी । राजयोग-उपदेश घेउनी । तया सुखी दिन यामिनीं वृत्ति ठेविली आनंदी ॥५०॥
सद्गुरुचरणीं परम विश्वास । भवतरणीं कशिली कास । प्रपंची असोनि उदास । सदा ब्रह्मरस सेविती ॥५१॥
संचित क्रियमाण दग्ध जाहलें । परि प्रारब्ध शेष राहिलें । तें सरें तों देहीं वर्तले । मग पावले पंचत्त्वा ॥५२॥
नरहरीचे द्वितीय तनय । कान्होबा नामें अति सदय । ज्यासी पांडुरंग सदा प्रिय । प्रपंचकार्य करितांही ॥५३॥
श्रीमहादेव सद्गुरु । भवसिंधूचें महातारुं । राजयोग - धुरंधरु । कान्होबासी उपदेशिती ॥५४॥
परी पांडुरंगचरणीं प्रीति । कान्होबाची अति पढियंती । आषाढी कार्तिकी वारी करिती । सदा स्मरती चरण त्याचे ॥५५॥
कर्म उपासना ज्ञान । तिन्ही मोक्षमार्गाचें साधन । कर्मानुरुप अधिकार जाण । मन घेऊन उठतसे ॥५६॥
ऐसी कान्होबाची स्थिति । श्रीपांडुरंगचरणीं परमप्रीति । ठेवूनि, संसारी वर्तती । जळीं पद्मप्रत्र जैसें का ॥५७॥
आतां नरहरीचे तृतीय नंदन । जे पूर्णब्रह्म सनातन । कलीमाजीं अवतार पूर्ण । जग पावन करावया ॥५८॥
ज्याचें चरित्र वर्णनानिमित्त । वाढला सुरस सुश्राव्य ग्रंथ । आणि वंशविस्तार सांद्यत । समूळ आद्यंत वर्णिला ॥५९॥
जो शांतीचा पुतळा । की भक्तीचा निजकळवळा । कीं प्रेमाचा जिव्हाळा । आद्भुतकला जयाची ॥६०॥
ज्याचे जन्में वंश पावन । जगदुध्दारा जयाचें जनन । ज्याचेनि योगें राजयोग जीर्ण । बीजारोपण होय त्याचे ॥६१॥
जो धैर्याचा महामेरु । कीं जो भवनदीचें तारुं । ज्याचे कृपें संसारु । होय साचारु ब्रह्मरुप ॥६२॥
त्या श्रीसद्गुरु रामाचें । चरित्र यथामति वाचे । वर्णीन सुरस कृपें; त्याचे । ग्राहक साचे सज्जन तुम्ही ॥६३॥
राम-चरित्र रत्न-मांदुस । उघडूनि दावीन श्रोतयांस । परीक्षक महानुभाव विशेष । म्हणोनि उल्हास वाटतो ॥६४॥
राम चरित्रामृत वाटी । श्रोते सज्जनाचे होटी । लावीन; ती श्रवणपुटीं । नेऊनि पोटीं सांठवा ॥६५॥
रामचरित्र नेत्रांजन । लाधले बहुपुण्यें करुन । नेत्री घालूनि सावधान । आत्मधन ठाय़ी पाडा ॥६६॥
रामचरित्र विस्तीर्ण जहाज । लाधलें ऐलतीरा । सहज । भवसागर तरणीं काज । तें बांधूनि माज सत्वर या ॥६७॥
सायुज्य मुक्तीचा हव्यास । जन करिती असमसहास । परी मी वांछी जन्मपंक्तीस । रामचरितास गावया ॥६८॥
जन्म हो का भलत्या यातीं । परी रामचरितीं असो प्रीति । हेंचि मागतसे श्रीपति । कृपा संती करावी ॥६९॥
जन्म हो का कोटयानुकोटी । परी घडो राम-दासाची भेटी । जे मज वाहोनि पाठी पोटीं । न होतां कष्टीं-संरक्षिती ॥७०॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥७१॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत् सोऽहं हंसः ॥
॥ अध्याय सव्विसावा संपूर्ण ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 03, 2020
TOP