भगवद्गीतास्तोत्र - अध्याय सतरावा
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७८४५॥
कुळीं सत्कुळीं कुळाधीं । कुळदैवत कुळघ्नधी ॥
नवल दाविलें कुळसिद्धी । जग अवघें कुळसुखी ॥१॥
आतां सप्त दशा पोटीं । कैसी नाजुक हतवटी ॥
भक्ष्य साजुक किरीटी । पात्रीं देव वोगरी ॥२॥
तेथें त्रिगुण मक्षिका । वारुनियां स्वाद नीका ॥
घेणें पांडूच्या बाळका । हरि माउलीच्या करें ॥३॥
परि सत्कवी पिपिली । ताट प्रसादा लाधली ॥
आतां वृत्ति जे लाधली । ते न राहे निवांत ॥४॥
तेंच एक वेळ पुन्हा । विचारुनी जनार्दना ।
घे तूं केवळ सज्जना । तुकया टोवो न पाहे ॥५॥
॥७८४६॥
महाराज राजयांच्या । सत्ता नेमीं श्रीमंतांच्या ॥
ऐके प्रभू पंडितांच्या । चिद्भुवनाच्या चिज्ज्योती ॥१॥
नमस्कार विश्वालया । ऐसें पार्थे स्तवूनियां ॥
पुसता झाला त्या अन्वया । बरी दृष्टी न्यासीजे ॥२॥
शास्त्रविधी जे सोडोनी । यजन श्रद्धेच्या याजनीं ॥
त्याची निष्ठा वोलाननी । सत्वरजीं कीं तम ॥३॥
कृष्ण गोपाळ गोवळा । सावळीया गोव्रजखेळा ॥
गोपीरमन गोवत्सला । गोरसचोरा तुकयाच्या ॥४॥
॥७८४७॥
बोले रुक्मिणीचा कांतु । रुक्म वस्त्र विराजितु ।
रुक्मांगदी रुक्मवंतु । रुक्मीयाचा मेहुणा ॥१॥
ऐके कपींद्रकेतना । खगेंद्रध्वज प्रिय अर्जुना ।
सुरेंद्र देवाधि नंदना । मज योगींद्रा प्रिय तूं ॥२॥
श्रद्धा संस्कारापासूनी । त्रिधा होती जीवा मनीं ।
सात्विक आणि राजसीनी । तामसी जे तिसरी ॥३॥
ऐक ऐसीया त्रिविधा । वेणी माया शिरी मुग्धा ॥
वरी डागिणे प्रसिद्धा । तुका जडी जडीते ॥४॥
॥७८४८॥
जैसें सत्व तैसी श्रद्धा या जीवांसी । कीं भक्ती देवासी नेमीली गा ॥१॥
होतरे सर्वा या भारताच्या राया । धरा आधीं पायां बळकटीं ॥२॥
ज्याची श्रद्धा तोची होतो सव्यसाची । कीळकीं नळाची प्रतिष्ठा ते ॥३॥
जीव श्रद्धामय नेमुची हा स्वयें । तुका यासी माय मीच जैसा ॥४॥
॥७८४९॥
सत्वाढय तो देवा भजे अर्पी भावा । भूपार्थ सचिवा सेवा जैसी ॥१॥
राजस ते यक्षा भजती गा रक्षा । गोरस सापेक्षा कुर्वाळी गा ॥२॥
तामस भूत प्रेतीं आयुष्य वेंचीती । सिंदी छायेप्रती मद्यपी गा ॥३॥
तैसें अघोरी ते वेचुनी धनातें । राजी तुकयातें न करीती ॥४॥
॥७८५०॥
शास्त्र जें न सांगे तेथें रात्रीं जागे । प्रेतावरी अंगें पडे मंत्रु ॥१॥
घोर तप कैसें जोडी जीव हिंसे । नेणे तीर्थी पीसें पर्वकाळु ॥२॥
दंभें कामें किंवा अहंकार व्हावा । भल्यावरी दावा चालवूनी ॥३॥
विशेष प्रीतीच्या बळें ही मतीच्या । चेष्टा तुकयाच्या आरंभीती ॥४॥
॥७८५१॥
करिती देह क्षीण हाची अवगुण । न पाहती सीण उभारिती ॥१॥
आंत मी जीवात्मा पीडितां आक्रंदें । नेणती गा मदें मस्ती ऐसी ॥२॥
देवो मी सर्वास मज देती त्रास । काय त्या मूढांस हांसूं रडूं ॥३॥
असुर हें चिन्ह निश्चय सांगून । सांगे आन अन्न तुकयासी ॥४॥
॥७८५२॥
आतां सर्वा गोष्टी माजी घे जे श्रेष्ठी । आहार परमेष्ठी नेमीतसे ॥१॥
त्या सारीखें होत गुण देहोत्पत्त । त्रिविध भासत आहार जो ॥२॥
त्रिवर्गासी प्रीय सांगूं यथान्याय । मग दावूं प्रत्यय यज्ञांचा गा ॥३॥
तप आणी दान भेद घे ऐकून । जरी तूं सज्ञान तुकया ऐसा ॥४॥
॥७८५३॥
आयुष्यासी बरें सत्व आवतरे । बळ आणी बारे वैराग्य ये ॥१॥
सुख प्रीतीलागी क्षुधे दे तूं चांगी । स्थिर स्निग्ध अंगीं रसेंयुक्त ॥२॥
आहार हा प्रीय सात्वीकास होय । गोरस कीं प्रिय शर्करादी ॥३॥
गोधूम तांदूळ सत्वीं मूगदाळ । तुकीं शाखा फळ तूंबी ऐसें ॥४॥
॥७८५४॥
उष्णें जीभ पोळी क्षारसिंधु उकळी । कटूतें उगळी उदरस्था ॥१॥
आम्लेदांत हाले शुष्क निर्जीव झाले । आणीवीन भाले तिखें खाय ॥२॥
खातां नाकीं मुखीं धूर उठे कीं दु:खीं । सर्वांगस शोखी चैन नेदी ॥३॥
आहार राजस सद्य फळ त्यास । शोक भया यास ह्मणे तुका ॥४॥
॥७८५५॥
शिजुनी लोटला काळ बहु गेला । उठे पदार्थाला घाणी जेथें ॥१॥
वाळली काचरी रसु ना अंतरीं । विटलें परोपरी फेंसावलें ॥२॥
शीळें ह्मणिजे मांसा व्याघ्र सडवी जैसा । सदन्ना बुरसा वाटे तेवीं ॥३॥
विदारिलें शूनें वत्सें बाळकाने । अंतु राहे ते अन्ने राडी करी ॥४॥
अपवित्र आहार अपवित्र आचार । तामस प्रकार तुका निंदी ॥५॥
॥७८५६॥
नाहीं फळकांक्षा वृत्ती निरपेक्षा । तुलसीच्या वृक्षापरी सेवा ॥१॥
विधि डोळयानें यजनीं हवनें । बापा लेकी माने अलिप्तवें ॥२॥
यजावें ते अशा एका जगदीशा । गुरुत्वें हुताशाप्रती पाळी ॥३॥
सात्विकांचा यज्ञ हाची भाव सुज्ञ । सांगीतला प्राज्ञ ह्मणे तुका ॥४॥
॥७८५७॥
अभिलाष फळीं च्युत वृक्षामाळी । पाळीत कर्दळी तेवीं यज्ञ ॥१॥
दंभार्थ चोहटी दावीतु कोल्हाटी । यज्ञीं हाटवटी तया मानें ॥२॥
भरतश्रेष्ठा यज्ञ राजसाचें चिन्ह । घ्यावें ओळखून केवळ गा ॥३॥
तुकयासी अर्थ कळला राजस्वार्थ । प्रपंच परमार्थ चाळीतसे ॥४॥
॥७८५८॥
नाहीं विधी नाहीं मंत्रु पुरा पाही । अन्नशांती तें ही सुनाट गा ॥१॥
दक्षिणा ते कैसी दक्षिणा दिशेसी । दावी आणि तैसी यमकृपा ॥२॥
श्रद्धा उदरी नसे उगे भलत्या मीसे । लोकीं सांगतसे सत्कारुनी ॥३॥
तामस यजन जाणसी सज्ञान । आतां सत्व चिन्ह दावी तुका ॥४॥
॥७८५९॥
देव द्विज गुरु भजे एक भावें । भिन्न त्याच्या नांवें न झाला जो ॥१॥
प्राज्ञ परीयसा पूजनीं धीवसा । शुद्धिवंत कैसा अवक्र तें ॥२॥
ब्रह्मचर्य खरें स्त्रीकडे ना मोहरे । अहिंसक सारे कर्मजाळ ॥३॥
हेंची देह तप जाणावें अर्जुना । वाचीकाच्या गुणा वर्णी तुका ॥४॥
॥७८६०॥
नेदी कष्ट श्रोत्या ऐसें जें बोलणें । प्रेम पाल्हावणें साधुवल्ली ॥१॥
परी ते गा सत्य प्रिय परा हीत । कीं वेदवेदांत पाहाणें गा ॥२॥
नित्य पाप करी शिकावें हव्यास । जन ह्मणती व्यास अवतरला ॥३॥
वाचेचें हें तप जाणावें बीभत्सु । मनाचें ही इच्छु तुकापुसे ॥४॥
॥७८६१॥
मन प्रसन्नता मौनीं ध्यानीं वागे । सौम्यत्वें न पांगें चांचल्य तें ॥१॥
निग्रह मनाचा चित्तांत निष्काम । सदा स्मरे रामकृष्ण हरी ॥२॥
मानस हें तप जाणावें फाल्गुना । आतां सत्वगुणा ऐक तुकीं ॥३॥
॥७८६२॥
महाश्रद्धें केलें जें कां आराधन । त्रिधा तें करुन तपालागीं ॥१॥
फळेच्छा वांचूनी निष्ठायुक्त वाल्हा । जेवीं बैसवीला नारदानें ॥२॥
अथवा वामदेव कपिल दत्तात्रेय ॥ त्यांच्या पडे पाय निष्कामत्वें ॥३॥
सात्वीक हें तप ऐकावें रे कृष्णा । राजसाची तृष्णा वर्णी तुका ॥४॥
॥७८६३॥
सन्मान वाढावा पूजा घेणें लोकीं ॥ मानी बुद्धी साकी उघडीना ॥१॥
श्राघ्यें धरी पडप आणी दंभ भारी । राजस अवधारी तप तें गा ॥२॥
चित्रीं गंगाजळ जवळीक नित्य । आदशीं असत्य धन जैसें ॥३॥
चंचळ अशाश्वत पार्थिवा जाणावें । आतां तमा ध्यावें तुका त्याज्य ॥४॥
॥७८६४॥
मूढत्वें आग्रहें स्वात्मया पीडूनी । स्वमांस रक्तांनीं देती बळी ॥१॥
किंवा उगे करी मनस्वी उपास । इंद्रिय तापास चढवी तपें ॥२॥
ते शत्रु मारावे उच्चाटण व्हावें । काम पुरवावे इच्छेजोगे ॥३॥
ते तामस गा पार्था त्वां जाणावेम । आतां सत्वा भावें गाय तुका ॥४॥
॥७८६५॥
देणें विहित कीं यया भावें पार्था । न दावी सर्वथा उपकार जो ॥१॥
अंगास छेदवी झीजवी चंदन । हरास लेपन जैसें त्याचें ॥२॥
पडे पूर्णाहूती महायज्ञीं जैसी । पात्र काळ देशीं सत्वदान ॥३॥
तुका ह्मणे ऐका रजो गुण कैसा । चोर मानी जैसा धनाढयासी ॥४॥
॥७८६६॥
प्रत्युपकारार्थ जो कां सावधान । पक्षासी प्रधान आमंत्रीजे ॥१॥
सोयर्या आग्रह आहेरीं ते दृष्टी । फळापेक्षा पोटीं वाहे तैसी ॥२॥
देणें घडे जरी यद्यपी निष्काम । तेव्हां वाटे ग्रामलूट केली ॥३॥
दान राजसाचें ऐसें निरोपीलें । आतां तुकीं आलें तमांध गा ॥४॥
॥७८६७॥
दान धर्म तमीं नसे संसारु । घडे तरी घोरु मार्ग ऐका ॥१॥
कुत्सिता त्या देशीं काळ अवकाळेंसी । वांती शूनी जैसी मिळूं आली ॥२॥
आतां तें अपात्र कैसें तरी ऐक । नित्याचे पाईक भाटापरी ॥३॥
लाता बुक्या वरी जैसी बोलवण । तैसें दान पुण्य अमंगळ ॥४॥
तामस वर्णिला आतां श्रुत पंथ । ऐकावे समर्थ ह्मणे तुका ॥५॥
॥७८६८॥
ओंतत्स त्रिपदें ब्रह्म तें बोलिलें । अवर्णासी केलें नामरुप ॥१॥
त्रिविध लक्षणें मानसीं वोळखे । शशी पूर्ण देखे शरदीं जेवीं ॥२॥
तेणें गा पार्थिवा पूर्वी विप्र वेद । यज्ञादि विविध बोलियले ॥३॥
तुकयाच्या दये प्राप्त गुरु दासा । पुरला धिंवसा तेणें त्याचा ॥४॥
॥७८६९॥
ह्मणोनि ओंकार यज्ञ दान तप । क्रियेचें स्वरुप वोळखिती ॥१॥
वेदवेत्याचीया नित्यचिया विधी । प्रोक्त यथा सिद्धी प्रर्वतती ॥२॥
मग जें साधन विनियोगें चांग । सौंदर्याचें अंग अळंकार ॥३॥
मुखीं ब्रह्म नाम हातीं सत्य कर्म । विनियोगें वर्म दावी तुका ॥४॥
॥७८७०॥
तो घट ह्मणतां मृत्तिका जाणवे । भूषणीं आघवें भांगार गा ॥१॥
तत्पदीं ज्ञान जें होय कर्म ब्रह्म । बुझे गूढ वर्म चतूराब्धि ॥२॥
यज्ञ दान सारें मोक्षार्थीच जाण । निष्काम तें पूर्ण कीजे तीहीं ॥३॥
ऐसें जाणोनियां छेदी संशयास । वधी कौरवांस तुका ह्मणे ॥४॥
॥७८७१॥
सत्यपणीं तेंच साधू साचपणीं । गोप्याची करणी प्रगटली ॥१॥
सच्छब्दें त्यांतही वर्ते धनंजया । कर्म करुनीयां अलिप्तता ॥२॥
निष्काम जें कर्मी साधुत्वीं भारता । सच्छब्दें योजितां येथें होई ॥३॥
मग तूज बाध न लगे गोत्रहत्या । तुका ह्मणे सत्य शास्त्रांचीये ॥४॥
॥७८७२॥
सत् या शब्दें साधु ते ही झाले सिद्ध । नलगे कर्म बाधब्रह्मत्वांत ॥१॥
स्थिती त्याची सुज्ञा यज्ञीं दानीं तपीं । तो तंव चिद्रूपीं तच्छब्दार्थ ॥२॥
तच्छब्दार्थ ब्रह्म सत् ऐसें बोलीजे । कदा न उरीजे महामौन ॥३॥
मौन तें ही मेलें आटलें जीवपण । शिवसाक्ष खूण ह्मणे तुका ॥४॥
॥७८७३॥
परी केले होम संभ्रम दानांचा । जरी कां श्रद्धेचा लेशु नाहीं ॥१॥
तपादी साधनें केलीं लोकेपणा । व्यर्थ मूर्खे शीणा आदरीलें ॥२॥
प्रेतास भूषणें लग्न नपुंसका । विध्वंस नेटका शृंगारु गा ॥३॥
असत् ते असाधुअ जीत अथवा मेले । तुकया मुकले यह परी ॥४॥
॥७८७४॥
ऐसा गीता गर्भ सत्रावा प्रसंग । झाला येथें सांग हरीकृपें ॥१॥
ज्यांत गुणभाग शेवटीं अध्यात्मा । बोलीला भक्तात्मा पार्थीवासी ॥२॥
आतां कळसाध्याय बोले परीणामी । योगीया विश्रामीं घडे तुकीं ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : June 19, 2019
TOP