भगवद्गीतास्तोत्र - अध्याय चौदावा
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७७७०॥
ज्ञानीं उत्तम तें ज्ञान । जें सुभान निर्मळ ॥१॥
पुन्हा सांगेन तें थोर । फोडी घोर भवांध ॥२॥
मुनी सर्व जें जाणुनी । अनुदिनीं तत्पर ॥३॥
सिद्धी पावले कैवल्य । जिणें साकल्य तुकयाचें ॥४॥
॥७७७१॥
माझें याच ज्ञानाश्रयें । महदाश्रयें त्यागूनी ॥१॥
पावले सारुप्यसिद्धी । दीजे समाधी शुकाची ॥२॥
सृष्टि नव्हती होतांही । स्थिती देहीं विराली ॥३॥
लयीं व्यथा न पावती । त्यागा मूर्ती तुकयाच्या ॥४॥
॥७७७२॥
महत्तत्वात्मक ब्रह्म । तुज सुगम सांगतों ॥१॥
मज हे तुतें जीवत्वीं । मूळ तत्वींचा झाडा ॥२॥
त्यांत ठेवितांचि दंश । उरे अंश मूळभुत ॥३॥
विश्व होतसें मी तेव्हां । तुका जेव्हां ये जन्मा ॥४॥
॥७७७३॥
होती देहोत्पत्ती त्यांच्या । अधिकाराचा मी बाप ॥१॥
जीव वीर्य मी देतों जो । उपजो निपजो रचितवेळें ॥२॥
ब्रह्म महत्तत्व माता । कुंतीसुता ऐक रे ॥३॥
त्याचा भूतांश शोणितेम । करी तुक्यातें उत्पन्न ॥४॥
॥७७७४॥
गुण भवें प्रकृतीचे । उत्पत्तीचें कारण ॥१॥
सत्त्व आणि रज तम । पुरुषोत्तम सांगतु ॥२॥
देहीं बाधती हे जीवा । वन बोलावा पाण्यानें ॥३॥
गुणातीत अव्यय जो । अंतीं उमजो तुकया ॥४॥
॥७७७५॥
त्यांत निर्दोष सत्व जें । मम तेजें विराजित ॥१॥
प्रकाशक निर्मळत्वें । न कर्तृत्वें अहंकारें ॥२॥
सुखेच्छा विषय ज्ञान । सावधान या विषयीं ॥३॥
यासी बाधतें या संगें । तुका नलगे मज संगीं ॥४॥
॥७७७६॥
विषयप्रीती तोचि रज । धरी काज कामाचें ॥१॥
तृष्णा संग समुद्भवें । मग भवावें मनेच्छा ॥२॥
करवूनी बाधे याला । कष्टी केल्या जीवात्मा ॥३॥
कर्मे विषय साधनें । तुका मनें विटला ॥४॥
॥७७७७॥
तम आत्मत्वें अज्ञानें । गुढ मनें संकल्पू ॥१॥
करी मोहो जड भ्रम । चुके वर्म ज्या साठीं ॥२॥
निद्रा असावधपणीं । होय हानी आयुष्या ॥३॥
तम बाधतें आळसें । तुका नसे जयांत ॥४॥
॥७७७८॥
सत्व प्रबळे सुखांत । ये मुखांत रुचि जेवीं ॥१॥
कर्मात प्रबळे रज । जेंवी खाज कर्मठा ॥२॥
असावधानिया ज्ञानें । तेणें माने ते तमी ॥३॥
तुका नसे रे जयांत । जरी स्वयात रुसली ॥४॥
॥७७७९॥
रजतमास मोडोनी । ये वाढूनी सत्वांशु ॥१॥
तम मोडी रज सत्वां । स्व कर्तृत्वा दर्शवी ॥२॥
तम सत्व नुरे जेव्हां । रज तेव्हां विस्तारे ॥३॥
एका उंची दोनी खांचे । हें तुकयाचे सुशब्दीं ॥४॥
॥७७८०॥
सर्व देहीं ही इंद्रियीं । रवी जयीं प्रतिबिंबे ॥१॥
आणि जेव्हां ज्ञान तेव्हां । जाणे सत्वा वाहाड ॥२॥
तुका म्हणे देव मन । तें आधीन सत्वाच्या ॥३॥
॥७७८१॥
आरंभ प्रवृत्ती कर्मी । धरी उर्मी चित्ताची ॥१॥
अशांतता आणि लोभ । देत क्षोभ त्रिलोकीं ॥२॥
विकार आणि स्पृहा । करिती महा कुचेष्टा ॥३॥
रज वाढतां विलासे । तुकीं पीसें शीरेना ॥४॥
॥७७८२॥
कांहीं वर्तेना न सुचे । घर भुलीचें कारण ॥१॥
देह आणि असावध । परि क्रोधा जागतो ॥२॥
नकळे बरें कीं वाईट । पडे कीट आधणीं ॥३॥
तम जेधवां वाढतें । गुण तुका ते निरुपी ॥४॥
॥७७८३॥
जन्म भक्तियोगें रंगे । घडती तीर्थे व्रतें सांगें ॥
सत्वगुण उत्साहा गे । जरी वाढे अर्जुना ॥१॥
त्याच भावें अंतकाळीं । सावधान त्दृत्कमळीं ॥
स्मरोनियां वनमाळी । देह जरी सोडील ॥२॥
तरी श्रेष्ठ ज्ञाते लोक । जे कां पावती कौतुक ॥
तेथें पावे हा सात्विक । जेवीं बाळक पित्या पैं ॥३॥
तया प्राप्ति पदा भोगी । कोणी उपद्रविना स्वर्गी ॥
जरी स्वेच्छा भूमीलागीं । आला तरी तुका तो ॥४॥
॥७७८४॥
सोस केला जन्मवरी । रजु पोसिला शरीरीं ॥
शेवटीं तो देहधारी । मरे जरी वासनें ॥१॥
त्यास पुन्हा तोचि हाट । जेथें वसती कर्मठ ॥
तेथें उपजोनी धोपट । मार्ग साधी मायिक ॥२॥
आतां परपीडा परनिंदा । परघातीं जीव सदा ॥
तमोवृद्धींत मानदा । जरी मेला प्राणीया ॥३॥
तरी जन्मे मूढयोनीं । स्थावर पाथर काननीं ॥
मग तुकया नयनीं । तया न दिसे कल्पांती ॥४॥
॥७७८५॥
पैंगा निवात कवच रिपु । नगशत्रुजा सुधा वपु ॥
हीही गुणी कुलदीपु । मज सात्विक आवडे ॥१॥
फळ निर्मळ सत्वाला । वेढ जें कांहीं बोलिला ॥
पुण्य मार्ग उजळीला । दुजा भानू होऊनी ॥२॥
रजाचें फळ तें दु:ख । जरी रुची नेघे मुख ।
इंद्रिय विषयीं असुख । आठवूनी मग रडे ॥३॥
उघडे तयाचें खापर । अज्ञानाचा शिरोभार ॥
तेंचि फळ ज्या अपार । बोधी तुका नायके ॥४॥
॥७७८६॥
सत्वगुणें ज्ञान वाढे । वेदशास्त्र कळे गुढें ॥
बुद्धि मोहेना सदृढें । जरी मुंढें वेष्टीला ॥१॥
रजोगुण वृद्धि अंत । पैंगा इंद्रिये आघात ॥
पाठीं वाजतां धांवत । अविवेक तरुच्छायें ॥२॥
आतां तमाचें सार्थक । मूळ असावा धावक ॥
पुढें अज्ञान पाक । पाहुन चाले त्या पाठीं ॥३॥
मुर्खपणाचें वेतन । प्राण सांडी तें घेऊन ॥
सहज तुकया समान । करुं ह्मणतां नष्टले ॥४॥
॥७७८७॥
सत्वगुणें नर वैदुर्या । ऊर्ध्वगती साधुवर्या ॥
ज्यास मार्ग देतो सूर्या । मग यम तो कीती ॥१॥
आतां येथें भूलोकांत । देह धरणें अंतवंत ॥
येथें उपडे पडे जीवित । मेघातळीं रजाचें ॥२॥
आतां तिसरा जो तमु । किंवा श्मशानीचा धूमू ॥
ज्याचा क्रोध वाहे यमू । नीच वृती पाहू्नी ॥३॥
तामस लिंगा अधोगती । कधीं न पवे सुगती ॥
नये तुकया संगती । फिरे जरी चौर्याशीं ॥४॥
॥७७८८॥
कर्त्ता कार्य कारणाचा । गुणावीण ठाव त्याचा ॥
नसे ऐसी माझी वाचा । सत्य मानी अर्जुना ॥१॥
दृश्य दर्शनांत दृष्टा । आहे त्रिपुटी प्रतिष्ठा ॥
पाहे ऐसे जरी श्रेष्ठा । नलगे कांहीं पुसणें ॥२॥
स्वात्मा गुणातीत पाहे । तोच पावे मद्रूप हें ॥
येथें तुका नि:संदेहे । गुणातीत लेखावा ॥३॥
॥७७८९॥
उल्लंघुनी गुणवाटा । स्थिती अन्यत्र सुभटा ॥
संस्कार तनू पटा । माजि रंग जो दिसे ॥१॥
जन्म मृत्यु जरा दु:खा । जो वेगळा स्वात्मसुखा ॥
भोगी मुक्तिचीया सुखा । चिरंतन एकाग्र ॥२॥
ऐसा देव वदे वाणी । येरें परिसुनी श्रवणीं ॥
उल्हासला गांडिवपाणी । पुसे आवडी धरुनीयां ॥३॥
सत्य सुख गुणपर । काय तयाचें अंतर ॥
तुका वदला सादर । श्रोतीं चित्त ठेवावें ॥४॥
॥७७९०॥
वदे अर्जुन गोकुळपाळा । ऐक वसुदेवाच्या बाळा ॥
कोठें या चिन्हाचा मेळा । जो वोतला संतत ॥१॥
त्रिगुणांस उल्लंघून । तेव्हां तें क्रमी साधन ॥
बोले हरी सावधान । असा आचार तो कैसा ॥२॥
यासी लंघुनी वर्ततो । स्थितिं कोणत्या नांदतो ॥
तुका प्रपंची वागतो । कैसा वदसी निराळा ॥३॥
॥७७९१॥
बोले मेघवर्ण कांती । मेघ गंभीर गिरेप्रती ॥
ऐके मेघवाहन मूर्ती । श्रोत्र मेघ चातक ॥१॥
जेणें प्रकाशे प्रवृत्ती । मोह सत्वादिकां स्थिती ॥
जीं लक्षणें धरी मती । प्रवृत्तिकर्मी न द्वेष ॥२॥
निवृत्तीत्तें अपेक्षिना । ऐसी निश्चळ कल्पना ॥
तुका ह्मणे मग अर्जुना । पुन्हा बोले गोविंदु ॥३॥
॥७७९२॥
त्रिभुवनवैभवास । घेउनि शंकरगृहास ॥
अपूर्व आला तरी त्रास । तो उदास या नांवें ॥१॥
त्रितापांकित पीडे । ऋतु देतां नभाकडे ॥
नये चांचल्य ल्यापडे । जो कां झाला निश्चळु ॥२॥
गुण वर्तती हे ऐसे । हेकें न धरी मानसें ॥
स्वतां कर्त्तव्यता नसे । कांहीं न करी यालागीं ।
कडकडाटें गेला वारा । रुख न वचे सांडुनि थारा ॥
किंवा मेरु पांडुकुमारा । काय लेखी तो तुका ॥४॥
॥७७९३॥
न प्रिय आलीया संतोषे । अप्रियांत नये रोषे ॥
सुखदु:खादि विशेषें । एक सुखें जो सेवी ॥१॥
कोणी निंदिला वंदीला । प्रावृट् ऐकेना तयाला ॥
कोठें रुसला फुगला । ऐसें गुण जो नेघे ॥२॥
स्वात्मनिष्ठेतें न सोडी । ध्रुव तपा त्रिदश कोडी ॥
छळितो भक्ति न तो सोडी । मधुवनीं मनोहर ॥३॥
भेंडा धोंडा कीं सुवर्ण । परिक्षूं नेणें वर्णावर्ण ॥
तो गा झाला जरी अवर्ण । तुका तरी मत्प्रिय ॥४॥
॥७७९४॥
मान अपमानीं शत्रु सन्निधानीं । मित्राच्या भुवनीं सरिखा जो ॥१॥
द्वय पक्षीं सम तपें भानुत्तम । तैसा न विषम झाला कोणा ॥२॥
आरंभ सर्व ही टाकीतो न पाही । मन नि:संदेही एक विध ॥३॥
पार्था गुणातीत तोचि बोलिजेत । ऐसी जेथें ख्यात तुक्यासम ॥४॥
॥७७९५॥
मातें अव्यभिचारें सेवी जो आदरें । पतिव्रता सरे पतीसवें ॥१॥
भक्तीयोगें पूर्ण उपासीतो खुण । सांगतो तुज गुण उल्लंघीतो ॥२॥
ब्रह्मत्वास योग्य झाला महाभाग्य । होईल आरोग्य शनै: शनै: ॥३॥
हें ही नको ज्याला रसरुपें वोतला । वैद्यु तो गांजला तुकारामु ॥४॥
॥७७९६॥
ऐके सव्यसाची नित्य जें वेदांची । साक्षीने मोक्षाची संपदा गा ॥१॥
धर्म जो आपुला चहुंवर्णी आला । याचीया पावला शाश्वतासी ॥२॥
एकांतसुखास मी जगन्निवास । प्रतिष्ठा तयास केवळ गा ॥३॥
मीच होय ऐसें धरावें मानसें । तुका अनायासें उद्धरला ॥४॥
॥७७९७॥
ऐसी हे सुगीता साधकाची माता । मज वाटे दुहिता श्रीहरीची ॥१॥
सुभद्रेहोनीयां अधिका मान या । कां जे व्यापूनीयां उरली असे ॥२॥
तिचा अभिमन्यू इचा बोध मन्यु । पतन जघन्यू मानी हरी ॥३॥
भाग्यांचा सपूर पांडुजा चतुर । निवेदी असुर कुळकाळा ॥४॥
झाले अध्ये चवदा गुणातीत वादा । सांगूनी संवादा नेमी तुका ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : June 19, 2019
TOP