भगवद्गीतास्तोत्र - अध्याय पहिला

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७२३७॥
धर्मबंधु कुरुपुत्र रणांगणीं । मिळाले आयनीं झुंजावया ॥१॥
प्रज्ञाचक्षु पुसे संजयास गोष्टी । अंतरीं तो कष्टी पुत्रदु:खें ॥२॥
पांडुपुत्र आणि आमुचे आत्मज । केलें कैसें काज राज्यलोभें ॥
तुका दास प्रार्थी ऐकावें सज्जनें । व्यासाचे आज्ञेनें संजय बोले ॥४॥

॥७२३८॥
हांसोनि संजय बोले ऐकराया । पांडवी सेनीया बळिवंता ॥१॥
निजबळदर्पे चढला अभिमाना । दुर्योधना येणे गुरुपासी ॥२॥
दास तुका बोले द्रोणाचे संनिध । राजा उपबोध करी काय ॥३॥

॥७२३९॥
पाहाजी पांडवसेनासमुदाव । साजावली जीव घ्यावयासी ॥१॥
शस्त्रें कवच टोप लेउनी सजीले । उतावेळ भले झुंजावया ॥२॥
आचार्या शाहणे नव्हते पांडव । परी राखी नाव धृष्टद्युम्न ॥३॥
शिष्य हा तुमचा विद्या तुह्मी दिल्ही । उपकारा आली ऐसें झालें ॥४॥
द्रुपदाचा पुत्र अग्नी गर्भी झाला । बुद्धिवंत भला तुका ह्मणे ॥५॥

॥७२४०॥
येथें भीमार्जुना तुल्य महावीर । युयुधान शूर विराट ही ॥१॥
द्रौपदीचा पिता पूर्ण महारथी । धृष्टकेतु मूर्ति शिशुपाळाची ॥२॥
चेकितान काशीपती वीर्यवान । पुरुजित्‍ आपण कुंतीभोज ॥३॥
नर पुंगव नृप शैब्य पराक्रमी । तुका ह्मणे नामें पुढें ऐका ॥४॥

॥७२४१॥
युधामन्यु वीर उत्तमौजा जैसा । अभिमन्यु खासा पार्थपुत्र ॥१॥
द्रौपदीचे पांच सर्व महावीर । आमुचे ही थोर अवघी ॥२॥
अधिकारी त्यांचीं वर्णतसें नामें । सूचना उत्तमें ऐकावीजी ॥३॥
तुका ह्मणे गीतेमाजी नवश्लोक । बोलिला पृथक दुर्योधन ॥४॥

॥७२४२॥
पितामह तुह्मी संहारिते अरी । तैसा धनुर्धारी कर्ण माझा ॥१॥  
कृपाचार्य गुरुश्रेष्ठां श्रेष्ठ खरा । समानसाजराविजयाख्य ॥२॥
द्रोणपुत्र चीरंजीवी अश्वत्थामा । विकर्णाचा महिमा काय वाणूं ॥३॥
भूरिश्रवा तसा कळूं द्या तुह्मासी । महिमा बोले ऐसी तुका ह्मणे ॥४॥

॥७२४३॥
आणिक ही बहू शूर महाबळी । रणीं चेंडुफळी खेळणारे ॥१॥
मजसाठीं जीव संकल्पिला जीहीं । हाणणारे घाई शस्त्रें नाना ॥२॥
समरीं कुशळ नामाथिले भले । शिपाई दादुले काळदुत ॥३॥
अहंतेच्या योगें बोले राजेश्वर । ऐकोत चतुर तुका ह्मणे ॥४॥

॥७२४४॥
परंतुअ निर्बळ दिसे पांडवदळ । भीम रक्षपाळ असतां ही ॥१॥
आमुचे सबळ तुह्मावीण दीसे । तुह्मी रक्षा कैसें काय वाणूं ॥२॥
विश्वाचे अंकुर तैसे महावीर । काळदंताकार शस्त्रें हातीं ॥३॥
तुका ह्मणे संता ऐकावें सावध । बोलता सक्रोध राव झाला ॥४॥

॥७२४६॥
अहो तो कौरवांचा राजा । संतोषेल जया काजा ॥१॥
ऐसा भीष्म तो वडील । दावीं संतोष नवल ॥२॥
हांक फोडी सिंहनादें । शंख वाजवी आनंदें ॥३॥
पूर्णप्रतापाचें अंग । तुका ह्मणे संतसंग ॥४॥

॥७२४७॥
तेव्हां एक वेळा सारी । शंखध्वनीची कूसरी ॥१॥
भेरी गर्जती ठोकिल्या । पणवान कांहीं गाजल्या ॥२॥
एकसरेंचि गोमुखें । दाही दिशा नादमुखें ॥३॥
झाल्या पूर्ण ह्मणे तुका । लीला पांडवांची ऐका ॥४॥

॥७२४८॥
थोरी थोरला तो रथी । शुभ्रवर्ण हयनाथी ॥१॥
दोघे युक्त रहंवरीं । कुंतीपुत्र पूतनारी ॥२॥
दिव्य वाजविते झाले । शंख करीचे आपुले ॥३॥
अहो माधवी पांडव । तुका ह्मणे ठेवी जीव ॥४॥

॥७२४९॥
पांचजन्य त्दृषीकेषें । वाजवितांची आवेशें ॥१॥
देवदत्त धनंजयें । वाजविला देऊं भयें ॥२॥
पौंड्रनामा महाशंख । श्रवणें रिपुसीं दे दु:ख ॥३॥
भीमें वाजविला बळें । तुका वदे हर्ष मेळें ॥४॥

॥७२५०॥
प्रभु अनंत विजय । श्रवणार्थी दाता जय ॥१॥
शंखालागीं युधिष्ठिर । वाजवित हर्षपर ॥२॥
आतां नकुलसहदेवें । शंख वाजवी ऐकावें ॥३॥
सुघोष मणिपुष्पक । तुका ह्मणे हे रसिक ॥४॥

॥७२५१॥
धनुर्धर महा काश्य । राजे जाशीं सर्व वश्य ॥१॥
तैसा भीष्मप्राण हारी । शिखंडिची केवढी थोरी ॥२॥
धृष्ठद्युम्न उत्तरपिता । सात्यकी तो अपाराजिता ॥३॥
तुका पुढें विनवीतो । ऐका व्यास ज्या वाणितो ॥४॥

॥७२५२॥
जनक द्रौपदीचा ऐका । ज्याच्या नामें यमा धोंका ॥१॥
पांची पांडवांचीं मुलें । माजी अभिमन्यु दादुलें ॥२॥
अन्यत्रही देशपती । मिळूनि जळज वाजविती ॥३॥
आपुलाले पृथकाकारें । तुका ह्मणे एकसरें ॥४॥

॥७२५३॥
तो घोष धार्त्तराष्ट्रांचें । करी छेदन धैर्याचें ॥१॥
विदारित वक्षस्थळा । दिल्ही सर्वाशी अवकळा ॥२॥
गगन आणि भूमी । झालीं नादें करुनी श्रमी ॥३॥
तुका ह्मणे सैन्य थोवी । महा तुंबळ गर्जवी ॥४॥

॥७२५४॥
आप्त व्यवस्थित सारे । पाहोनि स्वचमु कैवारे ॥१॥
धार्त्तराष्ट्र कपिध्वज । घेऊं पाहे युद्धा आज ॥२॥
उचलुनी धनु करीं । हांसे कौतुकें अंतरीं ॥३॥
आरंभावी खणाखणीं । तुका ह्मणे त्या निर्वाणी ॥४॥

॥७२५५॥
तेव्हां पार्थ हृषीकेशा । बोले कैसा हांसोनी ॥१॥
मध्य भागीं नेई रथ । मनोरथ पुरवी ॥२॥
उभय सैन्य पाहेन मी । ऐसा भूमी करी उभा ॥३॥
अच्युत ह्मणे बैसुनि पाहे । तुकया सोय दिसे बा ॥४॥

॥७२५६॥
तों कीं जों यां समीपाहे । मन संदेह वाराया ॥१॥
झुंझार जे उभे रथी । मोक्ष ग्रंथी बांधाया ॥२॥
आह्मी तरीं कोण कोणा । नारायणा भांडावें ॥
तुका ह्मणे ऐसें देवा । अर्जुन तेव्हां बोलिला ॥४॥

॥७२५७॥
पाहेन मी युद्धीं वीर । वीर धीर प्रतापी ॥१॥
मिळुनि आले आप्तवर्ग । किंवा स्वर्ग साक्षेपी ॥२॥
मज भासते दुर्बुद्धी । नाहीं शुद्धी चोखट ॥३॥
तुका ह्मणे विजयी रथ । विजयी पार्थ सांभाळी ॥४॥

॥७२५८॥
त्दृषीकेशा गुडाकेश । बोले ऐसें प्रार्थुनी ॥१॥
भारत राया संजय बोले । प्रेमें डोले अंतरीं ॥२॥
त्या दों सैन्या मध्यभागीं । रथ शारंगी करी उभा ॥३॥
तुका ह्मणे विजयी रथ । विजयी पार्थ सांभाळी ॥४॥

॥७२५९॥
समोर भीष्मद्रोणाच्या । भूपाळाच्या सन्मुख ॥१॥
पार्थ पाहे ह्मणे यातें । मिळाले ते कुरुंप्रति ॥२॥
तेव्हां विभो कृष्णामनीं विचार ध्यानीं आणिला ॥३॥
कांहीं कौतुक दिसताहे । तुकया साह्य दिनबंधु ॥४॥

॥७२६०॥
तो पार्थ पाहे चुलते । क्रोधें पिते खवळले ॥१॥
आजे त्यांत तयां प्रती । नाहीं क्षितीं उपमा ॥२॥
गुरु मामे आणि भाऊ । आपुले जीऊ प्रत्यक्ष ॥३॥
पुत्रपौत्र तयांसही । तुका पाही त्या पाठीं ॥४॥

॥७२६१॥
सासरे सोयरे तेही । नि:संदेही जे उभे ॥१॥
त्या दोहीं फौजे आंत । युद्ध ख्यात लावीते ॥२॥
कौंतेयें देखोनियां । जीवीं माया झळंबे ॥३॥
बंधूतें ही रणांगणीं । तुका वाणी ज्या लागीं ॥४॥

॥७२६२॥
कृपेकरुनी आविष्ट । परनिष्ठ भावार्थी ॥१॥
ऐसा विपादें बोलिला । कृष्णा भला प्रार्थित ॥२॥
देखियेलें स्वजनास । आपणास जे वंद्य ॥३॥
युद्धार्थी ते उभे सिद्ध । जे निषिद्ध तुकयाशी ॥४॥

॥७२६३॥
पिळीति सर्व ही गात्रें । कळा वक्रें त्या काळीं ॥१॥
शरीरी सुटतो कांप । रोमरोम कांपती ॥२॥
तुका विनवी नारायणा । लेश मना पार्थाच्या ॥३॥

॥७२६४॥
हातापासुनि गांडीव । गळतें जीव दग्धला ॥१॥
उभा राहों ही न शके । चित्त शोकें भ्रमिष्ट ॥२॥
तुका ह्मणे करुणा निधी । हे उपाधी नीवारा ॥३॥

॥७२६५॥
देखतों मी निमित्तांस । विपरीतांस केशवा ॥१॥
न कल्याण ही मी देखें । युद्धी सखे मारुनी ॥२॥
तुका ह्मणे जैसें भयें । तैसें स्वयें निवेदी ॥३॥

॥७२६६॥
न इच्छी मन माझें । कांहीं राज्यादिक वोझें ॥
जय कांक्षे विशीं तुझे । पाय दिव्य आहेती ॥१॥
कृष्णा गोपाळा माधवा । नित्य प्राणाचा विसांवा ॥
आह्मां कासयासी व्हावा । हा संसार पातकी ॥२॥
राज्यभोगें जीवित हें । या सुखाचा संदेहे ॥
आतां माझी पाहे । लाज रक्षी दयाळा ॥३॥
गोविंदा काय आमुतें । चाळवणी वोपा भातें ॥
तुका दास कुशब्दातें । त्रास मानी वोखटीया ॥४॥

॥७२६७॥
राज्य भोगूं सुखें आह्मीं । काय दिसतें दुर्नामीं ॥
तूं तंव काय नेणे स्वामी । जें प्रार्थावें हळुहळु ॥१॥
अपेक्षितों ज्या निमित्त । तें तंव वाव झालें सत्य ॥
पदरीं माप हें असत्य । आज घाली रोकडें ॥२॥
सोडोनि ते प्राणधना । आणि संसारीं वासना ॥
आणि कल्पना कामना । मेली काय ममतेची ॥३॥
उभे युद्धांत राहिले । नि:संदेही वीर भले ॥
यांत सुख चालुनि आलें । तुका ह्मणे कोणतें ॥४॥

॥७२६८॥
गुरु पाहे श्रेष्ठ मातें । द्रोण नामें जो आमुतें ॥
तैसें भीष्माचेंही नातें । काय आजी बुडालें ॥१॥
तात बापाचा जो आजा । चुलते पाहे अधोक्षजा ॥
कितीं पुत्र महाराजा । मरों आजी टेंकले ॥२॥
माय बंधु तोची मामा । सासर्‍याची हे प्रतिमा ॥
लेंक पुत्राचे जी आह्मा । अंगें दीसे मारणें ॥३॥
स्त्रीचे भाऊ हे शालक । तैसे सोयरे आणिक ॥
तुका ह्मणे जी कौतुक । वाटे मज देखोनी ॥४॥

॥७२६९॥
मी यांसि हो जनार्दना । सहसा मारुं इच्छी ना ॥
नसे दुष्ट वासना । जन्मपणापासूनी ॥१॥
हें जरीं एकवेळे । मज मारितील बळें ॥
तें मी न मनीं वोळें । ऐसा हेत उदास ॥२॥
स्वर्गलोक मृत्यु लोक ॥ पाताळीचे निवासक ॥
झालों हीन आह्मी रंक । तेंच सुख आवडे ॥३॥
तेथें भूमि हे थोडकी । किती ईचा हो पाड कीं ॥
तुका वदेल द्वाडकीं । लोकीं ऐसें दिसेना ॥४॥

॥७२७०॥
वधोनि हे धार्तराष्ट्र । राया धृतराष्ट्राचे पुत्र ॥
जनार्दना सिद्धि सूत्र । काय दिसे मी नेणें ॥१॥
आप्तालागुनी पाहतां । पाप वाटाची आईता ॥
भला नेमिला अनंता । लोकांमाजी निंद्य जो ॥२॥
आतताई ही करुन । आलों मारुनि स्वजन ॥
तुका वदेल भजन । कोण्या तोंडें अयकुं मी ॥३॥

॥७२७१॥
या लागीं जगत्पती । यांसी मारावया चित्तीं ॥
वाढविली उपपत्ती । ते उगीच सुनाटा ॥१॥
आह्मी पांडव लोकीं मान्य । कर्म नाचरों अमान्य ॥
योग्य न हों हें पैशुन्य । अंगीं आंतलों घ्यावया ॥२॥
होऊं स्वजन हत्येनें । सुखी माधवा कैसेने ॥
तुका ह्मणे श्रीकृपेनें । उणें आह्मा काय जी ॥३॥

॥७२७२॥
ते हे जरीं न पाहती । सारासार न्याय नीती ॥
दृष्टी अंध लोभें होती । वश वत्तीं कामाच्या ॥१॥
आशा लागली द्रव्याची । अथवा पुत्र संततीची ॥
तेथें सहज विवेकाची । मानमोड होतसे ॥२॥
कुळ हत्येंत जो दोष । मित्र द्रोहाचा विशेष ॥
तुका ह्मणे हो हें विष । दुष्ट घाली हो अन्नांत ॥३॥

॥७२७३॥
ज्याच्या भेणें साधक नरीं । लंघनें साधनें डोंगरीं ॥
जातें पाहतां कंसारी । तूं हातींचा सूटसी ॥१॥
तया पातकापासोनी । सुटों आह्मी कैसेनी ॥
निंद्य कर्म आचरोनी । वंद्य होऊं तो कैसें ॥२॥
जनार्दना विष खातां । कैचें अमरत्व आतां ॥
जाणत व्याघ्रजाळीं जातां । आतां भला कैसेनी ॥३॥
तैसें कुळहत्येमाजी । दोषें पुण्य लोपे भाजी ॥
तुका कैसें विनवाजी । हें देखतां प्रत्यक्ष ॥४॥

॥७२७४॥
कुलक्षयेंच बुडती । सत्य जाणतां श्रीपती ॥
मग त्या वृद्धि होती । अधर्माच्या अनंता ॥१॥
कुळधर्म परंपरा । केला विधीनें संसारा ॥
त्याचा सहज मातेरा । हातें आमुच्या होतसे ॥२॥
धर्मनाशें सर्वकुळ । वश्य अधर्मा सकळ ॥
देखत अन्यायाचें फळ । लांचिव न्याय होतसे ॥३॥
तुका ह्मणे पार्थ शब्दीं । देवा लागली समाधी ॥
तेणें वचनें हीं कधीं । पैं गा नव्हती ऐकिलीं ॥४॥

॥७२७५॥
देवा न बोलि चि कांही । तेणें भ्याला तो त्दृदयीं ॥
काय महाराजाठायीं । विचार जो येईल ॥१॥
आह्मी जरीं न बोलावें । तरी वहावतों भवें ॥
कोण्ही न काढो स्वभावें । आह्मा टाहो फोडणें ॥२॥
मग विनवी फाल्गुन । अधर्माच्या बळें जाण ॥
दुष्ट कुलस्त्रिया पूर्ण । होती याचा अनुभव ॥३॥
त्याचा दोष यादव राजा । होती वर्णसंकर प्रजा ।
तुका ह्मणे बीजा । पासूनी ते अंकुर ॥४॥

॥७२७६॥
त्या संकरें नरक । प्रकारें अनेक ॥
होती हा विवेक । सर्वां ठावा ॥१॥
कुळघ्नांच्या कुळा । लागे दोष ज्वाळा ॥
मग तो उन्हाळा । खडखडीत ॥२॥
पिंडोदक क्रिया । लोपें देवराया ॥
वोरुंबरी वांयां जाय जैसी ॥३॥
तुका ह्मणे सर्व । पूर्वजांसी च्यव ॥
जळीं भंगे नाव । कोण तारी ॥४॥

॥७२७७॥
त्या दोषें त्यां मग कुलघ्नांचे खग । उडवितां अंग टिकों नेदी ॥१॥
सर्व संकरसे अनंता होतसे । माजी कां न दीसे सार्थक जी ॥२॥
बुडे जाति धर्म कुळ वर्ण आश्रम । नुरे जेथें नाम आचाराचें ॥३॥
कुळधर्म खरे सांगों मी कीतीरे । तुका ह्मणे सारे खरे बुडती ॥४॥

॥७२७८॥
गेले ज्याचे धर्म । अधर्म हे शेष ॥
काय त्या विशेष । धर्म सांगूं ॥१॥
मनुष्याचें हित । जनार्दनास्थित ॥
होतें विष्कळीत । पापयोगें ॥२॥
नरकीं निश्चय । वास त्याचा होय ॥
उद्धार न जाय । जया यासीं ॥३॥
तया गति ऐसी । ऐकतो मवासी ॥
नको दशा तैसी । तुका ह्मणे ॥४॥

॥७२७९॥
महा पापी पुरे आचरण खरें । त्रिभुवन विसरे जयालागीं ॥१॥
कटकटा वोखटी बुद्धि हे नकटी । आह्मी निश्चय पाठीं जीच्या बैसों ॥
कीं या राज्यलोभा टाळू पुण्य स्तंभा । स्वजन वधारंभा प्रवर्त्तलों ॥३॥
तुका ह्मणे क्रोध आलिया शिरच्छेद । कीजे परी वेळ नको ऐसी ॥४॥

॥७२८०॥
जरी मी नि:शस्त्र उगा माझें गात्र । फाडिती हे अस्त्र घालूनियां ॥१॥
अवघे वरवाळे छेदो माझे गळे । परी मी नातळे विकल्पासी ॥२॥
कल्याण हें मज दीसे आज । तुका ह्मणे काज हेंचि बोले ॥३॥

॥७२८१॥
कुरुपती लागीं संजय प्रसंगीं । वदेकीं अवघी वार्त्ता ऐसी ॥१॥
बोलोनी साकल्य पार्थिवा वैकल्य । द्यावया कैवल्य वांछी शांति ॥२॥
बाणेसी कमान हातींची सोडून । उगा तो आपण स्वस्थ बैसे ॥३॥
शोकें जाजावला विव्हळ  चित्ताला । मोहें कवळीला तुका ह्मणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP