मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|
अध्याय पस्तिसावा

श्रीसिद्धचरित्र - अध्याय पस्तिसावा

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीगणेशाय नम: ॥
आम्हां दीनांकारणें । परेशा तुझें येणें । जडजीव उध्दरणें । हें करणें बहु आवडे ॥१॥
केवळ परप्रकाशोद्देशें । लोकबांधव रवि प्रकाशे । दयाब्धि तुज अपैसे । घडे तैसें अवतरणें ॥२॥
परार्थ फळती झाडें । नदी परार्थ वाहे कोडें । मेघां वृष्टी करणें पडे । परार्थ; सांकडे न मानी तो ॥३॥
जेथें जेथें जे वसती । ठाय़ींचे ठाई संबोखिती । श्रम सायास सोशिती । परासी देती बहु तोष ॥४॥
ऐसी जी जी उपमा । तुज देईन रामा । ती न पुरे तुझिया रोमा । सार्वभौमा त्रिभुवनींच्या ॥५॥
या जगाचिया कणवा । अनुशासना लागी देवा । वेद निर्मिले जे तुवां । मार्ग दावावयातें ॥६॥
परी प्रबळ तुझी माया । तुझ्या सत्ते बळावुनिया । ब्रह्मादिकां आणिले आया । जे सृष्टिकार्या चालविती ॥७॥
मा इतरांचा पाड किती । सांगें जिणावया तिजप्रति । प्रकटूनि तूं दयामूर्ति । धरिसी हाती तै खरें ॥८॥
जैसा बाळकालागीं पिता । बागुल शब्दें भिवविता । होय, भ्याला म्हणोनि मागुता । स्वयें तारिता तयासी ॥९॥
मुळीं बागुलचि नाहीं । तेथें भय कैचें काई । परी भय दाविता जैं । निवारील तैं भय जाय ॥१०॥
तैसें ’ माया ’ या शब्दार्था । सूक्ष्म विचार विवरुं जातां । नाहीं त्या वंध्यासुता । दाविता भ्रांता भय जैसें ॥११॥
तैसी तुझी नाथिली माया । तुज शरण न आलिया । ब्रह्मादिकां न ये आया । प्रौढ क्रिया हे जियेची ॥१२॥
ही दैवी गुणमया । मम माया दुरत्यया । मजचि शरण आलिया । तरती माया ते एक ॥१३॥
ऐसें गीतेमाजी देवा । ऊर्ध्व बाहू करोनि, सर्वा । सांगती; परी तया पर्वा । धरोनि गर्व न साधिती ॥१४॥
मग कळवळोनियां चित्ती । अवतार धरिसी क्षितीं । लावोनि जनां सुपथीं । दयामूर्ति तारिसी तूं ॥१५॥
आम्ही पळतां दुरी । प्रेमें धरुनियां करीं । पुनःपुन्हां शुध्दीवरी । आणिसी; थोरी किती वानूं ? ॥१६॥
सर्व सुखें सांडोनि । यति-तापसी वनोवनीं । हिंडती निजवस्तुलागोनी । ते निजसदनीं तूं देसी ॥१७॥
गुणदोषां द्डवोनि पाठीं । जगनिंदें लावूनि कांटी । वत्सा धरिजे पोटीं । तैसें जगजेठी रक्षिसी ॥१८॥
निजवदनींचा कवळ । देवोनि संबोखिती बाळ । माय माउली तूं स्नेहाळ । अनन्य केवळ मी तुझें ॥१९॥
ऐसी भाकिता करुणा । दीनवत्सलाचा राणा । म्हणे वत्सा ना भी सुजाणा । ग्रंथरचना चालवी ॥२०॥
तुझी ह्रदयींचें गुज । आम्ही जाणतसों सहज । तेंचि वागुच्चारें चोज । प्रकट आजि दाविलें ॥२१॥
तुवां स्तवन करावें । मग आम्हीं प्रसन्न व्हावे । ऐसें नसे; तें आघवें । ह्रदिस्था ठावे श्रीगुरुसी ॥२२॥
इतर असो आतां । शुध्द चालवी ग्रंथकथा । श्रवणीं बैसला श्रोता । समाज ग्रंथार्था भुकेला ॥२३॥
ऐसें तुम्हां सज्जना । कारणें श्रीगुरु राणा । आज्ञापी मज दीना । या महिमाना पात्र तुम्हीं ॥२४॥
तुम्हासाठीं श्रीगुरु । पामराचा अंगीकारु । करोनि ग्रंथ विस्तारु । करी साचारु स्वयमेव ॥२५॥
नातरी तुम्हां श्रेष्ठांपुढें । ग्रंथीं शब्दरचना जोडे । ऐसें सामर्थ्य वाडेकोडें । श्रीपति वेडे काय जाणे ? ॥२६॥
नाथें बोलविला रेडा । दत्तें अंत्यज केला पुढां । माउली अंगीकारी वेडा । तुमच्या कोडा श्रीपतीसी ॥२७॥
श्रोते म्हणती पुरे करी । ग्रंथ चालवी झडकरी । ते आज्ञा वंदोनि शिरीं । नमस्कारी साष्टांग ॥२८॥
पूर्वाध्याताचिये अंतीं । रामें पूर्ण शंकराप्रति । केले; दीपें दीप लाविती । स्वयंज्योती तैसें करी ॥२९॥
तैसें आपणाऐसें । राम शंकरा करीतसे । पुढें वर्तलें जैसें । तें सावकाशें परिसावे ॥३०॥
जैसा प्रल्हाद बाळका । उपदेशु करी निका । (१)राम-पुत्र समवयस्कां । हित बालका सांगावे ॥३१॥
म्हणे नरदेह आपण उत्तम । बहु दुर्लभ परी सुगम । जाहला येथें निष्काम । आचरोनि कर्म तरावे ॥३२॥
आयुष्य क्षण लवें । व्यर्थ व्यर्थ जात आघवें । पर्वकाळ पुन्हां फावे । ऐसें जीवें न माना ॥३३॥
गेली वयसा न ये पुन्हां । आयुष्याची नव्हे गणना । अद्य वाब्दशतान्ते मरणा । प्राप्त जाणा होणें असे ॥३४॥
वृध्दापकाळपर्यंत । आयुष्य राहील शाश्वत । ऐसा नाहीं निश्चितार्थ । यास्तव त्वरित सावध व्हा ॥३५॥
ऐसा हितवाद ऐकतां । आले बहुतेकांच्या चित्ता । श्रीगुरुपदीं ठेवूनि माथा । कृपावंता तारी म्हणती ॥३६॥
बाबण्या ताटगोडे थोर । आणि नारायण सावकार । बाबाजी कुलकर्णी साचार । रावजी सोनार आणि कृष्णा ॥३७॥
देशपांडे बाळाजी गोविंद । रामचंद्र तंमाजी प्रसिध्द । श्रीगुरु चरणींचा आमोद । सेवूनि, गोष्पद भव केला ॥३८॥
दत्तंभटा देशिंगकर । बाबू गुरव विश्वासी नर । तैसासि सिदरामही साचार । पैलपार पावले ॥३९॥
जैसा येतां पर्वकाळ । पुनीत होती वृध्दबाळ । तैसें जे जन प्रेमळ । गुरुपदीं भाळ ठेविती ते ॥४०॥
ऐसा पुण्य काळ चालतां । एक वर्तली अपूर्व कथा । ती चित्त देऊनि श्रोता । साद्यंत आतां परिसावी ॥४१॥
सज्जना छळीती दुर्जन । हा अनादिसिध्द रोळ जाण । जरी फळ पावती दुर्जन । तरी स्वगुण न सांडिती ॥४२॥
तैसें तया ग्रामामाजीं । (२)रामचंद्र पिता तंमाजी । म्हणे संसृति बुडाली माझी । पुत्र काजीं न पडे आतां ॥४३॥
पुत्र माझा गुणगंभीर । संसारीं परम चतुर । तया उपदेशी रामचंद्र । आतां संसार न करील ॥४४॥
जेणें माझा भुलविला पुत्र । एकांन्ती गांठूनि सत्वर । तया ताडन करुं फार । ऐसा विचार दृढ केला ॥४५॥
(३)संसार त्यागें ज्ञान होतें । तरी सर्वही त्यागिते । हे अज्ञाना न कळे निगुतें । वृथा रितें जल्पती ॥४६॥
प्रपंचाचा न करी त्याग । वेदाज्ञेची नुल्लंघी रेघ । वर्णाश्रम यथासांग । तुं अव्यंगपणें साधी ॥४७॥
काया क्लेशीं कष्टूं नये । व्रत तीर्थ निंदुं नये । उपासना दृढतर होये । ऐस अक्रिय तूं वर्ते ॥४८॥
प्राप्ताच अनादर न करी । अप्राप्ताची इच्छा न धरी । ऐसा उपदेश सुविचारी । ज्ञान थोरीं हे असे ॥४९॥
हें जो न जाणे पामर । तो न म्हणावा गुरुपुत्र । अहाहा अधमा नकळे विचार । निरय घोर भोगिती ते ॥५०॥
(४)ऐसी कर्णोपकर्णी वार्ता । तथ्य जाणे ही रामकान्ता । सुप्रसन्न पाहोनि एकान्ता । ते मम ताता काय प्रार्थी ॥५१॥
म्हणे जी स्वामी अद्वितीया । अखंड दासी चिंतो पाया । पुत्रें विपरीत केली क्रिया । जाणोनि तंमाराया क्षोभला ॥५२॥
श्रीनीं मस्तकीं ठेविला हस्त । तेणे होऊनि तो मस्त । प्रपंच त्यागील नेमस्त । पुढे गत काय आपुली ? ॥५३॥
ऐसें मानूनि विपरीतार्था । अनंत जन्मींच्या निजस्वार्था । त्यागोनि; करुं पाहे अनर्था । यास्तव चित्ता भय वाटे ॥५४॥
ऐकोनि श्रीगुरु हासिन्नले । यांत आमुचें काय गेलें ? देहा पूजिलें की विटंबिले । आम्ही येतुलें कां चिंतावें ? ॥५५॥
देह तो असे प्रारब्धाधीन । सुखदुःखे भोगी आनाआन । त्याची वृथा चिंता वाहून । क्लेशाधीन कां व्हावे ? ॥५६॥
आमुचें मरोनि जिणें । तेथें अधिक अथवा उणें । हें मी कांहींच न जाणे । जगदुद्धरणें गुरुसेवा ॥५७॥
स्वामी मुखीचे उत्तर । जें त्रिकाण्डीचें सार । ऐकतां, प्रेमाचा गंहिवर । आला अनावर सतीतें ॥५८॥
म्हणे जी जी स्वामिया । अज्ञानध्वान्तनाशका सूर्या । आज्ञापिलें जे गुरुवर्या । तें सर्व कार्या साच कीं ॥५९॥
परी अबला मी भीरु । न साहे तव अनादरु । हें ग्राम माझें माहेरु । आप्त परिवारु येथ माझा ॥६०॥
ऊर्ध्व करोनियां भ्रुकुटी । ’ तमा ’ श्रीस पाहील दिठी । तरी परिवारु उठाउठी । त्याचे पाठीं लागेल ॥६१॥
उभयांत कलह थोर । न वाढावा वैराकार । भंग न पावे जगदन्तर । तेंचि ईश्वरपूजन ॥६२॥
ऐसें वाटलें मना । म्हणोनि केली विज्ञापना । युक्तायुक्त ज्ञानघना । पद्मनयना जाणा तुम्ही ॥६३॥
कळेल तो करावा विचार । म्हणोनि पदीं ठेविलें शिर । श्रीगुरु देती नाभिकार । म्हणे चिंतातुर न व्हावे ॥६४॥
तेथील जो ग्रामाधिपति । अप्पा देसाई नामें ख्याति । त्याच्या सदनीं श्रीगुरु जाती । सहज रीती एकदां ॥६५॥
तयासी जाणवलें वृत्त । साष्टांग करी प्रणिपात । म्हणे सुकृतौघ समस्त । आजि उदित जाहला ॥६६॥
अज्ञाननाशक सविता । प्रयत्न न करितां आला हातां । आतां पद्मकर ठेवोनि माथां । तारी या पतिता दयाळा ॥६७॥
ऐसें प्रार्थूनि दुजे दिनीं । प्रातःकाळीं स्नान करुनी । श्रीपदीं भाळ ठेवुनी । तीर्थसेवनीं सिध्द झाला ॥६८॥
विधियुक्त संप्रदाय । स्वीकारोनि; धरी पाय । म्हणे धन्य तूं गुरुमाय । बाळा ’ हाय ’ न म्हणों दे ॥६९॥
श्रीमत्‍ भगवदगीता । नित्य होय अप्पा वाचिता । षष्ठीं जो योग होय सांगतां । ती खूण चित्ता बाणलीई ॥७०॥
 म्हण योग मार्ग खरा । सत्य ज्ञान नव्हे इतरां । साक्षात्कार जाहला पुरा । ममान्तरा बाणला ॥७१॥
ऐसी शुध्द चित्तवृत्ति । होतांचि, तो ग्रामाधिपति । सदा जपे गुरुमूर्ति । अनन्यभक्ती ठेवोनी ॥७२॥
अण्णाबोवा संत । तैसेंचि तात्याबोवा विख्यात । मंगळवेढेकर येत । हरिदास तेथ सुसमयीं ॥७३॥
(५)रात्रौ श्रीमंतांचे सदनीं । कीर्तन होते एके दिनीं । माझा तात राम मुनि । जाय कीर्तनी आनंदे ॥७४॥
प्रतिष्ठेची नाही चाड । कीर्तनाची बहु आवड । पडों नये कोणाची भीड । म्हणोनि एकीकडे बैसली ॥७५॥
हरिदास परम उत्तम । गुरुदास्याचे जाणती वर्म । तैसाचि ज्ञानयोग सुगम । जया, त्या प्रेम अनिवार ॥७६॥
श्रीगुरुवांचोनि जिणें । नरदेहींचें सर्वस्वीं उणें । ऐसें वेदशास्त्र म्हणे । हे नेणे तो नरपशु ॥७७॥
जो भवाब्धीचा तारुं । श्रमसायासातें थोरु । न देववी तो पैलपारु । कृपें साचारु पाववी ॥७८॥
ऐसा वर्णितां श्रीगुरु । श्रव्णीं कोणाचा आदरु । हें वक्ता कृपाकरु । पाहे साचारु निरखोनी ॥७९॥
पाहतां श्रोते मंडळी । रामाकडे दृष्टी गेली । तो वृत्ति तदाकार जाहली । पूर्न निमाली निजानंदीं ॥८०॥
हें देखतां हरिदासें । सत्कारिला प्रेम सौरसें । श्रीमंतांसी सांगतसे । हा सत्पुरुष येथें कां ? ॥८१॥
अहो हा योगांगण मान्दार । आश्रितान्तःकरण दिनकर । याज्ञवल्क्य कीं शुक योगीन्द्र । हा माहेर निजाचें ॥८२॥
ऐसें ऐकोनि यजमान । धांवोनि घाली लोटांगण । म्हणे महाराज कृपाघन । ऐसें आगमन कां झालें ? ॥८३॥
ऐसा श्रीगुरु प्रार्थुनी । बैसविला निजासनीं । चरणीं मस्तक ठेवोनि । कर जोडूनि उभा राहे ॥८४॥
हें पाहती सर्व नयनीं । पिशुनही होता तये स्थानीं । म्हणे हा केवळ मोक्षदानी । काय मनीं म्यां आणिलें ? ॥८५॥
सुरतरु प्रार्थावा हिता । कीं कुठारें कीजे घाता । हें मी न जाणे तत्त्वतां । काय आतां करावे ? ॥८६॥
ऐसा जाहला पश्चात्ताप । म्हणे कें सारुं माझे पाप ? । सहजीं विरालासे ताप । ताडन माप के तेथें ? ॥८७॥
निंदा द्वेष अथवा भक्ती । घडावी सज्जनाची संगति । सहज जाळूनि दुर्मति । शुध्द वृत्ती होय प्राणिया ॥८८॥
असो कडोलीकर गोविंद । हरिदास जगप्रसिध्द । निःसीम जाणे योग अगाध । म्हणोनि सिध्द ये श्रवणा ॥८९॥
त्याचें कीर्तन नित्य नेम । आदरें ऐकतसे सद्‍गुरुराम । खूण बाणतां, सप्रेम । होवोनि; नाम गर्जतसे ॥९०॥
कमळनेत्रें सर्व देखे । परी पराग भ्रमर चाखे । तैसे ग्रंथगर्भीचे निके । भावार्थ घेपे राघवु ॥९१॥
संस्कृत हो कां प्राकृत । पुराणपदें वाक्यार्थ । सर्व सांगती; परी गुह्यार्थ । एक रघुनाथ जाणतसे ॥९२॥
ऐसा आनंदे काळ जातां । पुढें वर्तली नवल कथा । ती परिसिजे श्रोता । सावध चित्ता करोनि ॥९३॥
अथणी ग्रामामाजी देख । ’ बोडस ’ इत्युपनामक । गोपाळपंत द्विज एक । राजसेवक वसतसे ॥९४॥
लेखनविद्येमाजीं कुशल । तैसाचि शुचिष्मंत सुशीळ । अध्यात्मविद्या जाणे सकळ । वृथा काळ जाऊं नेदी ॥९५॥
मंगसोळी नामें ग्राम । तेथें पातला द्विजोत्तम । कांहीं कार्याचा उद्यम । मनीं आगम धरोनी ॥९६॥
तेथें मल्लंभट देशिंगकर । बाबण्णा नारायण सावकार । आणि ’ बळवंत ’ रामपुत्र । परस्पर संवादिती ॥९७॥
आत्मसुखानुभूति । एकमेकांत सांगती । सांगतां समाधिस्थ होती । पुनः येती देहावर ॥९८॥
प्रेमभर न सावरे । आनंदें कंठ गंहिवरे । म्हणती आम्हां श्रीगुरुवरें । नेले खरें भवपार ॥९९॥
ऐसें परस्परें बोलती । तें ऐके तो द्विजाति । म्हणे वयें सान दिसती । परी बोलती सिध्दान्त ॥१००॥
पूर्वी गोपाळपंत बोडस । सांप्रदायी रामदास । दासबोधादि ग्रंथ विशेष । सावकाश अवलोकी ॥१०१॥
परी चिदैक्य मार्ग कळा । ते ठाउकी नाहीं गोपाळा । म्हणे लेकुरां हा जिव्हाळा । प्राप जाहला कोठुनी ? ॥१०२॥
ऐसे विचारुनि मानसीं । मग पुसतसे तयांसी । बाप हो या सत्पथासी । कोणी तुम्हांसी लाविले ? ॥१०३॥
ते म्हणती श्रीगुरु रामें । भक्त काम कल्पद्रुमें । आम्हां अंगीकारिलें प्रेमें । निज सुखधामे दयाळें ॥१०४॥
द्विज म्हणे संप्रति । कवणे ठायीं ते असती । ’ गेले चिंचणी ग्रामाप्रति ’ । म्हणोनि देती उत्तर ॥१०५॥
तें ऐकोनि तो द्विजन्मा । म्हणे मी कैं देखेन रामा । ऐसा दृढ जडला प्रेमा । शिवापूर ग्रामा मग गेला ॥१०६॥
इकडे रामास दृष्टान्तीं । महादेव आज्ञापिती । ’ बा रे शिवापुराप्रति । त्वरीत गतीं तूं जावे ’ ॥१०७॥
गोपाळपंत बोडस । तुज आठवी रात्रंदिवस । दर्शन देऊनि तयास । सन्मार्गास लावी वेगीं ॥१०८॥
ऐसा दृष्टांत जाहला । राम प्रातःकाळीं उठिला । म्हणे जाऊं शिवापुराला । आज्ञा आम्हांला प्रमाण ॥१०९॥
परी कोण गोपाळपंत । कैसी त्याची भेट होत । हे जाणेल श्रीगुरुनाथ । दासें आज्ञांकित असावे ॥११०॥
जागृतीं कैकास स्वप्नी । जें आज्ञापिलें स्वामींनीं । ते प्रमाण आम्हांलागुनी । ऐसें बोलोनि निघाले ॥१११॥
मारुतीचे देवालयांत । गोपाळ बैसला राजकार्यांत । श्रीगुरु राम ते समयीं तेथ । आले त्वरित शिवापुरीं ॥११२॥
पाहतां घनश्याम मूर्ति । आनंदला गोपाळ चित्तीं । म्हणे मम भाग्यसंपत्ति । हेचि असती श्रीचरण ॥११३॥
मियां जावे तेथवरी । अथवा पाचारावे तरी । तें मी न करे दुराचारी । काय थोरी कृपेची ! ॥११४॥
ऐसें विचारी मानसीं । बाहेरी राजकार्याची । धांवूनि लागे चरणासी । प्रेमें मातेसी बाळ जैसें ॥११५॥
पुसे चिंचणी ग्रामाहूनी । येणें असावे आजिचे दिनीं । ’ होय ’ म्हणतां श्रीगुरुंनीं । आनंद मनीं न समाये ॥११६॥
कांहीं न देतां प्रत्युत्तर । गृहीं सत्कारपुरस्सर । नेऊनि बैसवी मंचकावर । पूजा संभार मेळवी ॥११७॥
शुचिर्भूत होय आपण । श्रीगुरुस मंगलस्नान । घालोनियां, साष्टांग नमन । कर जोडोन उभा राहे ॥११८॥
म्हणे मी पतित तूं पावन । अंगीकारावा हा दीण । राम म्हणे बा तूं धन्य । वृथा कां शीण वाहसी ? ॥११९॥
तुजसाठीं श्रीगुरुवरी । आम्हां धाडिले येथवरी । ऐसें म्हणोनि विधियुक्त करी । उपदेश; हारी मनोमळ ॥१२०॥
साधनचतुष्टय संपन्न । वरी रामदासी औपासन । महावाक्य होता श्रवण । तातकाळ नयन प्रकाशले ॥१२१॥
पद्मकर ठेवितां माथा । हरली भवज्वराची व्यथा । निजैक्यसमाधि भोगितां । द्वैतकथा मग कैची ? ॥१२२॥
कांहीं वेळ समाधिस्थ । राहिलासे गोपाळपंत । आनंदी आनंद भोगीत । मागुती येत पूर्वस्थितीं ॥१२३॥
पाहोनि श्रीमुख चांगलें नयनी प्रेम पाझर आले । चरणीं गडबडा लोळे । म्हणे केलें धन्य मज ॥१२४॥
दासबोधादि ग्रंथ । पाहिले बहुत शास्त्रार्थ । आजि जाहले सुप्रचीत । संशय रहित झालों मी ॥१२५॥
बहुत ग्रंथ धुंडाळिले । अर्थान्वयें ज्ञान बिंबलें । परी तें परोक्ष बोलिलें । जंव न आले निज हातां ॥१२६॥
फाल्गुनामाजीं बाळकें । जल्पताती मनोत्सुकें । परी विषयातें नोळखें । ग्रंथमुखें तेवीं जाहलें ॥१२७॥
जंव मन न होय उन्मन । किंवा जीव शिवाचे लग्न । नोहे; तोंवरी ब्रह्मज्ञान । कदां जाण न होय ॥१२८॥
ऐसें बोलोनि विनवीतसे । अखंड समाधिशेजे वसे । ऐसें मानस इच्छीतसे । करणें कैसें तें सांगा ॥१२९॥
श्रीगुरु म्हणती गोपाळा । समाधिसुख सोहळा । पाहात जाई वेळोवेळां । जे चित्कळा ब्रह्मीची ॥१३०॥
परी दृश्य द्रष्टा दर्शन । या त्रिपुटीतें ग्रासून । जें ज्ञप्तिमात्र अभिन्न । स्वरुप जाण तें तुझें ॥१३१॥
हे अनुभविल्याविण । प्रत्यक्ष ज्ञान नव्हे पूर्ण । म्हणवोनि दाखविली खूण । बा तूं निपुण अससी ॥१३२॥
परी ऐसी ताटास्थ्यता । धरोनि, न राहे तत्त्वतां । येणें आयुष्य न नासतां । वृध्दिंगत होतसे ॥१३३॥
तुझें संचित क्रियमाण । ज्ञानानळें जळालें पूर्ण । परि प्रारब्ध न सरे जाण । भोगिल्याविण देहांत ॥१३४॥
समाधिसुखाचा जो वेळ । तो आयुष्य न गणी काळ । कां जे सुख दुःख प्रांजळ । भोगफळ तेथ नसे ॥१३५॥
याचि योगें बहु सिध्द । आजवरी जगीं प्रसिध्द । असती; त्यागोनियां क्रोध । सुखे निर्द्वन्द्व विचरती ॥१३६॥
तुज देहाची असे गोडी । तोंवरी समाधीतें न सोडी । परी देह हाडाची बेडी । सांडी वावोडी स्वेच्छा तूं ॥१३७॥
सहज समाधी वर्तणें । प्रारब्धाहाती असे जिणें । अवस्थातीत सुख भोगणें । आम्हां करणें आवडे हें ॥१३८॥
ऐसें ऐकोनियां वचना । गोपाळ करी विज्ञापना । म्हणे आम्हां अनाथा दीना । तुझी आज्ञा प्रमाण की ॥१३९॥
जैसें आज्ञापिलें स्वामींनीं । चित्ती धरोनि अनुदिनी । सुखें वर्तेन जी या जनीं । म्हणोनि चरणीं लागला ॥१४०॥
रामें पुसोनि तयासी । आले मंगसोळी ग्रामासी । वारंवार गुरुदर्शना । मंगसोळीस गोपाळ ये ॥१४१॥
दिवसेंदिवस वाढे भक्ति । अभ्यासीही धरिली आसक्ति । ऐसें पाहोनि, श्रीगुरुमूर्ति । आज्ञापिती काय तया ॥१४२॥
तूं जाहलासी पूर्ण ज्ञानी । जगदुद्धार करी येथुनी । मुमुक्षु याचक चिंतामणी । होऊनि, जनीं संचरे ॥१४३॥
आज्ञा वंदोनियां शिरीं । शिष्य पाहोनि अधिकारी । त्यासी बोधी गुरुनाम मंत्री । जगदुध्दारी होय ऐसा ॥१४४॥
सोडोनियां राजसेवा । नित्य स्मरे श्रीगुरुदेवा । कृष्णातीरीं वास बरवा । कुटुंबवैभवासहित करी ॥१४५॥
शिष्य जाहले कितीएक । तयामाजीं मुख्यमुख्य । आणोनि, श्रीगुरुसन्मुख । गोपाळपंत निरवीतसे ॥१४६॥
पाहोनियां ’ शिष्य-शिष्यां ’ । आल्हादु होय परेशा । म्हणे आदिनाथाचिये वंशा । श्रीजगदीशा तूं वाढवी ॥१४७॥
(६)ऐसी गोपाळाची कीर्ति । आत्मानात्म विचार स्थिति । तैसी निःस्पृहतेची ख्याति । जगविख्याति जाहली ॥१४८॥
रामचरित कथा सुरस । श्रोते सेवा सावकाश । टाकोनियां निद्रा आळस । प्रेमरस घ्या तुम्ही ॥१४९॥
तुमचेनि कृपालेशें । ग्रंथीं होय मतिप्रकाश । नातरी मतिमंद विशेष । श्रीपति सर्वास ठाउका ॥१५०॥
कोठें होतें न्यूनाधिक । ठाउकें नाहीं कांही एक । ह्रदिस्थ श्रीगुरुनायक । वदवील देख तें खरें ॥१५१॥
मी तों अल्पमति हीन । किती वानूं माझे दुर्गुण । परी करील संरक्षण । अनन्यपण जाणोनि ॥१५२॥
काळकूटातें शंकर । त्यजीना, पृथ्वीतें अहीन्द्र । वडवग्नि साहे समुद्र । अंगीकारानिमित्त ॥१५३॥
तैसीच माझी गुरुमाउली । संरक्षिती वेळोवेळीं । जे जे करीतसे आळी । साहोनि; रळी पुरवीतसे ॥१५४॥
इतरां दुर्लभ चरणरज । तिये ओसंगी घेतिला मज । काय वानूं कृपेचें चोज । रंका साम्राज्य वोपिती ॥१५५॥
माझी अनन्याची प्रौढी । किती वानूं मी घडीघडीं । मी दूर जाय देशोधडी । ओढोनि तांतडी आणिती ॥१५६॥
कैसाही राहे तूं सुखें । चरणसान्निध्यातें न चुके । येतुलें करी; इतर अशेखें । आम्हां देख पावलें ॥१५७॥
ऐसें प्रेमाचें भोज । मजवरी ते महाराज । करिती; तयाए चरणरज । तारक मज भवार्नवीं ॥१५८॥
पुढील कथा अलोलिक । वदवितील गुरुनायक । जें कलिकल्मषनाशक । श्रोती नावेक स्थिर व्हावे ॥१५९॥
श्रीरामचरण -रजोद्‍भव गोदा । वारी सर्व-जन आपदा । चित्समुद्र मुमुक्षुयादा । अवगाही सदा श्रीपति ॥१६०॥
सर्वसाक्षी आत्मयारामा । निज जन-काम कल्पद्रुमा । कंठीं वसवोनियां नामा सदा प्रेमा देई तुझा ॥१६१॥
स्वस्ति श्रीसिध्दचरित्रभाव । भवगजविदारक कंठीरव । तारक सद्‍गुरु रामराव । त्यानें उपाव रचिला हा ॥१६२॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ ॐ तत्सम्‍ सोऽहं हंसः ॥

॥ अध्याय पस्तिसावा संपूर्ण ॥

टीपा - राम-पुत्र समवयस्कां । हित सांगतसे -ओवी ३१ :-
सद्‍गुरु श्रीमहादेवनाथांनीं जगदुध्दाराची आज्ञा दिल्यानंतर श्रीरामचंद्र महाराजांनीं पहिली दीक्षा आपली धर्मपत्नी व मुलास दिली असें वर्णन मागील अध्यायांत आहे. ’ बळवंत ’ नामक या श्रींच्या सुपुत्राला अल्पवयांतच दीक्षा झाली. त्याच्या मुखाने ओवीलेखकानें वाचकांना नरदेहाचें सार्थक करुन घेण्याचा उपदेश ३५ व्या ओवीपर्यंत केला आहे. या पोथींत ’ बळवंत ’ नावानें उल्लेख आलेला आढळतो. परंतु तें टोपणनांव असावे. कारण त्यांचे घराण्यांत ’ नरहर ’ हेंच नांव रुढ आहे. श्रींचे नातू सांप्रत ’ रघुनाथ नरहर पागे ’ असें नांव लावतात .

(२) रामचंद्र पिता तंमाजी । म्हणे संसृति बुडाली माझी - ओवी ४३ :- ३७, ३८ व ३९ ओव्यांतून महाराजांच्या कांहीं शिष्यांची नावें नमूद केली आहेत. त्यापैकी । रामचंद्र तमाजी ’ एक शिष्य होते. परमार्थ, गुरु -शिष्यसंबंध, वैराग्य यासंबंधीं आज जशा अनेक गैरसमजुती आहेत तशा त्या काळीही होत्या . ’ संसारी परमचतुर ’ असा आपला रामचंद्र हा मुलगा या गुरुपदेशाच्या भरीस पडल्यानें आतां संसार नीट करणार नाहीं असें तंमाजीला वाटले. पण नुसतेंच वाटलें नाही तर तमोगुणानें जोर केल्यामुळें त्यानें श्रीमहाराजांचा छ्ळ करण्याचे ठरविले - असा हा कथाभाग आहे.

(३) संसारत्यागें ज्ञान होते । तरी सर्वही त्यागिते - ओवी ४६ :-
४६ ते ५० या ओव्यांतूण तंमाजीनें आपल्या बुध्दीप्रमाणें रामचंद्रास म्हणजे आपल्या मुलास ’ गुरुपुत्र ’ कोण ? यासंबंधी
विचर सांगितला आहे.
(४) ऐसी कर्णोपकर्णी ही वार्ता । तथ्य जाणे रामकांता ओवी ५१ :-
मुलाला उपदेश दिल्याबद्दल तंमाजी कांहीं अविचाराचें कृत्य करणार आहे ही वार्ता कानीं येऊन रामकांता म्ह. श्रीरामचंद्र
महाराजांच्या धर्मपत्नी श्रीगुरुंजवळ संभाव्य संकटाबद्दल भय व्यक्त करीत आहेत. यावर श्रीमहाराजांनीं ५४ ते ५७ ओव्यांतून दिलेलें उत्तर हे त्यांच्यासारख्या विदेही गुरुभक्ताला अत्यंत साजेसेच आहे.

N/A

References : N/A
Last Updated : March 10, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP