मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय चोविसावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय चोविसावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशाय नमः ॥
ॐ नमो चिद्‍घना श्रीराममूर्ति । विश्वीं विश्वात्मा ये प्रतीति । नवल, अनुपम, साथकाहातीं । देसी स्थिति निमिषार्धे ॥१॥
अहा निमिषार्धी अभंगाच्युत । ऐसा कैवल्यदानी समर्थ । सद्‍गुरु रामा तूंचि निश्चित । म्हणोनि शरणागत मी तूंते ॥२॥
मागां तेविसावे अध्यायान्ती । चाफळीं येवोनि महादेव यति । त्रिरात्री तेथे करुनि वस्ती । दुसरे ग्रामीं पातले ॥३॥
तेथे एक रजपुतीण । कोणी स्वयाती देखोन । आवडी तया करी प्रश्न । विनोदें ऐसा ॥४॥
बाप हो मी तुम्हांतें । एके वस्तूसी मागते । तें द्याल काय मातें । सांगावे जी ॥५॥
ऐशियामाजीं एक तिजला । ’ देतो ’ ऐसें बोलला । येरी म्हणे तयाला । ’ पुत्र हो ’ ऐसें ॥६॥
मग तिये दिधली भाक । जे होईन तुमचा लेक । काय मागाल हाचि धाक । पोटीं होता ॥७॥
तेथ सद्‍गुरु होते बैसले । (१)तया बाईसी तेंचि पुसिले । परि तें ऐकोनि कोपलें । चित्त तियेचें ॥८॥
मग धावोनि ये पति तियेचा । आधींच उन्मत्त जातीचा । वरी ऐकोनि ऐसी वाचा । क्रुध्द झाला ॥१०॥
ओटयावरी सद्‍गुरुनाथ । बैसले होते; जाऊनि तेथ । खालीं पाडिले; लाथ । हाणोनियां ॥११॥
तंव डोळ्याजवळीं हरळ । रुतोनि, रक्ताचा ओघळ । वाहों लागला घळघळ । गालावरूनी ॥१२॥
तंव दुसरा एक रजपूत । तें देखोनि भयभीत । होवोनि, आला धांवत । सद्‍अगुरुपाशीं ॥१३॥
म्हणे देवा हाय हाय । जे सर्वांसी पूज्य पाय । तयातें ऐसा अन्याय । केला दुष्टें ॥१४॥
ब्रम्हनिष्ठ द्विजाति । दुखविला यया दुर्मती । नेणोनि पुढें कैसी गति । पावेल हा ॥१५॥
ऐसें बोलोनि, सद्‍गुरुसी । हाती धरोनि, घरासी । नेता झाला आदरेंसी । महाभाग ॥१६॥
शेक, लेप औषधि । योजोनि, तया सुबुध्दीं । बरी केली व्याधि । सद्‍गुरुची ॥१७॥
अनायसे चार दिवस । संतपदाचा सहवास । होतांचि, झाला विश्वास । तया ठायीं ॥१८॥
हा कोणी विलक्षण । महापुरुष ऐसी खूण । पटतांचि, गेला शरण । सद्‍गुरुसी ॥१९॥
तयाचें कीर भाग्य थोरु । म्हणोनि भेटला सद्‍गुरु । येर्‍हवी ऐसा कल्पतरू । केवीं लाभे ? ॥२०॥
घरा आली सद्‍गुरुमाय । याहीवरी सेविले पाय । मग तया भाग्याकाय । उणे पडे ? ॥२१॥
संतचरणाचे रज । लाधतांचि, वासनाबीज । जळोनि गेलें सहज । कृपालेशे ॥२२॥
परिसाचिया भेटी । लोह सुवर्णाची खोटी । व्हावया कायसी गोठी । विलंबाची ? ॥२३॥
हे असों, तिमिर । जंव न येती सूर्यकर । तंवचि असे; नंतर । पळोनि जाई ॥२४॥
तैसा तो रजपूर । जैं होय का शरणागत । तैंचि केला मुक्त । सद्‍गुरुंनी ॥२५॥
ऐसी गुरुकृपा थोर । लाहोनि सेवातत्पर । असतां झाला निरंतर । भाग्यशाली ॥२६॥
आयकोनि हे वार्ता । अनुताप जाहला चित्ता । बाई आणि तिचा भर्ता । उभयताच्या ॥२७॥
म्हणती धिक्‍ आमुचें जीवित । केवढें केलें हें दुष्कृत । जे आम्हीं हाणिली लाथ । ब्राह्मणासी ॥२८॥
मग अनन्यभावे शरण । जावोनियां धरिले चरण । म्हण्ती आम्हाकडून । अपराध जाहला ॥२९॥
ऐसें वोळंगितां पाय । कळवळली सदगुरुमाय । मग क्षमापोनि अन्याय । कृपा केली ॥३०॥
मग तो मायातिमिर - रवि । तीर्थे देखोनि आघवीं । परतोनि आला बोरगांवी । श्रीमहादेव ॥३१॥
आतां पुढील इतिहास । जो शेवटील गोड घांस । परिसावा जी मानस । एक करोनी ॥३२॥
म्हणल जरी आकंठ । भरलें आमुचें पोट । तरी ना न म्हणावा घोट । अमृताचा ॥३३॥
अरुष बोला जै उबगला । तरी जैसा येथवरी लळा पाळिला । तैसाचि एक वेळा । पुरवावा जी ॥३४॥
येथवरी आदरें । स्वीकारिले उणेपुरे । मग आतांचि का दातारें । उपेक्षावे ? ॥३५॥
तंव ह्रदयान्तरीं बैसली । बोले सद्‍गुरु माउली । कासया शंका येतुली । बाळा तुज ? ॥३६॥
येथ तुझिया आवांका । कवण घेई आशंका । समर्थाचिया बालका । काय वाण ? ॥३७॥
ऐसे मातेचिया मुखांतून । लाधतांचि आश्वासन । तात्काळ आलें उत्तेजन । कृष्णसुता ॥३८॥
श्रोतीं आतां तेंचि बळ । घेवोनि, कथा पुढील । सांगेन तुम्हां प्रेमळ । चित्त द्यावे ॥३९॥
एके दिवशीं तो मुनि । आयुष्कर्म आटपोनी । शेकीत बैसला उन्हीं । अंगणामाजीं ॥४०॥
अंगीं शैत्यविकृति । होऊनि बिघडली प्रकृति । म्हणोनि स्नानार्थ नदीप्रति । जावें न जावें ॥४१॥
ऐसा विचार करीत । बैसला असता सद्‍गुरुनाथ । तंव एक स्त्री अकस्मात । पातली तेथें ॥४२॥
होती जातीची ब्राह्मण । षोडशवर्षीय तरूण । तैसीच रुपसंपन्न । अतिमात्रें ॥४३॥
आधीं तारूण्याचे भरीं । वरी पति जाय ग्रामान्तरीं । तेणे गांजिली प्रखरशरीं । मन्मथाच्या ॥४४॥
ऐसा प्रंचड मदनदन्ती । मातला जो तिच्या चित्तीं । विप्रा देखोनि एकान्तीं । अधिक खवळे ॥४५॥
मग तया तपोधना । साष्टांग वंदी अंगना । पोटीं धरोनि वासना । विषयाची ॥४६॥
म्हणे हे सद्‍गुरुनाथ । कासया बैसला असा उन्हांत ? । जरी कांहीं असे मनांत । सांगावे जी ॥४७॥
महाराज आपुल्या सेवेसी । सिध्द आहेच हे दासी । आज्ञा द्यावी; मानसीं । शंका न धरी ॥४८॥
यया भाषणाचें मर्म । जाणोनि, तो सध्दर्म । म्हणे आजि आयुष्कर्म । केलें आम्हीं ॥४९॥
परी थोडी शरीरी । वाटे थंडीची शिरशिरी । यालागीं उन्हामाझारीं । शेकीत बैसलों ॥५०॥
दोन घटिका घेऊनि ऊन । झालिया शीतनिवारण । मग जाऊं नदीस्नान । करावया ॥५१॥
यया सद्‍गुरुच्या बोला । आयकोनी म्हणे अबला । स्वामी यावे स्नानाला । आमुच्या घरीं ॥५२॥
शरद्‍ऋतु प्रातःकाळ । वायु सुटला शीतळ । ऐशियामाजीं गंगाजाळ । सोसेल कैसे ? ॥५३॥
यालागी कृपा करुनी । यावे आमुच्या सदनीं ऐसी इच्छा मनीं । उत्कट होय ॥५४॥
ऐशा परी ते अंगन । करी सद्‍गुरुची प्रार्थना । तंव समर्थ निघाले सदना । कामिनीच्या ॥५५॥
मग उष्णोदक स्नान । आणि मिष्टान्न भोजन । घालोनि, केला सन्मान । समर्थाचा ॥५६॥
महादेव भोजनोत्तरीं । गेला आपुल्या बिढारीं । (२)मग ध्यानी मनीं सुंदरी । तोचि पाहीं ॥५७॥
एक नसती कामवासना । तरि हेचि उपासना । त्रिशुध्दि करी अज्ञाना । देशोधडी ॥५८॥
हा माळवेल सविता । केव्हां, ऐसी उत्सुकता । झाली प्रमदेच्या चित्ता । तया दिवशीं ॥५९॥
अवशिष्ट राहिला दिन । तिये तो वाटे युगासमान । म्हणे सूर्य मार्गक्रमण । आजि विसरला ॥६०॥
ऐसी लागली तळमळ । तंव सूर्य ठाके अस्ताचळ । रजनी आली प्रेमळ । सखी जैसी ॥६१॥
कां भोग्य पुरुषाकडून । करावया पाचारण । कृष्णवस्त्र नेसोन । दासीच आली ॥६२॥
तेणें मानें विरहिणी । सूर्यास्ताचा हर्ष मानी । मग करु लागे वेणीफणी । शृंगारादि ॥६३॥
शिरी बध्द कबरीभार । कुंकवाची लेइली चीर । सर्ळ भांगीं सिंदूर । बिंदु ठेविला ॥६४॥
नेत्री रेखिलें काजळ । अंगी लाविले परिमळ । नवमल्लिका पुष्पमाळ । शिरीं गुंफिली ॥६५॥
भरजरी वस्त्र झगझगीत । अंगी कंचुकी तटतटीत । वरी लेइले लखलखीत । अलंकार ॥६६॥
जाणों महादेव तपासी । भिवोनियां मानसीं । प्रेषिली हे ऊर्वशी इन्द्रें जैसी ॥६७॥
ऐसी मदनसामुग्री । सज्ज होवोनि, सुंदरी । वेगें आली बिढारीं । सद्‍गुरुच्या ॥६८॥
तंव तो बोधसविता । नित्यपाठ उत्तरगीता । वाचीत बैसला होता । खोलीमाजीं ॥६९॥
एकेक ओवीचा सार । ध्यानीं घेतां; तदाकार । होवोनियां द्विजवर । तट्स्थ बैसे ॥७०॥
तंव ती ये अकस्मात । द्वारीं ताडिला हात । तो कर्णी आला आघात । सद्‍गुरुच्या ॥७१॥
मग उठोनियां सत्वर । तया उघडिलें द्वार । तंव चमकली बाहेर । वीज जैसी ॥७२॥
स्त्री नव्हेच; हा स्तेन । आला रात्रीं वेष धरुन । लुटावया तपो-धन । सद्‍गुरुचें ॥७३॥
कीं हे कसवटीची सहाण । प्रेषिता जाहला मदन । महादेव तपःसुवर्ण । परीक्षावया ॥७४॥
कीं हा आमुचा सद्‍गुरु । मलय गिरीचा चंदनतरु । म्हणोनि पाहे आश्रय करुं । नागीण जैसी ॥७५॥
ऐशापरी ती द्वाराआंत । आली ठुमकत मुरडत । कामचेष्टा दावीत । स्वामीपुढें ॥७६॥
केशर कस्तूरी वेलदोडा । एवं त्रयोदशगुणी खिचडा । घालोनि केला विडा । सेवा म्हणे जी ॥७७॥
मग घालोनि दंडवत । बैसे अधोमुख पुढत । ठेवोनिया उजवा हात । कपोलावरी ॥७८॥
ऐसी ती मृगनयना । ईषत्‍ हास्य-वदना । करों लागली नटवा । नानापरी ॥७९॥
स्कंधावरील पदर । सारोनियां, वारंवार । हाणितले कटाक्षशर । समर्थावरी ॥८०॥
परी जे सकळ हावभाव । स्वामीवरी झाले वाव । जैसा अचलीं प्रभाव । मारुताचा ॥८१॥
हाती धरिले प्रखर । सदा ज्ञानाचे तीव्र शर । वरी लेईला वीर । धैर्यकवच ॥८२॥
यम निमयादि आठ । सजला योगांगीं सुभट । मग कायसी लटपट । कामक्रोधाची ? ॥८३॥
येर्‍हवीं तरी पाहतां । जो ब्रह्मानंदाचा भोक्ता । तया केवीं लोलुपता । विषयसुखीं ? ॥८४॥
जयानें षड्‍रस पक्वान्न । यथेच्छ केलें भोजन । तया रिझवी काय वमन । तृप्तीलागीं ? ॥८५॥
नित्य कामधेनु घरीं । जया इच्छित पूर्ण करी । तया आणोनि ’ खरी ’ दिधली जैसी ॥८६॥
तैसी जया तुर्या बाळी । अवस्थात्रैं भोगा मिळाली । तया कायसी हे पुतळी । हाडामांसाची ? ॥८७॥
परी अगाध हे सद्‍गुरु। ऐसियाचाही अंगीकारु । करोनि, झाला तारूं । भवाब्धीचा ॥८८॥
जाणोनि तियेचें इंगित । तीतें बोलिला । सद्‍गुरुनाथ । बाई तुमचे मनोरथ । जाणिले आम्हीं ॥८९॥
परी आमुची आज्ञा जैसी । वागशील जरी तैसी । तरी तुझी इच्छा निश्चयेसी । पूर्ण करुं ॥९०॥
यया सद्‍गुरुचिया बोला । होय म्हणे ती अबला । मग गुरुरायें तिजला । सन्मुख बैसविलें ॥९१॥
तया समयी जे उत्सुकता । झाली रमणीचिया चित्ता । वर्णू न शके तत्त्वतां । वैखरीनें ॥९२॥
कामार्णवाच्या लहरी । उठों लागतां अंतरी । कंप सुटला शरीरीं । रोमांच आले ॥९३॥
चित्तीं म्हणे ती काम-हता । हे सद्‍गुरो प्राणनाथा । कासया विलंब आतां । आलिंगनासी ? ॥९४॥
तंव एकदां कृपादृष्टीं । अवलोकोनि, गोमटी । दाविली हातवटी । समाधीची ॥९५॥
चौदेहा पैलीकडे । जें तुर्येचें रुपडें । लक्ष्यांश असो तिकडे । ऐसें निवेदिलें ॥९६॥
मग म्हणे योगिराट । आतां आम्हां तुम्हां गांठ । नाही जोंवरी पहांट । फुटली तंव ॥९७॥
एवं प्रातःकालावधीं । महादेव करुणांबुधि । लावोनि बैसला समाधी । तिज समवेत ॥९८॥
सूर्योदयीं सद्‍गुरुराज । सांडिता जाहला समाधिशेज । मग देखिलें तिच्या सहज । मुखाकडे ॥९९॥
तंव पूर्वील कामवासना । सांडोनि गेली मना । देखोनि पळे पंचानना । हरिणी जैसी ॥१००॥
यावरी तरुणांगी । थापटोनि केली जागी । तैं दिसों लागले अंगी । सात्त्विक भाव ॥१०१॥
स्वेद कंप रोमांचित । आनंदाश्रु सद्‍गदित । कंठ भरला; दंडवत । पडली पायां ॥१०२॥
मग बोले स्फुंदत । धन्य धन्य सद्‍गुरुनाथ । आजि माझें जीवित । सफळ केलें ॥१०३॥
सद्‍गुरु महिमा अगाध । नेणोनि केला अपराध । परी येवो नेदिसी क्रोध । लेशमात्र ॥१०४॥
हेंही आल्पचि बापा । याहुनि अधिक कृपा । करोनि; जाळिले पापा । जन्मान्तरीच्या ॥१०५॥
लुटावया आला तस्कर । तया भोजनीं अहेर । अर्पूनि कीजे पाहुणेर । जयापरी ॥१०६॥
तैसें तुवां आजि केलें । जे हे अपराध येतुले । साहोनि, मज बैसविलें । ब्रह्मपदीं ॥१०७॥
बापा शिळी भाकर । याचित असतां क्षुधातुर । अमृत देवोनि अमर । केलें तुवां ॥१०८॥
परी हाय हाय ताता । ऐसा अप्रतिम दाता । लाधोनि तुझी योग्यता । जाणिलीचि ना ॥१०९॥
केला अमृताचा सडा । सुरभि लाविली काबाडा । इंधन केलें लाकुडा । कल्पतरुच्या ॥११०॥
शाल मिळाली गोमटी । फाडोनि केलीई लंगोटी । परिसाची केली गोटी । खेळावया ॥१११॥
जया योग्य शिखास्थान । ऐसें सुगंध सुमन । पायातळी चूर्ण । कीजे जैसें ॥११२॥
तैसा तूं सदगुरु । भेटला असतां कल्पतरू । करुं गेलें व्यभिचारू । तुझ्यासह ॥११३॥
परी तेही सर्व गोठी । घालोनियां तुवां पोटीं । मोक्षाऐसी मोठी । वस्तु दिधली ॥११४॥
एवढा तुझा थोर । जो मजवरी उपकार । तो कैची मी पामर । फेडों शकें ? ॥११५॥
यालागीं धरावे चरण । तुझेंचि करावे स्मरण । हाचि धंदा आमरण । माझा आतां ॥११६॥
ऐसें बोलोनि विरहिणी । दंडवत पडली चरणीं । मग बोले शिखामणि । योगियांचा ॥११७॥
बाई तुझे मनोरथ । आताम तरी झाले तृप्त । कीं आणिक कांहीं इच्छित । मनीं आथी ? ॥११८॥
मग म्हणे सुंदरी । जया अटवीं केसरी । शिरला; तेथे ’ करी ’ । राहील कैसा ? ॥११९॥
परी एक असे विनंति । जे आतां झाली वृत्ति । तैसीच असावी स्थिति । निरंतर ॥१२०॥
यावांचोनि दुसरी । चाड नसे अंतरीं । ’ तथास्तु ’ म्हणे कैवारी । अनाथाचा ॥१२१॥
हा आशीर्वाद शिरीं । वाहोनि, आपुल्या घरीं । जाती झाली सुंदरी । अत्यानंदे ॥१२२॥
ऐसा सद्‍गुरु महिमा । सामर्थ्यासी नाहीं सीमा । नेणों तया उपमा । काय द्यावी ?॥१२३॥
कोणी अनुतापयुक्त । सद्‍गुरुसी शरणागत । झालिया; होय मुक्त । हें प्रसिध्द जगीं ॥१२४॥
परी हे मोठें चोज । जे आमुचा योगिराज । तारिता जाहला सहज । जारिणीतें ॥१२५॥
ऐसियाचि लीला थोर; देखोनि आठवे साचार । जो गोपीई केला व्यभिचार । श्रीभगवंतासी ॥१२६॥
जयें केलें जर्जर । देव दानव किन्नर । तेवींच ऋषि थोर थोर । नारदादि ॥१२७॥
तपस्तेजोराशि । विश्वामित्राऐसी । धेडें पडली फासी । ज्याच्या दर्पे ॥१२८॥
ऐसा जाळोनि काम । देवोनि मोक्ष सार्वभौम । महादेव ऐसें नाम । सत्य केलें ॥१२९॥
अध्याय हा चोविसावा । जो का श्रोतयांचा विसांवा । ह्र्दया आणिला वोलावा । भक्तिरसाचा ॥१३०॥
अहो क्षुद्र मुखांतुनि । निघे जरी हे वाणी । तरी अव्हेर आकर्णी । नोहावा जी ॥१३१॥
सुधें भरिला घट । मातीचा जरी वोखट । तरी काय कडुवट । अमृत ते ॥१३२॥
सोनाराच्या मूढपणें । वाकुडे झाले जरी लेणें । म्हणोनि काय मोलें उणें । भांगार होई ? ॥१३३॥
हें असो; नारिकेल । बहिरंगी जरी कुफल । तरी काय हो आंतील । खोबरें कडू ? ॥१३४॥
सज्जना, तैसीच ही कविता । जरी नावडे तुमच्या चित्ता । तरी आंत आहे कथा । सद्‍गुरुची ॥१३५॥
म्हणोनि मद्‍वाणीची ’ फोल ’ । सांडोनिया तुम्ही ’ साल ’ । हे सिध्दचरित्र चूतफल । सुखें भक्षावे ॥१३६॥
किंवा कथा-हेम पोटीं । ऐसी शब्द लोहाची पेटी । तुम्ही संत देखाल दिठी । तरी हेमचि तें ॥१३७॥
कां जे तुमची दृष्टि । ते परिसाचीच घृष्टी । मग लोहत्वाची गोठी । कायसी तेथें ? ॥१३८॥
आणि यावरी लळा । पाळिला तुम्ही आगळा । मग काय यया बाळा । भीति उरली ? ॥१३९॥
येर्‍हवीं ऐसें साहस । काय करिता हा दास । जरी नसतां प्रेमपोष । तुम्हांकडून ? ॥१४०॥
अहो बाळाचिया तोंडें । जरी बोलिजे बोबडे । तरी अमृताऐसें आवडे । पितयासी ॥१४१॥
तैसी वाणी पोंचट । आणि काव्यही पोरकट । परी आलाचि ना वीट । संतां तुम्हां ॥१४२॥
ऐसे माझे मायबाप । तुम्ही जाहला सकृप । म्हणोनीच हे जल्प । मी करों शके ॥१४३॥
अघट कृत्य घेतले हाता । कैसेनि पावेल पूर्णता । हेचि होती चिंता । ह्र्दयामाजीं ॥१४४॥
परी ते तुमच्या कृपें । अवघडही झालें सोपें । वरीं सद्‍गुरु दीपें । दाविली वाट ॥१४५॥
आंतून श्रीचें आश्वास्न । बाहेरी तुमचें उत्तेजन । तेणें जाहलें सहजी पूर्ण । काज माझें ॥१४६॥
आताम वंदूं समर्थ । श्रीज्ञानदेव एकनाथ । ज्यांच्या कृपें सच्चरित । पूर्ण जाहले ॥१४७॥
पुढील अध्याय पंचवीस । जो या ग्रंथाचा कळस । स्वयें बोलेल सरस । माय माझी ॥१४८॥
जेथें कथिता सद्‍गुरु । कथाही तोचि कल्पतरू । मग श्रोतयांचा आत्मा गार । कां न होई ? ॥१४९॥
रती चित्त करोनि समरस । न सांडितांही श्वासोच्छ्‍वास । परिसा पुढील पंचवीस । अध्याय तुम्ही ॥१५०॥
(३)श्रीपति सज्जनाचेनि मतें । रघुवीरें आज्ञापूनि मातें । सिध्दीसी कृतसंकल्पातें । नेलें असे स्वलीलें ॥१५१॥
तो परात्पर श्रीरामचंद्र । वंदिला ज्ञाननिधि योगीन्द्र । प्रेमानंदे दाटला सांद्र । ’ कृष्णसुत ’ ॥१५२॥
येर्‍हवी परमगुरुचे चरिती । मज वाकशून्या केउती मति? । परी मम पाठीराखा श्रीराम श्रीपति । आळी पुरविती दासाची ॥१५३॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्र भाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥१५४॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत्‍ सोऽहं हंसः ॥

॥ अध्याय चोविसावा संपूर्ण ॥

टीपः (१) तया बाईसी तेंचि पुसिलें-ओवी ८ :-
४ ते ३० ओव्यांतून श्रीमहादेवनाथांच्या चरित्रांतील एक हकिकत अली आहे. या सर्व ओव्या सुबोध असल्यामुळे त्याचा गद्य सारांश येथे देण्याचें कारण नाहीं. कांहीं रजपूत स्त्रीपुरुष परस्पर थट्टाविनोद करीत एका ठिकाणीं बसले होते. जवळच श्रीगुरु महादेवबुवाही निवांत बसले होते. " मी मागेन ते द्याल काय ? " असे त्यांपैकी एक रजपूत बाई
प्रत्येकाला विचारीत होती. एकजनानें मी देतो असे म्हटलें त्यावर ती बाई म्हणते. माझा मुलगा हो. हे ऐकुन पुरुष विनोदानें म्हणतो ’ काय मागणार याची मला भीति पडली होती ! ’ ’ सारांश हा सर्व खेळीमेळिचा संवाद चालला होता.
श्रीमहादेवनाथांनी ’ तया बाईसी तेंचि पुसिले म्हणजे ते त्या बाईस म्हणाले, ’ मी मागेन तें देशील काय? या पृच्छेंत
तिला असभ्यपणा वाटला व तिने नवर्‍याकडून श्रीनाथांना मारहान करविली -

(२) ध्यानी मनीं सुंदरी पाहीं - ५७
श्रीसिध्दचरित्रासारखे प्रासादिक ग्रंथ हे कथा-कादंबर्‍यांप्रमाणें मनुष्याच्या अंतःकरणांत रजोगुणांचा क्षोभ करवून जीवाला
विषयलोलुप बनविणारे नसतात. सत्त्वगुणाचा उत्कर्ष होऊन मनुष्याचे मनांत भक्ति ज्ञान वैराग्य निर्माण व्हावे अशी या
सद् ग्रंथांच्या निर्मात्यांची कळकळ असते. ४२ ते ९४ ओव्यांत बरेंचसें शृंगारप्रधान वर्णन असले तरी ते श्रीसद्‍गुरु महादेवनाथांचें वैराग्य, ज्ञाननिष्ठा व वाममार्गी जाऊं पाहणार्‍या जीवास सन्मार्गावर आणण्याची करुणा यांचें प्रसन्न दर्शन घडविण्यासाठीं पार्श्वभूमीसारखें समजलें पाहिजें तसेंच परद्रव्य, परनारी याबाबतीत साधकांनीं किती अहोरात्र व यावज्जीव सावध राहावयाचे असते त्याचें मार्गदर्शन लेखकास येथें करावयाचें आहे. ज्या ओवीचरनावर येथें टीप दिली
जात आहे त्यांत त्या बाईकडे भोजन करुन श्रीगुरु आपल्या बिर्‍हाडी गेल्यावर ’ ध्यानी मनीं ती स्त्रीच त्यांना दिसू लागली  ’ असा अर्थ आहे. हें वर्णन, साधकांच्या मार्गदर्शनासाठी आहे. श्रीमहादेवनाथांची खरोखरी अशी मनःस्थिति झाली
असें नव्हे. या कथाप्रसंगांत श्रीगुरुंचे ’ यया भाषणाचें मर्म । जाणे तो सद्‍धर्म । ’ समर्थ निघाले सदना कामिनीच्या ।
’ सकळ हावभाव ।’ ’ स्वामीवरी जाले वाव । ’ जो ब्रह्मानंदाचा भोक्ता । तया केवीं लोलुपता । विषयसुखी ! ॥ हें जें वर्णन
आहे तेंच यथार्थ होय. यांतून साधकानें एवढेंच समजावयाचें कीं अन्न तयार करणार्‍या व वाढणार्‍या व्यक्तीच्या
अम्तःकरणांतील कामवासना, द्वेष, इ तीव्र विकार त्या अन्नांत उतरतात । व तें भक्षण करणारावर परिणाम करतात.
श्रीरामकृष्न परमहंस म्हणत असत ’ मातेनें अगर सुशील पत्नीनें केलेलें अन्न हे अत्यंत पवित्र होय ! सर्वात पवित्रतम
अन्न अर्थातच स्वतःशिजविलेलें होय !

(३) श्रीपति सज्जनाचेनि मतें । कृतसंकल्पातें सिध्दीसी नेलें - ओवी १५१ :-
अध्याय १९ ते २४ या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ’ कृष्णसुतांनी ओवीरचनेसंबंधीं स्पष्ट आत्मोल्लेख केला आहे. रघुवीरांनी म्हणजे सद्‍गुरु श्रीरामचंद्र तिकोटेकर महाराजांनीं आज्ञा केली व थोर मनाच्या श्रीपतींनी संमति दिली म्हणून ह्या सहा अध्यायांची रचना झाली असा कृष्णसुतांनीं पुनः निर्देश केला आहे.
कठीण शब्दाचे अर्थः हरळ =खडेगोटे (१२) सुवर्णाची खोटी = सोन्याची लगड (२३) शैत्यविकॄति = थंडीमुळे पडसें खोकला वगैरे होणे (४१) बिढार= बिर्‍हाड (५७) कबरीभार = केसांचा अंबाडा  ( ६४) स्तेन = चोर (७३) ईषत = किंचित थोडेसं
(७९) खरी =(स) गाढवीण (८३) कामहता = वासनेच्या पूर्ण आहारीं गेलेली (९४) करी = [ सं. करिन] हत्ती (११९) चोज = नवल
आश्चर्य (१२५) भांगार = सोनें (१३३) चूतफळ = आंबा (१३६)

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP